विद्यार्थी संघ निवडणूक अभाविपच्या वाढत्या कार्याचा शंखनाद

विवेक मराठी    29-Mar-2024   
Total Views |
जेएनयू विद्यार्थी संघ निवडणूक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हरली असली तरीही ही निवडणूक डाव्यांसाठी कठीण होती. या वर्षी डाव्यांविरुद्ध लढणार्‍या काँग्रेसधार्जिण्या एनएसयूआय आणि आंबेडकरवादी बापसानेदेखील डाव्यांच्या कंपूत विद्यार्थी परिषदेविरोधात प्रवेश केला आला. ही निवडणूक म्हणजे अभाविपच्या जेएनयूत वाढणार्‍या कार्याचा शंखनाद आहे.
ABVP
 
’छात्रशक्ती राष्ट्रशक्ती’ ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची घोषणा भारतभर निनादत असताना दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ याला अपवाद कसे असेल? मार्च 2024 मध्ये झालेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये अखिल भारतीय परिषदेने कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. मध्यवर्ती पॅनलमध्ये चार पदांवर थोड्या मतांच्या अंतराने परिषद हरली असली तरीही ही निवडणूक डाव्यांसाठी कठीण होती. या वर्षी डाव्यांविरुद्ध लढणार्‍या काँग्रेसधार्जिण्या एनएसयूआय आणि आंबेडकरवादी बापसानेदेखील डाव्यांच्या कंपूत विद्यार्थी परिषदेविरोधात प्रवेश केला आहे. यामुळे परिषदेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे डाव्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागल्याची ही चिन्हे आहेत. 2020 नंतर विद्यार्थी परिषदेकडून जेएनयू निवडणुकांसाठी मोठी आंदोलने करण्यात आली. जेएनयूतील विद्यार्थी-प्रश्नांवर तोडगा निघावा आणि कॅम्पसमधील प्रशासकीय कारभार विद्यार्थ्यांकडून लोकशाही पद्धतीने चालावा, ही विद्यार्थी परिषदेची तळमळ सुरुवातीपासूनच संपूर्ण देशाने पाहिली. निवडणुका व्हाव्यात म्हणून 2021 मध्ये परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून 2 आठवडे उपोषण करण्यात आले होते. 2022 मध्ये जेएनयूचे मुख्य द्वार बंद करून परिषद कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी आंदोलन केले होते. या सगळ्याला यश हे 2024 मध्ये आले. कॅम्पसमधील लोकतांत्रिक मूल्ये पुनर्जीवित व्हावीत म्हणून विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सतत प्रयत्न केले. चार वर्षांनंतर जेएनयू विद्यार्थी संघाच्या ह्या वर्षी निवडणुका झाल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. जानेवारीच्या शेवटी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी-प्रश्नांसाठी बांधील असणार्‍या डीन ऑफ स्टुडन्ट ऑफिसकडून ’येत्या काही आठवड्यांत निवडणुका होणार’ ही नोटीस लावली गेली, तरीही सगळेच साशंक होते.
 
 
पुढील आठवड्यात जेएनयू प्रशासनाकडून विद्यापीठात असणार्‍या सर्वपक्षीय बैठकीसाठी नोटीस काढण्यात आली; परंतु जेएनयू विद्यार्थी संघाच्या निवडणुका ह्या जेएनयूतील विद्यार्थिवर्गाकडून घेण्यात येतात, त्यामुळे प्रशासनाच्या हस्तक्षेपाला अभाविपकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर डाव्या पक्षांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली. ह्या बैठकीचे नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाल्यावर लोकशाही पद्धतीने निर्णय न घेता जेएनयू विद्यार्थी संघाची पूर्वअध्यक्ष आयशी घोष हिने स्वतःच स्वतःला अध्यक्ष म्हणून जाहीर केले. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना ही बैठक कुठे होणार याची माहिती जाणूनबुजून दिली गेली नव्हती त्याचबरोबर परिषदेचे कार्यकर्ते बैठकीच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना बसण्यासाठी जागाही दिली नाही. परिषदेकडून या संकुचित लोकशाहीविरोधी डाव्या मानसिकतेचा विरोध करण्यात आला. यानंतर काही दिवसांनी विद्यापीठाची सर्वसाधारण सभा भरवण्यात आली. त्या वेळी डाव्यांकडून अभाविपच्या कार्यकर्त्यांना चिरडून टाकण्याच्या घोषणा भर मंचावरून जेएनयू विद्यार्थी संघाचा संयुक्त सचिव दानिश याने दिल्या. विद्यापीठात असलेल्या प्रत्येक विभागाच्या सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आल्या. त्यात स्कूल ऑफ सोशल सायन्स आणि स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये झालेल्या सभा देशभरात गाजल्या.


