निमंत्रणाचे ‘राज’कारण

विवेक मराठी    09-Jan-2024   
Total Views |


rammandir
 सर्व मान्यवरांना ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ न्यासातर्फे निमंत्रण पाठविण्यात आलेले आहे. निमंत्रणपत्रावर चंपतराय, महासचिव, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांची सही आहे. चंपतराय हे संघप्रचारक असून त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेचे दायित्व आहे. हे सर्व पाहता एखादा शाळकरी मुलगाही हे निमंत्रण कुणी पाठविले आहे, हे सांगू शकतो.
 
आपण सार्‍या भारतीयांसाठी २०२४ साल हे ऐतिहासिक ठरणारे आहे. कारण पाचशे वर्षांच्या पराभवाचा अंधकार नष्ट होऊन या वर्षाच्या शुभारंभीच भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण होऊन रामराज्याची सोनेरी पहाट उजाडणार आहे. त्याग, समर्पण व बलिदानाने घायाळ झालेली अयोध्या नगरी भव्य श्रीराम मंदिराने तेजाळणार आहे. बलिदानाच्या रक्ताने लाल झालेली पवित्र शरयू नदी खळखळून आनंदाने वाहणार आहे. २२ जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर श्रीराम पुन्हा अयोध्येत परतणार आहेत. ‘श्रीराम' अर्थात हिंदू जीवनमूल्यांचा एकत्रित संचय होय. भारतातील सर्व जातीजातींतील-प्रांतांतील समूहांना जोडणारा एकात्मतेचा धागा म्हणजेच मर्यादापुरुषोत्तम राम.
 
 
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्यानंतरही जवळजवळ ७० वर्षे श्रीरामजन्मभूमीसाठी हिंदू जनमानसाने संघर्ष केला. प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देऊन वादग्रस्त भूमी श्रीरामाची जन्मभूमी असून त्यावर भव्य श्रीराम मंदिर उभारण्याची अनुमती दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या माध्यमातून लाखो रामभक्तांना जानेवारी महिन्यात अयोध्येत होणार्‍या भव्य श्रीराम मंदिर लोकार्पणाचे याचि देही याचि डोळा साक्षी होता येणार आहे. श्रीराम हे सकल जनांचे असल्यामुळे श्रीरामांचे मंदिर हे सर्वसामान्य रामभक्तांच्या योगदानातून व्हावे, याकरिता न्यासातर्फे निधी संकलन मोहीम राबविली आणि सार्‍या भारतवासीयांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 
 
या सर्व पार्श्वभूमीवर ज्या वेळी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली, त्या वेळी सर्वसंमतीने असेही ठरविण्यात आले की, श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाचे निमंत्रण सर्वांना द्यायचे. देशातील मान्यवरांना ‘श्रीराम रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र’ न्यासातर्फे हस्ते अथवा कुरिअरने हे निमंत्रण पाठविण्यात आले. संपूर्ण भारत राममय झाला असताना लोकार्पणाच्या दिवशी प्रत्येकाला अयोध्येत येऊन प्राणप्रतिष्ठा करणे शक्य होणार नाही, हा विचार करून ‘अक्षता कलश यात्रां’चे आयोजन करण्यात आले. भारतातील सर्व भागांत या अक्षता कलश यात्रांचे उत्साहाने आणि आनंदाने स्वागत झाले.
 
 
सकल समाजाचा विचार करून सर्व रामभक्तांना या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळावे, यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न केले गेले. तरीही दुधात मिठाचा खडा पाहण्याची सवय असणार्‍यांना यातही कसे चांगले दिसेल, असेच झाले. भारतातील सर्व मान्यवरांना ‘श्रीराम रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ यांच्यातर्फे निमंत्रण पाठविण्यात आलेले आहे. काही मान्यवरांनी या निमंत्रणाचे सहर्ष स्वागत केले, निमंत्रण मिळणे हे आपले सौभाग्य मानले, तर काही नतद्रष्टांनी निमंत्रण मिळण्याआधीपासूनच ’न‘चा पाढा वाचायला आणि गळे काढायला सुरुवात केली. काहींनी तर हा कार्यक्रम स्वतःहोऊन भाजपाचा ठरवून टाकला. हा राजकीय कार्यक्रम असल्याने आम्हाला तिथे स्थान नसणार, याची ग्वाहीही देऊन टाकली, असो.
 
 
 
मूळ मुद्दा हा आहे की, सर्व मान्यवरांना ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ न्यासातर्फे निमंत्रण पाठविण्यात आलेले आहे. निमंत्रणपत्रावर चंपतराय, महासचिव, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांची सही आहे. चंपतराय हे संघप्रचारक असून त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेचे दायित्व आहे. हे सर्व पाहता एखादा शाळकरी मुलगाही हे निमंत्रण कुणी पाठविले आहे, हे सांगू शकतो.
  भाजपाच्या कोणत्याही केंद्रीय मंत्र्याने निमंत्रण दिलेले नाही किंवा भाजपाच्या केंद्रीय सचिवाने निमंत्रण दिलेले नाही.
 
