अयोध्येतील राम मंदिरभारतीय स्थापत्यातील नवा मापदंड!

विवेक मराठी    12-Jan-2024   
Total Views |
rammandir
हिंदूंनी 500 वर्षे पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता म्हणून आज अयोध्येत रामजन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर साकार होते आहे. रामजन्मभूमीसाठीचा संघर्ष संपल्यानंतर त्या स्थानावर भव्य आणि चिरकाल टिकणारे मंदिर उभारण्याचे आव्हान हिंदू समाजासमोर होते व हे आव्हानदेखील हिंदूंनी यशस्वीरित्या पेलून दाखवले आहे. या मंदिर उभारणीच्या प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी असलेले राम मंदिराचे मुख्य अभियंते जगदीश आफळे आणि सिव्हिलव्यतिरिक्त अन्य अभियांत्रिकीची बाजू सांभाळणारे जगन्नाथ (मामा) गुळवे यांची साप्ताहिक विवेकने थेट अयोध्येतून विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित अंश.
आपणाशी मंदिराशी संबंधित अनेक बाबींवर चर्चा करायची आहेच; परंतु त्यापूर्वी, या ऐतिहासिक कार्यामध्ये आपल्याला सहभागी होता आले, एक महत्त्वाची जबाबदारी आपल्याला सांभाळता आली आणि आता भव्य राम मंदिराच्या स्वप्नाची पूर्तता होते आहे, याबाबत आपण काय भावना व्यक्त कराल? मुळात आपण या कामात कसे जोडले गेलात?
 
जगदीश आफळे - श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात अगदी सुरुवातीच्या काळापासूनच मी जोडला गेलो आहे. मंदिर उभारणीच्या कामात सहभागी होण्यापूर्वी मी व माझी पत्नी अमेरिकेत रा.स्व. संघाच्या कुटुंबप्रबोधन गतिविधीसाठी प्रवास करत होतो. त्यापूर्वी कुटुंबप्रबोधन गतिविधीचेच देवगिरी प्रांताचे काम माझ्याकडे होते. संघामध्ये आपल्याला दिलेले काम स्वीकारायचे आणि ते का व कशासाठी याची चर्चा करायची नाही, संघशरण वृत्तीने आपल्याला दिलेल्या कामाला अधिकाधिक न्याय देण्याचा प्रयत्न करायचा, ही अगदी स्वाभाविक अशी शिस्त आहे. आम्ही 2019-20च्या अमेरिकेच्या प्रवासातून परत आलो, तेव्हा रामजन्मभूमीसंबंधी न्यायालयाचा निकाल नुकताच लागलेला होता. त्यानंतर मंदिर उभारणीसंबंधी काय करता येईल याची पुण्यात मोतीबागेत चर्चा झाली. त्या वेळी मधुभाई कुलकर्णी यांनी याविषयी आधी सखोल अभ्यास करून मग योजना आखण्यात यावी, अशी सूचना केली. कोणत्याही बांधकामामध्ये आपण सर्वांत आधी त्या जागेचे नकाशे, आर्किटेक्चरल ड्रॉइंग्ज यांच्या आधारे बांधकामाची योजना आखतो. आधी जे वास्तुविशारद होते, त्यांनी यासंबंधी काही काम करून ठेवले होते. परंतु स्व. अशोकजी सिंघल यांच्या काळात कल्पनेत असलेले मंदिर आणि आता मोठी जागा मिळाल्यानंतर उभारायचे मंदिर, यात काही बदल होणे स्वाभाविक होते. पुढे यासंबंधी प्रयागराज येथे मा. सरसंघचालकांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. चंपतराय हेही या वेळी उपस्थित होते. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचीही स्थापना त्या वेळी झालेली होती. या बैठकीत असा मुद्दा उपस्थित झाला की न्यासाच्या कल्पनेत असलेले मंदिर हे अभियांत्रिकीच्या दृष्टीनेही अभ्यासले जाणे आवश्यक आहे. त्या वेळी या कामासाठी मला विचारणा झाली. त्यावर मी आधी अयोध्येला जाऊन प्रत्यक्ष जागा पाहण्याची विनंती केली. शिवाय, स्व. अशोकजी सिंघल यांच्या काळात ठरलेली योजना, त्यांची त्या वेळी घनश्यामदास बिर्ला, एल अँड टी यांच्याशी झालेली चर्चा इत्यादींचाही अभ्यास करण्याचे आम्ही ठरवले. या सार्‍यातून लक्षात आले की आपल्याला वाटते आहे तितके हे काम सरळ-सोपे नाही! यातून मार्ग काढायचा असेल तर अभियांत्रिकीची चांगली टीम आपल्याला उभारावी लागेल, हेही लक्षात आले. कुटुंबप्रबोधन गतिविधीच्या कामातून या कामात येणे हा आमच्यासाठी खूप मोठा बदल होता. परंतु जेव्हा मंदिर उभारणीशी संबंधित कार्याची दिशा ठरली, तेव्हा आम्हीही ठरवले की आता मागे वळून पाहायचे नाही.
 
