संघसमर्पित, अद्वितीय लोकसंग्राहक - पी.पी. मुकुंदन

विवेक मराठी    29-Sep-2023   
Total Views |
एका संघप्रचारकाला श्रद्धांजली वहायला केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री पिन्नाराय विजयन येतात, फक्त येतात असं नाही, तर “गेलेली व्यक्ती संघटन कसं करावं ह्याचा आदर्श होती” असेही गौरवोद्गार काढतात. त्याच कार्यक्रमात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सी. दिवाकरन “त्यांचा संघ मला हवाहवासा वाटतो’ म्हणतात, केरळचे राज्यपाल दिवंगत संघप्रचारकांबद्दल गौरवोद्गार काढतात! आणि गेलेली व्यक्ती असते संघाचे माजी ज्येष्ठ प्रचारक आणि केरळ भाजपाचे माजी संघटनमंत्री ’पी.पी. मुकुंदन’ म्हणजे आमचे मुकुंदएट्टन!

P Mukundan
नित्य सिद्ध संघस्वयंसेवक हे वेगळं रसायन असतं. त्यातही संघप्रचारक म्हटलं की एकूण ती व्यक्ती, त्या व्यक्तीच्या कामाचं स्वरूप ह्या सगळ्यामागे एक ’ऑरा’ येतो. कुशल संघटक, उत्तम शारीरिक, मानसिक, बौद्धिक बैठक आणि सामाजिक विषयांवर, प्रश्नांवर कामातून आलेल्या अनुभवांची मांड असते. संघात ’आदर्श’ संघप्रचारक मंडळींची मोठी यादी, परंपरा आहे. अनेक नावं घेता येतील, त्यातली ज्ञात आणि प्रसिद्ध नावं कुणीही सांगू शकेल; पण कधी एका संघप्रचारकाच्या शोकसभेत कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री ’गेलेली व्यक्ती एक आदर्श संघटक होते’ अशी आदरांजली वाहतात, हे ऐकलंय का? कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ’गेलेली व्यक्ती म्हणजे संघ असेल तर हा संघ मला हवाहवासा वाटतो’ असं वक्तव्य करते, हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? मला माहितीये, तुम्ही म्हणाल, ‘’छे! कसं शक्य आहे?” पण ते शक्य झालंय. एका संघप्रचारकाला श्रद्धांजली वहायला केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री पिन्नाराय विजयन येतात, फक्त येतात असं नाही, तर “गेलेली व्यक्ती संघटन कसं करावं ह्याचा आदर्श होती” असेही गौरवोद्गार काढतात. त्याच कार्यक्रमात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सी. दिवाकरन “त्यांचा संघ मला हवाहवासा वाटतो’ म्हणतात, केरळचे राज्यपाल दिवंगत संघप्रचारकांबद्दल गौरवोद्गार काढतात! आणि गेलेली व्यक्ती असते संघाचे माजी ज्येष्ठ प्रचारक आणि केरळ भाजपाचे माजी संघटनमंत्री ’पी.पी. मुकुंदन’ म्हणजे आमचे मुकुंदएट्टन!
 
 
सहसा व्यक्ती गेल्यावर त्या व्यक्तीच्या जवळचे लोक, नातेवाईक, मित्रमंडळी त्या व्यक्तीविषयी चांगलंच बोलतात. पण त्या व्यक्तीच्या विचारधारेच्या विरुद्ध असणारे लोकही त्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलतात, तेव्हा ती व्यक्ती खरोखर वेगळी ठरते! मुकुंदएट्टन त्याला अपवाद नव्हते. मुकुंदएट्टन संघआदर्शाचा चालताबोलता स्रोत होते. केरळ प्रांतातील संघ आणि भाजपा ह्यांचा इतिहास बघितला, तर ह्या दोन्ही संघटनांची पाळंमुळं घट्ट रोवण्यात ज्या व्यक्तींनी आपलं आयुष्य समर्पित केलं, त्यात मुकुंदएट्टन ह्यांचं नाव फार वरती मोजावं लागेल! मुकुंदन ह्यांचं कार्य खूप मोठं होतं ते कसं, विविध क्षेत्रांत कसं होतं, त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं होतं, ते बघू या.
 
