22 जानेवारी 2024

विवेक मराठी    02-Feb-2024   
Total Views |

rammandir
22 जानेवारी 2024 ही तारीख भारतीय परंपरेप्रमाणे शुभकार्याचा मुहूर्त ठरविणारी सर्व ईश्वरीय शक्तीची अनुकूलता असणारी तारीख ठरली. या दिवशी अयोध्येत रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्या धाम व रामलल्लांची मूर्ती दर्शन हे केवळ देवदर्शन नसून राष्ट्रीय आकांक्षेच्या परिपूर्णतेचा हा परमोच्च बिंदू आहे. मंदिरातील बालरामाची मूर्ती आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. या मूर्तीचे दर्शन म्हणजे ‘स्व’ दर्शन आहे. 22 जानेवारी 2024 ही तारीख नव भविष्यकाळ घडविणारी तारीख आहे. 22 तारखेपूर्वीचा भारत आणि 22 तारखेनंतरचा भारत याची सीमारेषा ठरविणारी ही तारीख आहे.
 
इतिहासातील काही तारखा अजरामर होतात. 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले. 26 जानेवारीला संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि आपला देश प्रजासत्ताक राज्य झाला. या दोन्ही तारखा सनातन भारतीय परंपरेतील तारखा नाहीत, याचा अर्थ आपल्या परंपरेप्रमाणे मुहूर्त, ग्रह-नक्षत्रांची स्थिती वगैरे पाहून या तारखा ठरविण्यात आल्या नव्हत्या. त्या त्या तारखांचे स्वतंत्र इतिहास आहेत. परंतु 22 जानेवारी 2024 या तारखेचे तसे नाही. ही भारतीय परंपरेप्रमाणे शुभकार्याचा मुहूर्त ठरविणारी सर्व ईश्वरीय शक्तीची अनुकूलता असणारी तारीख होती. या दिवशी अयोध्येत रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली.
 
लोकभावना अशी होती की, बाबराने रामाचे मंदिर पाडल्यानंतर रामाला 500 वर्षांचा वनवास घडला. 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांना आपल्या हक्काचे घर मिळाले. ते मिळावे यासाठी 500 वर्षे संघर्ष झाला. अगणित रामभक्तांचे रक्त सांडले. रक्त सांडण्याची ही परंपरा साबरमती एक्स्प्रेसचा डबा जाळेपर्यंत चालू राहिली. रामाच्या जन्मस्थानावर मंदिर बांधायचेच, हा निर्धार कधी संपला नाही. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हा संकल्प वारसा हस्तांतरित होत गेला आणि ही पिढी कृतार्थ झाली. ‘याची देही याची डोळा’ प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानावर भव्य मंदिर पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. मीदेखील या भाग्यवंतांतील एक होतो. 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा समारंभात मी सपत्नीक सहभागी झालो.
 

rammandir
 
हा जसा व्यक्तिगत आयुष्यातील परमानंदाचा क्षण होता, त्याहूनही अधिक राष्ट्रीय आकांक्षेच्या परिपूर्णतेचा हा परमोच्च बिंदू होता. देवदर्शन कुठेही होते, रामाची मंदिरे देशात कुठे नाहीत असा प्रश्न पडेल, इतकी मंदिरे आहेत. पण अयोध्येतील रामजन्मस्थानावरील मंदिर, हे जन्मस्थानावरील मंदिर आहे. त्या मंदिरातील बालरामाची मूर्ती आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. या मूर्तीचे दर्शन म्हणजे ‘स्व’ दर्शन असते. ‘स्व’ दर्शन म्हणजे आम्ही कोण आहोत, आमचा इतिहास कोणता, आमचे तत्त्वज्ञान कोणते, आमचा वारसा कोणता, जीवन जगण्याची आमची पद्धती कोणती या सर्वांची आठवण आणि साठवण म्हणजे जन्मस्थानावरील रामलल्लाची मूर्ती.
 
बावीस जानेवारी 2024 ही तारीख नव भविष्यकाळ घडविणारी तारीख आहे. 22 तारखेपूर्वीचा भारत आणि 22 तारखेनंतरचा भारत याची सीमारेषा ठरविणारी ही तारीख आहे. 22 तारखेपूर्वीच्या भारताचेदेखील काही कालखंड आहेत. 1947 ते 1964, 1966 ते 1984, 1985 ते 2014. हा कालखंड राम अस्मिता संपविण्याचा कालखंड आहे. आम्ही कोण आहोत, याच्या विस्मरणाचा कालखंड आहे. या काळात आपण आपल्याला जी लेबले लावून घेतली, ती अशी होती - आम्ही समाजवादी, आम्ही सेक्युलर, आम्ही धर्मनिरपेक्ष, आम्ही उदारमतवादी, आम्ही जयजगतवाले. या कोणत्याही लेबलामध्ये ‘राम’ नव्हता. ज्यात ‘राम’ नाही, ते काही कामाचे नाही, असे हनुमंताचे सांगणे आहे. शब्द कितीही गोड असले आणि खंडीभर पुस्तकांचे विषय असले, तरी जनहृदयाचे कणभरदेखील विषय ते होत नाहीत. जनहृदयाचा विषय होण्यासाठी प्रत्येक विषयात ‘राम’ असावा लागतो.
 
