@मधुभाई कुलकर्णी
स्वतंत्र भारतामध्ये समाजात कोणते गुण हवेत याचा विचार कुणी केला असेल तर केवळ डॉ. हेडगेवारांनी. हेच त्यांचे स्वातंत्र्यसेनानी म्हणून असामान्यत्व आहे. देशाकरिता जगणारे नागरिक हवेत. दैनंदिन व्यवहारात देशभक्तीचे जीवन जगणारे, अनुशासनाचे पालन करणारे, सचोटीचा व्यवहार करणारे, पर्यावरणपूरक जीवनशैली असलेले, भेदभाव न मानणारे, स्वाभिमानी नागरिक हवेत. ‘क्रांतदर्शी केशवाने दिव्य स्वप्ना पाहिले’ अशी एक काव्यपंक्ती आहे. आपण प्रारंभ केलेले कार्य स्वतंत्रतेला अमरत्व प्राप्त करून देणारे ठरेल याचा त्यांना प्रबळ आत्मविश्वास होता. संघकार्य हे ईश्वरी कार्य आहे, असे ते नेहमी म्हणत असत.
विसाव्या शतकातील पहिली 50 वर्षे स्वातंत्र्य आंदोलनाने भारलेला कालखंड होता. संघनिर्माता डॉ. हेडगेवार हे अग्रगण्य स्वातंत्र्यसेनानी होते. क्रांतिकार्य असो, लोकमान्य टिळक होम रुल लीगकरिता पैसा फंड उभा करणे असो, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चाललेले असहकार आंदोलन असो, खादी प्रचार असो, स्वदेशी भांडार चालवणे असो, ‘स्वातंत्र्य’ दैनिकाचे संचालन असो, सर्वत्र त्यांचा सहभाग दिसून येतो.
ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वशासन नको, तर संपूर्ण स्वातंत्र्याचे ते आग्रही होते. 1920 च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनात कार्यसमितीसमोर पाठवलेल्या प्रस्तावावरून त्यांच्या हृदयातील स्वातंत्र्याबद्दलची धग लक्षात येते. हिंदुस्थानचे प्रजासत्ताक निर्माण करून भांडवलशाही राष्ट्राच्या जाचातून जगातील देशांना मुक्त करणे हे काँग्रेसचे ध्येय आहे, असा प्रस्ताव काँग्रेसने स्वीकारावा, अशी डॉ. हेडगेवारांची इच्छा होती. त्या काळात असे अधिकृत घोषित करणे काँग्रेसला सोयीचे झाले नसते. 1921 ला झालेल्या शिक्षेच्या वेळी त्यांनी न्यायालयात केलेल्या बचावाच्या प्रतिपादनातून त्यांच्या मनातील स्वातंत्र्याची तीव्रता लक्षात येते. “खरोखरच असा एखादा कायदा आहे काय, की ज्याच्या योगाने एका देशातील लोकांना दुसर्या देशातील लोकांवर राज्य करण्याचा अधिकार पोहोचतो? पब्लिक प्रॉसिक्युटरला, माझा तुम्हाला हा सवाल आहे. ही गोष्ट निसर्गाच्या विरुद्ध नाही काय? इंग्रजांना हिंदुस्थानातील लोकांना पायाखाली तुडवून त्यांच्यावर राज्य करण्याचा अधिकार कोणी दिला? ज्याप्रमाणे इंग्लंडचे लोक इंग्लंडवर, जर्मनीचे लोक जर्मनीवर राज्य करतात तसे आम्ही हिंदुस्थानातील लोक हिंदुस्थानात मालक म्हणून राज्य करू इच्छितो. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे आहे आणि ते आम्ही मिळविणारच.”
'हिंदू समाजाचे संघटन' या सूत्राला धरून काम करणाऱ्या रा. स्व. संघाच्या प्रयत्नातून मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या अनेक विषयांवर प्रभावी काम झाले आहे. हे जाणून घेण्यासाठी...
स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या चाललेल्या सर्व प्रकारच्या गतिविधींमध्ये सहभागी होत असताना अजून एक मूलभूत प्रश्न त्यांना सतावत होता. स्वातंत्र्य मिळविण्याइतका तो महत्त्वाचा आहे, असे त्यांना वाटत होते.
स्वातंत्र्य गेले का? ज्या चुकांमुळे, कमतरतेमुळे ते स्वातंत्र्य गेले, तेही पुन्हा जाणार नाही कशावरून?