ABVP
 
जेएनयूत स्कूल ऑफ सोशल सायन्स आणि स्कूल ऑफ लँग्वेजेस अर्थात सामाजिक शास्त्र आणि भाषाशास्त्राच्या विभागात सगळ्यात जास्त विद्यार्थिसंख्या आहे. जवळपास 1800 विद्यार्थी या दोन विभागांमध्ये शिक्षण घेतात. त्यामुळे या दोन्ही विभागांच्या सर्वसाधारण सभांमध्ये अभाविपची प्रतिमा मलिन करण्यासाठी डाव्यांकडून पूर्ण प्रयत्न करण्यात आले. स्कूल ऑफ लँग्वेजेसची सर्वसाधारण सभा जवळपास 18 तास सुरू होती. त्यात डाव्या विचारसरणीच्या इतर विद्यार्थ्यांनी शिरकाव केला. जेएनयू विद्यार्थी संघाचा संयुक्त सचिव दानिश याने जेएनयूतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवडणूक आयुक्तांच्या यादीतील नावे न घेता डाव्या विद्यार्थ्यांची यादी बनवून त्यांना निवडणूक आयुक्त म्हणून सादर केले. स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये 18 तास विद्यार्थी सर्वसाधारण सभेसाठी जमले होते. शेवटी सहनशीलतेचा संयम संपल्याने डावे आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीला सुरुवात झाली. जेएनयू विद्यार्थी संघाचा संयुक्त सचिव दानिश याने 18 तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी त्याच्यावर हात उचलून त्याला घेरले. अभाविपची विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली लोकप्रियता कमी करण्यासाठी डाव्यांकडून या सगळ्या प्रकारासाठी अभाविपला जबाबदार धरले गेले. असाच काहीसा प्रकार स्कूल ऑफ सोशल सायन्समध्ये झाला. स्कूल ऑफ सोशल सायन्सच्या सर्वसाधारण सभेत डाव्या विचारसरणीचे अनेक विद्यार्थी बाहेरून आले होते. त्याचा विरोध म्हणून विद्यार्थी परिषदेने बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना परत पाठवा, त्याशिवाय सभा सुरू करू देणार नाही म्हणून आंदोलन केले. जेएनयूत सर्वसाधारण सभांमध्ये निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी हात वर करून मत द्यावे लागते आणि प्रत्येक सभेत त्या विभागातून साधारण 300 ते 500 इतके विद्यार्थी उपस्थित असतात. 2-4 निवडणूक आयुक्तांच्या पदांसाठी साधारण 100-150 विद्यार्थी आपली नावे देतात. एखाद्या उमेदवाराची मते ही किती हात वर आहेत यावरून मोजली जातात. जेएनयूच्या बाहेरचे विद्यार्थी अशा सभांमध्ये येतात आणि त्यांच्या विचारधारेच्या निवडणूक आयुक्तांची नावे आल्यावर हात वर करून मतदान करतात. 100-150 नावांवर मते घ्यायची असल्याने प्रत्येकाचा चेहरा आणि ओळखपत्र पाहून मत ग्राह्य धरणे शक्य नसते. याचाच विरोध करण्यासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना सभेत येऊ देऊ नका म्हणून परिषदेने स्कूल ऑफ सोशल सायन्समध्ये आंदोलन केले; परंतु डाव्यांनी परिषद निवडणूकविरोधी आहे, असा अपप्रचार करायला सुरुवात केली. गंमत म्हणजे डाव्यांची सरचिटणीस पदासाठी असलेली उमेदवार स्वाती सिंह हिची उमेदवारी निवडणुकीच्या आदल्या रात्री रद्द करण्यात आली. प्रोक्टोरल चौकशीमध्ये ती दोषी आढळल्याने तिची उमेदवारी जेएनयू निवडणूक आयोगाने रद्द केली आणि म्हणून तिने मध्यवर्ती पॅनेलची मतमोजणी थांबवून ठेवून आणि ही संपूर्ण निवडणूक रद्द व्हावी म्हणून दोन दिवस उपोषण केले होते. एका बाजूला डावे म्हणत होते की, अभाविप निवडणूकविरोधी आहे; परंतु डाव्यांच्याच मध्यवर्ती पॅनेल उमेदवाराने आपल्या पारड्यात निर्णय न पडल्याने मतदान झाल्यावर ही निवडणूक रद्द व्हावी म्हणून रडारड केली. ह्या सगळ्या प्रसंगानंतर निवडणूकविरोधी डाव्यांचा चेहरा जेएनयूने पाहिला.
 
