विजय संघशक्तीचा... जाणत्या जनतेचा

विवेक मराठी    23-Nov-2024   
Total Views |
 
rss
राष्ट्रीय शक्तीच्या एकजुटीचा हा विजय आहे. या अर्थाने हा संघशक्तीचा विजय आहे. जेव्हा आपला सुवर्णकाळ होता, तेव्हा आपण संघटित होतो आणि जेव्हा आपण विभाजित झालो, तेव्हा पतनाचा काळ सुरू झाला. या वेळेच्या निवडणुकीत गुजराती विरुद्ध मराठी अशीही विषयसूची चालविली गेली. मोदी आणि शहा गुजराती आहेत, त्यांचे राज्य आम्हाला नको, अशी बांग सकाळी 9 वाजता रोज ठोकण्यात येत होती. जनतेने ती एका कानाने ऐकली आणि दुसर्‍या कानाने सोडून दिली. वाघाचे कातडे पांघरलेले हे सर्व गाढव आहेत, हे जनतेने जाणून घेतले. हा विजय जनतेच्या या जाणतेपणाचा आहे. 
संघशक्तीचा विजय म्हणजे काय, हे स्पष्ट करायला पाहिजे. ‘संघ’ हा शब्द उच्चारला की, समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) येतो. हा विजय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजय आहे का? तर त्याचे उत्तर अजिबात नाही. संघाच्या एका गीताची ओळ अशी आहे, ‘समाज अवघा समर्थ करूनि, श्रेय कीर्तीचा करू धनी’. या निवडणुकीत संघाने काहीही केले नाही, जे काही केले ते स्वयंसेवकांनी केले. ज्यांना संघ काहीही माहीत नाही, त्यांना हे वाक्य समजणे अवघड आहे आणि ज्यांंचे संघाचे ज्ञान अर्धवट आहे, ते अर्धवटपणे समजून घेतील. संघस्थापनेपासूनची संघाची भूमिका अशी आहे की, ‘संघ काहीही करणार नाही, स्वयंसेवक सर्व करतील’.
 
 
लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जेव्हा पुढे आले तेव्हा सर्व स्वयंसेवक अत्यंत अस्वस्थ झाले. त्यांच्या अस्वस्थतेचे कारण भारतीय जनता पक्षाला अपेक्षेइतक्या जागा मिळाल्या नाहीत, हे नव्हते. त्यांच्या अस्वस्थतेचे कारण हिंदुविचारांविरुद्ध ज्या शक्ती राजकीयदृष्ट्या एकजूट झाल्या, याचा त्याला धक्का बसला. या शक्ती राजकीयदृष्ट्या सशक्त झाल्यास कोणती भीषण संकटे आपल्या राष्ट्रापुढे येतील, या विचारानेच तो व्याकूळ झाला आणि त्याने मनोमन निश्चय केला की, विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. त्यासाठी जे पडेल ते कष्ट करायचे. जेवढी जागृती समाजात निर्माण करता येईल तेवढी करायची, हा त्याचा दृढ संकल्प होता.
 
 
 
राजकीय पक्षांचा विचार केला तर त्या पक्षांचे सर्व नेते, आमदार, कार्यकर्ते हे सर्वच सांस्कृतिकदृष्ट्या हिंदूच आहेत. निवडणुकीचा फॉर्म भरण्यापूर्वी बहुतेक जण इष्टदेवतेचा कौल मागतात, साधुसंतांचे आशीर्वाद घेतात. शुभ दिवस आणि शुभ मुहूर्त पाहतात. संघ स्वयंसेवकांचा संघर्ष हा त्यांच्याशी नाही. हे आपले सांस्कृतिक ऐक्य आहे आणि त्याची बरोबरी जगातील कोणताही समाज करू शकत नाही. उणीव राजकीय ऐक्याची असते.
 
 मिर्झाराजा जयसिंग हा शिवभक्त होता; पण काशी विश्वनाथ मंदिर तोडणार्‍या औरंगजेबाचा मुख्य सरदार होता. असले जयसिंग स्वतःचा स्वार्थ साधतात, हिंदू समाजाचे न भरून येणारे नुकसान करतात, त्यांना रोखले पाहिजे.
 
असे देवधर्म करणारे, देवाचा कौल मागणारे, साधुसंतांचा आशीर्वाद घेणारे जेव्हा राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी डोक्यावर गोल टोपी घालतात, मुस्लिमांच्या मागणीपत्रावर स्वाक्षरी करतात, त्या वेळी त्यांची ही राजकीय कृती धोकादायक ठरते. या राजकीय वृत्तीचा पराभव करणे, हे श्रेष्ठ राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे स्वयंसेवकांना वाटते. मिर्झाराजा जयसिंग हा शिवभक्त होता; पण काशी विश्वनाथ मंदिर तोडणार्‍या औरंगजेबाचा मुख्य सरदार होता. असले जयसिंग स्वतःचा स्वार्थ साधतात, हिंदू समाजाचे न भरून येणारे नुकसान करतात, त्यांना रोखले पाहिजे.
 
