‘बसवंत गार्डन’भारतातील पहिले अ‍ॅपी तसेच अ‍ॅग्री पर्यटन केंद्र

विवेक मराठी    17-Feb-2024   
Total Views |

Baswant Honeybee Park
नाशिकमध्ये ‘बसवंत हनी बी पार्क - मधमाशीपालन प्रशिक्षण केंद्र’, तसेच ‘बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र’ उभारण्यात आले आहे. देशातील पहिले अ‍ॅपी-अ‍ॅग्री टूरिझम सेंटर म्हणून या केंद्राची ओळख निर्माण झाली आहे. मधमाशीचे मानवी जीवनातील महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवून तिचे संरक्षण व संवर्धन करणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे. मधमाशीपालनाच्या माध्यमातून पिकांची उत्पादन वाढ, तसेच स्वयंरोजगारनिर्मितीतून शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना येथे रंजक व अभ्यासपूर्ण स्वरूपात साकारण्यात आली आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे ‘पूर्वा केमटेक’ आणि ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम’च्या सहयोगाने अभिनव असे ‘बसवंत हनी बी पार्क - मधमाशीपालन प्रशिक्षण केंद्र’, तसेच ‘बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र’ उभारण्यात आले आहे. देशातील पहिले अ‍ॅपी-अ‍ॅग्री टूरिझम सेंटर म्हणून या केंद्राची ओळख निर्माण झाली आहे. मधमाशीचे मानवी जीवनातील महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवून तिचे संरक्षण व संवर्धन करणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे. मधमाशीपालनाच्या माध्यमातून पिकांची उत्पादन वाढ, तसेच स्वयंरोजगारनिर्मितीतून शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना येथे रंजक व अभ्यासपूर्ण स्वरूपात साकारण्यात आली आहे. अनेक पर्यटक सहपरिवार येथे भेट देतात, तसेच शाळा-महाविद्यालयांच्या सहली विद्यार्थ्यांना आवर्जून घेऊन येतात.
 

Baswant Honeybee Park 
 
असे म्हणतात की, जोपर्यंत मधमाशी असेल, तोपर्यंतच माणूस अस्तित्वात असेल. मधमाशीपालनाच्या संदर्भात ही एक प्रातिनिधिक स्वरूपात झालेली सुरुवात आहे. अ‍ॅग्री टूरिझम-अ‍ॅपी टूरिझम हे क्षेत्र परिसरातील शेतकरी बंधुभगिनींना ‘कम्युनिटी टूरिझम’ या दृष्टीकोनातून पूरक ठरेल, हे निश्चित. हा प्रकल्प महाराष्ट्रातील कृषी पर्यटन क्षेत्राला पथदर्शक तसेच प्रेरक ठरेल, म्हणूनच तो अधिकाधिक उपयुक्त आणि शाश्वत व्हावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचा अभिप्राय ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम’चे कार्यकारी संचालक व या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेचे प्रवर्तक संजय पवार व्यक्त करतात. या केंद्रात वर्षभर विविध परिसंवाद व चर्चासत्रे आयोजिली जातात. त्यात राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवाद, हनी बी फेस्टिवल, बसवंत फळ महोत्सव, द्राक्ष आणि किशमिश (बेदाणे) महोत्सव, मुख्याध्यापक/प्राचार्य परिषद, पर्यटन महोत्सव, चित्रकला स्पर्धा, तसेच इतरही अनेक उपक्रम राबविले जातात. बसवंत हनी बी पार्कमध्ये शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी, तसेच बेरोजगार युवकांसाठी सर्व सुविधायुक्त बसवंत मधमाशीपालन प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून युवकांना व शेतकर्‍यांना प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. बसवंत मधमाशी उद्यानाची स्थापना 2019मध्ये, तर ‘बसवंत कृषी-उद्योग पर्यटन केंद्रा’ची स्थापना 2021मध्ये करण्यात आली.
 