ABVP
 
या वर्षी विद्यार्थी परिषदेकडून अध्यक्ष पदासाठी उमेशचंद्र अजमेरा, उपाध्यक्ष पदासाठी दीपिका शर्मा, सरचिटणीस पदासाठी अर्जुन आनंद, सहसचिव पदासाठी गोविंद डांगी यांना उमेदवारी देण्यात आली होती. यातील उमेशचंद्र अजमेरा हे जेएनयूत पीएचडीच्या तिसर्‍या वर्षाचे विद्यार्थी असून, तेलंगणातील अनुसूचित जमातीमधील बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते आहेत. उमेशजींचा जेएनयूपर्यंतचा प्रवास हा अगदी काट्यांनी भरलेला होता. उमेशजींचे गाव हे नक्सल कॉरिडॉरमध्ये येत असल्याने उमेशजी लहान असताना नक्षलवाद्यांकडून त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली. ’लाल गुलामी छोडकर, बोलो वंदे मातरम्’ ही अभाविपची घोषणा सत्यात उतरवण्यासाठी उमेशजींचा संपूर्ण परिवार लढत आहे. वडिलांच्या हत्येनंतर काही काळातच आईचे झालेले निधन यामुळे उमेशजींचे लहानपण कष्टात गेले. पुढे जेएनयूत एमएला प्रवेश मिळाल्यावर उमेशजी अभाविपच्या कार्यात सहभागी झाले आणि त्यांच्या वडिलांनी तेलंगणाच्या नक्षली गावात पेरलेल्या राष्ट्रभक्तीच्या बीजाचे वाढलेले रोप उमेशजींनी डाव्यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात जेएनयूत सोबत आणले. उमेशजींमुळे जेएनयूत राष्ट्रभक्तीचा विचार घेऊन येणार्‍या, परंतु सुरुवातीला बुजर्‍या असणार्‍या अनेक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले. अर्जुन आनंद, गोविंद डांगी आणि दीपिका शर्मा यांनादेखील भरघोस प्रतिसाद मिळाला.
 
