चौदहवी का चाँद हो

विवेक मराठी    30-Sep-2023   
Total Views |
Waheeda  Rehman 
वहिदा रहमान हिचा अभिनय अत्यंत नैसर्गिक आणि सहज आहे. दिलेली भूमिका कोणत्याही वादात न पडता समरसून निभावणे हे तिच्या यशस्वी कारकिर्दीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. कामे मिळवण्यासाठी कोणतीही तडजोड न करणारी आणि प्रसिद्धीचा मोह न बाळगता योग्य वेळेला निवृत्त होणारी वहिदा रहमान ही अभिनेत्रींसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. अशा या गुणवान व्यक्तिमत्त्वाला या वर्षीच्या दादासाहेब फाळके या चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने गौरवले गेले आहे.
तिच्या सौंदर्याने तीन पिढ्यांना वेड लावले. या सौंदर्याचे रहस्य काय आहे असे जेव्हा वहिदाला एका मुलाखतीत विचारले, तेव्हा तिचे उत्तर होते, “योग्य मेकअप, योग्य प्रकाश आणि परिपूर्ण कॅमेरा. कॅमेरा माझ्यावर मेहेरबान होता.” ती म्हणाली. हा कॅमेरा मला मिळाला असता तर! असे किती जणांना तेव्हा वाटले असेल.
 
 
करमणूक म्हणून चित्रपट पाहणारा सर्वसामान्य प्रेक्षक आणि रसिक दर्दी यांना एकाच वेळी मोहिनी घालणार्‍या दुर्मीळ अभिनेत्रींमध्ये वहिदा रहमान हिची गणती होते. तिचे देखणेपण, हालचालीतील डौल, नृत्यकौशल्य, नैसर्गिक अभिनय करण्याचे कसब, योग्य भूमिका निवडण्याची तिची हुशारी ह्या सर्वांना चित्रपटसृष्टीने न्याय दिला. तीन फिल्मफेअर आणि एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणार्‍या या अभिनेत्रीचा चित्रपटातील प्रवेश मात्र एका दु:खद घटनेमुळे झाला. वहिदाचे वडील मोहम्मद रहमान हे डिस्ट्रिक्ट कमिशनर होते. मूळचे जमीनदार, पण सरकारी नोकरी स्वीकारल्यामुळे घराशी नाते तुटलेले. वहिदा तेरा वर्षांची असतानाच त्यांचे अचानक निधन झाले. डॉक्टर होण्याची मनीषा बाळगणार्‍या वहिदाने घरची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. एका तेलगू चित्रपटात तिने केलेले लोकनृत्य अत्यंत गाजले. याच सुमारास तिची गुरुदत्तशी भेट झाली. तेव्हा सीआयडी चित्रपटची जुळवाजुळव सुरू होती. यातील सहनायिकेच्या भूमिकेसाठी वहिदाची निवड झाली. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका देदीप्यमान कारकिर्दीची ही सुरुवात होती. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही जोड्या अजरामर आहेत. एक कलाकार म्हणून त्यातील प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण आहे, तरीही त्यांच्या करियरचा लेखाजोखा एकमेकांशिवाय पूर्ण होत नाही. वहिदाच्या नावाबरोबर गुरुदत्तचे नाव येणे स्वाभाविक आहे. जेमतेम वीस वर्षांची असताना ‘सीआयडी’ या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका एका नर्तकीची होती आणि तिला करड्या छटा होत्या. सुरुवातीला खलनायकाची हस्तक असलेली ही नर्तकी, चित्रपटाच्या शेवटी खलनायकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नायकाला पळून जाण्यास मदत करते. ‘कही पे निगाहें, कही पे निशाना’ हे गाणे क्लायमॅक्सला येते. एकीकडे खलनायकाला भुलवणारी मदभरी नजर, दुसरीकडे आपली खेळी ओळखली जाईल याची भीती, तर नायक पकडला जाईल याची चिंता. पदार्पणातच चित्रपटाच्या मुख्य नायिकेला, शकिलाला झाकोळून टाकणारी ही कामगिरी होती.
 