Baswant Honeybee Park 
 
बसवंत मधमाशी उद्यानातील विशेष आकर्षणे पुढीलप्रमाणे आहेत - ‘बीनी’ आणि ‘बीनिव्हर्स’ (सेल्फी पॉइंट), मधमाशीच्या जीवनक्रमाचा माहितीपट, मधमाश्यांची वसाहत (अ‍ॅपिअरी) येथे उभारण्यात आली आहे. गावातील सर्व शेतकरी एकत्र येऊन कशा प्रकारे मधमाशीपालन करू शकतात, हे समजण्यासाठी ‘मधमाश्यांचे गाव’ ही संकल्पना मांडली आहे. याव्यतिरिक्त आग्या मधमाशी प्रतिकृती, बी-प्लँट नर्सरी - सीड बँक, मधमाशीच्या संदर्भातील विविध पुस्तकांचे खुले वाचनालय, ग्रामीण भागातील संस्कृती आणि मधमाशीचे कार्य वारली पेंटिंग्जच्या माध्यमातून समजावून देणारा विभागही आहे. येथील आर्ट गॅलरीत बांबू पेंटिंग, पॉट पेंटिंग, स्टोन पेंटिंग अशी विविध आकर्षणे आहेत. याबरोबरच येथील खाद्यपदार्थ आणि विक्री विभागात आउटलेट आणि कॅफे, मधुबन फूड कोर्ट, विसावा, स्मरणवस्तू दुकान, गेम झोन कॅफे अशा विविध सुविधा आहेत. बसवंत कृषीउद्योग पर्यटन केंद्रात ‘गाव समृद्ध, तर देश समृद्ध’ ही महत्त्वाची विचारधारा अधोरेखित करणार्‍या ‘सेवरगाव’ या स्वयंपूर्ण आदर्श गावाची (मिनिएचर व्हिलेजची) संकल्पना प्रतिकृतीद्वारे मांडली आहे. अलीकडे प्रक्रिया उद्योगांतून रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. यासाठी एक मध्यम स्वरूपाचे अन्नप्रक्रिया केंद्र (फूड प्रोसेसिंग युनिट), मध प्रक्रिया केंद्र, तसेच चॉकलेट फॅक्टरी येथे उभारून प्रशिक्षणाची सोयदेखील केली आहे. द्राक्षांची माहिती, बेदाणा निर्मिती प्रक्रिया आणि विविध प्रकारच्या बेदाण्यांची मांडणी येथे केली आहे.
 

Baswant Honeybee Park 
 
ग्रामीण भागातल्या बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे सजीव साधन असणार्‍या कृषी आधारित बैल-संस्कृतीची परिपूर्ण ओळख बसवंत गार्डनमध्ये मांडलेल्या बैलांच्या शिल्पाकृतींमधून नवीन पिढीला अतिशय रंजकतेने करून दिली जाते. भारतातील बैलांच्या विविध जातींच्या हुबेहुब प्रतिकृती त्यांच्या माहितीसह येथे बघायला मिळतात. याबरोबरच स्पोर्ट्स झोन, फळांच्या मोठ्या प्रतिकृती, ससेपालन, टुक-टुक व्हॅन इत्यादी विविध आकर्षणांचा यात समावेश आहे.
 

Baswant Honeybee Park 
 ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम’चे कार्यकारी संचालक संजय पवार
या कृषिपूरक, स्तुत्य उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. बसवंत मधमाशी उद्यानाला 2022मध्ये प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टूरिझम या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘रिस्पॉन्सिबल टूरिझम अ‍ॅर्वार्ड’ हा पुरस्कार मिळाला. याअंतर्गत ‘नैसर्गिक वारसा आणि जीवविविधतेमध्ये पर्यटनाचे योगदान वाढवणे’ या श्रेणीमध्ये बसवंत हनी बी पार्कला रौप्यपदकाने सन्मानित करण्यात आले. गतवर्षी (2023) संस्था श्रेणीमध्ये ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याखेरीज इतरही काही पुरस्कार या प्रकल्पाला लाभले आहेत.
 
