डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुत्व

विवेक मराठी    25-Nov-2024   
Total Views |

Dr. Ambedkar
 
 
पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लक्षात घेतले की, एकरस, एकात्म हिंदू समाज निर्माण व्हावा,
अशी त्यांची इच्छा होती. त्याची जातीची ओळख विसरून हिंदू हीच एकमेव ओळख असायला हवी,
हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरणासह मांडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वरील विचार साधारणपणे शंभर वर्षांपूर्वी मांडले आहेत. ज्यांना हिंदू, हिंदुत्व आणि राष्ट्राची काळजी वाटते, त्यांना हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श आहेत. त्यांनी आपल्या समाजाची मातृभावाने काळजी घेतली आणि त्याच कळवळ्याने व्यंगावर अचूकपणे बोट ठेवून सुधारणा करण्यासाठी लढा दिला, ते हिंदू समाजाला श्रद्धास्थानी असले पाहिजेत. 
 
 
हिंदू समाजाला जडलेली व्यंगे दूर करून समतेच्या पायावर उभा असणारा सशक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रबोधनपर्वात अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले. त्यासाठी समाज, परंपरा, रूढी आणि धर्मग्रंथ यांची कठोर चिकित्सा केली. अशा महापुरुषांच्या मांदियाळीमध्ये महामानव पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अग्रक्रम दिला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात 1920 साली माणगाव येथे झालेल्या अस्पृश्य बांधवांच्या सभेत राजर्षी शाहू महाराज यांच्या साक्षीने झाली आणि 1956 च्या 6 डिसेंबर रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. केवळ छत्तीस वर्षांच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डोंगराएवढे काम केले आहे. अस्पृश्यता, जातिभेद यांची मुळे कुठे आहेत आणि या सामाजिक व्याधींवर उपाय काय? याचा सर्वांगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास केला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनातील कालखंडाची तीन टप्प्यांत विभागणी करता येते. पहिला टप्पा हा जाणीव-जागृतीचा आहे. दुसरा टप्पा समतेच्या आग्रहाचा आहे आणि तिसरा टप्पा कायदेशीर उपाययोजना आणि तथागताचा धम्म स्वीकारण्याचा आहे. असे असले तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कृतीचा पाया हिंदू धर्मसुधारणेचा होता. आपण कोण आहोत? आपला वारसा काय आहे? आपली अवनती का झाली? आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? या सर्वच प्रश्नांची उत्तरे शोधताना त्यांनी हिंदू, हिंदुत्वाचा विचार केला होता.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ही हिंदू समाजावर कठोर टीकाकाराची आहे. वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म, धर्मग्रंथ, परंपरा यावर प्रहार केले आहे. यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काय उद्देश होता? हिंदू समाजाचा अभिन्न असणारा एक समाजघटक नरकयातना भोगत होता आणि त्यांच्या वेदना आणि दुःख समजून घेण्यासाठी तत्कालीन समाजधुरीण, समाजव्यवस्था अयशस्वी ठरली होती. अशा वेळी समाजपुरुषाला खडबडून जागे करण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब करावा लागतो तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म, समाजाला जडलेली व्यंगे दूर करण्यासाठी काम करताना जो मार्ग स्वीकारला तो अनेकांना मान्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदुद्रोही आहेत, असा समज असणारे प्रश्न उपस्थित करतील की, हिंदुत्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध काय? याचे उत्तर देताना आम्हाला मातृभावाची आठवण येते. माता आपले अपत्य सुदृढ व्हावे यासाठी आणि वेळप्रसंगी जशी कठोर होते, चांगले वळण लागावे म्हणून आवश्यक असेल तर शिक्षा करते, त्याच मातृभावनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाकडे पाहिले तर हिंदुत्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अन्योन्यसंबंध लक्षात येईल.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य बांधवांच्या दुःख आणि वेदना चव्हाट्यावर मांडल्या. हा अस्पृश्य बांधव कोणत्या समाजाचा, धर्माचा भाग होता? तो जर हिंदू समाज आणि धर्माशी नाळ जोडणारा होता, तर मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी टीका कोणावर केली पाहिजे होती? हिंदू समाज आणि धर्मावरच ना? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे, तत्त्वज्ञानाच्या बाबतीत हिंदू धर्म जगात उच्च कोटीचा आहे, त्याच्याशी कोणी बरोबरी करू शकत नाही आणि व्यवहाराच्या बाबतीतही हिंदू समाज इतका हीन पातळीवर आहे, की त्याचीही जगात तुलना होऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा केंद्रबिंदू हिंदू समाजाचा व्यवहार सुधारणेचा होता आणि त्यासाठी आवश्यकतेनुसार टीकाटिप्पणी करत असत. बार्शी, जिल्हा सोलापूर येथील अस्पृश्य बांधवांच्या सभेत बोलताना अस्पृश्य बांधवांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी तीन मार्ग आहेत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. ते म्हणतात, देशांतर व धर्मांतर याशिवाय नामांतर हा एक अस्पृश्यता निवारणार्थ नवीन उपाय सांगण्यात येत आहे. अलीकडे अस्पृश्यांनी आदिहिंदू म्हणवून घ्यावे, असे सुचवण्यात येत आहे. याबाबतीत मतभेद व्हावयाचे कारण आपणास कोणते नाम शोभते हे आहे. हा बर्‍याच अंशी हौसेचा प्रश्न आहे. तेव्हा हा प्रश्न वादविवादाने सोडविला जाईल, असे काही सर्वस्वी म्हणता येणार नाही. अस्पृश्यता व जातिभेद ही नावात साठविलेली आहेत. हे सर्वस्वी खरे आहे आणि ती नावे लुप्त केल्याखेरीज भागायचे नाही. आम्ही आपली जातीवाचक नावे सोडून फक्त चालणार नाही, तर आमच्याबरोबर सर्व जातींनी आपली जातीवाचक नावे सोडून सर्वसाधारण असे एक नाव धारण केले पाहिजे. माझ्या मते सर्वांनीच फक्त ‘हिंदू’ असे म्हणावे व जातीवाचक पोटनावे काढून टाकावीत. कोणीही स्वतःस ब्राह्मण, मराठा, महार, चांभार, मांग इत्यादी न म्हणता फक्त ‘हिंदू’ असे म्हणावे, तेणेकरून समाजात समता उत्पन्न होऊन एकी होईल. हिंदू म्हटल्याने कोणास कोणाचा तिरस्कार वाटणार नाही. कोणी कोणास हीन लेखणार नाही व कोणी कोणास श्रेष्ठ मानणार नाही. शिवाय व्यक्ती-व्यक्तीची परस्परांतील सहानुभूती जातिवाचक न राहून आज समाजात अन्याय, बेटी, बेदिली नष्ट होऊन बीमोड होईल. आज मराठा असता तरी इतर मराठा त्याला आपली सहानुभूती दर्शवितो. तसेच ब्राह्मण ब्राह्मणाशिवाय सहानुभूती दाखवण्यास तयार होत नाहीत; परंतु जेथे सर्वच हिंदू तेथे सहानुभूतीच्या आड काहीच नाही. मुसलमान समाजात आज जी एकी आहे तिचे कारण काय, हेच. त्यांच्यात मुसलमान म्हटला की झाले. तो आपला झाला. तसे हिंदूंमध्ये व्हावयास त्यांना सर्वसाधारण असे नाव पाहिजे व ते ‘हिंदू’ असावे, असे माझे मत आहे.
 
