संघऋषी - रामभाऊ बोंडाळे

विवेक मराठी    13-Feb-2024   
Total Views |
संघऋषी  रामभाऊ बोंडाळे केशवचरणी अर्पित झाले. संघ कसा जाणून घ्यायचा आणि जाणून घेतलेला संघ कसा जगायचा, हे त्यांनी जगून दाखविले. येणार्‍या असंख्य पिढ्यांना प्रेरणा मिळेल असे जीवन रामभाऊ जगले. ही शब्दसमिधा मी त्यांच्या जीवनयज्ञास अर्पण करतो. 
rss
 
रामभाऊ बोंडाळे यांचे वयाच्या 98व्या वर्षी महाल कार्यालयात निधन झाले, ही बातमी मी वाचली आणि रामभाऊंच्या अनेक आठवणी मनात दाटून आल्या. आणीबाणीच्या काळात माझ्याअगोदर ते ठाणे कारागृहात दाखल झाले होते. मी ठाणे कारागृहात गेल्यानंतर प्रथम त्यांच्याशी माझा परिचय झाला. प्रथमदर्शनी मनात ठसावे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्हते. बेताची उंची, सडपातळ बांधा आणि बोलण्यात जाणवणारा किचिंतसा तोतरेपणा, अशा व्यक्तित्वाचा माणूस मनात घर करीत नाही. चौदा महिन्यांच्या त्यांच्या सहवासात त्यांच्या उंचीचा मला हळूहळू परिचय होत गेला आणि माझ्या नकळत मी त्यांच्यापुढे नम्र होत गेलो. ही नम्रता, माझ्या नकळत त्यांनी सांगावे, मी ऐकावे आणि करावे अशा स्थितीला आली. त्यांच्याच प्रेरणेमुळे कारागृहात अनेक विषयांचे वाचन आणि रोज भरणार्‍या शाखेत अनेक विषयांवरील माझ्या भाषणमालिका झाल्या. आज एक वक्ता, विचारवंत, अभ्यासक अशी माझी ओळख करून दिली जाते, माझ्या ओबडधोबड व्यक्तिमत्त्वाची अशी जडणघडण रामभाऊंनी केली, हे कुणाला माहीत नसते.
 
 
रामभाऊंनी अशा अनेक ओबडधोबड मूर्ती संघात घडविल्या असतील, हे सांगता येणे अवघड आहे. सरसंघचालक सुदर्शनजींनी पुण्याच्या बालगंधर्व मंदिरातील एका कार्यक्रमात रामभाऊंच्या उपस्थितीत त्यांचा एक किस्सा सांगितला. सुदर्शनजी यांना संघ शिक्षा वर्गात जायचे होते. संघ शिक्षा वर्गाचे शुल्क भरण्यासाठी रक्कम कमी पडत होती. रामभाऊंनी उरलेल्या रकमेची व्यवस्था केली आणि सुदर्शनजी गंभीरपणे म्हणाले, “ती रक्कम मी त्यांना परत करू शकलो नाही, पण त्याचे व्याज मात्र अजूनही फेडत आहे.” किती खोल अर्थ आहे या वाक्यात! रामभाऊंप्रमाणे सुदर्शनजींनीही आपले संपूर्ण आयुष्य संघाला समर्पित केले होते आणि या समर्पित जीवनाने त्यांची सव्याज परतफेड चालू होती.
 
 
rss 
 
रामभाऊ हे संघऋषी होते. आपल्या परंपरेत ऋषी या शब्दाला फार मोठा अर्थ आहे. ऋषी हा दर्शनकार असतो. सत्याचे तो दर्शन घेतो आणि तो स्वत:च अंतर्बाह्य सत्य होऊन जातो. रामभाऊंनी तपश्चर्या केली. ही तपश्चर्या संघ तपश्चर्या आहे. या तपश्चर्येतून त्यांनी संघ दर्शन अनुभवले आणि ते स्वत:च संघमय झाले. संघ म्हणजे रामभाऊ आणि रामभाऊ म्हणजे संघ असे समीकरण झाले.
 
 
अशा तपस्व्याचे अप्रतिम शब्दचित्रण भगवद्गीतेच्या दुसर्‍या अध्यायातील स्थितप्रज्ञ लक्षण या भागात आले आहे. 54 ते 72 असेे श्लोक आहेत. त्यातील प्रत्येक श्लोक संघऋषी रामभाऊ यांचे दर्शन घडवितो. अर्जुनाचा श्रीकृष्णाला प्रश्न असा आहे की, “हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झाला आहे, अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय?” तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो? अर्जुनाचा हा प्रश्न अतिशय गहन आहे. या प्रश्नात समाधी आहे, परमात्मा आहे, स्थिरबुद्धी पुरुष आहे आणि असा स्थिरबुद्धी पुरुष बोलतो, बसतो आणि चालतो कसा हे अर्जुनाला जाणून घ्यायचे आहे. कल्पना करू या की हा प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला आज विचारला आहे. तेव्हा कृष्णाने उत्तर काय दिले असते? तो म्हणाला असता, “अर्जुना, तू महाल कार्यालयात जा, तिथे रामभाऊ बोंडाळे राहतात, त्यांना बघ, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.”
 
