‘रत्न’

विवेक मराठी    21-Feb-2024   
Total Views |

vivek
 अर्कचित्र - अमोघ वझे
अनेक पंचायती करन्यासाटी मिळाल्येल्या ‘पंचायत रत्ना’ला घिऊन सुप्रीचा बाप ष्टेजवरनं खाली उतरला आन् पाराफुडनं चालंत निगाला. मांडव रिकामा हुता आन् कार्यकर्ते गायप हुते. पारावरची गर्दी सुप्रीला आन् तिच्या बापाला कायतरी सांगत हुती. त्यांला त्ये आयकाया एत हुतं का नाय, म्हायती न्हाई!
पंचायतीसमुरच्या चावडीवं मांडव टाकून ष्टेज हुबारल्यालं. आज सुप्रीला दुसर्‍यांदा ‘पंचायत रत्न’ देनार हुते. तिची कामंच तसली हुती. येका येकरात धा कोटीची वांगी घेटल्याकरनानं तिला कृशीरत्न बी देनार हुते, पन इन्स्पेक्शन वाल्यांची गाडीच गायप झाल्ती. सुप्रीच्या बापानं ह्यो पंचायतरत्नचा जुगाड जमवून आन्ल्याला. कारन फुडं जाऊन सुप्रीला सरपंच करायचा प्ल्यान हुता. मागच्या टायमाला फेल झाल्ता आन् या टायमाला गल्लीत तरी मतं भेटतीन का नाय याची खात्री देता येत नवती. म्हनून कुटूनतरी चर्चेत र्‍हायाला पायजेल, म्हनून ह्यो घाट घाटल्याला.
 
 
संज्या आन् र्‍होयत्या मानसं धरून धरून आनून बसवत हुते. मेन पोग्रॅम सुरू हुईस्तवर किरन्याचे वयचारीक इणोदी वाक्यान ठिवल्यालं. त्ये दर चार वाक्याणंतर जातीय वकार्‍या काढाया लागल्यावं डोकं जाग्यावं आसल्याल्या पब्लिकणं चपला फेकाया सुर्वात क्येली. सुप्रीच्या बापाणं ‘तुमचा मानूस आवरा’ म्हनून आद्याच्या बापाला फोन लावला. पन आद्याच्या बापानं काई करायच्या आत मांडवातली लाईट ग्येली. आंधारेच्या करिश्माणं किरन्याला हात धरूण खेचलं आन् ष्टेजवरूण घेऊन ग्येली. आद्या माईकवं जानार हुता, पन समुर गर्दी नसल्याणं त्येणं जायाचं टाळलं.
 
 
मांडवाच्या समूरच्या पिंपळाच्या पारावं देव्या, दाढी आन् दाद्या मज्जा बगत बसल्यालं. शेवटी दाद्या म्हन्ला, “जाऊद्या राव, पोरं पोरं हैत. नका खेचू.” देव्यानं हासून टाळी धिली आनी शिट्टी मारली. त्येनं जशी शिट्टी मारली, तशी हिकडं लाईट आली.
हिकडं सुप्री पुरस्कार घेन्यासाटी नट्टापट्टा करत बसल्याली. तिला लाईट गेल्यानं फुटल्याला घाम पुसाया आंधारेची करिश्मा टिशू घेऊण आली. त्ये बगून यजमाण आसल्याला सुप्रीचा बाप वयतागला. म्या सोत्ता हितं बसल्याला आसून लाईट जाती म्हंजी काय? पन त्येणं जरा थंड घेटलं. आश्या त्येणंबी लै जनांच्या लायटी घालवल्या हुत्या. आज लाईट घालवायच्या पोजिशणवर देव्या हुता, ह्ये त्येला ठावकी हुतं.
 
 
हिकडं सुत्रसंचालण कराया आद्या बांदेकर मिश्या सावरंत फुडं आला. त्येणंबी पयल्यांदी सरपंच दाढी आन् हुपसरपंच देव्या आन् दाद्याला माईकवरूण फुडच्या रांगेत यून बसायाची इनंती क्येली. दाद्या लांबनंच ‘र्‍हाऊंदे र्‍हाऊंदे..’ म्हनत हुता. बांदेकर पुन्ना पुन्ना नावं घेत र्‍हायला. मांडवात या तिघांच्या नावाचा जयघोश चाल्ल्याला. त्येनं आत सुप्रीचा बाप पुन्ना वयतागला. कारेक्रम कुनाचाबी आसुंद्येल, चर्चा आपलीच झाली पायजेल, ह्यो दाद्याचा ह्येका पाहून देव्या गालातल्या गालात हासत हुते.
 
 
हिकडं कारेक्रम कदी सुरू हुनार म्हनून सुप्री बेचैन झाल्याली. सक्काळधरनं नट्टापट्टा करूण बसल्याणं तिचा बाजार उठल्याला. आधीच्या पोग्रॅमला दाद्याणं योक लंबर म्यानेजमेंट केल्याली. ही रानीवानी आल्ती आन् ग्येल्ती. आता दाद्या न्हाई तं खुर्च्याबी भरंनात. संज्या आन् र्‍होयत्याचं पार घामटं निगाल्येलं. आद्याला बरूबर घ्याव तं रश्मिआक्काणं “नगं बाई, आमच्या पोरग्याला ऊन बाधतं” सांगूण र्‍होयत्याला कटावल्यालं. त्ये फुडनं मानसं आनून बसवंत हुत्ये आन् मागनं दाद्या आन् देव्या ‘काय म्हन्ता मामा’ करत पारावं गर्दी वाडवत हुते.
 
 
तिकडं त्या बांदेकरचा घसा पार सुकून ग्येला, तरी देव्या, दाढी आन् दाद्या मांडवात यीनात. आल्येली मानसं टिकत नवती. सेवटी सुप्रीचा बाप सुप्रीला घिऊन ष्टेजावं आला. रिकाम्या खुर्च्या आन् भरल्याला पार बगून त्येला काय समजायचं त्ये समाजलं. त्येनं बांदेकरला सांगून फोटूवाला बलिवला आन् सुप्रीला पुरस्कार घिऊन फोटू काडून घेटला. फोटू काडतानी सुप्री, सुप्रीचा बाप आन् फोटूवाला शिरीयस हुते. बाकी पब्लिक पारावं देव्या दाढी आन् दाद्याशी गप्पा हानत बसल्याले.
 
 
अनेक पंचायती करन्यासाटी मिळाल्येल्या ‘पंचायत रत्ना’ला घिऊन सुप्रीचा बाप ष्टेजवरनं खाली उतरला आन् पाराफुडनं चालंत निगाला. मांडव रिकामा हुता आन् कार्यकर्ते गायप हुते. पारावरची गर्दी सुप्रीला आन् तिच्या बापाला कायतरी सांगत हुती. त्यांला त्ये आयकाया एत हुतं का नाय, म्हायती न्हाई!
 
 

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.