अनोख्या स्पर्धेतून मुलांमध्ये रामचरित्राची रुजवात

विवेक मराठी    29-Jan-2024   
Total Views |

rammandir
मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये कौशल्य विकास मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम जीवनचरित्र’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रामायणातून विद्यार्थ्यांना निर्णयक्षमता, नियोजन कौशल्य, समरसता, बंधुभाव, नीतिमत्ता, राज्यशास्त्र अशी जीवनमूल्ये आणि व्यवहारज्ञान मिळेल, हा या स्पर्धेचा उद्देश होता. या अनोख्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रामचरित्राची रुजवात करण्याचा हा स्तुत्य उपक्रम.
 
अवघा देशच नव्हे, तर जगाचा कानाकोपरा 22 जानेवारी 2024 या ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार झाला. या वर्षातील विलक्षण योग म्हणजे देशाबरोबरच सार्‍या जगाने दिवाळीपूर्वीच मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. हा सुवर्णदिन येण्यासाठी अनेक जणांनी त्याग, समर्पण, बलिदान यांच्या समिधा वाहिल्या. पाच शतकांचा हा संघर्ष अत्यंत खडतर होता. परंतु न डगमगता सनातन धर्मातील सार्‍यांनी संयम न सोडता वज्रनिर्धाराने हा संकल्प सत्यात उतरवला. त्यामुळे हा आनंद अवर्णनीय होता. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन मंदिरनिर्माणाला अनुमती दिल्यापासूनच सार्‍या देशात उल्हासाचे वातावरण होते. स्वप्नपूर्तीचा हा आनंद व्यक्त करण्यासाठी अनेक जणांनी अनेक संकल्प हाती घेतले. देशातील कोणताही वर्ग, समाज, क्षेत्र यापासून दूर राहिला नाही.
 
 
अनेकांनी जागोजागी फलक लावून आपला आनंद व्यक्त केला. कौशल्य विकास मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मंगलप्रभात लोढा यांनीही फलक लावून हा आनंद व्यक्त केला. पण त्याचबरोबर त्यांनी समाजभान राखून आणि खर्‍या अर्थाने पालकमंत्र्याची भूमिका बजावून मुंबई महानगरपालिकांच्या सर्व शाळांमध्ये ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम जीवनचरित्र’ हा अनोखा उपक्रम राबविला.
 

rammandir 
 
या अनोख्या उपक्रमाबद्दल मा. मंगलप्रभात लोढा यांच्याशी संवाद साधला आणि ही संकल्पना नेमकी कशी सुचली असे विचारता, ते म्हणाले, “मी रा.स्व. संघाच्या मुशीत वाढलेला एक स्वयंसेवक आहे. त्यामुळे संघसंस्काराचे बाळकडू मला लहानपणापासूनच मिळाले आहे. राष्ट्र प्रथम ही शिकवण म्हणजेच राष्ट्राची अस्मिता, संस्कृती, जीवनमूल्ये यांची जोपासना करणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे आपले परमकर्तव्य आहे, हा संघसंस्कार रुजला आहे. 2014नंतर सत्ता परिवर्तन होऊन काळ्या इंग्रजांचे राज्य जाऊन हिंदुत्व विचारधारा मानणारे सरकार सत्तारूढ झाले. तेव्हापासूनच हिंदुत्वाचा विचार जोरकसपणे मांडण्यात आला. हिंदुत्व म्हणजे परधर्मावर टीका नसून प्रत्येक धर्माचा आदर होय. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे हिंदू धर्माचे सर्वात मोठे तत्त्व आहे. या तत्त्वात केवळ मानवजातीचा विचार केलेला नाही, तर पृथ्वीतलावर असलेल्या सर्वांच्या कल्याणाचा विचार केला आहे.
 
