महाविकास आघाडीसाठी देवरांचा बळी गेला...

विवेक मराठी    19-Jan-2024   
Total Views |
congress
यावेळी दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत. महाविकास आघाडी असल्याने तेथून देवरांना उमेदवारी मिळणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी याबाबत अनेक प्रयत्नही केले. पण आघाडी असल्याने उमेदवारी मिळणार नाही असेच उत्तर मिळाले. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे महाविकास आघाडीसाठी एका काँग्रेस निष्ठावंताचा बळी गेला आहे...
काँग्रेस पक्षामध्ये अशी काही राजकीय घराणी आहेत, जी काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्या तीन तीन पिढ्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली. काँग्रेस पक्ष ग्रामीण भागातही रुजवला, पक्षाला बळ दिले. त्यामुळे पक्ष 60वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेवर राहू शकला. पण 2014च्या लोकसभा निवडणुकीत वातावरण काँग्रेसच्या विरोधात जाताना दिसू लागले. तेव्हा अनेकांनी मोदी लाटेत पक्षाला राम राम केला, पण काही काँग्रेसनिष्ठ घराण्यांनी पक्ष सोडला नाही. भाजपाचे आव्हान स्वीकारून काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्याचे काम केले. काँग्रेसच्या अशा एकनिष्ठ घराण्यांतील एक घराणे म्हणजे देवरा घराणेे! मुरली देवरा हे काँग्रेसचे मुंबईतील मोठे नेते होते. 80 ते 90च्या दशकात शिवसेनेच्या आव्हानाचा प्रतिकार करून त्यांनी काँग्रेसला मुंबईत बळ दिले. ईशान्य मुंबईत गुरुदास कामत आणि दक्षिण मुंबईत देवरा असे दोन भक्कम आधारस्तंभ काँग्रेसकडे होते. पुढे देवरा यांचा चिरंजीव मिलिंद देवरा दोन वेळा मुंबईतून खासदार झाले. टीम राहुलमध्ये ते सक्रिय होते. त्यामुळे अशा नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांची दखल घेणे उचित ठरते, नाहीतर आता काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने भाजपामध्ये किंवा अन्य पक्षामध्ये प्रवेश केला तरी त्यात काही अप्रूप किंवा सनसनाटी बातमी राहिली नाही. पण देवरा घराण्याचे वेगळेपण म्हणजे तेे प्रवाहाच्या विरोधात राहून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आणि त्यांनी मुंबईत काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा जरी दोन वेळा पराभूत झाले असले, तरी त्यांनी घेतलेली मतांची टक्केवारी मोठी आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेत पक्षाचे नगरसेवक, विधानसभा निवडणुकीत आमदार त्यांनी निवडून आणले होते. कॉर्पोरेट जगतातील मैत्रीतून ते पक्षाला मोठा फंडही मिळवून देत होते. पण तरीही काँग्रेस पक्ष त्यांना या वेळी दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळवून देण्यास असमर्थ ठरत आहे, हे पाहिल्यानंतर त्यांनी शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला. खरंतर मिलिंद देवरा हे पक्षात नाराज होते हे अनेक वेळा दिसत होते. तेव्हाच राहुल गांधी यांनी स्वत:होऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. पण राहुल गांधींना एवढे समजत असते, तर नक्की आज पक्षाचे वेगळे चित्र असते. खरंतर पक्षाने प्रतापगढी ऐवजी देवरांना राज्यसभेवर पाठवले पाहिजे होते, पण तसे झाले नाही.किंवा अन्य काही मोठे पद देऊन सन्मान केला नाही.
 
 
काँग्रेस पक्षाच्या चिरा ढासळू लागल्या आहेत. राहुल गांधी यांच्या टीममधील ज्योतिरादित्य सिंदिया, आर.पी.एन. सिंह, जितिन प्रसाद या सर्वांनीच अन्य पक्षांत प्रवेश केला आहे. एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते पक्षाला राम राम करत असतांनाही एक एक कार्यकर्ता व नेता किती महत्त्वाचा असतो, हे राहुल गांधी यांना उमगलेले नाही. दुसरीकडे भाजपाचा पराभव करण्यासाठी राहुल गांधी गेल्या वर्षी भारत यात्रा काढली, या वर्षी भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. भारत जोडो यात्रा काढूनही मध्य प्रदेशात आणि राजस्थानमध्ये पक्षाला लाजिरवाणे पराभव पत्कारावे लागले. ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूं।’ अशी वाक्ये बालून चांगली वातवरणनिर्मिती केली. पण प्रत्यक्षात काहीच फरक पडला नाही. त्यामुळे राहुल गांधींचा कार्यकर्ता जोडो झालाच नाही. त्यामुळे आता त्यांनी काँग्रेस पक्षाला संजीवनी देण्यासाठी यात्रा काढावी. कदाचित ते जास्त संयुक्तीक ठरेल.. आता लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात असताना त्यासाठी रणनीती आखून तयारीला लागायचे असते. तिकीट वाटपाबाबत चर्चा करायची असते. नाराज कार्यकर्त्यांना कुरवाळायचे असते. ही सर्व कामे सोडून यात्रा काढून एखाद्या संन्याशासारखे फिरस्ती होणे याला राजकीय अपरिक्वताच म्हणता येईल. त्यामुळे यापुढेही देवरांसारखे इतरही नेते नाराजीमुळे पक्षातून बाहेर पडू लागले, तर नवल वाटायला नको.