Waheeda  Rehman 
 
गुरुदत्तना माणसाची पारख होती. कलेची जाण होती. ‘प्यासा’ चित्रपटातील गुलाबोचा रोल तिला मिळाला आणि या भूमिकेचे तिने सोने केले. प्यासाची मुख्य नायिका माला सिन्हा, पण याही चित्रपटात दुय्यम नायिकेचा प्रभाव पडला. अर्थात वहिदाला मिळालेल्या दुय्यम भूमिका ह्या साधारण नव्हत्या. गुलाबो ही जगाचा अनुभव आल्याने, व्यावहारिक शहाणपण अंगात मुरवलेली सामान्य वेश्या आहे. सतत चेहरा रंगवून स्वत:चा खरा चेहरासुद्धा ती विसरून गेली आहे. अंगावर घातलेल्या खोट्या दागिन्यांसारख्याच तिच्या तकलादू भावना. पण अजून तिला कविता आवडते. रखरखीत आयुष्यात हा हळुवारपणा तिने जपला आहे. बागेत भेटलेल्या विजयला कवितेतील ओळी म्हणून ती भुलवायचा प्रयत्न करते, पण जेव्हा तो तिला पोलिसापासून वाचवण्यासाठी, स्वत:ची पत्नी म्हणून ओळख करून देतो, तेव्हा मात्र तिलाही अनोळखी असलेली एक भावना जन्म घेते. खरे तर पुरुषी सहवास कंटाळा येईल इतका भोगलेला. पण आता मात्र प्रेमाच्या समर्पणातला आनंद तिला हवाहवासा वाटतो. हे आयुष्य आपल्यासाठी नाही याची जाणीव आहे तिला आणि तरीही त्याच्याकडे ओढल्या जाणार्‍या मनावर तिचे नियंत्रण नाही. एका भोगीचे योगिनीत रूपांतर होते. ‘आज सजन मोहे अंग लगालो, जीवन सफल हो जाये’ हे मीरेचे भजन गुलाबोची मन:स्थिती उलगडून सांगते. जेव्हा विजय मेला असे जग समजते, तेव्हा ती स्वत:ला विकून, त्याचे पुस्तक छापून आणते आणि हाच विजय जेव्हा प्रसिद्धी आणि पैसे नाकारून जगाकडे पाठ फिरवतो, तेव्हा ती त्याची साथ देते. अभिनयाची कसोटी पाहणारी ही भूमिका होती.
 
 
प्यासाच्या सुमारास वहिदा, गुरुदत्त फिल्म्स युनिटचा एक अविभाज्य भाग झाली. तिच्या सूचनांचा विचार होऊ लागला. सुरुवातीला तरी गुरुदत्त म्हणजे त्या छोट्या शहरातून आलेल्या मुलीसाठी तिला घडवणारा आणि मार्गदर्शन करणारा शिक्षक होता, हे निश्चित. या जोडीचे गाजलेले आणखी चित्रपट म्हणजे ‘कागज के फूल’ आणि ‘साहब, बीबी और गुलाम’.
 
 
जिथे चित्रपट बनवले जातात, त्या इंडस्ट्रीचा वेध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न फार कमी लोकांनी केला आहे. इथल्या झगमगटाच्या आत जीवघेणी स्पर्धा आहे, नैराश्य आहे, भ्रमनिरास आहे. हे सत्य नकोसे वाटल्याने असेल, बॉक्स ऑफिसवर ‘कागज के फूल’ हा चित्रपट चालला नाही. नंतर मात्र या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत स्थान मिळाले. एक यशस्वी दिग्दर्शक एका नवोदित मुलीला यशस्वी नायिका बनवतो, तिच्या प्रेमात पडतो आणि तिथून त्याच्या र्‍हासाला सुरुवात होते, अशी या चित्रपटाची कथा होती. या नवोदित मुलीची - शांतीची भूमिका वहिदाने समरसून केली आहे. चित्रपटाची नायिका शांती, आपल्याला घडवणार्‍या दिग्दर्शकाच्या प्रेमात पडते, जो विवाहित असतो. लोकांची कुजबुज त्याच्या पत्नीच्या कानी जाते. आधीच दुरावलेले संबंध आणखीनच ताणले जातात. काही नात्यांना कायद्याचे अधिष्ठान नसते, त्यामुळे समाजाची मान्यता नसते, अशी नाती म्हणजे अवकाशात मारलेल्या हाका. जोपर्यंत सादाला प्रतिसाद मिळतो, तोपर्यंतच त्या हाकांना अस्तित्व. नाहीतर त्या फक्त विरून जातात.
 

