पुरंदरची लढाई - फत्तेखानाचा पराभव

#शिवरायांचीयुद्धनीती लेखांक : 5

विवेक मराठी    27-Sep-2023   
Total Views |
अठरा वर्षांचे शिवराय. युद्धांचा अनुभव नाही, दादोजी कोंडदेवांसारखा अनुभवी वडील माणूस गेलेला, तीर्थरूप वडिलांना अपमानास्पद अटक असा सर्वत्र चिंतेचा अंधार दाटला होता. परंतु अशा बिकट परिस्थितीतही महाराजांनी फत्तेखानाशी लढण्याचा धाडसी निर्णय घेतला. शत्रूला आपल्या प्रांतात शिरू न देता त्याच्याच प्रांतात युद्ध करायचे, जेणेकरून आपल्या प्रदेशाची नासाडी होणार नाही. त्यासाठी त्यांनी ठिकाण निवडले ’किल्ले पुरंदर’! शिवरायांची पहिलीच लढाई होती. कोणताही युद्धानुभव नसताना ह्या लढाईत महाराजांनी विजय मिळवला होता.
फोटो सौजन्य : google

shivaji maharaj 
प्रस्तावना :

स्वराज्यनिर्मितीसाठी शिवरायांसमोर आव्हाने होती ती मुघल, आदिलशहा अशा प्रमुख सत्ताधीशांची आणि पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच अशा पाश्चिमात्य शक्तींची. जंजिर्‍याचा सिद्दीशी आणि पातशहांच्या चाकरीत मुजोर झालेल्या काही मराठे सरदारांशीही त्यांचा उघड सामना होता. स्वराज्य संस्थापनेच्या आड येणार्‍या ह्या सर्व शत्रूंना साम-दाम-दंड-भेद अशा सर्व नीतींचा वापर करून पराभूत करणे हेच शिवरायांचे लक्ष्य होते. केवळ सत्तेच्या लालसेपोटी लढायांसाठी लढाया असे विचार त्यांच्या मनाला शिवलेसुद्धा नाहीत. स्वराज्यासाठी लढाया अटळ असल्या, तरी जमेल तितकी युद्धे, नरसंहार थांबवणे, सर्वसामान्यांच्या संपत्तीचा विध्वंस टाळणे यासाठी ते प्रयत्नशील होते. परंतु शत्रूला नामोहरम करण्यासाठी आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी प्रत्येक लढाईत नवनवीन डावपेच आखले. रणक्षेत्राचा आणि तेथील भौगोलिक, नैसार्गिक बाबींचा अभ्यास, शत्रुसैन्याची व स्वबळाची, शस्त्रास्त्रांची गणिते, शक्ती आणि युक्तीचा सुयोग्य वापर अशा प्रकारे शिवरायांनी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण युद्धनीती तयार केली. सह्याद्रीच्या दुर्गम क्षेत्राचा उपयोग करून गनिमी काव्याचे तंत्र विकसित केले. शिवरायांच्या प्रत्येक मोहिमा या त्यांच्या रणकौशल्याचे विविध पैलू दर्शवतात. हे पैलू कोणत्याही देशाची अंतर्गत आणि सीमा संरक्षणाची व्यवस्था कशा असाव्यात, ह्याचे मार्गदर्शन करतात. ‘शिवकल्याण राजा’ या लेखमालेतील या भागात शिवचरित्रातील काही प्रमुख लढाया आपण समजून घेणार आहोत. आजच्या अधुनिक तंत्रविज्ञान युगात संरक्षण व्यवस्थेचे, युद्धाचे तंत्रज्ञान जरी बदलले असले, तरी शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यास हा राष्ट्रसंरक्षणासाठी सदैव नि:संशय प्रेरणादायक ठरेल.
शहाजीराजांनी आपल्या उजाड झालेल्या पुणे जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी शिवबांसह जिजाऊसाहेबांना बंगळूरहून पुण्याला पाठवले. त्यांच्याबरोबर दादोजी कोंडदेवांसारखे निष्णात कारभारी दिले. दादोजींनी पुण्याला पुन्हा वसवण्यासाठी सुरुवात केली. सुरुवातीला जहागिरीची व्यवस्था लावण्यासाठी शिवरायांची घोडदौड सुरू झाली. पण मावळातून फिरताना त्यांना व त्यांच्या सवंगड्यांना स्वराज्याची स्वप्ने पडू लागली. 1646 साली शिवरायांनी आदिलशहाचा भोर प्रांतातला तोरणा हा बेवसाऊ किल्ला घेतला. राजगड बांधायला घेतला. प्रत्यक्ष बंड न करता अत्यंत सावधगिरीने राजे पाऊल टाकत होते. मार्च 1647मध्ये दादोजी कोंडदेवांचे देहावसान झाले आणि त्यानंतर लगेच शिवरायांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला. आता शिवरायांनी उघड उघड आदिलशहाची ठाणी बळकावायला सुरुवात केली. शिरवळचे ठाणे काबीज केले. दक्षिणेतही शिवरायांचे वडीलबंधू शंभूराजे आदिलशाहीविरुद्ध अशाच प्रकारे छुपे उद्योग करीत होते. ह्या दोन्ही मुलांना शहाजीराजांची फूस आहे, दक्षिणेतील हिंदू राजांना त्यांची मदत आहे अशा सर्व बाबी मुहम्मद आदिलशहाला अडचणीच्या होत्या. शहाजीराजे व त्यांच्या दोन्ही मुलांना पायबंद घालण्यासाठी विजापूरच्या हालचाली सुरू झाल्या. आदिलशाहाने शहाजीराजांना मुस्तफा खानाकरवी 25 जुलै 1648 रोजी कैद केले. फर्रादखानाला शंभूराजांवर पाठवले आणि शिवरायांचा पाडाव करण्यासाठी फत्तेखान खुदावंतखानाची नेमणूक झाली. मावळातल्या देशमुखांना फत्तेखानाला सामील होण्याची फर्माने निघाली. उत्रावळीचे केदारजी खोपडे ह्यांनाही असेच फर्मान आले (दि. 8 ऑगस्ट 1648). फर्मान मिळताच आपल्या शिबंदीसह खानाला मिळावे व त्याच्या आज्ञेत राहावे, चुकारपणा केल्यास परिणाम चांगला होणार नाही, अशी धमकीच फर्मानातून दिली. शहाजीराजांच्या कुटुंबावर चहूबाजूंनी संकटांची रांगच लागली.
 