 
 
व्यक्तिमत्त्व
 
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे माजी राज्य संघटन सचिव पी.पी. मुकुंदन यांनी आपल्या मागे एक अतुलनीय वारसा सोडला आहे. अभूतपूर्व, एकमेवाद्वितीय असा नेता! मुकुंदन हे केरळच्या राजकारणातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं, केव्हा? जेव्हा भाजपा राष्ट्रीय राजकारणात आणि केरळच्या प्रादेशिक राजकारणात एक किरकोळ ताकद होती. इतर संघप्रचारकांना ज्या दिव्यातून जावं लागतं, तसंच त्यांनाही राज्यात मार्क्सवाद्यांशी विलक्षण हिंसक चाललेलं भांडण सहन करावं लागलं. अगदी पहिलाच किस्सा म्हणजे मुकुंदन ह्यांच्याकडे जेव्हा शाखेची जबाबदारी आली, तेव्हा शाखा लावायला विरोध करणार्‍या कम्युनिस्ट साम्यवादी नेत्याच्या घरी मुकुंदन थेट धडकले आणि सरळ, ‘’मला इथे शाखा लावायची आहे, लहान मुलं तासभर खेळतात आणि निघून जातात, ह्यात तुम्हाला काय आक्षेप आहे? कृपया शाखेला विरोध करू नका” अशी थेट आणि खमकी भूमिका घेतली. एखाद्या संघस्वयंसेवकाकडून त्या कम्युनिस्ट नेत्याला अशी भूमिका अपेक्षित नसावी आणि म्हणून त्यांनी मुकुंदन ह्यांना शाखा लावायची परवानगी दिली. त्यांच्या वरच्या कम्युनिस्ट नेत्यांच्या - सी. दिवाकरन ह्यांच्या कानावर गोष्ट गेली. त्यांनी त्या स्थानिक नेत्याला विचारलंही की “काय करताहात तुम्ही? संघकार्यकर्त्याला कशी काय परवानगी दिलीत, तेही शाखा लावायला?” तो कार्यकर्ता मात्र ठाम राहिला, कारण मुकुंदन ह्यांची संघकार्यावरील जबरदस्त निष्ठा त्याला प्रभावित करून गेली. स्वतः दिवाकरन ह्यांनी मुकुंदन ह्यांच्या शोकसभेत हा किस्सा सांगितला.
 
 
1946मध्ये कन्नूरमधील मनथरा येथे जन्मलेले मुकुंदन शालेय शिक्षणानंतर पूर्णवेळ संघकार्यकर्ता बनले. 1965मध्ये ते कन्नूरमध्ये प्रचारक झाले. आणीबाणीच्या काळात त्यांना त्रिशूर येथून अटक करण्यात आली आणि 21 महिने तुरुंगवास भोगावा लागला. 1991मध्ये भाजपा केरळचे संघटक सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा आणि संघपरिवाराच्या कार्यकर्त्यांच्या जवळपास सर्व पिढ्या मुकुंदन ह्यांना प्रेमाने आणि आदराने ’मुकुंदएट्टन’ म्हणून संबोधतात. कार्यकर्त्यांसाठी त्यांची निव्वळ उपस्थितीच आश्वासक असायची. ते फक्त कठीण काळातच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, तर भाजपा आणि संघपरिवाराच्या कार्यकर्त्यांना राजकीय विरोधक आणि पोलिसांकडून घेरले जात असताना त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आपले राजकीय कौशल्य आणि संपर्कदेखील वापरला. भाजपाची उपस्थिती केरळात किरकोळ असतानाही भाजपाचं कार्यालय हवं, कायमस्वरूपी इमारत हवी, पक्षाला बेसिक लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, पक्षनिधीचं महत्त्व जाणून तो जमा करणं, पर्यायाने भाजपाचा बेस तयार करणं ह्याचं श्रेय मुकुंदन ह्यांच्याकडे जातं. केरळात राजकीय हिंसाचारात जेव्हा कार्यकर्त्यांचा मृत्यू होत असे, तेव्हा त्या कार्यकर्त्याच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला पक्षाकडून जास्तीत जास्त पाठिंबा आणि सहकार्य मिळेल, ह्याची मुकुंदनजी खात्री करत असत.
 