Waheeda  Rehman 
 
जायेंगे कहां, सूझता नही, चल पडे मगर रास्ता नही
 
क्या तलाश है, कुछ पता नही
 
 बुन रहे है दिल ख्वाब दम-ब-दम।
 
प्रत्येक श्वासागणिक स्वप्ने विणत चाललेले ते दोघे, आवेगाने एकमेकांकडे ओढले जातात, पण कुठे जायचे तेच निश्चित नसल्याने नात्याची शोकांतिका होणे अटळ होते.
 
 
चित्रपटाच्या कथेत आणि दिग्दर्शकाच्या आयुष्यात साम्य असल्याच्या अफवा उठल्या. स्टुडिओत जी कुजबुज होत होती, ती गुरुदत्तच्या पत्नीच्या - गीता दत्तच्या कानावर गेल्याने त्यांच्या संसारात वादळ उठले. त्यात चित्रपटाच्या अपयशाने गुरुदत्त खचले. याच सुमारास त्यांनी ‘साहब, बीबी और गुलाम’ या चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: न करता अब्रार अली यांच्याकडे त्यांनी दिग्दर्शनाची सूत्रे दिली. चित्रपटातील मुख्य पात्र छोट्या बहू. हिची भूमिका मीना कुमारीकडे असली, तरी केवळ अब्रार अल्वीच्या आग्रहासाठी वहिदाने ही दुय्यम भूमिका स्वीकारली. पतिपरायण, मुलासाठी आसुसलेली, संस्कारी, घराबाहेर कधीही न पडलेली, नवर्‍याशिवाय आयुष्य अपूर्ण मानणारी छोटी बहू आणि त्या प्रतिमेला संपूर्ण विसंगत अशी जब्बाची भूमिका होती. खोडकर, चंचल, अन्यायाच्या विरोधात ठाम उभी राहणारी, स्वत:चे मत मांडणारी, सुशिक्षित मुलगी जब्बा. सुरूवातीची काहीशी गर्विष्ठ, तुटक मुलगी, नंतर भूतनाथला चिडवताना तिच्या चेहर्‍यावरील खोडकर भाव आणि शेवटी त्याच्या प्रेमात पडल्यानंतर मृदू झालेली ती, अशा विविध छटा आपल्या अभिनयातून तिने दाखवल्या. एक चांगली अभिनेत्री तुलनेने दुय्यम आणि छोट्या भूमिकेलासुद्धा सशक्त बनवू शकते, हे वहिदाने दाखवून दिले. त्या वेळी तिच्याही खाजगी आयुष्यात वादळ आलेच होते. गुरुदत्तच्या धरसोड प्रवृत्तीचा त्रास तिलाही होतच असणार, पण निदान तिने तिच्या व्यावसायिक आयुष्यावर त्याचा परिणाम होऊन दिला नाही.
 
 
‘कागज के फूल’च्या अपयशानंतर गुरुदत्त निराशेच्या खाईत लोटले गेले. त्यांच्या खाजगी आयुष्यातील स्थित्यंतरेसुद्धा त्यांना पेलवता आली नाहीत आणि त्या दु:खात त्यांनी आपले आयुष्य संपवले, असे बोलले जाते. खरे तर खाजगी आयुष्यात काय घडते ते फक्त त्यात सामील असणार्‍या लोकांनाच माहीत असते. पण अशा ग्लॅमरस व्यवसायात असल्यावर गॉसिप होणे स्वाभाविक असते. वहिदालासुद्धा टीकेचा सामना करावा लागला असणार, पण कुठेही तोल जाऊ न देता तिने फिनिक्स पक्ष्यासारखी झेप घेतली.
 