 
अठरा वर्षांचे शिवराय. युद्धांचा अनुभव नाही, दादोजी कोंडदेवांसारखा अनुभवी वडील माणूस गेलेला, तीर्थरूप वडिलांना अपमानास्पद अटक आणि तशात स्वराज्याच्या उद्योगाला नुकतीच केलेली सुरुवात. सर्वत्र चिंतेचा अंधार दाटला. शिवरायांसमोर पर्याय दोनच होते - मिळवलेले सर्व देऊन संपूर्ण शरणागती पत्करायची किंवा सर्व ताकदीनिशी फतेखानाशी झुंज घ्यायची.
 
 
परंतु अशा बिकट परिस्थितीतही महाराजांनी फत्तेखानाशी लढण्याचा धाडसी निर्णय घेतला. समोर उभ्या राहिलेल्या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून शिवरायांनी पहिले पाऊल उचलले, ते म्हणजे शत्रूला आपल्या प्रांतात शिरू न देता त्याच्याच प्रांतात युद्ध करायचे, जेणेकरून आपल्या प्रदेशाची नासाडी होणार नाही. त्यासाठी त्यांनी ठिकाण निवडले ’किल्ले पुरंदर’. पुरंदर राजांच्या मुलुखाच्या सीमेबाहेर होता. पुण्यापासून आग्नेयेला साधारण 20 मैलांच्या अंतरावर. पुरंदरच्या वायव्येला 14 मैलांवर कोंढाणा, पश्चिमेला 20 मैलांवर राजगड आणि गडापासून 6 मैलांवर सासवड. गडाच्या पश्चिमेला डोंगराळ भाग, तर पूर्वेला सपाटी. उंची आणि विस्तार दोन्हीत पुरंदर उजवा. भरपूर धान्य-दारूगोळा साठा असेल, तर गड कितीही काळ लढू शकेल असा भक्कम. पण हा किल्ला त्या वेळी शिवरायांकडे नव्हता, आदिलशहाकडेच होता. शहाजीराजांचे जुने स्नेही महादजी नीळकंठराव सरनाईक पुरंदरचे पिढीजात किल्लेदार होते. वृद्धपणात मुलांच्या आपापसांतील भाऊबंदकीने ग्रस्त होते. शिवरायांनी अशा परिस्थितीत पुरंदरात सैन्यासह प्रवेश केला, पण प्रत्यक्ष पुरंदर न घेता महादजींची परवानगी मिळवली. फत्तेखान इंदापूर-बारामती-जेजुरी मार्गाने पुढे येत सासवडनजीक बेलसरला थांबला.
 