 
श्रीराम हे आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांचे जीवन हे कर्तव्यधर्माचा वस्तुपाठ आहे. शिवाय आपल्या संस्कृतीत सुशासनाची उपमा देताना रामराज्याची संकल्पना मांडली गेली आहे. श्रीरामांचे वैयक्तिक आयुष्य अथवा सार्वजनिक आयुष्य हे कर्तव्यधर्माचे पालन कसे करावे याचा आदर्श प्रस्थापित करणारे आहे. या मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाला त्रेतायुगात चौदा वर्षे वनवास भोगावा लागला आणि या युगात जन्मस्थानावर श्रीराम मंदिर उभे राहण्यासाठी पाचशे वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष करावा लागला.
 
 
rammandir
 
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचे जीवनचरित्र आणि पाचशे वर्षांच्या आंदोलनाचा थोडाबहुत इतिहास (किमान अलीकडचा - कारसेवेचा इतिहास, विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन, सनातन धर्माचा त्याग, समर्पण, बलिदान) याची या शालेय जीवनात जुजबी माहिती व्हावी, याकरिता ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम जीवनचरित्र’ या स्पर्धेचे आयोजन केले. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, म्हणून विद्यार्थ्यांना त्याच माध्यमातून या विषयाकडे वळविले पाहिजे. या निमित्ताने ते आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ मंडळीशी संवाद साधतील, आपल्या परिसरातील मंदिरात जाऊन गुरुजनांशी संवाद साधतील, गूगलच्या मदतीने या विषयाची माहिती काढतील, पुस्तके वाचतील, गोष्टी ऐकतील आणि राम या दोन अक्षरांचे सामर्थ्य आणि रामनामासाठी, राम मंदिरासाठी दिलेला प्रदीर्घ लढा याविषयी अभ्यासून स्पर्धेत सहभागी होतील. यातून प्रभू श्रीरामांच्या जीवनातील घटना-प्रसंगांचा मुलांवर सकारात्मक प्रभाव पडेल, तसेच रामायणातून विद्यार्थ्यांना निर्णयक्षमता, नियोजन कौशल्य, समरसता, बंधुभाव, नीतिमत्ता, राज्यशास्त्र अशी जीवनमूल्ये आणि व्यवहारज्ञान मिळेल, हा या स्पर्धेचा उद्देश होता. कारण या वयोगटातील मुलेच उद्याचे उज्ज्वल भारताचे, रामराज्याच्या दिशेने जाणार्‍या सुशासनाचे नागरिक आहेत. रामजीवनाचा एखादा गुण जरी या वयात रुजविण्याचे छोटे कार्य या स्पर्धेच्या निमित्ताने झाले, तरी ते या स्पर्धेचे फलित म्हणावे लागेल.”
 
 
या स्पर्धेचे आयोजन करताना मुलांनी याच दिशेने या विषयाकडे पाहावे असा विचार होता, आणि झालेही तसेच. मुलांनी अतिशय अभ्यास करून या स्पर्धेत भाग घेतला. चित्रकला, निबंध, काव्यलेखन, नाट्य सादरीकरण अशा माध्यमांतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 10 जानेवारीपासून सुरू झालेल्या स्पर्धेची सांगता 17 जानेवारीला झाली. मुंबईतील 1148 शाळांमध्येे ही स्पर्धा घेण्यात आली. 1 लाख 20 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन व निवडक नाटकांचे सादरीकरण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात ठेवण्यात आले.
 
 
‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम जीवनचरित्र’ या स्पर्धेतील सहभाग ऐच्छिक असतानाही मनपा शाळेतील सर्वधर्मीय मुले यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाली. ‘सब के राम’ ही प्रचिती या स्पर्धेतून अनुभवास मिळाली, असे मनपा शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले. तसेच मुलांबरोबर पालंकानीही या स्पर्धेचे स्वागत केले. या विषयावर पहिल्यांदाच शाळेतून असे आयोजन करण्यात आल्याबद्दल आणि आपली सनातन संस्कृती मुलांमध्ये रुजविण्यासाठी स्तुत्य असा उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या.
 
 

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.