 
2019 मध्ये संयुक्त डाव्या युतीला 40.40 टक्के मतदान झाले होते, तर अभाविपला 19.70 टक्के. या वेळी संयुक्त डाव्या युतीला 46.00 टक्के मतदान झाले आहे, तर अभाविपला 31.75 टक्के मतदान झाले आहे. मागच्या निवडणुकीत अभाविपचे 12 कौन्सिलर निवडून आले होते, ती संख्या ह्या वेळी 18 वर पोहोचली आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आईसा), स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसएफ), डेमोक्रॅटिक स्टुडंट फेडरेशन (डीएसएफ), संयुक्त डाव्या युतीत या 4 पक्षांचा समावेश आहे; परंतु ह्या वेळी डाव्यांकडून सरचिटणीस पदावर असलेल्या स्वाती सिंगची उमेदवारी रद्द झाल्याने, डाव्यांनी काँग्रेसधार्जिण्या नॅशनल स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एनएसओआय) आणि बिरसा फुले आंबेडकर स्टुडंट असोसिएशन (बापसा) यांची युती उमेदवार प्रियांशी आर्य हिच्याकडे सगळी मते फिरवली. संपूर्ण निवडणूककाळात ’लाल भगवा एक है’ अशा घोषणा देणार्‍या बापसाचा निळा रंग लाल रंगात जाऊन कसा-कधी मिसळला हे कार्यकर्त्यांनाही कळले नाही.
 

JNU 
 
एकंदरीतच या सगळ्या गणितांची बेरीज ही डाव्यांच्या विजयात झाली. अभाविपचा सूर हा आधीपासूनच विद्यार्थिहिताच्या बाजूने होता. नवीन अकॅडेमिक ब्लॉक, हॉस्टेल सुधारणा, विद्यार्थिनींसाठी सुलभ अशा योजना, नवीन हॉस्टेल निर्माण हे मुद्दे घेऊन अभाविप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आणि म्हणूनच अभाविपला विज्ञान शाखेतून आणि इंजिनीअरिंग विभागातून चांगली मते मिळाली. विज्ञान आणि इंजिनीअरिंगच्या मतपेट्या सुरुवातीला उघडल्याने अभाविप पुढे होती; परंतु मानवता आणि सामाजिक विज्ञानाशी संबंधित विभागांमध्ये शर्जील इमाम आणि ओमर खालिदसारख्या देशद्रोहाचा खटला सुरू असलेल्या माजी विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती निर्माण करण्यात डावे यशस्वी झाल्याने दुसर्‍या मध्यात डावे पुढे गेले. वैचारिक काम ह्या विभागांमध्ये वाढवणे हे आता अभाविप जेएनयूचे पुढचे ध्येय असायला हवे. डाव्यांच्या प्रत्येक विद्यार्थी संघटनेची एक वैचारिक शाखा आहे. निवडणुकीच्या काळात डाव्यांची 5-6 वैचारिक पत्रके मेसमध्ये येत असताना अभाविपचे मात्र एकच पत्रक जात होते. मानवता आणि सामाजिक विज्ञानाशी संबंधित विभागात अभाविप समर्थकांची संख्या वाढवायची असल्यास मोठ्या प्रमाणात वैचारिक आणि बौद्धिक काम वाढवणे गरजेचे आहे. मानवता आणि सामाजिक विज्ञानाचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांची नाडी ही सामाजिक प्रश्न आणि चर्चेत आहे. जेएनयूचा गड जिंकायचा असेल तर स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस आणि स्कूल ऑफ लँग्वेज या डाव्यांच्या वैचारिक मुळावर अभाविपने घाव घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी विविध सामाजिक प्रश्नांवर राष्ट्रीय विचारधारेतून चर्चा घडवून आणणे अतिशय गरजेचे आहे; परंतु ही निवडणूक म्हणजे अभाविपच्या जेएनयूत वाढणार्‍या कार्याचा शंखनाद आहे. येत्या काही वर्षांतच डाव्यांचा भारतातील शेवटचा गड पडल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की.

शांभवी थिटे

सध्या जेएनयू येथे आंतराष्ट्रीय संबंध या विषयात पीएचडी करत आहेत. मागील पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणावर अध्ययन करत असून मध्य आशिया हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय घडामोडी विश्लेषक म्हणून कॉर्पोरेटमध्ये अनुभव. आशियाई राजकारणा सोबतच इतिहास अभ्यासाची विशेष आवड.