shivaji maharaj 
 
कोंढाणा घ्यायचा त्याचा मनसुबा होता. पण शिवरायांनी स्वत:कडे असलेल्या मावळमुलखाच्या पुढे येऊन पुरंदरावर मुक्काम ठोकल्यामुळे तो गडबडला. नाइलाजाने त्याला बेलसरला उघड्यावर छावणी टाकावी लागली.
 
 
शिवरायांचा स्वत:चा लढायचा अनुभव कमी होता, तसाच सैन्यातील मराठी मावळ्यांचा. मावळातील अठरापगड जातीची स्वराज्याच्या प्रेरणेने वेडावलेली माणसे ती. नाही म्हणायला मोसे खोर्‍याचे देशमुख बाजी पासलकर हेच वयाने व अनुभवाने वडील. मावळातील शिळीमकर, बाजी जेधे, बाबाजी झुंजारराव, बाजी बांदल शिबंदी घेऊन महाराजांना सामील झाले होते. शिवाय महाराजांचे जिवाभावाचे सवंगडी गोदाजी जगताप, भिकाजी चोर, संभाजी काटे, भीमाजी वाघ, भैरोजी आणि कावजी मल्हार, शिवाजी इंगळे सोबत होते. फत्तेखानाकडे सुमारे चार-पाच हजार सैन्य होते. त्याने पहिल्यांदा शिरवळचे ठाणे घेण्यासाठी बाळाजी हैबतरावाला फाजलशाह आणि आशफशाह या दोन मातबरांबरोबर पाठवले. फत्तेखानाच्या हालचाली कशा असतील याबाबतचा शिवरायांचा अंदाज अचूक ठरला. शिरवळला सुभानमंगळ हा भुईकोट किल्ला होता. मोठी गढीच ती. काहीही प्रतिकार होऊ न देता त्यांनी शिरवळ बाळाजीच्या ताब्यात जाऊ दिले. त्यामुळे बाळाजीही अभिमानाने फुगून बेसावध झाला आणि तिकडे फत्तेखानही. त्याला शिवरायांच्या योजनेची कल्पनाच नव्हती. बेलसर आणि शिरवळ अशा दोन ठिकाणी खानाची फौज विभागली गेली.
 
 
वेगवेगळ्या ठिकाणी लागोपाठ हल्ला करणे आता शिवरायांना सोपे होते. त्यांनी पहिली चाल केली सुभानमंगळवर. पुरंदरच्या पायथ्याहून निघून कावजी मल्हार जातीने गोदाजी, भिमाजी, संभाजी, इंगळे, भिकाजी नि भैरोजी यांच्याबरोबर भल्या सकाळी शिरवळवर चालून गेला. हैबतरावाच्या सुस्तावलेल्या सैन्याला सावरायला वेळही न देता सुभानमंगळच्या कोटालाच ते भिडले. खणती लावून तटाला खिंडार पाडले आणि आत शिरले. हैबतरावाचे सैन्य बिथरले. कावजीने हैबतरावाला भाल्याने ठार केले. सैन्याने नांगी टाकली. शस्त्रे, घोडे, खजिन्यासह सुभानमंगळ बघता बघता ताब्यात आला.
 