जगन्नाथ (मामा) गुळवे - रामजन्मभूमी आंदोलनाच्या अनेक टप्प्यांत संघकार्यकर्ता म्हणून मी सहभागी होतो. प्रत्यक्ष इथे अयोध्येत येऊन काम करण्याबाबत जेव्हा जगदीशजी आफळे यांच्यावर येथील जबाबदारी आली, तेव्हा मलाही क्षेत्र प्रचारकांनी विचारणा केली. माझाही आधी अभियांत्रिकीशी संबंधितच व्यवसाय होता. मी मूळचा मेकॅनिकल इंजीनिअर आहे. अलीकडे काही वर्षांपूर्वी व्यवसाय थांबवून संघाचा वानप्रस्थी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे. अयोध्येत येण्यापूर्वीपर्यंत धर्मजागरण गतिविधीचा प्रांत प्रमुख अशी माझ्याकडे जबाबदारी होती. पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याने दिलेले कोणतेही काम करण्यासंबंधी कोणतीच अडचण असण्याचा प्रश्नच नव्हता आणि जेव्हा रामजन्मभूमीशी संबंधित कामासाठी विचारणा झाली, तेव्हा अर्थातच मी आनंदाने होकार दिला. सुरुवातीला निधी संकलनाचेही काम सुरू होते. त्या मोहिमेत देवगिरी प्रांताची जबाबदारी माझ्याकडे असल्याने तेव्हा मला अयोध्येत येता आले नाही, परंतु तो विषय पूर्ण झाल्यानंतर मी इथे आलो. आपल्याला मंदिर उभारणी विषयात प्रत्यक्षात काही योगदान देता येते आहे, याचा स्वाभाविकच आनंद होता. अभियांत्रिकीचा अनुभव गाठीशी होताच.
 
 
जगदीश आफळे - ..यामध्ये मी एकच गोष्ट नमूद करू इच्छितो. खरे तर या कामात आमच्याऐवजी अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असलेली आणखी कोणीही व्यक्ती येऊ शकली असती. परंतु आमच्यावर जो विश्वास दाखवण्यात आला, ते पाहता तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी संघशरण वृत्तीने आम्ही अधिकाधिक प्रयत्न केला. आम्हाला इथे टीमही चांगली मिळाली. त्यामुळे कामाचा कोणताही ताण न येत आतापर्यंत केवळ आनंदच मिळाला आहे. दिवसरात्र काम झाले, बैठका-प्रवास झाले, तरीही या कामाचा आनंद अवर्णनीय असाच आहे.
 

rammandir 
 
500 वर्षांच्या संघर्षानंतर उभे राहत असलेले राम मंदिर वैभवशाली व्हावेच, तसेच ते चिरकाल टिकणारेही असावे, याकरिता अभियांत्रिकीच्या दृष्टीने काय विचार करण्यात आला?
 
