नागपूरच्या पुरावरून, मुंबईचे बोधामृत!

विवेक मराठी    30-Sep-2023   
Total Views |
 नागपूरमध्ये गेल्या 25 वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात असा पाऊस झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकच नागरिकांना अशा पावसाची सवय नाही. त्यांना हे सर्व अनपेक्षित होते. पण निश्चितच नागपूरमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  हे दोन्ही नेते यातून बोध घेऊन अशा प्रकारची स्थिती नागपूरमध्ये येणार नाही, यासाठी उपाययोजना करतील.

nagpur
 
  
देशात कुठेही काही झाले तरी त्या बातम्यांचा एवढा ऊहापोह होत नाही, तेवढा गुजरातमध्ये घडलेल्या घटनेचा होत असतो. ही झाली देशातील स्थिती.. अशी स्थिती महाराष्ट्रातील नागपुरात आहे. नागपुरात काही घडले की तेथील बातमीचा मराठी माध्यमांतील सूर वेगळाच असतो आणि आरोपीच्या पिंजर्‍यात असतात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! सध्या राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. नागपुरात त्याने आपले रौद्र रूप धारण केले. 109 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे नागपूरमध्ये पूर आला. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. प्रशासनाने लागलीच तेथे मदतही केली. एनडीआरफ पथकाने अनेकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले. पूर ओसरला, पण पुरानंतर राजकीय पक्षांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका केली, कारण पालिकेत अनेक वर्षांपासून भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा नागपूरमधून निवडून येतात, तसेच हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचासुद्धा मतदारसंघ आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी नागपूरमधील पुरावरून देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्यावर शरसंधान करण्याची मिळालेली संधी सोडली नाही. या पुरामुळे उबाठासेनेला तर आयते कोलीतच मिळाले. राऊतांनी सामनामध्ये अग्रलेख लिहून टीका केली, तर अदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचे बोधामृत पाजले. नागपूरचा पूर मानवनिर्मित होता की नैसर्गिक होता, हे काही दिवसांत समजेलच. पण टीका करणार्‍या उबाठासेनेची अवस्था ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान’सारखी आहे. कारण 2005च्या मुंबईतल भीषण पुरानंतरही अजूनही मुंबई पालिकेला बोध घेता आलेेला नाही. अजूनही मुंबईत कमी पावसाने पाणी साचते, ही वस्तुस्थिती आहे.
 
पुराला कोण जबादार?
 
नागपूरमधील पुराला भाजपा, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना जबाबदार धरले जात आहे. कारण गेल्या 9 वर्षांत गडकरी आणि फडणवीस या जोडीने नागपूरचा कायपालट केला आहे. मेट्रो, उड्डाणपूल, रस्त्यांचे जाळे, कॉक्रिटीकरण यामुळे काही प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण विकासकामे करण्यासाठी हे करावेच लागते. अन्यथा नागरिकांना सुविधा देता येऊ शकत नाहीत. किती ठरवले तरी पर्यावरणाचा होणारा र्‍हास रोखणे आजच्या युगात अशक्य होत आहे. एकतर पर्यावरण जोपासावे लागेल, नाहीतर विकासाला तरी प्राधान्य द्यावे लागेल. दोन्हींचा समतोल राखून विकास करणे फारच अवघड आणि खर्चीक आहे. हे दुखणे संपूर्ण जगाचे दुखणे आहे. अमेरिकेतही पूर आला की हीच कारणे असतात. त्यामुळे नागपूरमध्ये पुराला जेवढे पर्यावरणाच्या र्‍हासास जबाबदार धरले जाते, तेवढेच निसर्गचक्राच्या बदलत चाललेल्या ?? कारणीभूत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
मुंबईत काय वेगळी स्थिती?
 
मुंबईत 2005 साली भीषण पूर आला होता. त्यानंतर त्याची कारणे समोर आली, तेव्हा पावसाबरोबरच नालेसफाई आणि पर्यावरणाचा होत चालेला र्‍हास यामुळेच पाणी सर्वत्र भरल्याचे दिसून आले. पण त्यानंतर मात्र अजूनही पालिकेने धडा घेतलेला नाही. दर वर्षी पाऊस आला की मुंबईतील अनेक भागात पाणी साचते. मुंबईमध्ये विकासकामे करताना अनेक झाडांची तोडणी केली आहे. पालिकेच्या अनेक भूखंडांचे श्रीखंड झाले. त्या भूखंडांवर अनेक झाडे होती. पण हे अदित्य ठाकरेंना कदाचित माहीत नसावे. नागपूर, मुंबई किंवा अन्य कोणताही भाग असो.. विकासकामे करताना पर्यावरणपूरक विकास करणे फारच अवघड आहे. पर्यावरणाकडे पाहिले, तर विकास होणार नाही. त्यामुळे या दोन्हींचा सुवर्णमध्य काढला पाहिजे. पर्यावरणाचा कमीत कमी र्‍हास होऊन विकासकामे झाली पाहिजेत, नाहीतर अशा विध्वंसाला आपणच कारणीभूत होतो.
पूर ओसरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोघेही कामाला लागले. गडकरी यांनी प्रशासनाला कामाला लावले, तर फडणवीसांनी स्वत: सर्वच भागात जाऊन पाहणी केली. नागपूरमध्ये गेल्या 25 वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात असा पाऊस झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकच नागरिकांना अशा पावसाची सवय नाही. त्यांना हे सर्व अनपेक्षित होते. पण निश्चितच नागपूरमधील हे दोन्ही नेते यातून बोध घेऊन अशा प्रकारची स्थिती नागपूरमध्ये येणार नाही, यासाठी उपाययोजना करतील.
संघ स्वयंसेवकांची मदत
 
स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांना प्रथम सुरक्षित स्थळी हलवले. त्यानंतर त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ, फळे, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या आणि सुका नाश्ता यांची व्यवस्था करून ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. या सेवा कार्यात नागपूर महानगरातील सेवा विभागाच्या स्वयंसेवकांसह सामाजिक संस्था व नागरिकांनीदेखील सहकार्य केले. धरमपेठ, टाकिया, कुह्मार टोली, संगम चाळ, बर्डी फ्लॉवर मार्केट अशा विविध भागांतील 15 हजारांहून अधिक कुटुंबांपर्यंत स्वयंसेवकांचा संपर्क केला.