 
shivaji maharaj
 
दुसर्‍या बाजूस पुरंदरहून महाराजांनी बाजी पासलकरांच्या नेतृत्वाखाली दुसरी तुकडी बेलसरला धाडली. फत्तेखानाच्या छावणीवरच थेट हल्ला केला. अनपेक्षित हल्ल्याने थोडा काळ खानाचे सैन्य बिथरले, पण लगेच सावरून लढाईला सामोरे गेले. फत्तेखानाच्या तुलनेत महाराजांचे सैन्य अगदीच कमी होते. बांदलाच्या तुकडीकडे सैन्याचा झेंडा होता. खानाच्या सैन्याने या निशाणाला वेढले. ज्याच्याकडे निशाण होते, तो घोडेस्वार जखमी झाला. प्रसंग ओळखून जवळ असलेल्या बाजी जेधेने घोडेस्वार आणि निशाण ताब्यात घेतले व लगेच माघार घेत पुरंदरच्या दिशेने कूच केली. ताबडतोब सर्व मराठे लढाई सोडून मागोमाग पळू लागले. फत्तेखानाच्या सैन्याला अचानक मराठ्यांनी घेतलेल्या पवित्र्याचा अंदाजच आला नाही. त्यांनी त्वेषाने मराठ्यांचा पाठलाग सुरू केला. मराठे घाईघाईने पुरंदरावर चढले. त्यांना आत घेऊन गडाचे दरवाजे बंद झाले.
 
 
पाठलाग करणारी फत्तेखानाची सेना पुरंदरच्या पायथ्याशी आली. शिरवळचा पराभव खानाच्या जिव्हारी लागला होता. तशातच अचानक छावणीवर झालेल्या हल्ल्यामुळे तो चिडलेला होता. त्याने पुरंदरवर चढाई करण्यासाठी मुसेखानाला आघाडीला ठेवले. उजवीकडे मताजी घाटगे आणि डावीकडे निंबाळकर ठेवून तो स्वत: सर्वात मागे राहिला. त्याचे सैन्य गडावर चढू लागले. ते टप्प्यात येताच मराठ्यांनी वरून दगडगोट्यांचा व बाणांचा वर्षाव सुरू केला. चढताना होणारी दमछाक आणि मराठ्यांचा वरून होणारा मारा या दोहोंमध्ये खानाची फौज पुरती घायाळ झाली. त्याचा फायदा उठवत लगेच महाराजांनी गडाचा दरवाजा उघडला. ताज्या दमाचे मराठे त्वेषाने खानाच्या फौजेवर तुटून पडले. सदोजी, भैरोजी आणि भिमाजीने अशरफखानासह इतर सरदारांना घेरले. गोदाजी जगताप थेट मुसेखानावर चालून गेला आणि भाल्याने त्याला जखमी केले. तशाही अवस्थात तो लढत होता. दोघेही जेरीला पेटले. शेवटी गोदाजीने मुसेखानाच्या खांद्यावर वार करत त्याला उभा चिरला. मुसेखानच पडल्यामुळे अशरफखान, मीनादखान, रतनशाह व घाटगे, सगळेच जण एकामागोमाग पळत सुटले. पळणार्‍या फतेखानाच्या सैन्याचा मराठ्यांनी सासवडपर्यंत पाठलाग केला. पाठलाग करताना झालेल्या चकमकीत बाजी पासलकर धारातीर्थी पडले. फत्तेखानाचा धुव्वा उडाला. पराभूत होऊन त्याने थेट विजापूर गाठले.
 
