महाराष्ट्राच्या विकासाला ‘एआय‘ची साथ

विवेक मराठी    14-Feb-2024   
Total Views |
Artificial intelligence
 
 AI या तंत्रज्ञानाला नाकारून चालणार नाही. राज्याच्या विकासासाठी याचा उपयोग करून घेणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. 90च्या दशकात जेव्हा संगणक भारतात आले, तेव्हा त्याचे दुष्परिणाम होते, पण तरीही केंद्र सरकारने संगणकाचा स्वीकार केला. त्यामुळे आज देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागत आहे. एआयमुळे अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा येणार आहे हे कटू सत्य असले, तरी यामुळे रोजगाराच्या अनेक नवीन संधीही प्राप्त होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या द्रष्टेपणाने ही संधी ओळखली. तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील मोठ्या गूगलशी याबाबत पुण्यात नुकताच करार केला आहे.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीय सभा, पक्षप्रवेश आणि आरोप-प्रत्यारोप यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच वर्तमानपत्रांतून आणि प्रसारमाध्यमांतून अशा बातम्यांनी जागा व्यापली आहे. या धामधुमीत ‘गूगलशी महाराष्ट्र राज्याचा करार’ या बातमीला मात्र मीडियातून हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. ही बातमी राज्याला दिशा देणारी, व्हिजन ठरवणारी, राज्यात नवीन काही करणारी आहे. आता एआय (Artificial intelligence - AI) या तंत्रज्ञानाने संपूर्ण जगात आपले प्रस्थ वाढवले आहे. या तंत्रज्ञानामुळे जगामध्ये मोठे बदल होेत आहेत. याचे अनेक फायदे असले, तर याचे अनेक दुष्परिणामही आहेत. पण तरीही या तंत्रज्ञानाला नाकारून चालणार नाही. राज्याच्या विकासासाठी याचा उपयोग करून घेणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. 90च्या दशकात जेव्हा संगणक भारतात आले, तेव्हा त्याचे दुष्परिणाम होते, पण तरीही केंद्र सरकारने संगणकाचा स्वीकार केला. त्यामुळे आज देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागत आहे. एआयमुळे अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा येणार आहे हे कटू सत्य असले, तरी यामुळे रोजगाराच्या अनेक नवीन संधीही प्राप्त होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या द्रष्टेपणाने ही संधी ओळखली. तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील मोठ्या गूगलशी याबाबत पुण्यात नुकताच करार केला आहे. महाराष्ट्र हे असा करार करणारे देशातील पहिले राज्य ठरले. यामुळे शेती, पर्यावरण, स्टार्टअप, आरोग्यसुविधा, कौशल्य आदी विविध क्षेत्रांत अ‍ॅप्लिकेशन बनवणार आहे. यातून राज्याला मोठा फायदा होणार आहे. विशेषत: कृषी क्षेत्रात याचा मोठा फायदा होणार आहे. एआय या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकर्‍यांना हवमानाचा अंदाज कळणार आहे, पीक, जमीन, बाजारभाव या संदर्भात माहिती मिळणार आहे. शेतकर्‍यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
 
 
लहरी पाऊस, त्याचबरोबर 2014पूर्वी सिंचन क्षेत्रात अत्यल्प झालेले काम यामुळे शेतकर्‍याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. त्यातच दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी शेतीला कंटाळा आहे. शेती सोडून शहराकडे वळला आहे. अशा स्थितीत गूगलशी झालेला करार हा नक्कीच शेतकरी तरुणांना दिशादर्शक ठरणार आहे, शेती करण्यास प्रेरणा देणार आहे. त्याचबरोबर स्टार्टअप, आरोग्यसुविधा, कौशल्य याही क्षेत्रात याचा मोठा फायदा होणार आहे. त्यातच गूगलचे विश्वव्यापी नेटवर्क असल्याने राज्याला होणारे अनेक फायदे राज्यासाठी वरदान ठरणार आहेत.
 
Artificial intelligence
 
आमचे हे उद्योग गुजरातला पळवून नेले, ते घेऊन गेले, वेदान्त फॉक्सकॉनचे काय झाले.. अशा आरोळ्या ठोकणार्‍यांना कदाचित सदर करार दिसला नसेल, नाहीतर तर यातही त्यांना काहीतरी डावपेच दिसला असता. कादाचित गूगलमध्ये अदानींचे शेअर नसल्यामुळे ते शांत असतील. नाहीतर येथे त्यांना राजकारण दिसले असते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे नक्कीच सोपे आहे. पण त्यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या विकासावर, व्हिजनवर किंवा त्यांनी महाराष्ट्रात राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनांवर टीका करणे अशक्य आहे. त्यांच्या योजनांमुळे आज मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग उदयास आला आहे. मुंबई कोस्टल रोड व मेट्रोचे जाळे विणले गेले आहे. त्यामुळे गूगल सर्चसारख्या कंपनीशी केलेला करार हासुद्धा महाराष्ट्रसाठी नक्कीच भविष्यकालीन विचार आहे. हे अधोरेखित होते.