सामाजिक अन्याय, धार्मिक ग्लानी, राजकीय अवनती आणि आर्थिक गुलामगिरी यांच्यामुळे राष्ट्र कसे अधोगतीस जाते, याचे सांप्रतचा हिंदू समाज हे एक ठळक व अनुकंपनीय उदाहरण आहे. या अधोगतीतून बाहेर पडायचे असेल आणि पुन्हा एकदा समतेच्या पायावरचा सबळ समाज उभा करायचा असेल, तर समाजातील नागरिकाला त्याच्या जन्मसिद्ध हक्काची जाणीव करून दिली पाहिजे.

पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वरील विचार वाचले तर लक्षात येईल की, एकरस, एकात्म हिंदू समाज निर्माण व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्याची जातीची ओळख विसरून हिंदू हीच एकमेव ओळख असायला हवी, हे बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरणासह मांडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वरील विचार साधारणपणे शंभर वर्षांपूर्वी मांडले आहेत. आज हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जातिअंताचा विचार म्हणून कुणी सांगत नाही. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन विविध चळवळी चालवणारे सतत सांगत असतात की, आम्ही जातिअंताची चळवळ चालवत आहोत. अशा चळवळीचा परिणाम म्हणून आपल्या समाजात जाती अधिक घट्ट होताना दिसत आहेत. जातीय अस्मिता जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या या चळवळी आणि त्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मुळातून समजून घेतील काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करावासा वाटतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्याचा योग्य अन्वयार्थ लावून जर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत काम झाले असते तर कदाचित वेगळे चित्र समोर आले असते.
 