यावरून एवढे तरी नक्कीच समजते की, मंदिर लोकार्पणाचा कार्यक्रम भाजपाचा नाही. भाजपाच्या कोणत्याही केंद्रीय मंत्र्याने निमंत्रण दिलेले नाही किंवा भाजपाच्या केंद्रीय सचिवाने निमंत्रण दिलेले नाही. मात्र ही सर्व कडबोळी गँग आपल्याच गोंधळात एवढी दंग झाली आहे की, आपल्या आजूबाजूला काय चालले आहे, जनभावनांचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, जनमताचा कौल काय आहे, याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत.
 
 
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे, ही एकच सल या कडबोळी गँगला खटकत आहे. श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचा इतिहास पाहिला, तर नरेंद्र मोदी हे श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनातील एक शिपाई होते, या आंदोलानत ते सक्रिय सहभागी होते; शिवाय स्वातंत्र्यानंतर सत्तास्थानावरील सरकारांपैकी श्रीराम मंदिराबाबत सकारात्मक भूमिका घेणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारे सरकार हे मोदींच्या कार्यकाळातील आहे.
 
  काँग्रेसकडून राम मंदिर उभारणीची नेहमीच खिल्ली उडवली गेली.
काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस संसदीय पक्षनेत्या सोनिया गांधी यांनाही श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. या समारंभास उपस्थित राहण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. यावर उत्तर देताना साध्वी निरंजन ज्योती यांनी म्हटले की, "त्यांच्या मनात जर रामाविषयी श्रद्धा असेल, मर्यादापुरुषोत्तम रामाला ते मानत असतील, तर निमंत्रण स्वीकारा आणि श्रीरामाचे दर्शन घ्या." काँग्रेसकडून राम मंदिर उभारणीची नेहमीच खिल्ली उडवली गेली. काँग्रेसचे पित्रोदा यांनी "धर्म आणि राजकारण एकत्र करण्याचा भाजपाचा डाव आहे" असे तकलादू विधान केले आहे.
 
 
श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे आपणास निमंत्रण आले आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी तेजस्वी यादव यांना विचारला असता ते म्हणाले की, "आमच्या घरीही मंदिर आहे. आम्ही तिथे पूजाअर्चा करीत असतो. खरे तर देशाला रुग्णालयाची गरज आहे, अन्नछत्राची गरज आहे. मंदिरात गेलो तर आपल्याला दान द्यावे लागते. मंदिराचा देशाला काय उपयोग?" असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना केला. यापुढे त्यांची वटवट सुरू झाली, ती म्हणजे, भाजपा ज्या प्रकारे मंदिरामागील मार्केटिंग आणि मोदींजीचं ब्रँडिंग करते, ते चुकीचे आहे.
 
 
rammandir
 
गेल्या दोन वर्षांतील महाराष्ट्राचे राजकारण किती गढूळ झाले आहे, ते आपण सारे जाणतोच. त्यात श्रीराम मंदिराच्या निमंत्रण पत्रिकेवरूनही राजकीय वादळ चालूच आहे.
 
 
याउलट क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद हे निमंत्रण मिळताच भावुक झाले. "मी हयात असेपर्यंत राम मंदिराची निर्मिती व्हावी, अशी माझी अपेक्षा आणि इच्छा होती. येत्या सोमवारी २२ जानेवारीला मंदिराचे लोकार्पण होईल आणि या अत्यंत पवित्र प्रसंगी मला निमंत्रण आले आहे, हे माझे मी सौभाग्य समजतो."
 
rammandir
 
अभिनेता रजनीकांत यांना अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण मिळताक्षणीच ते आनंदाने मोहरून गेले. विरोधाभास म्हणजे ज्या काँग्रेसने श्रीरामाचे अस्तित्वच नाकारले होते, त्या काँग्रेसलाही आता श्रीराम आमचे आहेत, असे वाटू लागले आहे. फारुख अब्दुला यांनीही श्रीरामाला आपले म्हणावे, यातच सारे काही आले. श्रीराम मंदिराचे राजकारण केले असे म्हणणारेच जेव्हा भगवंतांना ‘आपले' म्हणतात, तेव्हा ते त्यांनी सोयीनुसार केलेले राजकारण असते, हे तर आता जनतेलाही चांगलेच ठाऊक आहे.
 
निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व पक्षप्रमुखांना श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण दिले गेले, तरी ज्यांना यातही सूडाचे राजकारण दिसले, त्यांच्या मनातील राम नक्कीच हरवला आहे असे म्हणावेसे वाटते. राजकीय भाषेत बोलायचे झाले, तर त्यांनी स्वतःहोऊन भाजपाला ‘राम’नामाची राजकीय स्पेस दिली आहे. राम म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्वाची सज्जनशक्ती एकवटली की काय चमत्कार होतो, ते आपण अयोध्येत होणार्‍या भव्य श्रीराम मंदिराच्या निमित्ताने पाहत आहोत. जे रामाबरोबर आहेत, त्यांना प्रजा रामराज्य करण्याची संधी नक्की देईल, हे वेगळे सांगायला नको.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.