 
मग काय करायला पाहिजे? स्वयंसेवकांनी ठरविले की, आपण सक्रिय झाले पाहिजे. आपल्याकडे भाजपचे पदाधिकारी येतील, आमदार येतील, खासदार येतील, याची वाट तो बघत बसला नाही. त्याचा विषय वैचारिक संघर्षाचा आहे. त्याने समाजातील सज्जनशक्ती, धर्मशक्ती आणि स्वहितदक्षशक्ती जागृत करण्याचे प्रयत्न सुरू केले. साधुसंतांच्या भेटी सुरू केल्या. त्यांना आवाहन केले की, ज्या धर्माच्या संरक्षणासाठी तुम्ही प्रवचने, पारायणे करता, तो धर्म मानणार्‍या लोकांच्या हाती राज्यसत्ता राहिली तरच धर्म सुरक्षित राहील. म्हणून तुम्ही राष्ट्रविरोधी शक्तींविरुद्ध उभे राहिले पाहिजे. जो राष्ट्रहिताची चिंता करील, त्याला मत दिले पाहिजे, असे तुम्ही लोकांना सांगितले पाहिजे. साधुसंतांना स्वयंसेवकांचे हे म्हणणे पटले आणि मग कीर्तनकार, साधुसंत, विविध संप्रदायांचे प्रमुख या सर्वांनी आपापल्या परिने राजकीय जागृती करण्याचा प्रयत्न केला. आताचे यश हे त्यांचे यश आहे. ते स्वतः जागृत झाले आणि त्यांनी समाजाला जागे केले.
 
‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश त्यांना उत्तम समजला. समाजात जातीय भेदाभेद करणार्‍यांचे राजकारण त्यांना समजले. म्हणून या वेळेला ते कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी पडले नाहीत. त्यांनी असा विचार केला की, आपल्याला सत्तेवर अशाच लोकांना बसवायचे आहे, जे राष्ट्रविरोधी शक्तींशी कधीही तडजोड करीत नाही. असे सर्व उमेदवार त्यांनी निवडून दिले आहेत. 
 
हिंदू समाजदेखील जातिभेदाच्या वर उठला. महाराष्ट्रात जातवाद जागविण्याचे खूप प्रयत्न झाले. देवेंद्र फडणवीस यांची जात काढून त्यांच्यावर शिव्यांची धार धरण्यात आली. मराठा अस्मिता जागविण्याचा प्रयत्न झाला. ओबीसी अस्मिता जागविण्याचा प्रयत्न झाला; परंतु सर्वसामान्य जनतेने एक मंत्र लक्षात ठेवला की, आपण हिंदू म्हणून एक राहिलो तर सेफ राहू. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश त्यांना उत्तम समजला. समाजात जातीय भेदाभेद करणार्‍यांचे राजकारण त्यांना समजले. म्हणून या वेळेला ते कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी पडले नाहीत. त्यांनी असा विचार केला की, आपल्याला सत्तेवर अशाच लोकांना बसवायचे आहे, जे राष्ट्रविरोधी शक्तींशी कधीही तडजोड करीत नाही. असे सर्व उमेदवार त्यांनी निवडून दिले आहेत.
 
 
राष्ट्रीय शक्तीच्या एकजुटीचा हा विजय आहे. या अर्थाने हा संघशक्तीचा विजय आहे. जेव्हा आपला सुवर्णकाळ होता, तेव्हा आपण संघटित होतो आणि जेव्हा आपण विभाजित झालो, तेव्हा पतनाचा काळ सुरू झाला. या वेळेच्या निवडणुकीत गुजराती विरुद्ध मराठी अशीही विषयसूची चालविली गेली. मोदी आणि शहा गुजराती आहेत, त्यांचे राज्य आम्हाला नको, अशी बांग सकाळी 9 वाजता रोज ठोकण्यात येत होती. जनतेने ती एका कानाने ऐकली आणि दुसर्‍या कानाने सोडून दिली. वाघाचे कातडे पांघरलेले हे सर्व गाढव आहेत, हे जनतेने जाणून घेतले. हा विजय जनतेच्या या जाणतेपणाचा आहे.
 
 
या वेळेला महाराष्ट्रातील जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करून देणारी राजकीय एकता दाखविली आहे. छत्रपती शिवरायांचा वारसा आम्ही सोडलेला नाही, हे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात घुसलेल्या औरंगजेबी सैन्याशी 27 वर्षे महाराष्ट्र लढला. त्याचे वर्णन करताना ‘गवतालाही भाले फुटले’, असे केले जाते. त्याच मनोवृत्तीची ऊर्मी धर्मप्रेमी, देशप्रेमी, शिवरायप्रेमी मराठी माणसाने दाखवून दिलेली आहे. त्या मराठी माणसाच्या चरणी शत शत वंदन!
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.