 
P Mukundan
 
मुकुंदन ह्यांचा ऑरा जबरदस्त होता. कला क्षेत्र, चित्रपट क्षेत्र हे तसं संघपरिवाराला अनुकूल नसलेलं क्षेत्र आहे, पण तरीही केरळ चित्रपटसृष्टीतले मोहनलालसारखे आघाडीचे कलाकार ते अगदी छोटे कलाकार इथपर्यंत मुकुंदन ह्यांना मानणारे होते. एका जाहीर कार्यक्रमात तर प्रसिद्ध दाक्षिणात्य गायिका चित्रा ह्यांनी मुकुंदन ह्यांना वाकून चरणस्पर्श केला होता. आपल्याकडे ही फार सामान्य गोष्ट असली, तरीही केरळात वाकून चरणस्पर्श करून नमस्कार करण्याची पद्धत नाही, तो फक्त अपवादात्मक स्थितीत, सर्वोच्च मान देण्यासाठी असतो, ह्यावरून मुकुंदन ह्यांचं व्यक्तिमत्त्व किती मोठं होतं, ह्याची कल्पना येऊ शकेल.
 
 
हाडाचे हिंदुत्ववादी संघकार्यकर्ता
 
 
मुकुंदन हाडाचे संघकार्यकर्ता होते. त्यामुळे त्यांचा संपर्क संपूर्ण कुटुंबाशी असायचा. नागपुरात अशा संपर्काला ‘थेट घराच्या चुलीपर्यंत संपर्क’ म्हणतात, अगदी तसाच चुलीपर्यंत त्यांचा संपर्क असायचा. मुकुंदन ह्यांना जवळून ओळखणारे अनेक लोक सांगतात की मुकुंदन घरी येणार, म्हणून घरातल्या मातृशक्ती त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना अगदी आनंदाने आग्रहपूर्वक खायला घालायच्या. संघटन शिस्त आणि हिंदुत्व ह्या बाबतीत मुकुंदन फार आग्रही होते. काही कारणांनी आणि स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी 2007 साली काही वर्षांसाठी भाजपामधून काढता पाय घेतला, त्याचबरोबर ते प्रचारक म्हणूनही थांबले. ह्या काळात एलडीएड, यूडीएफ ह्यांच्या स्थानिक ते सर्वोच्च सगळ्या स्तरांवरून त्यांना आपल्या पक्षात घ्यायला प्रयत्न केला गेला, त्याला ते बधले नाहीत; इतकंच कशाला, त्यांनी संघाबद्दल, परिवाराबद्दल उलट काही बोलावं म्हणून मीडिया सतत टपलेला असायचा, तरीही त्यांनी संघावर एक चकार टीकास्त्र सोडलं नाही. काही संघकार्यकर्त्यांनी स्थानिक भाजपा नेत्यांच्या कार्यशैलीवर टीका करणारे फेसबुक लेख लिहिले, जे व्हायरल झाले, अगदी स्थानिक माध्यमांनी डोक्यावर घेतले, त्यांनाही ’तुमचा मुद्दा रास्त असला, तरीही पब्लिक प्लॅटफॉर्म हा तो मांडायची जागा नाही, आपली भूमिका स्पष्ट करणारा प्रतिलेख लिहायला घ्या’ असा सूचनावजा प्रेमळ सल्ला देणारा पहिला फोन त्यांचा होता. विचार करा, तुम्ही एखाद्या संघटनेतून नाराज होऊन बाजूला झालात, तरीही तुम्ही त्यावर जाहीर टीका करत नाही, दुसर्‍या संघटनेत/पक्षात जात नाहीत, भरीस भर म्हणून तुम्ही तरुण कार्यकर्त्यांना देखील सार्वजनिक टीका करण्यापासून रोखता.. कारण ‘पक्ष आणि संघटन शिस्त सर्वोच्च’ ह्या तुमच्या नसानसात भिनलेल्या संघसंस्कारांमुळे. आजच्या राजकारणाचा विचार करता किती दुर्मीळ गोष्ट आहे ही! सेवाभारती केरळमध्ये सुरू करण्यात मुकुंदन ह्यांचे फार मोठे योगदान होते.
 