 
‘साहब, बीबी और गुलाम’ या चित्रपटानंतर, गुरुदत्त प्रॉडक्शन मधून बाहेर पडल्यावर वहिदाने निवडलेला पहिला चित्रपट होता ‘मुझे जीने दो’. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हाडामांसाची माणसे म्हणून डाकूंकडे पहिल्यांदाच पाहिले गेले. जर्नेल सिंग या डाकूची ही कथा. हा क्रूरकर्मा एका ठिकाणी दरोडा घालायला गेला असताना एका तवायफच्या प्रेमात पडतो, तिला पळवून आणतो. तिच्याशी लग्न करतो आणि तिचे प्रेम त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणते. अभिनय आणि नृत्य या दोहोंना वाव असणार्‍या चमेली जान या नर्तिकेच्या भूमिकेत वहिदाने कमाल रंग भरले आहेत.
 

Waheeda  Rehman 
 
आपल्या मुलाखतीत मुझे जीने दो, गाइड आणि तिसरी कसम हे आपले लाडके चित्रपट असल्याची कबुली वहिदाने दिली आहे. गाइड चित्रपटातील ‘काटो से खींच के ये आंचल’ या गाण्याच्या सुरुवातीलाच रोझी एका बाईच्या डोक्यावर असलेली घागर हातात घेऊन फोडून टाकते. शतकानुशतके बाईच्या डोक्यावरील असलेल्या ओझ्याचे हे प्रतीक. हे गतकाळाचे ओझे तिने फेकून दिले आहे. मोकळे आकाश, मुक्त वार्‍याची झुळूक उपभोगताना हे ज्याच्यामुळे मिळाले, त्या व्यक्तीबद्दल तिच्या मनात जिव्हाळा निर्माण होतो. कालपर्यंत जीवनाविषयी उदासीन झालेली ती आज ‘आज फिर जीनेकी तमन्ना है’ म्हणत आयुष्याचे स्वागत करते. पतीला सोडून, आपल्या कलेला वाहून घेणारी स्त्री या चित्रपटात प्रथम चित्रित केली गेली. वहिदाने हिंदी नायिकेला एक नवीन चेहरा दिला. गाइडमधील ‘आज फिर जीने की तमन्ना है’ गाणार्‍या रोझीच्या भूमिकेत तिच्याशिवाय कोणाचाही विचार करता येत नाही. गाइड या चित्रपटातील भूमिकेसाठी वैजयंतीमाला या अभिनेत्रीचा विचार झाला होता. आपली इमेज बिघडेल या विचाराने तिने या भूमिकेला नकार दिला. नवर्‍याला सोडणारी आणि प्रियकराबरोबर राहणारी स्त्री ही भूमिका तशीही त्या काळाचा विचार केला तर पटण्यासारखी नव्हतीच. ह्या चित्रपटाने मात्र प्रचंड यश मिळवले.
 
 
देव आनंदबरोबर वहिदाने सात चित्रपटांत काम केले. यातील अनेक भूमिका हटके आहेत. तिकिटांचा काळा बाजार करणार्‍या नायकाला सन्मार्गावर आणणारी ‘काला बाजार’मधील अलका सिन्हा, स्वत:च्या प्रियकराचा खून केल्याची कबुली दिलेली ‘बात एक रात की’मधील नीला, प्रियकरासाठी घरातील किमती हार चोरून त्याच्याबरोबर पळून जाणारी आणि त्याचे खरे स्वरूप समजल्यावर न रडता स्वत:चा हार मिळवण्याचा प्रयत्न करणारी ‘सोलवा साल’मधली लाज या सर्वच भूमिका नेहमीच्या नायिकांपेक्षा वेगळ्या होत्या.
 