‘राम’ असावा लागतो म्हणजे, आपली अस्मिता त्यात असावी लागते. आपली जीवनमूल्ये त्यात असावी लागतात, आपली जीवनपद्धती त्यात असावी लागते, आपले शाश्वत तत्त्वज्ञान त्यात असावे लागते.
 
आमची अस्मिता कोणती? वेदकाळापासून आपले या भूमीवर वास्तव्य आहे. आपली स्वतंत्र ओळख आहे. जगावर साम्राज्य निर्माण करणे ही आपली अस्मिता नाही. हे विश्व एका ब्रह्माचा पसारा आहे, मी त्याचा अविभाज्य भाग आहे, ही आपली अस्मिता आहे.
 
 
आपली जीवनमूल्ये पाश्चात्त्य जगापेक्षा फार वेगळी आहेत. पृथ्वी आपल्या उपभोगासाठी निर्माण झाली नसून वसुंधरा आमची माता आहे. पुत्र म्हणून आमचे कर्तव्य आहे की, ही माता निरोगी राहील, समृद्ध राहील, सुलजाम-सुफलाम राहील हे पाहणे. या वसुंधरेवर विहार करणारे सर्व प्राणी सुखाची कामना करतात, म्हणून कारण नसताना कुठल्याही प्राण्याला पीडा देणे पाप आहे.
 
आमच्या जीवनमूल्यांची संकल्पना पाप आणि पुण्य या दोन शब्दांभोवती केंद्रित झाली आहे, त्याची सोपी व्याख्या संतजनांनी अशी केली आहे - ‘पुण्य परउपकार। पाप ते परपीडा।’ जसा मी तसा तू, या भावनेने व्यवहार करायचा. ज्या गोष्टींमुळे मला दु:ख होते, तसे दु:ख दुसर्‍यांनाही होते, याची जाणीव सतत ठेवायची. या जाणिवेचे दुसरे नाव ‘श्रीराम’ असे आहे.
 
आमची जीवनपद्धती एकमेकांना पूरक बनून जगण्याची आहे. परिवार आमचा मुख्य कणा आहे. आई-वडील, आजी-आजोबा आणि रक्ताच्या नात्यातील सर्व नातेवाईक अशी मिळून आमची एक विशाल परिवाराची दृष्टी असते. प्रत्येक नातेसंबंधांची कर्तव्ये असतात. त्या कर्तव्यांचे पालन करायचे असते. हे कर्तव्याचे पालन म्हणजे रामायण आहे. राम-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न-जानकी-हनुमान ही सर्व नावे व्यक्तींची नावे नाहीत. ती कर्तव्यधर्माची रूपे आणि प्रतीके आहेत. जन्मस्थानावरील रामलल्लाची मूर्ती या जीवनपद्धतीची आपल्याला निरंतर आठवण करून देत राहील.
 
आमचे म्हणून शाश्वत तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान चिरकालिक, शाश्वत आणि सार्वभौम आहे. हे तत्त्वज्ञान सृष्टीतील एकत्व पाहायला शिकविते. डोळ्याला जे दिसते, ती विविधता आहे. एकत्वाची विविधता ही एकत्वाची सौंदर्य अभिव्यक्ती आहे. या विविधतेचा सन्मान करायला पाहिजे. विविधतेत भेद बघायचे नाहीत. सृष्टीतील प्रत्येकाचा देहधर्म वेगवेगळा असतो, आवडीनिवडी, विकासाची नैसर्गिक ओढ सर्व काही वेगवेगळे असते. या सर्वाचा सन्मान करायचा. एकसारखेपणा आणण्याचा प्रयत्न करायचा नाही. प्रत्येकाला जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे आणि अभिव्यक्त होण्याचेही पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे. यासाठी पाश्चात्त्य जगातील कोणाचीही उष्टावळ चाटण्याची आपल्याला गरज नाही. या तत्त्वज्ञानाच्या बाबतीत आम्ही स्वयंभू आणि सार्वभौम आहोत.
 
जन्मस्थानावरील रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन म्हणजे या सार्वभौमत्वाचे दर्शन आहे. जागृत झालेला हा देश आता राममार्गाने वाटचाल करू लागेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात रामतत्त्वाची अभिव्यक्ती घडवून आणण्याचा हा कालखंड सुरू झाला आहे. देशाच्या अर्थकारणात, देशाच्या समाजकारणात, देशाच्या राजकारणात, देशाच्या धर्मकारणात आणि देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात इथून पुढे हा अभिव्यक्ती होत जाण्याचा कालखंड सुरू झालेला आहे.
 