P Mukundan 
 
हिंदुहितासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन जमेल ते करणं ही मुकुंदन ह्यांची खासियत होती. गुजरातमध्ये 2002मध्ये गोध्राबाबत जे घडलं, तेच 2003मध्ये केरळमधील कोळीकोड जिल्ह्यातील माराड गावात घडलं! मुस्लीम लीगच्या गुंडानी 9 हिंदू मासेमारांची निघृण हत्या केली, दंगली भडकल्या, त्यात हिंदू होरपळला गेला. हिंसा थांबायचं नाव घेत नव्हती, तेव्हा मुकुंदन ह्यांनी स्वत: कोळीकोडला जाऊन इंडियन युनियन मुस्लीम लीगचे सर्वोच्च नेते सैय्यद मोहम्मदअली शियाब थंग्गल ह्यांची भेट घेतली. असं म्हणतात की ही भेट व्हावी, म्हणून काँग्रेसचे नेते ए.के. अँटोनी ह्यांनी पडद्यामागून प्रयत्न केले. काहीही करून दंगल थांबायलाच हवी ह्यावर मुकुंदएट्टन आणि मोहम्मदअली शियाब थंग्गल ह्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर दंगल आटोक्यात येऊन सामाजिक सौहार्द पूर्ववत होण्यात मदत झाली. त्या वेळी ती भेट प्रचंड गाजली होती. भाजपाच्या कुठल्याही नेत्याने मुस्लीम लीगच्या नेत्याशी थेट घेतलेली कदाचित ती पहिलीच भेट असावी. 70-80 च्या दशकात केरळमधील त्रिशूर येथील प्रसिद्ध वडकुनाथन मंदिर परिसरात ’त्रिशूर पुरम’दरम्यान ’हिंदू महासंगम’ आयोजित करता यावा, ह्याकरिता मुकुंदएट्टन त्रिशूरच्या तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना भेटले. पण जिल्हाधिकार्‍यांनी हिंदू महासंगमला परवानगी नाकारली. त्यानंतर मुकुंदन थेट केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री के. करुणाकरन ह्यांना थिरुवनंतपुरम येथे जाऊन भेटले. त्यांच्या समक्ष करुणाकरन ह्यांनी त्या जिल्हाधिकार्‍यांना फोन करून ’तुम्ही मला कार्यक्रमाला परवानगी नाकारायची कारणं देण्यापेक्षा तो कसा होऊ शकेल ह्याची कारणं दिलीत, तर आवडेल’ असा फोन केला. गंमत बघा, आज ही गोष्ट सोपी वाटेल, पण सत्तर-ऐंशीच्या दशकात केरळला भाजपाची काहीही ताकद नसताना मुकुंदन ह्यांनी कार्यक्रमाला परवानगी मिळवली होती. हिंदुहित ह्यात कुठल्याच प्रयत्नांची कसर नको, हा त्यांचा मूलमंत्र होता.
 

P Mukundan 
 
 
‘मुकुंदन ह्याच्या जाण्याने संघपरिवाराची कधीही भरून न निघणारी हानी झाली’ हे सारखं वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य मी वापरणार नाही. पण काही व्यक्तींच्या जाण्याने संघटना आणि समाज काहीतरी गमावतो, ते दृश्य स्वरूपात जितकं दिसतं, त्याहून अधिक अदृश्य स्वरूपात अधिक खोल असतं! रा.स्व.संघ, संघपरिवार ही अलौकिक कार्यकर्ता घडवणारी खाण आहे. त्या खाणीतले अनेक हिरे प्रसिद्ध आहेत. अनेक हिरे, हिरे असले तरीही माहीत नसणारे आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्वीट केल्यावर माझ्या ओळखीतल्या लोकांनाही प्रश्न पडला की कोण हे मुकुंदन? तर मुकुंदन ह्या अलौकिक हिर्‍याची जगाला ओळख व्हावी, ह्यासाठी हा लेखप्रपंच होता.
 
 
परमेश्वर मुकुंदएट्टन ह्यांच्या गतात्म्यास सद्गती देवो.
श्रीराम!

प्रसाद देशपांडे

प्रसाद देशपांडे, बाय प्रोफेशन SAP आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आहे. एका MNC त गेली आठ वर्ष काम करत आहेत,  कामाचं क्षेत्र मिडलईस्ट, सौदी, बहरीन, युएई हे आहे. गेली 3, 3.5 वर्ष ह्याच भागात वास्तव्य होतं. टेक्नलॉजी, भारतीय राजकारण, राजकीय विश्लेषण, सायबर सिक्युरिटी, इस्लाम, आंतरराष्ट्रीय राजकारण मुख्यतः मध्यपूर्व हे माझे डोमेन एक्सपर्टीस आहेत. फ्रिलान्सिंग ब्लॉगिंग आणि वृत्तपत्र लिखाणाची आवड.