 
वहिदाच्या चित्रपटाचा विचार करताना तिसरी कसम आणि खामोशी या दोन्ही चित्रपटांना टाळणे अशक्य.
 
 
फणीश्वरनाथ रेणू यांच्या लघुकथेवर आधारित ‘तिसरी कसम’ हा चित्रपट हे एक भावकाव्य आहे. हिरामणच्या बैलगाडीतून केलेला हा प्रवास त्यातील प्रवाशांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी देऊन संपतो. ह्या दोन्ही प्रवाशांचे जग फार वेगळे आहे. हिरामण हा लाजाळू, खेडवळ माणूस. त्याचे अनुभवविश्व फार मर्यादित आहे. हिराबाई ही नौटंकीत काम करणारी नर्तिका आहे. अनेक ठिकाणी फिरलेली, जगाचा अनुभव घेतलेली स्त्री आहे. त्या दोघांच्यात झालेली मैत्री फार अनपेक्षित आहे. त्याचे साधेपण तिला भावते. त्याच्यासाठी ती देवी आहे. त्याच्या नजरेतून स्वत:ला पाहणे हे कितीही आनंददायक असले, तरीही या भावनेला प्रतिसाद देणे तिला शक्य नाही. तिने ठरवले तरी समाज ते घडू देणार नाही, याची तिला कल्पना आहे. त्याच्या मनातली आपली प्रतिमा डागाळू नये, याकरता ती गाव सोडून जाण्याचा निर्णय घेते. नर्तकीचे एकाकी आयुष्य, त्यातून सुटण्यासाठी तिच्या मनाने केलेले आक्रंदन आणि हे शक्य नाही हे लक्षात आल्यावर परिस्थितीचा केलेला स्वीकार हे वहिदाच्या अभिनयातून पाहणे हा अनुभव आहे.
 
 
‘खामोशी’ चित्रपटातील राधाची भूमिका ही वहिदाच्या प्रदीर्घ कारकिर्दीमधील सर्वोत्तम भूमिका म्हणता येईल. हा चित्रपट प्रेक्षकांना सुन्न करतो. यातील कलाकारांसाठीसुद्धा हे अत्यंत अवघड आव्हान होते, यात शंका नाही. कोणत्यातरी आघाताने आपले मानसिक संतुलन हरवून बसलेले रुग्ण आणि त्यांना आपल्या सेवेने, प्रेमाने माणसात आणणारी नर्स यांची आगळीवेगळी कहाणी खामोशी. ही कहाणी आहे देव (धर्मेंद्र), राधा (वहिदा) आणि अरुण (राजेश खन्ना) यांची. प्रेमभंग झाल्याने देव नैराश्येत बुडून जातो. त्याला रुग्णालयात भरती केले जाते. आपल्या प्रेमाने, मायेने राधा त्याला माणसात यायला मदत करते. तिच्या प्रयत्नाला यश येते आणि देव बरा होऊन आपल्या घरी परत जातो. इलाज करताना, रुग्णात मानसिकरित्या न गुंतणे हे गृहीत धरलेले असते. तरीही मनावर नियंत्रण ठेवणे कधीतरी उपचार करणार्‍यासाठीसुद्धा कठीण असते. स्वत:ला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी राधा नकळत देववर प्रेम करायला लागते. देवसाठी मात्र हे नाते कृतज्ञतेचे. त्याच्या हृदयावर कोणा दुसरीचा हक्क आहे. मनावर दगड ठेवून राधा देवपासून स्वत:ला दूर करते. देव गेल्यानंतर त्याची जागा अरुण घेतो. हासुद्धा मानसिक रुग्ण. एक संवेदनशील लेखक. प्रेयसीने दगाबाजी केल्याने स्वत:ला हरवून बसला आहे. देवची केस यशस्वीरित्या सोडवल्यामुळे अरुणला बरे करण्याची जबाबदारी राधावर येते. तिच्या सहवासात अरुण हळूहळू स्वत:चे दु:ख विसरू लागतो. अभिनय, जो राधेकडून अपेक्षित आहे, तो करणे तिची प्रवृत्ती नाही. जे करणे तिला आवडत नाही, त्याचा ताण तिच्या मनावर आहे. आपण तुटत चाललो आहोत त्याची तिला जाणीव आहे. तिचे कर्तव्य मात्र तिला यातून बाहेर पडण्याची परवानगी देत नाही. देवने तिच्यापासून लांब जाणे तिच्या भावनांनासुद्धा गोठून टाकते. स्वत:वर लादून घेतलेली ही खामोशीच तिच्या परवडीचे कारण होणार आहे. ह्या चित्रपटात नृत्य नाही, तिच्या वाट्याला गीत नाही, तिला अत्यंत कमी संवाद दिलेले आहेत. शांततेला बोलके करणारा अभिनय वहिदाने ह्या चित्रपटात केला आहे.
 