देशाचे अर्थकारण समाजवादी असावे की भांडवलवादी असावे की साम्यवादी असावे की आणखी काही असावे, या सर्व अर्थहीन चर्चा आहेत. देशाचे अर्थकारण ‘राममय’ असावे. या अर्थकारणात अर्थाचा अभाव नसेल आणि अर्थाचा प्रभावदेखील नसेल. केवळ मनुष्याला नाही, तर किड्यामुंग्यांपासून चतुष्पाद प्राण्यांपर्यंत सर्वांना आर्थिक सुरक्षेत जीवन जगता येईल. आर्थिक सुरक्षा ही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांशी संबंधित असते. भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वजनशिष्टाचारयुक्त अशी ही राममय अर्थव्यवस्था असेल.
 
समाजकारणाचा विचार करता वर्ण, जाती इत्यादींचा विचार केला जातो. त्याबद्दल गेल्या दीड-दोनशे वर्षांत प्रचंड वैचारिक जागृती केली गेली आहे. आताच्या राम कालखंडात समरस समाजजीवन हे आदर्श समाजजीवन म्हणून घडविले जाईल. जातीवरून कोणाला हीन अथवा श्रेष्ठ लेखले जाणार नाही. आपआपल्या कर्मामुळे व्यक्तीचे समाजातील स्थान निश्चित होईल. आणि राममार्गात सुकर्म अपेक्षित आहे. भेदाभेदाने जर्जर झालेला हा समाज वेगाने सार्वत्रिक बंधुभावनेच्या आणि भगिनीभावाच्या चेतनेने उभा राहील.
 
पाश्चात्त्यांची राजकीय शैली समाजात कलह निर्माण करणारी आहे. या पद्धतीचे शंभर टक्के भारतीयीकरण म्हणजे रामकरण करण्याचा कालखंड सुरू झालेला आहे. राजकारणाचा विषय राजसत्तेशी येतो. राममार्गातील राजसत्ता ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ प्रज्ञा-करुणा-शिल यांवर आधारित असेल. राष्ट्रपतींपासून नगरसेवकांपर्यंत प्रत्येकाला उपभोगशून्य स्वामी या भावनेने सत्तेचा वापर करावा लागेल. याअगोदर दिलेल्या कालखंडात सत्ता कुटुंब सुखाय, व्यक्तिसुखाय, जातिसुखाय वापरली जात होती. तो मार्ग आता बंद करावा लागेल.
 
राममार्गाचे धर्मकारण म्हणजे कर्तव्यधर्माचे पालन होय. पूजापद्धती वेगवेगळी राहील, पूजापद्धतीचे ग्रंथ, आचार, कर्मकांडे वेगवेगळी राहतील. त्यात एकसारखेपणा निर्माण करणे राममार्गात बसत नाही. आताचा कालखंड राष्ट्रधर्माचे पालन करण्याचा कालखंड आहे. आपले एक सनातन राष्ट्र आहे, मी त्या राष्ट्राचा घटक आहे, केवळ घटक नसून एक अंग आहे; माझे संबंध जैविक आहेत, शरीरातल्या एखाद्या भागाला जखम झाली तर, त्याची पीडा सर्व शरीराला होते - त्याला अंगांगी भाव म्हणतात, तो या कालखंडाचा धर्ममार्ग आहे. अयोध्येतील जन्मस्थानावरील रामलल्ला आपल्याला त्याची आठवण करून देते.
 
 
आनंदाने जीवन जगणे हा आपला सनातन स्वभाव आहे, म्हणून आपल्या समाजरचनेत असंख्य उत्सव, सण, यात्रा यांची रेलचेल असते आणि अशा प्रसंगी नृत्य, गायन, वादन, नाटक, नाटिका अशा सर्व माध्यमांतून आपण आपल्याला अभिव्यक्त करतो. या अभिव्यक्तीचा जर अभ्यास केला, तर लक्षात येईल की हे ब्रह्मांड नादमय आहे, हे ब्रह्मांड तालमय आहे, हे ब्रह्मांड स्वरमय आहे; त्या सर्वांशी नृत्याच्या विविध मुद्रा करून ताल आणि स्वर यांचा मेळ साधून जी अभिव्यक्ती होते, तिची अनुभूती स्वर्गसुखाचा आनंद देणारी असते. हे आपले प्राचीन वैभव विपरीत काळात टिकवून ठेवण्यात आले. अनुकूल काळात ते आता पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध करायचे आहे.
 
 
रामभारत घडविण्याच्या कालखंडाला सुरुवात झालेली आहे. 22 जानेवारी 2024ला देशाचा कानाकोपरा राममय झाल्याचा अनुभव आपण घेतला. ही राममयता गंगेच्या प्रवाहासारखी अखंड आणि निरंतर वाहत ठेवायची आहे. एक असा भारत उभा करायचा आहे, जो सर्व विश्वाचे आशास्थान ठरेल. सर्व मानवी दु:खांचा परिहार करील आणि पेरू देशापासून मंगोलियापर्यंत विशाल भूभागावर राहणार्‍या जनजीवनाला शाश्वत सुखाचा ठेवा देईल. हे रामदायित्व आपल्याला पार पाडायचे आहे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.