 
सर्व हिंदू बांधवांना आपल्या जातीची ओळख सोडण्यास सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाड चवदार तळे सत्याग्रहप्रसंगी हिंदुमात्राच्या जगण्याचा जन्मसिद्ध हक्काचा जाहीरनामा प्रकाशित करतात. समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी गेलेले 24-25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे सत्याग्रहींसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले, ”सामाजिक अन्याय, धार्मिक ग्लानी, राजकीय अवनती आणि आर्थिक गुलामगिरी यांच्यामुळे राष्ट्र कसे अधोगतीस जाते, याचे सांप्रतचा हिंदू समाज हे एक ठळक व अनुकंपनीय उदाहरण आहे. या अधोगतीतून बाहेर पडायचे असेल आणि पुन्हा एकदा समतेच्या पायावरचा सबळ समाज उभा करायचा असेल, तर समाजातील नागरिकाला त्याच्या जन्मसिद्ध हक्काची जाणीव करून दिली पाहिजे.” याच परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुमात्रांच्या जन्मसिद्ध हक्काचा जाहीरनामा सर्वांसमोर मांडला, तो पुढीलप्रमाणे-
 
1) सर्व माणसे जन्मत: समान दर्जाची आहेत व मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील.
 
 
2) वरील जन्मसिद्ध मानवी हक्क कायम राहतील, हाच राज्यव्यवस्थेचा व समाजव्यवस्थेचा अंतिम हेतू असला पाहिजे.
 
 
3) अखिल प्रजा हेच सर्व प्रकारच्या अधिकाराचे व सत्तेचे उगमस्थान आहे. कोणत्याही व्यक्तीचे, समुदायाचे अगर वर्णाचे विशिष्ट हक्क जर ते बहुजन समाजाने दिलेले असतील, तर ते इतर कशाच्याही आधारावर- मग तो आधार राजकारणाचा असो अगर धर्मकारणाचा असो- मान्य होण्यास पात्र नाहीत.
 
 
4) कोणत्याही व्यक्तीला आपल्या जन्मसिद्ध हक्काप्रमाणे वागण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. व्यक्तीला मर्यादा घालण्यात आली, तर ती दुसर्‍या व्यक्तीला तिचा तशाच प्रकारचा जन्मसिद्ध हक्क उपभोगण्यास अवसर मिळावा इतक्यापुरतीच घालता येईल. ती मर्यादा खुद्द लोकांनी केलेल्या कायद्यांनी ठरविली पाहिजे.
 
 
5) जेवढ्या गोष्टी समाजास विघातक होतील, तेवढ्याच कायद्याने बंदी केल्या पाहिजेत. जी गोष्ट कायद्याने मना केली नसेल, ती करण्यास सर्वांना मुभा असली पाहिजे. तसेच जी गोष्ट करणे कायद्याने आवश्यक ठरले नसेल, ती गोष्ट करावयास कोणासही भाग पडता कामा नये.
 
