“मलकापूर बाजार समिती शेतकर्‍यांसाठी आधारवड” - सभापती शिवचंद्र तायडे

विवेक मराठी    27-Mar-2024   
Total Views |
 
malkapur
मलकापूर बाजार समिती मका बाजारपेठेसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या बाजार समितीला व्यापक स्वरूप देण्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा मार्गी लागल्या आहेत. शेतकर्‍यांच्या शेतमालाला अत्यल्प व्याजदरात तारण कर्ज, ई-नामसारख्या ऑनलाइन लिलाव पद्धतीचा व्यवहार असो की पायाभूत सुविधा या माध्यमातून मलकापूर बाजार समिती विदर्भातील चर्चेत राहिली आहे. आजच्या घडीला ही बाजार समिती शेतकरी बांधवांसाठी आधारवड बनली आहे. या क्षेत्राविषयी आणि त्यातील अनुभवांषियी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तेजराव तायडे यांनी ’कृषी विवेक’शी साधलेला संवाद.
गेल्या दोन दशकांपासून तुम्ही शेतीचे, राजकारणाचे व समाजकारणाचे यशस्वी नेतृत्व करत आहात. शेतकरी ते नेता या प्रवासाविषयी काय सांगाल?
 
माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. वरखेडसारख्या (ता. मलकापूर) एका छोट्या गावात वाढलो, शिकलो. शेतीत आणि ग्रामजीवनात रमलो. शेती आणि गावातील समस्यांचे आकलन केले. शेतीचे आणि समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर समाज आणि शासन यातील दुवा होणे आवश्यक होते. गावकर्‍यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून दिले. या माध्यमातून ग्रामविकास साधण्याचा प्रयत्न केला. पुढे बुलढाणा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करता आले. पत्नी उमा हिला बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून भरीव विकासकार्य करता आले.
 
शिवचंद्र तेजराव तायडे

malkapur
 
(सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मलकापूर)
संपर्क - 9011023587

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे यशस्वी सभापती म्हणून अल्पावधीतच तुमच्याकडे पाहिले जाते. याविषयी तुमचे मत काय?
 
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातील महत्त्वाची बाजार समिती आहे. 1 जानेवारी 1900 रोजी या समितीची स्थापना झाली. त्यामुळे मोठा वारसा लाभलेली ही समिती आहे. एकूण 19 एकरामध्ये वसलेल्या या समितीत 67 गावांचा समावेश होतो. मलकापूर शहरात सात एकर जागेत उपबाजार आहे. या ठिकाणी भाजीपाला व पशुबाजार भरविला जातो. मी गत एक वर्षापासून या समितीचा सभापती म्हणून दायित्व सांभाळत आहे. या बाजार समितीला व्यापक स्वरूप देण्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या शेतमालाला अत्यल्प व्याजदरात तारण कर्ज देणे, बाजार समितीत कितीही शेतमालाची आवक आली, त्याच दिवशी ई-नामसारख्या ऑनलाइन लिलाव पद्धतीचा व्यवहार अमलात आणून शेतकर्‍यांना त्वरित मोबदला देणे असो की पायाभूत सुविधा, या माध्यमातून मलकापूर बाजार समिती चर्चेत राहिली आहे. आजच्या घडीला ही बाजार समिती शेतकरी बांधवांसाठी आधारवड बनली आहे.
 

malkapur 
बाजार समितीत कोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, याशिवाय कोणकोणते उपक्रम राबविता?
बाजार समितीत मलकापूर तालुक्यासह, खान्देश व मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेलगतच्या गावांतून कापूस, मका, सोयाबीन, तूर, गहू, ज्वारी, चणा इ. धान्यांची आवक होत असते. शेतकरी बांधवांना व व्यापार्‍यांना कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ नये यासाठी आडत व खरेदीदारांसाठी व्यापारी गाळे, अंतर्गत रस्ते व रस्त्यांचे डांबरीकरण, शेतकर्‍यांसाठी शेतकरी निवास, शेतकर्‍यांच्या शेतमालाचे अचूक मोजमाप होण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक काटे, चार धान्य साठवण केंद्रे, पाणीपुरवठा व विद्युत व्यवस्था, 19 एकरावर शेड बांधणी, सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे, शेतकर्‍यांसाठी अल्प दरात भोेजन (प्रस्तावित योजना) अशा अनेक लोकाभिमुख सुविधा व योजना राबविल्या जात आहेत.
 
 
शेतकरी बांधवांसाठी तज्ज्ञांमार्फत पीक सल्ला, शेतकरी मेळावा, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, शेतकरी पुत्रांसाठी मनोबल अभ्यासिका या उपक्रमांसह बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी अत्यल्प व्याजदरात शेतमाल तारण योजना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे कॅन्सरच्या उपचारासाठी शेतकरीवर्गाकरिता दहा हजार रुपयांची मदत दिली जाते.
 

malkapur 
मलकापूर ही मक्याची विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून विकसित झाली आहे. याचा शेतकर्‍यांना कशा प्रकारे फायदा झाला आहे?
 
मका हे मलकापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचे मुख्य नगदी पीक आहे. मागील काही वर्षांत मका उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन व योग्य बाजारभाव यामुळे मलकापूरने मका क्षेत्रात आघाडी घेतली आहे. प्रामुख्याने मक्याची लागवड, काढणी, वाहतूक, विक्री या कामात हजारो लोकांना रोजगार मिळत आहे. मक्याच्या आवकेने येथील बाजार समिती फुललेली असते. त्यामुळे विदर्भात मलकापूर बाजार समिती मक्याच्या उलाढीसाठी प्रसिद्ध मानली जाते. मक्याची जास्तीत जास्त आवक व्हावी, यासाठी रेल्वे विभागाने खास मलकापूरसाठी स्वतंत्र मालवाहतूक सुरू केली आहे.
 
खुल्या बाजारापेक्षा बाजार समितीवर शेतकर्‍यांचा जास्त विश्वास आहे. हंगाम काळात एकूण 225908 क्विंटल मका आवक होत असते, तर सध्या सरासरी 500 ते 600 क्विंटल मका आवक होत आहे. शेतकर्‍यांनाही माल विक्रीनंतर त्वरित मोबदला देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मलकापूरचा नावलौकिक वाढला आहे.
 
बाजार समितीपुढील आव्हाने कोणती आहेत व यावर कशा प्रकारे मात कराल?
 
शेतमालाची होणारी आवक व शेतकरी यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास होत असतो. त्यामुळे व्यापार व बाजारभाव यामध्ये पारदर्शकता कशी राहील, यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय संचालक मंडळ, शेतकरी, आडते, खरेदीदार, हमाल, मापाडी आणि कामगार यांच्यात समन्वय कसा राहील यासाठी प्रयत्नशील आहे.
 
शासनाकडून कोणत्या अपेक्षा आहेत?
 
मलकापूर हे ’मका हब’ अशी ओळख तयार होत आहे. पोल्ट्री आणि खाद्यपदार्थ व्यवसायासाठी मलकापूर बाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मका बाजारपेठ लक्षात घेऊन कृषी विभागाने मका प्रक्रिया उद्योग उभा केल्यास मलकापूर हे मका निर्यातीचे व उत्पादनाचे मुख्य केंद्र ठरेल.
 
 
भविष्यातील व्हिजन कशा प्रकारचे आहे?
 
येत्या काळात भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांसाठी सुसज्ज अशी विक्री व्यवस्था उभारण्यात येणार आहे. शिवाय बाजार समितीची स्वत:ची रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागण्यात आलेली आहे.
 

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.