 
देखणेपण, अभिनयातील सहजता, नैसर्गिक डौल, कला, असामान्य गुणवत्ता आणि उपजत समज याचे वरदान फार कमी जणांना मिळते. तिचे देखणेपण वादातीत होते. तिच्या सौंदर्यावर लिहिलेली असंख्य गीते आहेत. साधना ही अभिनेत्री सोडली, तर हे भाग्य दुसर्‍या अभिनेत्रीच्या वाट्याला आले नाही. ‘चौदहवी का चाँद हो, या आफताब हो’, ‘जरा सुन हसीना ए नाजनीन’, ‘ये नयन डरे डरे’, ‘खुदा भी आसमाँ से जब ज़मीन पर देखता होगा, मेरे महबूब को किसने बनाया सोचता होगा’, ‘दिलरुबा मैने तेरे प्यार में क्या क्या ना किया’ ही सर्व गाणी म्हणजे तिच्या खूबसूरतीला गीतकारांनी दिलेली दादच. वरती दिलेले चित्रपट तर गाजलेले आहेतच, पण अगदी सामान्य चित्रपटातसुद्धा ती जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा तिच्यावरची नजर ढळत नाही. कारकिर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात केलेल्या चरित्र भूमिकासुद्धा विशेष आहेत. ‘त्रिशूल’मधली कुमारी माता, ‘नमकीन’मधली आपल्या तिन्ही मुलींना जपणारी आई, ‘कभी कभी’मधली अपराधीपण बाळगणारी आई, ‘रंग दे बसंती’मधली वीरमाता, ‘लम्हे’मधली दाई माँ या आईच्या भूमिकांमध्ये सुद्धा विविधता आहे.
 
 
तिचा अभिनय अत्यंत नैसर्गिक आणि सहज आहे. दिलेली भूमिका कोणत्याही वादात न पडता समरसून निभावणे हे तिच्या यशस्वी कारकिर्दीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. नम्र असूनही आपले मत ठाम मांडणारी, कामे मिळवण्यासाठी कोणतीही तडजोड न करणारी आणि प्रसिद्धीचा मोह न बाळगता योग्य वेळेला निवृत्त होणारी वहिदा रहमान ही अभिनेत्रींसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. अशा या गुणवान व्यक्तिमत्त्वाला या वर्षीच्या दादासाहेब फाळके पुरस्कार या चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने गौरवले गेले आहे.
 
 
पुढील वाटचालीसाठी या गुणवान अभिनेत्रीला खूप शुभेच्छा.

प्रिया प्रभुदेसाई

प्रिया  प्रभुदेसाई

अर्थशास्त्रात पदवीत्तर शिक्षण.... सा. विवेक आणि दिव्य मराठीत दोन वर्षे चित्रपट विषयक सदर. दिवाळी अंक, मासिके यात चित्रपटाविषयक लेखन. सेन्सॉर बोर्डवर ज्युरी म्हणून चार वर्षांसाठी निवड.