कोकणात कृषी पर्यटन विकसित होताना..

विवेक मराठी    17-Feb-2024   
Total Views |

kokan

कोकण हा निसर्गसंपन्न प्रदेश. सह्याद्रीच्या रांगा, स्वच्छ आणि विशाल समुद्रकिनारा, ऊन-पावसाचे योग्य प्रमाण, त्यामुळे हिरवीगार बागायती आणि कोकणी माणसातील आदरातिथ्यशीलता हे कोकणाचे वैभव व संस्कृती यामुळे कोकण कायम पर्यटनाचा आकर्षण बिंदू ठरते. रोजरोजच्या धकाधकीच्या जीवनातून कोकणाचे हे वैभव, नीरव शांतता व निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या वातावरणात वीकेंड अथवा सुट्टीचे दिवस ’फार्म स्टे’ इ. ठिकाणी सत्कारणी लावावेत ही संकल्पना कोकणात रुजत आहे. याद्वारे ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधणे हा कृषी पर्यटनाचा मुख्य उद्देश.
 
निसर्गसंपन्न असलेल्या कोकणाचा पर्यटनासाठी उत्तम उपयोग होऊन कोकणाचा विकास होऊ शकतो, हाच विचार करून 2023मध्ये महाराष्ट्र राज्याने सुरू केलेल्या कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत कोकण विभागात आतापर्यंत 168 कृषी पर्यटन केंद्रांना मान्यता मिळाली, यावरूनच कोकण विभागात कृषी पर्यटन मूळ धरत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोकणातील ग्रामीण भागातील खाद्यपद्धती, कला, शेतकर्‍याचे जीवनमान यामुळे बाहेरच्यांपर्यंत पोहोचेल, असे वाटते.
 
 
कोकणातील मुख्य व्यवसाय शेती - बागायती आणि शेतीपूरक व्यवसाय. जवळजवळ 60-70 टक्के लोक शेतीवर प्रत्यक्षपणे अवलंबून आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इत्यादी कृषी संलग्न विषयांचा एकत्रित विचार केल्यास कोकणातील ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निश्चित चालना मिळू शकेल. कृषी पर्यटनाद्वारे कोकणातील शेतकर्‍याला पूरक व्यवसाय आणि शहरातील हौशी लोकांना निवांत जागा या दोन्ही गरजा पूर्ण करून सुनियोजित व्यवस्था उभारली जात आहे. कोकणाचा कॅलिफोर्निया करण्यामध्ये अनेकांना रस आहे. परंतु, काळाची गरज ओळखून उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा वापर करणे आणि त्यातून विकास साधणे हिताचे आहे.
 

kokan
 
कोकणातील ’फार्म स्टे’चा विचार केला, तर हे लोक कोणी व्यावसायिक, उद्योजक नाहीत. शेतकरी-बागायतदार लोक एकत्र येऊन आलिशान घरे बांधण्याऐवजी मातीची घरे बांधून कृषी पर्यटनाचा प्रयोग करत आहेत. शहरी लोकांच्या गरजा काय असतात - तर सात्त्विक जेवण, दर्जेदार मांसाहारी पदार्थ, निसर्गाचे सान्निध्य, डोंगरांवर ट्रेकिंग, मुबलक पाणी आणि शांतता. कोकणाची संस्कृती या सर्व गरजा पूर्ण करते. विकसित होणारी वाहतूक व्यवस्था, रेल्वेची उपलब्धता, विमान वाहतूक, गोव्यापेक्षा स्वस्त आणि सुंदर या सर्वाचा फायदा कोकणामध्ये कृषी पर्यटनासाठी होत आहे. महाराष्ट्र राज्याने जेव्हा कृषी पर्यटन धोरण आखले, तेव्हा कोकणातून 256 अर्ज दाखल करण्यात आले. त्यातील 243 कृषी पर्यटन केंद्रांना पर्यटन अधिकार्‍यांनी भेट दिली आहे. त्यातील 168 पर्यटन केंद्रांना मान्यता मिळाली. याचाच अर्थ किमान 168 शेतकर्‍यांना, कृषी संस्थांना या धोरणाचा फायदा होणार आहे. शासनाच्या या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, कृषी सहकारी संस्था, शासन मान्यताप्राप्त कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विद्यापीठ, शेतकर्‍यांनी स्थापन केलेल्या संस्था या घटकांना लाभ होणार आहे.
 

kokan 
 
ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधणे हा कृषी पर्यटनाचा मुख्य उद्देश. कृषी पर्यटनाअंतर्गत शेतीउत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, शहरी लोकांना पर्यटनासह ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडवणे, ग्रामीण भागातील महिला-तरुण यांना गावामध्येच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, साहसी पर्यटन, वाइन टूरिझम, रोपवाटिका, मत्स्यतळे असे उपक्रम राबवता येतात. गावातील पडीक जमीन, क्षारयुक्त जमीन यामुळे वापरात येते. कृषी पर्यटनाद्वारे शेती, शेतीसंबंधित व्यवसाय, शेतीसाठीच्या पद्धती यांचा लोकांना परिचय करून देण्यात येतो. यामुळे गावातील लोकांचेही राहणीमान उंचावले जाते. गावातील शेतकर्‍याकडे पैसे येतात. शांत-सुंदर जागी राहण्यासाठी पर्यटक खर्च करण्यासही तयार असतात. ही नस ओळखूनच कोकणात कृषी पर्यटन बाळसे धरत आहे.
 