एक महत्त्वाचे कारण जे कोणाच्याही लक्षात येईल, ते म्हणजे फितुरी. सिंधचे सम्राट राजा दाहीर होते. महापराक्रमी असा त्यांचा लौकिक होता. ते महंमद बिन कासिमच्या आक्रमणासमोर हरले, कारण राजा दाहीर यांचा सेनापतीच कासिमला फितूर झाला, असे म्हणतात.
दिल्लीचे सम्राट वीर पृथ्वीराज चौहान, आक्रमक महंमद घोरीचा अनेकवार पराभव करणारे एकदा हरले की मुद्दाम हरवले गेले.
पराक्रमी पृथ्वीराजचे संबंधी (व्याही) जयचंद याने फितुरी केली व पृथ्वीराजांना पकडून दिले.
शत्रू लालूच दाखवणारच! त्याला मारतो, तुला सम्राट करतो, सम्राट होण्याच्या महत्त्वाकांक्षेने उचल खाल्ली, शत्रूला देशात प्रवेश मिळेल, हा विचारच मनाला शिवला नाही.
हे असेच चालू राहिले तर मिळालेले स्वातंत्र्य टिकेल का?
देशभक्ती हा काही जणांचाच गुण म्हणून ओळखला जातो असे का? प्रत्येक नागरिक स्वभावतः देशभक्तच असला पाहिजे. देशभक्ती हा प्रत्येकाचा प्राथमिक गुण असला पाहिजे. स्वातंत्र्याइतकाच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. फितूर होण्याची परंपरा थांबलीच पाहिजे.
स्वातंत्र्य का गेले? या प्रश्नाने केशवचे मन किती चक्रावून गेले होते. ते आपले काका आबाजी हेडगेवार यांच्याशी झालेल्या पत्राचारातून स्पष्ट दिसते.
कलकत्त्याहून डॉक्टर होऊन केशव नागपूरला परत आला. नातेवाईकांमध्ये स्वाभाविकपणे दवाखाना, लग्न यांची चर्चा सुरू झाली. काका आबा यांनी लिखितच विचारणा केली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, वीर सावरकर, डॉक्टर मुंजे लग्न करून स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय आहेत. तुझा केव्हा लग्न करण्याचा विचार आहे? केशवने याला दिलेल्या उत्तरावरून त्याच्या मनात चाललेली घालमेल आपल्या लक्षात येते. केशव लिहितो, तुम्ही म्हणता ते सर्व खरेच आहे. माझे मन एका प्रश्नाने घेरले आहे. शत्रूला आपलेच लोक फितूर झाल्यामुळे आपला पराभव झाला व आपण गुलाम झालो, हे थांबवता येणार नाही का? यासाठी मी काही करू शकलो तर मी मला धन्य समजेन.
लग्न करून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय राहता येते, हे तुम्ही म्हणता हे खरेच आहे; पण माझी मनाची ठेवण वेगळीच आहे. हे घरासाठी व हे देशासाठी अशी मनाची वाटणी मी करू शकणार नाही. मी लग्न करायचे नाही, हे पक्के केले आहे. कृपा करून लग्नाची चर्चा थांबवा.
त्यांच्या अंतःकरणात असलेली धगधग त्यांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांवरून दिसून येते.
18 मार्च 1922 ला महात्मा गांधींना सहा वर्षांची कारावासाची शिक्षा झाली. कारावासातून बाहेर येईपर्यंत दर महिन्याच्या 18 तारखेला गांधी दिन पाळला जात असे.
एका गांधी दिनाच्या डॉक्टरांच्या वक्तव्यातील दोनच वाक्ये पाहा. महात्मा गांधींसारख्या पुण्यश्लोक पुरुषाच्या अंगी असलेल्या सद्गुणांचे श्रवण व चिंतन करण्याचा आजचा दिवस आहे. महात्मा गांधींच्या अंगी असलेला अत्यंत महत्त्वाचा सद्गुण म्हणजे हाती घेतलेल्या कार्याकरिता आत्यंतिक स्वार्थत्याग होय. महात्मा गांधींचे अनुयायी म्हणवून घ्यायचे असल्यास स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून रणांगणात उतरा, अशा विचाराने डॉक्टरांचे अंतःकरण सारखे धगधगत होते.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चाललेल्या सर्व प्रकारच्या प्रयत्नांत अग्रेसर व सक्रिय असतानाच त्यांच्या मनात येत असलेले विचार पाहिले तर स्वतंत्रता सेनानी म्हणून त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य लक्षात येते.
1. पूर्ण प्रभावी संस्कार केल्यावाचून देशभक्तीचे टिकाऊ स्वरूप निर्माण होणे अशक्य आहे व असे स्वरूप निर्माण होईपर्यंत सामाजिक व्यवहारात सचोटी येणे, ही गोष्ट शक्य नाही.