 
कृषी पर्यटनाला अच्छे दिन!
धार्मिक पर्यटनाला सर्वाधिक महत्त्व असलेल्या नाशिक जिल्ह्यात अ‍ॅग्रो टूरिझम दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटकांचीदेखील पसंती लाभतेय. त्यामुळे अर्थातच कृषी पर्यटनाला ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्याद्वारे देश-परदेशातील पर्यटकांना नाशिकच्या संस्कृतीची ओळख करून दिली जाते. कृषी पर्यटन केंद्रांना विविध शासकीय योजनांमध्ये प्राधान्य मिळत असल्याने जास्तीत जास्त युवा शेतकर्‍यांना यात सहभागी करून घेण्याकरिता पर्यटन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. देश-परदेशातील पर्यटक नाशिकच्या निसर्गसंपदेच्या प्रेमात आहेत. पावसाळ्यात प्रचंड पाऊस आणि कडक उन्हाळ्यात थंड हवेची अनुभूती नाशिकच्या वातावरणात मिळते. पर्यटकांना नाशिकची ओळख करून देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जिल्ह्यात कृषी पर्यटनाची एकूण 27 केंद्रे असून अहमदनगरमध्ये नऊ, तर धुळ्यात दोन केंद्रे आहेत. त्यांच्यामार्फत पर्यटकांना व स्थानिकांना सहल घडवली जाते. पर्यटक खाद्यसंस्कृतीचा, वाइनचा, मिसळचा आस्वाद घेतात. कृषी पर्यटन केंद्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने शेतकर्‍यांना शाश्वत उत्पन्नाचा सक्षम पर्याय मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व निफाड तालुक्यांतील शेतकर्‍यांनी कृषी पर्यटन सुरू केले आहे. इतरही तालुक्यांतील शेतकर्‍यांना यात सहभागी करून घेण्यासाठी पर्यटन विभाग आता प्रयत्न करत आहे. कृषी पर्यटनाला जिल्ह्यात प्रचंड वाव असल्यामुळे शेतकर्‍यांनी या व्यवसायाकडे वळायला हवे. कृषी पर्यटन केंद्रांना शासनाच्या विविध योजनांमध्ये प्राधान्यक्रमही मिळतो. विभागीय पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी ही माहिती दिली.
कृषी पर्यटन केंद्र सुरू करायचे आहे?
 
केंद्रासाठी आवश्यक कागदपत्रे
 
किमान एक एकर शेती, सातबारा उतारा व 8अ नोंद, आधार कार्ड, पॅन कार्ड, 2500 रुपये नोंदणी शुल्क पावती, फूड लायसन्स इत्यादी.
 
सध्या तालुकानिहाय पर्यटन स्थळांची संख्या
 
• नाशिक - 12 • देवळा - 2 • त्र्यंबकेश्वर - 3
 
• इगतपुरी - 5 • दिंडोरी - 4 • निफाड - 1

संजय दामोदर देवधर

  • ज्येष्ठ पत्रकार, आणि आदिवासी वारली चित्रशैली अभ्यासक.

  • नाशिक येथे दैनिक गावकरीमध्ये 34 वर्षे कलाविभाग प्रमुख, वार्ताहर, कलासमीक्षक व उपसंपादक पदावर काम करून निवृत्त. सध्या फ्रिलान्स पत्रकारिता सुरु.

  • शैक्षणिक अर्हता - जी.डी.आर्ट ( ऍप्लाईड ) 1982 साली जे जे स्कुल ऑफ आर्ट येथून अव्वल श्रेणीत उत्तीर्ण.

  • अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांशी निकटचे संबंध व पदाधिकारी म्हणून कार्य. विविध स्पर्धांच्या परीक्षणाचा अनुभव.

  • संशोधनपर कार्य- आदिवासी वारली चित्रशैलीविषयी विशेष संशोधन. कार्यशाळांचे आयोजन करुन अनेकांना वारली कला शिकविण्याचा उपक्रम सुरु. आत्तापर्यंत ५ ते ७५ वयोगटातील हजारो कलाप्रेमींना वारली चित्रकलेचे मार्गदर्शन. परदेशी पर्यटक देखील येऊन वारली कलेचे धडे गिरवतात.

  • वारली चित्रकलेच्या प्रसार व प्रचारासाठी वारली चित्रसृष्टी हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. त्याच्या चार आवृत्त्या लोकप्रिय झाल्या आहेत. Warli Art World या इंग्लिश पुस्तकाच्या दोन आवृत्ती परदेशातही पोहोचल्या आहेत. रसिक वाचकांचा या पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

  • चित्रसहल या आगळ्यावेगळ्या उपक्रमात आदिवासी पाड्यांवर शहरी कलाप्रेमींना नेऊन वारली जीवनशैली, त्यांची कला यांचे सुरेख दर्शन घडवले जाते. आतापर्यंत अनेकजण सहकुटुंब सहलीत सहभागी झाले.

  • विश्वविक्रम - ऑगस्ट 2018 मध्ये 1100 पेक्षा अधिक स्पर्धकांची ऑन द स्पॉट वारली चित्रस्पर्धा घेतली व दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. सर्वाधिक सहभागाबद्दल जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड तर चित्रांद्वारे सामाजिक संदेश दिल्याने वंडरबुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले.

  • पत्रकारितेत विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारने सन 2019 मध्ये वारली कलेतील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.