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये कृषी पर्यटन विकसित होऊ लागले ते समाजमाध्यमांमुळे. कोकणची संस्कृती, वैशिष्ट्य समाजमाध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचू लागली. केवळ कासव या प्राण्यामुळे आंजर्ले, वेळास या गावांमध्ये अनेक होम स्टेज् निर्माण झाले. कासव महोत्सवामुळे अनेक लोक या गावांना भेट देऊ लागले. शिमगा-होळी, वर्षअखेर, आंबा-फणसाचा हंगाम, पावसाळा याचा कोकणातील कृषी पर्यटनाला व्यावसायिक द़ृष्टीकोनातून उपयोग झाला. ’कोकणहार्टेड गर्ल’, ’कोकणी रान माणूस’, ’कलर्स ऑफ कोकण’ ही प्रभावशाली यूट्यूब वाहिन्या चालवणारी मंडळी कृषी पर्यटनाला चालना देत आहेत. अंकिता वालावलकर हिचे वालावलकर स्टेज, कोकणी रान माणूसचे सर्वेसर्वा प्रसाद गावडे आणि त्यांचे शेतकरी सहकारी चालवत असणारे ’मांगर फार्म स्टेज, वैभववाडी येथे डोंगरपायथ्याशी नव्याने सुरू ’रेन वॉटर डान्स’, ट्रेकिंग, शेती करण्याची संधी असणारे ’फार्म स्टेज’ प्रसिद्ध आहेत. अगदी पिसेकामतेसारख्या कणकवली शहरानजीक असणार्‍या गावामध्ये नारळ-पोफळीच्या बागांमध्ये फार्म स्टेजची निर्मिती करण्यात आली आहे. पारंपरिक कंदील, कोकणी लज्जतदार जेवण, वाहतूक व्यवस्था यामुळे हे विशेष प्रसिद्ध आहे. गोव्यातील मोपा आणि सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ झाल्यामुळे कुडाळ-मालवण-वेंगुर्ले या तालुक्यात कृषी पर्यटन अधिक विकसित होत आहे. ऋतुविहार नेचर होम स्टे, (कुडाळ), ’स्टोनॅर्क रिसॉर्ट (गगनबावडा), ट्रॉपिकल कबानास (मालवण), मांगर फार्म स्टे (सावंतवाडी), शिवाज फार्म्स (दोडामार्ग) असे काही प्रसिद्ध फार्म स्टे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकसित झाले आहेत.

 
kokan
 
यामधील मांगर फार्म स्टेचे मालक भालचंद्र परब यांच्याशी संवाद साधून त्यांच्या व्यवसायाविषयी जाणून घेतले. भालचंद्र परब हे शेतकरी आहेत. सावंतवाडी भागामध्ये त्यांची सुपारीची बाग आणि शेती आहे. ’कोकणी रान माणूस’ प्रसाद गावडे यांच्या सहकार्यामुळे त्यांनी कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला. त्यांची ’बिझनेस आयडिया’ सरळ सोप्पी होती - ”मी एक शेतकरी आहे. मी ज्याप्रमाणे जगतो, ज्या कृती मी करतो, ज्या प्रकारे शेती करतो, जे खातो ते इतरांना कळावे.” ’मांगर’ हे सुबक मातीचे घर आहे. सकाळी नाश्त्याला पोहे-इडली न करता तांदळाची भाकरी, शेतातील भाजी किंवा एखादा पारंपरिक पदार्थ दिला जातो. जेवणही जे शेतकर्‍याला आवश्यक असते तेच जेवण पर्यटकांसाठी असते. त्यांच्या आवडीनुसार कोकणी चवीचे मासे किंवा अन्य मांसाहारी पदार्थ केले जातात. पर्यटकांना ’कुळागरे’ म्हणजे सुपारीच्या बागा, शेती दाखवली जाते. ’पाट’, विहिरीच्या थंड पाण्याची अनुभूती इथे येऊन घेता येते. स्वत:च पाणी काढण्याची हौसही भागवता येते. उंच डोंगरावरून दिसणारा समुद्रकिनारा आणि मावळणारा सूर्य हे या ’स्टे’चे खास वैशिष्ट्य आहे. मुख्य म्हणजे परब यांनी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ यासाठी घेतलेला नाही. याचे कारण विचारले असता ते सांगतात, ”कोकण मुळातच समृद्ध आहे. निसर्गाने सर्वसंपन्नता दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला शासनाच्या योजनांची गरज भासली नाही.” शासनाच्या योजनांमधून लोणी-तूप खाणार्‍यांच्या जगात, आहे त्यात समाधान मानणारा असा शेतकरी कोकणातच आढळेल. कोकणातील विविध पदार्थांची ओळख करून देणे, संपूर्णत: नैसर्गिक राहणीमान अनुभवून देणे, वाहत्या शुद्ध थंड पाण्याचे सुख या ’स्टे’मध्ये अनुभवता येतात.
 
केवळ स्वत:चा विकास न पाहता प्रसाद गावडे, भालचंद्र परब आणि अन्य आठ शेतकरी सहकारी, बागायतदार कृषी पर्यटन रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोकणातील शेतकर्‍याला त्याच्याच राहणीमानातून उत्पन्नाचे साधन मिळावे, पर्यटकांच्या गरजाही पूर्ण व्हाव्यात, संस्कृती टिकून राहावी, असे त्यांचे उद्देश आहेत.
 
 
एकंदरीतच निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणासारख्या प्रदेशामध्ये कृषी पर्यटन विकसित होणे हे त्या प्रदेशासाठी आणि स्थानिकांसाठी नक्कीच फायदेशीर आहे.

वसुमती करंदीकर

 
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका, तर ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. सध्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात ज्योतिषही शिकत आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत १३ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.