2. देशभक्तीने रसरसलेले व शीलाने नटलेले, गुणविकासाने प्रभावी झालेले, निस्सीम सेवाभावाने स्वतःहून अनुशासित जीवन जगण्यास उत्सुक असलेले असे क्रियाशील, कर्तृत्वशाली तरुण लक्षावधी संख्येने उभे केले पाहिजेत.
3. समाजातील आज जाणवणारे प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्न तर अवश्य व्हावेत; पण हे भेसूर प्रश्न कायमचेच मिटवायचे असतील तर मात्र काही पिढ्यांपर्यंत राष्ट्रीयत्वाची दीक्षा देऊन देशहितासाठी जीवनभर अखंड जागृत राहणारे नागरिक उभ्या देशात प्रचंड संख्येने परंपरेने उभे केले पाहिजेत.
डॉ. केशवराव हेडगेवार यांच्या मनात चाललेल्या वरील विचारांवरून असे लक्षात येते की, मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी समाजाची सिद्धता कशी असली पाहिजे याचा ते विचार करत होते.
‘आधी स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा’ हा वादही या दिवसांत उभा राहिला होता. डॉक्टर या वादात सहभागी झालेले दिसत नाहीत. Eternal vigilance is the price of libertyअसे एक इंग्रजी वाक्य प्रसिद्ध आहे. Eternal vigilance करिता आवश्यक गुणांनी युक्त समाज कसा उभा करता येईल याचा सविस्तर विचार त्यांनी केला होता असे दिसते.
नुसता विचार करून ते थांबले नाहीत, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चालवलेल्या सर्व प्रकारच्या गतिविधींमध्ये हिरिरीने भाग घेत असतानादेखील त्यांनी आंदोलने, चळवळ यापासूनही वेगळ्या अशा कामास प्रारंभ केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने ते ओळखले जाते.
राष्ट्रीयत्वाची दीक्षा देऊन वैयक्तिक स्वार्थ व महत्त्वाकांक्षा याला बळी न पडणारा, राष्ट्रीय भावनेने ओतप्रोत असा आपला समाज उभा व्हावा, असे डॉ. हेडगेवारांना वाटत होते हे आपण पाहिले.
राष्ट्रीयत्वाची भावना समाजात रुजवण्यासाठी काही पिढ्यांपर्यंत काम करावे लागेल, असे त्यांचे मन त्यांना सांगत होते. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने भारलेले देशहितासाठी जीवनभर अखंड जागृत राहणारे नागरिक उभ्या देशात प्रचंड संख्येने परंपरेने उभे केले पाहिजेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आगळ्यावेगळ्या कामाला चालना दिली, त्याचे नाव (त्यांनी जे पक्के केले होते ते) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख म्हणजे संघाची रोज चालणारी एक तासाची शाखा होय. संघाची शाखा म्हणजे देशभक्तीचा सत्संग. प्रत्येक व्यक्तीमध्ये देशभक्ती हा प्राथमिक गुण असलाच पाहिजे. समाजमनामध्ये अनुभवसिद्ध असलेल्या सत्संग, सद्विचार आणि सदाचार या प्रमेयाला त्यांनी नवीन आयाम जोडला. साधुसंत, संप्रदायाचे प्रवर्तक सत्संगाला येण्याचे आवाहन करीत असतात. सत्संगामुळे व्यक्तीच्या जीवनात सद्गुणांची वाढ होते. ईश्वरभक्ती, देवभक्ती, गुरुभक्ती निर्माण करणारे सत्संग समाजात चालूच असतात,
‘’ईश्वरभक्ती, देवभक्ती, गुरुभक्ती कमी नाही. प्रखर देशभक्तीची कमी आहे. पूर्ण प्रभावी संस्कार केल्याशिवाय देशभक्तीचे टिकाऊ स्वरूप निर्माण होणे अशक्य आहे. असे स्वरूप निर्माण होईपर्यंत सामाजिक व्यवहारात सचोटी येणे कठीण आहे. देशभक्तीचे प्रभावी संस्कार होऊ शकतील अशा सत्संगाची आवश्यकता आहे. संघाची प्रत्येक शाखा म्हणजे देशभक्तीचा सत्संग, याबाबतीत डॉ. हेडगेवारांचे मौलिक चिंतन दिसून येते.”
संघाच्या शाखेत कोणत्याही देवतेचा अथवा महापुरुषांचा फोटो, प्रतिमा ठेवली जात नाही. एखाद्या महापुरुषाची विशेष तिथी शाखेच्या वतीने मानावयाची असेल तर त्या कार्यक्रमापुरता फोटो लावला जातो.