 
6) कायदा म्हणजे अमुक एका वर्गानेच ठरवलेली बंधने नव्हेत. तो कोणत्या प्रकारचा असावा हे ठरविण्याचा हक्क सर्व प्रजेस अगर तिच्या प्रतिनिधीस पाहिजे. हा कायदा संरक्षणात्मक असो वा शासनात्मक असो, तो सर्वांना सारखाच लागू असला पाहिजे आणि समाजरचना समतेच्या पायावर करावयाची असल्यामुळे मानसन्मान, अधिकार व व्यवसाय यांच्याबाबतीत जात आड येता कामा नये.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला हा जाहीरनामा केवळ अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांसाठीच आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा जाहीरनामा हिंदू समाजाला सामाजिक समतेच्या दिशेने घेऊन जाणारा असून या जाहीरनाम्याचा विषय अस्पृश्यांच्या वेदनामुक्तीचा असला, तरी आशय हा समग्र हिंदू समाजाच्या सबलीकरणाचा व सामाजिक आचरणात बदल करण्याचा आहे. आचरण हे मानसिकतेवर अवलंबून असते. हिंदू माणसे ही धर्म आणि देऊळ यांच्याशी जोडलेली आहेत. जो देव तुमचा आहे तो देव आमचाही आहे, या भूमिकेतून 2 मार्च 1929 रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरासमोर मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह झाला, तो 3 मार्च 1934 पर्यंत चालू होता. नाशिकप्रमाणेच पर्वती (पुणे), अंबामाता (अमरावती) येथेही मंदिरप्रवेशाचे सत्याग्रह झाले. अमरावतीच्या सभेत मंदिरप्रवेशाची भूमिका मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ”उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की, त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही. हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे, तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या वैश्यांनी, तुकारामसारख्यांनी केली, तितकीच वाल्मीकी, चोखामेळा व रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी हजारो अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली उभारलेली मंदिरे जितकी स्पृश्यांची, तितकीच अस्पृश्यांचीही आहेत. त्यावर जितका स्पृश्यांचा, तितकाच अस्पृश्यांचा वारसा आहे.” इतक्या तळमळीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाज आणि धर्म यांच्याबाबत बोलत होते, समाजधुरीणांना आवाहन करत होते. मात्र त्याला अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली आणि पुढे एकवीस वर्षे हिंदू समाजाच्या प्रतिसादाची वाट पाहिली. समाज विनवणीला दाद देत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी कायदेशीर मार्गाने आपली भूमिका प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. महिलांचे आरोग्य, प्रश्न व कामगार वर्गाच्या हिताचे त्यांनी घेतलेले निर्णय या गोष्टींमधून त्यांचा सामाजिक कळवळा लक्षात येतो.
 
 
बाबासाहेबांनी आपले समतेचे स्वप्न राज्यघटनेच्या माध्यमातून साकार केले आहे. 1935 नंतर वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणारे डॉ. बाबासाहेब, ’हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा करणारे बाबासाहेब जेव्हा राज्यघटना लिहिण्याची वेळ येते, तेव्हा केवळ अस्पृश्यांचाच नाही, तर समग्र हिंदू समाजाच्या उन्नतीचा व सामाजिक समतेचा विषय मांडतात. बाबासाहेबांच्या लेखणीतून भारतीय नागरिकांना ’समान मत, समान पत’ मिळाली. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस हे मूल्य मिळाले. माणूस म्हणून जगण्याचे मूलभूत हक्क मिळाले, त्याला कायद्याचे अधिष्ठान दिले. हिंदू समाजाच्या हितासाठी हिंदू कोड बिल तयार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोण याची व्याख्या केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘हिंदू’ या व्याख्येत मुस्लीम, पारशी, ख्रिश्चन वगळून या देशात राहणारे सर्व पंथ, संप्रदाय, उपासना पद्धतीचा अवलंब करणारे सर्व जण येतात. शीख, बौद्ध, जैन हेसुद्धा हिंदू समाजाचे घटक आहेत, हे लक्षात घेतले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे आणि देशप्रेमाचे आपणास दर्शन होईल. हिंदू समाजाची काळजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होती. हिंदू कोड बिल कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात, तुम्हाला हिंदू आचार, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज ही कायम टिकवायची असतील, तर तेथे दुरुस्ती अथवा सुधारणा करणे अगत्याचे असेल. तेथे तशी दुरुस्ती अगर सुधारणा करण्यास का-कू करू नका. हिंदू आचारधर्मातले जे भाग अगदी पडायला झाले आहेत त्यांची दुरुस्ती करण्यापलीकडे या बिलात दुसरे काहीही नाही. हिंदू कोड बिल मंजूर करून घेण्यासाठी ते आग्रही होते. हिंदू कोड बिलास विरोध होताच त्यांनी राजीनामा दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली धम्मदीक्षा घेतली. तथागतांनी सांगितलेल्या समतेच्या मार्गाचा अवलंब केला.
 
 
वरील लेखन वाचल्यावर काही मंडळींना वाटणे स्वाभाविक आहे की, हे सिलेक्टिव्ह डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत; पण ज्यांना हिंदू, हिंदुत्व आणि राष्ट्राची काळजी वाटते, त्यांना हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श आहेत. आपल्या समाजाची मातृभावाने काळजी घेतली आणि त्याच कळवळ्याने व्यंगावर अचूकपणे बोट ठेवून सुधारणा करण्यासाठी लढा दिला, ते हिंदू समाजाला श्रद्धास्थानी असले पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असेच पूजनीय आणि आदर्श व्यक्ती आहेत.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001