अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - काही असे, काही तसे..

विवेक मराठी    05-Feb-2024   
Total Views |
sahitya sammelan 2024
अंमळनेर येथे 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या काळात 97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन साजरे झाले. संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक न घेता साहित्य महामंडळाच्या घटक संस्था एकमताने अध्यक्ष निवड करतात. या वर्षी ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि अंमळनेर येथे हे साहित्य संमेलन होईल असा निर्णयही झाला. जून 2023मध्ये अखिल भारतीय साहित्य महामंडळाने हे निर्णय जाहीर केले. 1952नंतर अंमळनेर येथे संमेलन होऊ घातले होते. मराठी वाङ्मय मंडळ अंमळनेर या संस्थेने आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आणि मागचे सात-आठ महिने या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट या संमेलनात फळास आले.
 
sahitya sammelan 2024
 
साहित्य आणि साहित्यबाह्य वादविवाद यांची किनार असल्याशिवाय संमेलन सफळ सुफळ झाले असे मानण्याची मराठी साहित्यरसिकांची अजूनही मानसिकता नसावी आणि म्हणूनच उद्घाटक कोण? त्यांची साहित्यिक कारकिर्द काय? असे प्रश्न संमेलनाच्या पूर्वसंध्येला उपस्थित केले गेले.
 
 
या पार्श्वभूमीवर अंमळनेरकरांनी संमेलन यशस्वीपणे पार पाडले. तालुक्याचे गाव असणार्‍या अंमळनेरमध्ये ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देता आल्या, त्या दिल्या गेल्या. व्यवस्थात्मक पातळीवर संमेलन यशस्वी झाले. प्रश्न आहे तो गुणात्मक व भविष्यलक्ष्यी मांडणीचा आणि दिशादर्शनाचा. तो किती साध्य करता आला, यावरही लवकरच चर्चा सुरू होईल आणि साहित्यिकदृष्ट्या या संमेलनाचे फलित काय, हेही समोर येईल.
 
 
अखिल भारतीय साहित्य संमेलन आता शताब्दीकडे वाटचाल करत आहे. आणखी तीन वर्षांनी 100व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन होईल, ही गोष्ट लक्षात घेता पहिल्या साहित्यकार परिषदेच्या निमित्ताने महात्मा फुलेंनी न्यायमूर्ती रानडेंना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली आहेत का? याचा विचार करणे आवश्यक आहे. 97व्या साहित्य संमेलनात विविध परिसंवाद, मुलाखती, कविसंमेलन, अभिरूप न्यायालय अशा विविध सत्रांची रचना केलेली होती. त्याचप्रमाणे प्रकाशन कट्टाही उपलब्ध करून दिला होता. तीन दिवसांत सुमारे दीडशे पुस्तके या कट्ट्यावर प्रकाशित झाली. ही संख्या लक्षात घेतली, तर मराठी साहित्यविश्व किती गतिशील आहे, हे लक्षात येते. या संख्यात्मक प्रगतीसमोर गुणात्मक प्रगतीचा आढावा कसा घ्यायचा? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
 
 
sahitya sammelan 2024
 
अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हटले की साहित्यप्रेमींची उपस्थिती (संमेलनाला साहित्यप्रेमींची गर्दी नाही अशी समाजमाध्यमांवरून जोरदार हाकाटी केली जात होती. मात्र प्रत्यक्षात या संमेलनासाठी महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींबरोबरच हैदराबाद, इंदोर, भोपाळ अशा शहरांतूनही साहित्यप्रेमी आले होते. गिरीश प्रभुणे यांच्या मुलाखतीनंतर त्यातले काही आवर्जून मंचावर येऊन प्रभुणेंना भेटून गेले.) पुस्तकांच्या खरेदीच्या संख्येच्या आधारे संमेलनाचे यश शोधण्याची जुनीच पद्धत आहे. अंमळनेर येथील संमेलनाचे मूल्यमापन करताना हेच निकष लावले, तर? मग अंमळनेर येथील संमेलन यशाच्या रेषेपलीकडे उभे असेल. विविध प्रसारमाध्यमांनी, सोशल मीडियावर सक्रिय असणार्‍या मंडळींनी अंमळनेर येथील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता का? की पुणे-मुंबई-नागपूरशी तुलना करत अंमळनेर संमेलनाचे यशापयश मांडले होते?
 