 
जगदीश आफळे - याकरिता सर्वांत आधी या मंदिराचा पाया मजबूत असणे आवश्यक होते. यासाठी आम्ही अनेकांशी चर्चा केल्या. येथील जमिनीचा पोत लक्षात घेतला. नद्यांच्या किनारपट्टीवरील मातीमिश्रित वाळूच्या जमिनींत बांधकामासाठी आवश्यक ताकद असत नाही. त्यामुळेच येथे उंच इमारती बांधल्या जात नाहीत. अशा स्थितीत 161 फूट उंचीचे केवळ दगडाचे वजनदार मंदिर बांधणे, हेच मोठे आव्हान होते. त्यामुळे आयआयटीच्या विविध ठिकाणच्या संस्था, एनजीआरआय, सीबीआरआय इत्यादी राष्ट्रीय संस्थांच्या मदतीने आपण अभिनव प्रयोग करत मंदिराच्या प्रस्तावित जागेवर 60 फुटांपर्यंत खोदकाम करून वाळू काढली आणि त्यावर रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीटचे 56 थर टाकून भक्कम अशा कृत्रिम खडकाची निर्मिती केली. ही वाळू काढण्याचेच काम जवळपास 6 महिने चालले. शिवाय, शरयू नदीला येणार्‍या पुरांची शक्यता लक्षात घेऊन जमिनीची संभाव्य धूप रोखण्यासाठी अत्यंत भक्कम रिटेनिंग वॉलदेखील बांधण्यात आली आहे. संघाच्या सामूहिक निर्णयाच्या पद्धतीनेच हे सर्व निर्णय त्यातील तज्ज्ञ संस्था-व्यक्तींशी सल्लामसलत केल्यानंतर घेतले गेले. मंदिराचे आधीचे डिझाइन तुलनेने छोट्या मंदिराचे होते. विस्तारित मंदिर उभारण्याचे ठरल्यानंतर साहजिकच आकार वाढला, मटेरियल वाढले, त्याचे वजन वाढले. त्यामुळे मंदिर दगडी बांधकामाचे असूनही स्टील वा काँक्रीट बांधकामाला करतात तसे स्टॅबिलिटी अनॅलिसिस करण्यात आले. दगडाच्या बांधकामाचे स्टॅबिलिटी अनॅलिसिस करून बांधण्यात आलेले हे कदाचित भारताच्या इतिहासातील पहिलेच बांधकाम असेल. या सर्व संशोधनातून पुढील एक हजार वर्षे टिकेल अशा दर्जाचे बांधकाम करण्याकरिता डिझाइनमध्ये सुधारणा करण्यात आल्या. जेव्हा काँक्रीटचे बांधकाम होते, तेव्हा हजार वर्षे टिकवण्याचा कुणीही विचार करत नाही. फार तर 100-150 वर्षांचे आयुष्य आपल्याला अपेक्षित असते. परंतु आपली दगडाची मंदिरे हजार वा त्याहूनही अधिक वर्षे टिकली. त्यामुळे राम मंदिर असेच हजारो वर्षे टिकण्यासाठी ग्रॅनाइट, जोधपूर-बन्सी पहारपूरचा दगड, संगमरवर आदी दगडांचा वापर आणि स्टॅबिलिटी अनॅलिसिस करून भूकंप-पूर-अग्नितांडव वा आणखी कोणतेही संकट आले तरी टिकेल अशा वास्तूसाठी आवश्यक ते डिझाइन आपण तयार करून घेतले व त्यानुसारच या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.
 
 
rammandir
 
राम मंदिराच्या पायासाठी झालेल्या उत्खननाचा आपण उल्लेख केलात. याआधी पुरातत्त्व विभागाच्या (एएसआयच्या) माध्यमातून उत्खनन झाले होते, तेव्हा प्राचीन हिंदू मंदिरांचे अवशेष सापडले होते. आताचे उत्खनन तर आणखी खोलवर झाले. त्या वेळी काही अवशेष सापडले का? कारण या जागेवर मंदिर होते जे पाडून मशीद बांधली गेली, हे याच अवशेषांनी सिद्ध केले होते.
 
जगदीश आफळे - सुरुवातीच्या काळात स्व. अशोकजी सिंघल यांनी रामजन्मभूमीच्या स्थानासंदर्भात भांडारकर इन्स्टिट्यूटचे डॉ. पां.वा. काणे किंवा बी.आर. मणी, एएसआयचे बी.बी. लाल यांच्याशी याबाबत चर्चा केल्या होत्या. पायाचे काम सुरू झाले, तेव्हा आपण पायातील माती काढत असताना त्या मातीत काय आहे, हेही लक्षात घेतले. एएसआय आधी येथे किती खालपर्यंत गेले होते, हे पाहिले गेले. एएसआयने मंदिराच्या पायासाठी इतक्या खोल जाण्यापूर्वी जागेची चाचपणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यानुसार जीपीआर (ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार) तंत्रज्ञान वापरले गेले. हैदराबादच्या एनजीआरआयकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी 30 ते 40 मीटर्स खोल जाण्याची नवी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. ज्या भागामध्ये आपण खोदकाम करू पाहतो आहोत, तिथे जमिनीत नदीचे पूर्वीचे मार्ग, त्यात वाळू कुठे कुठे आली आहे, कोणत्या काळात आली आहे, याचा अभ्यास करून आपल्याला नेमके किती खोल जायचे आहे, हे निश्चित करण्यात आले. त्यातून किमान 16 मीटर्स खोल जावेच लागेल, हे लक्षात आले. 20 मीटर्सपर्यंतचा अंदाज लक्षात घेत आपण पेनिट्रेशन केले तेव्हा दगड, विटा आणि त्यातून बांधलेल्या इमारतींचे काही अवशेष आहेत असे लक्षात आले. एकदम खोदायला सुरुवात केल्यास या अवशेषांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता क्रमाक्रमाने खोदकाम करावे, असे ठरले. एएसआयसारख्या यंत्रणा ज्या प्रकारे एखाद्या ऐतिहासिक स्थळाचे उत्खनन करतात, त्याचप्रमाणे हे काम सुरू झाले. परंतु दुसरीकडे प्रत्यक्ष मंदिराचे बांधकामदेखील लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक होते. तसेच पावसाळाही तोंडावर आला होता. त्यामुळे अक्षरश: दिवस-रात्र हे काम करण्यात आले. यात आम्हाला 4-5 मंदिरांचे अवशेष सापडले. या सर्व प्रक्रियेत एएसआयचे लोक, शिवाय आपली संत-महंत मंडळीदेखील होतीच.
 