रोजच्या शाखेत फोटो नाही. संघनिर्माता म्हणून डॉ. हेडगेवार यांचाही नाही. शाखेत ‘संघ अमर रहे’, ‘डॉ. हेडगेवार अमर रहे’, ‘जय जगत’ इत्यादी कोणत्याही घोषणा दिल्या जात नाही.
शाखेत हनुमान चालीसा, नवग्रह स्तोत्र नाही. शाखा म्हणजे विशुद्ध राष्ट्रभक्ती. केवळ ‘भारतमाता की जय’, ‘राष्ट्र देवो भव’ याच भावनेचा संस्कार व्हावा.
मला काय मिळेल यावर देशभक्ती अवलंबून नाही. देशभक्ती सौदेबाजीचा विषय होऊ शकत नाही, अशा आशयाचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये दिलेल्या शेवटच्या भाषणात व्यक्त केले आहेत. आता आपण बहुपक्षीय लोकशाही स्वीकारत आहोत. प्रत्येक पक्ष सत्तेवर यायचा प्रयत्न करणार. पक्षहित की राष्ट्रहित, असा प्रश्न जेव्हा उभा राहील तेव्हा प्रत्येक पक्ष राष्ट्रहिताला प्राधान्य देईल का? असा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो. इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतर मिळालेले स्वातंत्र्य आपण घालवून तर बसणार नाही ना?
मी प्रथम भारतीय, मध्ये भारतीय व शेवटीही भारतीय. भारताकरिता बलिदान देण्याची वेळ आली तर मी पहिल्या रांगेत असेन. भारताच्या एकतेवर कुणी आघात करू शकणार नाही. There is a deep cultural unity in our society (that should be recognized by all).
तुम्ही मार्क्सवादी असा, लोहियावादी असा, गांधीवादी असा की आंबेडकरवादी असा, राष्ट्रवादी असणे महत्त्वाचे आहे. ‘नेशन फर्स्ट’ अशी भूमिका प्रत्येक नागरिकाची हवी, असा प्रयत्न संघाचा आहे. जपानचे एक उदाहरण बर्याच वेळा ऐकले आहे. एक भारतीय परिवार जपानमध्ये प्रवासाला जातो. रेस्टॉरंटमध्ये ते जेवण करतात. वेटर बिलाप्रमाणे पैसे घेतो व म्हणतो, तुम्ही पानात फार टाकले ते बरे नाही केले. भारतीय प्रवासी म्हणतो, तुला सर्व पैसे मिळाले ना? आम्ही खाऊ नाही तर न खाऊ, तो आमचा प्रश्न आहे. जपानी वेटर म्हणतो, पैसे तुमचे आहेत; पण अन्न देशाचे आहे.
आज 80,000 च्या वर देशभक्तीचे सत्संग चालू आहेत. लवकरच 1,00,000 व्हावेत असा प्रयत्न आहे. असा सत्संग प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत का नको? असा एककलमी कार्यक्रम संघाने चालवला आहे. पू. सरसंघचालक राज्याचा, प्रांताचा प्रवास करतात, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतात, बैठकांत याचीच विचारणा होते. सर्व मंडलांत, सर्व वस्तींत शाखा करण्याची काय योजना आहे?
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सत्याग्रह, तुरुंगवास भोगण्याची तयारी, आवश्यकता असेल तर बलिदान देण्याची तयारी होती. स्वतंत्र भारतामध्ये समाजात कोणते गुण हवेत याचा विचार कुणी केला असेल तर केवळ डॉ. हेडगेवारांनी. हेच त्यांचे स्वातंत्र्यसेनानी म्हणून असामान्यत्व आहे. देशाकरिता जगणारे नागरिक हवेत. दैनंदिन व्यवहारात देशभक्तीचे जीवन जगणारे, अनुशासनाचे पालन करणारे, सचोटीचा व्यवहार करणारे, पर्यावरणपूरक जीवनशैली असलेले, भेदभाव न मानणारे, स्वाभिमानी नागरिक हवेत. ’क्रांतदर्शी केशवाने दिव्य स्वप्ना पाहिले’ अशी एक काव्यपंक्ती आहे. आपण प्रारंभ केलेले कार्य स्वतंत्रतेला अमरत्व प्राप्त करून देणारे ठरेल याचा त्यांना प्रबळ आत्मविश्वास होता. संघकार्य हे ईश्वरी कार्य आहे, असे ते नेहमी म्हणत असत.