 
पुरंदर-बेलसरची ही लढाई शिवरायांची पहिलीच लढाई होती. कोणताही युद्धानुभव नसताना आणि सैन्यबळ कमी असतानाही ह्या लढाईत महाराजांनी विजय मिळवला होता. त्यामागे त्यांची असामान्य बुद्धिमत्ता व युक्तिसामर्थ्य होते. बराच काळ चालणार्‍या मोहिमांना, पारंपरिक युद्धशैलीला शिवरायांनी अत्यंत शीघ्र गतिमानतेचा नवा आयाम दिला. शत्रूच्या मनाचा आणि विचारांचा योग्य अभ्यास करून आपल्याला पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथे आणि पाहिजे तसे शत्रूला हालचाली करायला भाग पाडणे हे या लढाईत शिवरायांनी यशस्वीरित्या साधलेले होते. शिरवळला आणि बेलसरला सपाट मैदानावर, तसेच पुरंदरच्या डोंगराळ भागात दोन्ही प्रकारे महाराजांनी ह्या लढाईचे नियोजन केले. शत्रूला बेसावध करणे, त्याला गोंधळवून टाकणे, अकस्मात समोर येणे असे अनेक पवित्रे महाराजांनी उपयोगात आणले. शत्रूचे सैन्य दुभागून वेगवेगळे हल्ले चढवणे, ऐन वेळी माघार घेत शत्रूला आपण निवडलेल्या दुर्गम रणक्षेत्री आणून, त्याला दमवून, ताज्या दमाने त्याच्यावर प्रतिहल्ला करणे अशा डावपेचांनी महाराजांनी फत्तेखानाला धूळ चारली.
 
 
महाराजांनी या पहिल्याच लढाईत पराक्रम गाजवणार्‍या सर्व वीरांचा सन्मान केला. बाजी पासलकरांच्या धाकट्या भावाला, कृष्णाजी यशवंतरावाला देशमुखीचे वतन दिले. बाजी जेधेला ‘सर्जेराव’ हा किताब दिला. बाजी बांदल याला भाणसदरे व पर्‍हे गावाचे इनाम दिले.
 
 
पुरंदरच्या लढाईचे मोठे परिणाम झाले. शिवरायांच्या रूपाने आदिलशाहीला एक रणकुशल व बुद्धिमान शत्रू मिळाला. आता शिवरायांचे स्वराज्य केवळ पोराटोरांचे बंड राहिले नाही, तर मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्धच सुरू झाले. आदिलशाहीविरुद्ध महाराजांचे युद्ध आता बराच काळ चालणार, हे अधोरेखित झाले. शिवरायांनी शहाजीराजांची सुटका होण्यासाठी आदिलशहावर मुघली सामराज्याचा दबाव यावा याकरिता शहजादा मुरादबक्षशी संधान बांधण्याची कूटनीती साधली. त्यायोगे फत्तेखानाच्या पराभवामुळे आदिलशहाविरुद्ध लढण्यासाठी शिवरायांना मुघल साम्राज्याचे सहकार्य मिळाले, जे सुरुवातीच्या काळात आवश्यक होते. शिवरायांच्या ताब्यातील मुलुखाला आदिलशहाची मान्यता मिळाली. अठरापगड जातीच्या मराठी मावळ्यांना एक नवा आत्मविश्वास मिळाला. स्वराज्य म्हणजे एक स्वप्न नाही, तर सत्यात साकारणारा एक नवा आधार आहे, ही मराठी मुलखाला जाणीव झाली. अपमानाने आणि अत्याचाराने पीडित रयतेला वाली सापडला. शिवरायांबद्दल मावळ मुलखात जिव्हाळा निर्माण झाला.
 
 
शिवचरित्राशी संबंधित बखरींमध्ये शहाजीराजांच्या कैदेचे वर्णन आले, तरी फत्तेखानाच्या स्वारीची माहिती मिळत नाही. जेध्यांचा या युद्धात प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे जेधे शकावलीत व जेधे करिन्यात या संदर्भातील नोंदी येतात. शिवभारत या ग्रंथात मात्र कवींद्र परमानंदांनी या लढाईसंबंधी विस्तृत तपशील दिला आहे. फार्शी साधनांमध्ये शहाजीराजांची कैद दिसत असली, तरी फत्तेखानाच्या लढाईचे स्पष्ट उल्लेख सापडत नाहीत. पुरंदरची ही लढाई कधी झाली याची तिथी साधनांमध्ये मिळत नाही. तरी इतर संबंधित नोंदीनुसार ती बहुधा ऑक्टोबर-नोव्हेंबर 1648मध्ये झाली असावी, असे वाटते.
 
 
एक मात्र नक्की - पुरंदर-बेलसरची ही लढाई शिवरायांच्या रणकौशल्याची आणि युद्धनीतीची नांदी ठरली.

रविराज पराडकर

 
रविराज पराडकर हे  इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.