sahitya sammelan 2024 
 
प्रत्येक परिसंवादात भरपूर वक्ते आणि त्यांना दिलेली मर्यादित वेळ यामुळे परिसंवादाच्या विषयाचा आत्मा हाती लागण्यास अडचण होते का? या प्रश्नाचे उत्तर महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी शोधायला हवे. त्याचप्रमाणे प्रदीर्घ काळ साहित्य म्हणजे काय हे ठरवण्याच्या निकषाबाहेर असणार्‍या किंवा साहित्याच्या प्रचलित निकषात न बसणार्‍या लिखाणाचा विचार कसा करायचा? याविषयी विचार करण्याची संधीही आता प्राप्त झाली आहे. प्रचलित निकष आणि समकालीन अभिव्यक्ती यांची सांगड घालून पुढची वाटचाल करावी लागेल, हे या संमेलनाने अधोरेखित केले आहे.
 
 
sahitya sammelan 2024
 
अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही साहित्य क्षेत्रातील शिखर संस्था आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय साहित्य संमेलन हेसुद्धा मराठी साहित्यविश्वाचे सर्वोच्च स्थान आहे. असे असेल, तर महाराष्ट्रात अनेक छोट्या स्वरूपाची संमेलने होतात, त्यांना दिशादर्शन करण्यासाठी महामंडळ काय करते? मागील काही वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जेथे असेल, तेथेच विद्रोही साहित्य संमेलन आयोजित केले जाते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यावरणास ही गोष्ट नवी नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय परिषदेच्या मंडपात सामाजिक परिषद आयोजित केली जात असे. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन संमेलने झाली, तर फार फरक पडत नाही. प्रश्न एवढाच आहे की हे साहित्य क्षेत्रातील सवतेसुभे किती दिवस चालू राहणार? विद्रोही, महानगरी, ग्रामीण, दलित, समरसता, झाडीपट्टी, बोलीभाषा अशा विविध प्रादेशिक व विषयनिष्ठ संमेलनाचे आयोजन करण्यामागची भूमिका अखिल भारतीय साहित्य महामंडळ कधी करते का? शिखर संस्था म्हणून या सर्व संस्था व संघटनांशी संवाद व मार्गदर्शन करण्याचे दायित्व महामंडळ स्वीकारते का? अंमळनेर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गिरीश प्रभुणे यांची मुलाखत झाली. त्यात त्यांना प्रश्न विचारला गेला की, “विद्रोही साहित्य संमेलन आणि हे संमेलन यांचा समन्वय कसा होईल?” तेव्हा ते म्हणाले, “दोघांची भूमी एकच आहे. विद्रोह म्हणजे विशेष द्रोह. तो तात्कालिक असतो. तो ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी केला आणि समाजाने त्यांना डोक्यावर घेतले. विद्रोह का आहे, हे समजून घेण्याची जबाबदारी आपली आहे.”
 
 
sahitya sammelan 2024
 
विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वासुदेव मुलाटे यांचे अभिनंदन करताना  अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  डॉ. रवींद्र शोभणे
 
म्हणजेच संवाद आणि समन्वय यांच्या माध्यमातून प्रश्न निकाली निघत असले, तरी प्रश्न का निर्माण झाला हे विसरता कामा नये. साहित्य हे समाजजीवनाचे तात्कालिक प्रतिबिंब असते. त्याचप्रमाणे आपण काय आहोत आणि कसे असायला हवे याचे दर्शन साहित्य घडवत असेल, तर नकार, विद्रोह या तात्कालिक साहित्यमूल्यांकडे किती दिवस कानाडोळा करायचा, हेही ठरवण्याची वेळ आली आहे. वर्धा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. ते वर्धा येथील विद्रोही साहित्य संमेलनात भेट देण्यासाठी गेले. अंमळनेर येथील विद्रोही संमेलनास डॉ. रवींद्र शोभणे यांनी भेट दिली. ही पाऊलवाट वहिवाट झाली, तर लवकरच अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या छत्रछायेखाली विविध विषयनिहाय व प्रदेशनिहाय अनेक संमेलने आयोजित होतील आणि एकूणच मराठी साहित्यविश्व संपन्न होत जाईल.
 

sahitya sammelan 2024 
 
शंभरीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सध्याच्या स्वरूपाबद्दलही गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. संमेलन म्हणजे उत्सव, संमेलन म्हणजे जल्लोश, संमेलन म्हणजे लखलखाट यातून बाहेर पडून छोट्या छोट्या प्रमाणात सघन चर्चा आणि विचारांची देवघेव कशी होईल याचा विचार करण्याची ही वेळ आहे. संमेलनातील परिसंवाद, कविसंमेलने उत्तम होतात, होतील, पण भविष्यवेधी चिंतन आणि प्रत्यक्ष अभिव्यक्तीची वाट मोकळी करून देण्याचे काम साहित्याच्या शिखर संस्थेला करावे लागेल.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001