 
अर्जुनाला काय उत्तर मिळाले असते? त्याला उत्तर मिळाले असते की, हा असा पुरुष आहे, ज्याने मनातील सर्व कामना पूर्णपणे काढून टाकल्या आहेत, जो आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट आहे, दु:खदायक प्रसंगी त्याच्या मनाला खेद होत नाही आणि सुखाच्या प्राप्तीची ज्याला मुळीच इच्छा नाही, ज्याचे भय आणि क्रोध नाहीसे झाले आहेत, असा पुरुष अर्जुनाला सापडला असता. अर्जुनाच्या हेसुद्धा लक्षात आले असते की, हा असा पुरुष आहे, ज्याने इंद्रियांच्या सर्व विषयवासना आवरून घेतल्या आहेत आणि ज्याची आसक्ती अंतिम सत्याच्या साक्षात्काराने नाहीशी झालेली आहे.
 
 
अर्जुनाच्या हेदेखील लक्षात आले असते की, क्रोधापासून संमोह निर्माण होतो, संमोहामुळे स्मरणशक्तीदेखील भ्रष्ट होते आणि पुढे बुद्धीदेखील भ्रष्ट होते, या सर्वांपासून विमुक्त झालेला हा पुरुष आहे. हा असा पुरुष आहे, ज्याचे अंत:करण प्रसन्न आहे, ज्याचे चित्तदेखील प्रसन्न आहे आणि सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन चित्त, बुद्धी अंतिम सत्यात स्थिर झालेली आहे.
 
 
हे सत्य कोणते? हे हिंदुराष्ट्र आहे आणि मी या हिंदुराष्ट्रपुरुषाचा घटक आहे, अवयव आहे हे ते सत्य. हिंदुराष्ट्राची उन्नती माझी उन्नती आहे. हिंदुराष्ट्राची सुखदु:खे माझी सुखदु:खे आहेत. हिंदुराष्ट्राच्या उन्नतीस-अवनतीस मी कारणीभूत आहे, हा ऐक्यबोध हे सत्य आहे. रामभाऊंचे सर्व जीवन हे सत्य जगण्यात गेले. एक व्यक्ती समष्टीमय झाली. हे संघसाधनेचे अंतिम फलित आहे.
 
 
प्रचारक म्हणून रामभाऊंचे विदर्भ कार्यक्षेत्र राहिले. चंद्रपूरपासून त्यांचा प्राचरकी जीवन सुरू झाले आणि साधनेच्या अंतिम टप्प्यात ते महाल कार्यालयात आले. शेकडो संघगीते त्यांना कंठस्थ होती आणि असंख्य गीतांना त्यांनी चाली लावल्या. चाली लावण्यासाठी सुरांचे आणि तालांचे ज्ञान आवश्यक असते. विविध रागांचे ज्ञान असावे लागते. हे ज्ञान रामभाऊंनी कुठून मिळविले? माझ्यापुरते त्याचे उत्तर आहे - ते ज्ञान संघसाधनेतून मिळविले. सामाजिक विषयांचे त्यांना जबरदस्त भान होते. जातीपातीत विभक्त झालेला हिंदू समाज, अस्पृश्यतेची रूढी या बाबतीत आपल्याला काय करायला पाहिजे, याचे उत्तम ज्ञान त्यांच्याकडे होते. एक ज्ञानी असे असतात, जे फक्त प्रश्न मांडत जातात, प्रश्न का निर्माण झाले हे सांगतात, प्रश्नाचे गांभीर्य मांडतात, परंतु प्रश्नांच्या निराकरणाचे ज्ञान त्यांच्याकडे नसते. रामभाऊंचे उलटे होते. सामाजिक प्रश्नांची विद्वत्तापूर्ण छाननी मी कधी त्यांच्याकडून ऐकली नाही. प्रश्नांची उत्तरे काय असावीत, ही उत्तरे त्यांनी स्वत: जगून दाखविली.
 
 
संघऋषी रामभाऊ केशवचरणी अर्पित झाले. संघ कसा जाणून घ्यायचा आणि जाणून घेतलेला संघ कसा जगायचा, हे त्यांनी जगून दाखविले. येणार्‍या असंख्य पिढ्यांना प्रेरणा मिळेल असे जीवन रामभाऊ जगले. ही शब्दसमिधा मी त्यांच्या जीवनयज्ञास अर्पण करतो.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.