 
rammandir
 
या भव्य राम मंदिरात दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येणार आहेत. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन म्हणून आवश्यक असलेल्या व्यवस्थांची या मंदिर उभारणीत कशा प्रकारे काळजी घेण्यात आली आहे?
 
जगन्नाथ (मामा) गुळवे - मुळात बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर जेव्हा रामजन्मभूमीवर छोटे अस्थायी मंदिर बांधण्यात आले, तेव्हापासून तिथे श्रीरामाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून हजारो-लाखो रामभक्त येत आहेत. त्यामुळे भव्य मंदिर उभे राहिल्यानंतर आज येत आहेत त्याच्या कित्येक पटीने अधिक लोक दर्शनाला येतील, याची आम्हाला कल्पना होतीच. रामनवमीच्या दरम्यान तिथे लाखांनी लोक येतात. एरवीही हजारोंच्या संख्येने लोक येत असतात. ही संख्या लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना - उदा., पाणी, वीजपुरवठा, स्वच्छतागृहे, सामान ठेवण्यासाठी लॉकर्स, चप्पल ठेवण्याची व्यवस्था इत्यादींची रचना मंदिरात करण्यात आली आहे. या व्यवस्थांचा भार अयोध्या महानगरपालिकेवर पडणार नाही. मंदिर संकुलातच स्वतंत्रपणे भूमिगत पाणी साठवले जाणार आहे, तसेच विजेचीही स्वतंत्र वाहिनी मंदिर संकुलात जोडण्यात आली आहे. अग्निशमन दलासाठीही पाण्याची व्यवस्था मंदिर संकुलातच करण्यात आली आहे.
 
 
एल अँड टी, टाटा, आयआयटी व इतर अनेक राष्ट्रीय संस्था आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अशा अनेक संस्था-यंत्रणा या मांडणीत उभारणीच्या कामात सहभागी आहेत. शिवाय केंद्र सरकार, उत्तर प्रदेश राज्य सरकारदेखील देखरेख ठेवत आहेत. इतक्या यंत्रणा सहभागी असताना त्यांच्यात योग्य तो समन्वय राहावा, यासाठी कशा प्रकारे रचना लावण्यात आली होती?
 
 
जगदीश आफळे - यासाठी आम्ही दोन-तीन वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला. मुळात या सगळ्या कामाची एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे, ज्यात केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन यांचे प्रतिनिधी आहेत, काही ट्रस्टी आहेत, काही संत-महंत आहेत. निर्णय घेण्यासंबंधीचे काम या समितीकडे आहे. त्या त्या विषयातील तज्ज्ञांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करून संघशिस्तीप्रमाणे सामूहिक निर्णय घेतले जातात व सर्व जण त्याचे पालन करतात. याची दर महिन्यात बैठक होते व ही बैठक दोन तासांची नाही, तर दोन दिवसांची असते. यानंतर या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा - अभियंते, सुपरवायझर्स इत्यादी दर सोमवारी एकत्र येतात व चर्चा करतात. हे सगळे होत असताना या कामाचा मूळ कणा म्हणजे अर्थातच वेळ, खर्च आणि दर्जा याबाबत विचारमंथन होते. दर्जाबाबत कुठेही तडजोड नाही, याच तत्त्वावर हे सर्व काम होते आहे. शिवाय या कामात कुठेही लहान-मोठा अपघात होता कामा नये, याचीही काळजी आपण पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. आज या सर्व कामात साधारणपणे 15 वरिष्ठ व्यवस्थापक, 60-65 अभियंते आणि 4500 कामगार प्रत्यक्ष साइटवर कार्यरत आहेत. स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महिन्यातून एकदा इथे भेट देत होते. स्थानिक प्रशासनाशी बैठका होत होत्या. थोडक्यात सांगायचे, तर ’पूर्वनियोजन आणि पूर्ण नियोजन आणि या नियोजनानुसार पूर्ण क्षमतेने काम’ या तत्त्वावर राम मंदिराच्या उभारणीचे काम घडले आहे.

निमेश वहाळकर

सा. विवेकमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत.  मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण.