शिवरायांचे राजकारण

लेखांक : 14

विवेक मराठी    17-Apr-2024   
Total Views |
हिंदूंच्या राज्यनिर्मितीला जिहादची कट्टरता येणार नाही याकडे शिवरायांचा पूर्ण कटाक्ष होता. त्या कालखंडात शिवरायांना जे राजकारण साधले ते इतर सत्ताधीशांना साधता आले नाही. औरंगजेब धर्मांध होता म्हणून त्याची सत्ता लयास गेली आणि शिवरायांनी ज्या सहनशीलतेचा व सहिष्णुतेच्या राजकारणाचा पाया रचला त्यामुळे हिंदवी स्वराज्य टिकलेच नाही, तर ते साम्राज्यात रूपांतरित झाले. धार्मिक सहिष्णुतेने समाज एकत्र नांदावा याकडे त्यांनी अधिक लक्ष पुरवले.
 

shivaji maharaj 
 
सत्ता हे राजकारणाचे अंतिम ध्येय असले तरी त्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग आणि सत्ता मिळाल्यानंतर तिचा वापर व ती टिकवण्यासाठी अंगीकारलेल्या धोरणांवरच राजकारणाचे यशापयश खर्‍या अर्थाने अवलंबून असते. ’शुक्रनीती’ आणि ’कौटिल्याचे अर्थशास्त्र’ अशा प्राचीन नीतिशास्त्रांमध्ये राजकारण विषयाचा अंतर्भाव आहे. शिवचरित्राचा अभ्यास करताना अशा भारतीय नीतिशास्त्रांचे साधर्म्य आढळणे म्हणजे महाराज त्या विषयांचे जाणकार होते असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्यापाशी असलेल्या शास्त्रीपंडितांकडून असे पूर्वसुरींचे ज्ञान त्यांना प्राप्त झाले असेलही, पण स्वराज्यनिर्मितीसाठी शिवरायांनी जे राजकारण केले, जी नीती अवलंबिली, ती मात्र त्यांच्या स्वतःच्याच चाणाक्ष बुद्धीच्या बळावर अणि अंगभूत गुणांवर यशस्वी झाली.
सुरुवातीच्या काळात सेनाबळ आणि खजिना या दोहोंचे सामर्थ्य कमी असल्यामुळे शिवरायांनी शत्रूवरील मोठ्या मोहिमा किंवा चढाया टाळल्या, संघटनेवर अधिक भर दिला. शहाजीराजांची अनुभवी माणसे त्यांच्याबरोबर होती आणि त्यांचा वरदहस्तही होता; पण 1656 नंतर मात्र ही परिस्थिती पालटली. शहाजीराजांपासून राजकीयदृष्ट्या शिवराय विलग होऊन त्यांनी स्वतंत्र राजकारण विकसित केल्याचे दिसून येते.
 
 
हिंदवी स्वराज्य संस्थापन हेच ध्येय
 
सुमारे तीन शतके या मातीतील माणसे इस्लामी सत्ताधीशांची गुलाम झाली होती. दुर्दैव म्हणजे इथल्या लोकांना गुलामगिरीची सवयच लागली होती, त्यामुळे मनगटांत पराक्रम असला तरी सत्तेविरुद्ध बंड करण्याचे धारिष्ट्यच होत नव्हते. शिवरायांनी गुलामगिरीची ही शृंखला तोडून, लोकांच्या काळजात देशभक्ती पेरून, त्यांना राष्ट्रकार्याला प्रेरित केले, ही त्या काळातील असामान्य घटना होती. ’हिंदवी स्वराज्य’ हेच शिवरायांचे अंतिम राजकीय ध्येय होते. त्याची व्याप्ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून संपूर्ण हिंदुस्तान होता हेही समजून येते. 1673 मध्ये अ‍ॅयबे कॅरे ह्या फ्रेंच प्रवाशाची चौलच्या मराठी अधिकार्‍याशी भेट झाली. या भेटीबद्दल लिहिताना कॅरे म्हणतो की, मी जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल त्याला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की, महाराजांचा मनसुबा सिंधू नदीपासून बंगालपर्यंत आणि खंबायतपासून गंगेपर्यंत सर्व हिंदुस्थानात राज्य स्थापण्याचा आहे. म्हणजेच महाराजांच्या ’हिंदवी स्वराज्य’ या ध्येयाची त्यांच्या मुलखातील सर्व अधिकार्‍यांना स्पष्ट कल्पना होती व त्या लक्ष्यासाठी ते सारे कटिबद्ध होते.
 
 
शिवरायांचे स्वराज्य हिंदूंचे राज्य होते. त्याला सेक्युलॅरिझम या आधुनिक कल्पनेमध्ये बसवणे हे सयुक्तिक होणार नाही. हिंदू स्वभावतःच सहिष्णू आणि सर्वसमावेशक होते. सर्व तात्त्विक विचारांचा नि धार्मिक आचारांचा ते सन्मान करीत होते. कुणाही धर्माकडून आपल्याला भय आहे हे त्यांच्या विचारात नव्हते आणि म्हणूनच ’वसुधैव कुटुंबकम्’ ही त्यांची धारणा होती; परंतु हिंदुस्थानावर आक्रमण करणार्‍या धर्मीयांमध्ये मात्र कट्टरता होती, ज्यामुळे हिंदू राज्ये नष्ट झाली आणि देवधर्माचे प्रचंड नुकसान झाले. शिवरायांचे स्वराज्य हे गतवैभवांकित हिंदू राज्याचे पुनर्प्रतिष्ठापन होते, संस्थापन होते. साहजिकच शिवरायांचे वैर आदिलशाहा आणि मुघल या प्रमुख इस्लामी राज्यांशी होते. ’इस्लामी राज्ये’ ही संज्ञा ह्या सत्ता स्वतःच वापरत होत्या. शिवराय धार्मिक होते; पण धर्मांध नव्हते. म्हणूनच त्यांच्या राजनीतीत इतर धर्मांचा सन्मानही होता आणि त्यांच्या राज्यात सर्वांना धार्मिक स्वातंत्र्यही होते, जे मुघल आणि आदिलशाहीत नव्हते. जसे सैन्यात हिंदू असूनही मुघल व आदिलशाहा यांची राज्ये ’इस्लामी राज्ये’ म्हणून गणली जात होती त्याप्रमाणेच ’स्वराज्य’ हे सैन्यात किंवा नौदलात काही मुस्लीम असतानाही हिंदूंचेच राज्य होते. म्हणूनच शिवरायांच्या राजकारणाचे सूत्र हिंदूंंचे एकत्रीकरण आणि सबळीकरण होते. तसेच एतद्देशीयांचे रक्षणही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. उत्तरकाळात विजापुरातील दखनी आणि पठाण मुस्लीम वादात दखनींकडे सत्ता असावी यासाठी शिवराय आग्रही असल्याचे दिसून येते. छत्रसाल बुंदेलाला औरंगजेबाविरुद्ध बंड करून हिंदूंंचे राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेली प्रेरणा यामागे तोच विचार होता; पण हिंदूंच्या राज्यनिर्मितीला जिहादची कट्टरता येणार नाही याकडे त्यांचा पूर्ण कटाक्ष होता. त्या कालखंडात शिवरायांना जे राजकारण साधले ते इतर सत्ताधीशांना साधता आले नाही याचे एक कारण इतरांची कट्टरताही होती. औरंगजेब धर्मांध होता म्हणून त्याची सत्ता लयास गेली आणि शिवरायांनी ज्या सहनशीलतेचा व सहिष्णुतेच्या राजकारणाचा पाया रचला त्यावर औरंगजेबानंतरही हिंदवी स्वराज्य नुसते टिकलेच नाही, तर ते साम्राज्यात रूपांतरित झाले, हा इतिहास विसरता येत नाही. धार्मिक सहिष्णुतेने समाज एकत्र नांदावा याकडे त्यांनी अधिक लक्ष पुरवले.
 
 
shivaji maharaj
 
सेना आणि प्रशासन
 
 
राज्य स्थापण्यासाठी शिवाजी महाराजांनी लष्कर आणि प्रशासन या दोन्हींची योग्य सांगड घातली. आज जरी या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरी शिवकालातील राजकारणात त्या दोघांचा समन्वय झाला होता. म्हणजेच शिवरायांच्या राजकारणात उत्तम प्रशासक आणि उत्तम सेनानायक या दोन्ही गुणांचे एकत्रीकरण झाले होते. उत्तम सैन्य जसे राज्याचे संरक्षण करून युद्धात जय मिळवते, शत्रूला परास्त करते तसेच उत्तम प्रशासन हे प्रजेचे कल्याण करते, अर्थवृद्धी करून राज्य समृद्ध करते आणि शिस्तबद्ध, भ्रष्टाचारमुक्त कारभार सामाजिक जीवनाला प्रगतिपथावर नेतो हे शिवरायांनी प्रत्यक्ष अमलात आणले. सेना आणि प्रशासन या दोहोंचे महत्त्व शिवरायांच्या लेखी एकसारखे होते, हे दाखवून देणारा एक प्रसंग खूप बोलका आहे. मोरोपंत पिंगळ्यांना मोहिमांवर नियुक्त करण्यात येते, तसेच आपल्याला कारभाराऐवजी मोहिमा दिल्या, तर आपणही आपला पराक्रम सिद्ध करू, गडकोट जिंकू, असे निळोपंतांनी महाराजांना सांगितले. त्या वेळी युद्ध आणि प्रशासन आपण समान मानतो. उत्कृष्ट प्रशासन हे कार्यही मोलाचे आहे व तेच तुम्ही करावे हे शिवरायांनी समजावले. इतकेच नाही, तर मोरोपंतांच्या दर्जाचा मान आणि मोबदला निळोपंतांना देतात, हीच कृती महाराज प्रशासनाला किती महत्त्वपूर्ण मानत ते दाखवते.
 
 
भ्रष्टाचार आणि परस्परांवर कुरघोडी करण्याची वृत्ती महाराजांनी स्वराज्याच्या सेनेत आणि प्रशासनात येऊ दिली नाही. फितुरीला, गुन्ह्यांना सिद्ध झाल्यास तात्काळ शिक्षा आणि पराक्रम, यशस्वी कामगिरीला तात्काळ बक्षीस शिवराय देत. त्यामुळे आपल्या लोकांमध्ये शिस्त आणि पराक्रम वाढीला लावण्यात ते यशस्वी ठरले. मराठ्यांच्या ठायी नीतिमत्ता, एकजूट आणि देशप्रेम निर्माण करण्याचे कसब शिवरायांनी केले जे कुणालाही जमले नाही. लोकांमध्ये सामाजिक समतोल राखून एकसंध भावना निर्माण करण्यासाठी जहागीरदारी, वतनदारीसारख्या प्रलोभनांऐवजी रोख पगारी रयतवारी कार्यपद्धती निर्माण केली. उत्तम प्रशासन ही लष्कराची शक्ती असते, राज्याची बळकटी असते म्हणून जो जो मुलुख शिवरायांनी जिंकला, तिथे सर्वप्रथम योग्य अधिकारी नेमून प्रशासन मजबूत केले. एकाच माणसावर एकाच वेळी लष्करी आणि प्रशासकीय जबाबदार्‍या त्यांनी टाकल्या नाहीत, तर या दोहोंचे यशस्वी पृथक्करण केले आणि राज्यकारभाराचा नवा पाया रचला. लोकांची मने जिंकणे, त्यांना राष्ट्रकार्यात सामील करून घेणे, जबाबदारी देणे आणि ती योग्य पार पाडण्यास प्रवृत्त करणे, ही शिवरायांची नीती विशेष उल्लेखनीय ठरते . पोर्तुगीज प्रवासी आणि शिवरायांचा पहिला विदेशी चरित्रकार ‘कॉस्मे द गार्दा’ लिहितो की, शिवराय आपल्या लोकांशी ज्या मायेने वागत त्यामुळे लोकांचेही महाराजांवर जिवापाड प्रेम होते आणि ते त्यांच्याशी निष्ठावान व प्रामाणिक राहिले. लोक स्वराज्यासाठी प्राणांचीही पर्वा करीत नव्हते, सर्वस्व देत होते, कारण आपल्यामागे राजे आपल्या कुटुंबाला वार्‍यावर सोडणार नाहीत याची त्यांना खात्री होती. शिवरायांच्या नीतिमत्तेची थोरवी त्यांच्या लोकांतही उतरली म्हणूनच ‘प्रजा राजाहून थोर’ झाली.
 
शिवराय आपल्या लोकांशी ज्या मायेने वागत त्यामुळे लोकांचेही महाराजांवर जिवापाड प्रेम होते आणि ते त्यांच्याशी निष्ठावान व प्रामाणिक राहिले. लोक स्वराज्यासाठी प्राणांचीही पर्वा करीत नव्हते, सर्वस्व देत होते, कारण आपल्यामागे राजे आपल्या कुटुंबाला वार्‍यावर सोडणार नाहीत याची त्यांना खात्री होती.

कॉस्मे द गार्दा
(पोर्तुगीज प्रवासी आणि शिवरायांचा पहिला विदेशी चरित्रकार)
 
 शत्रुभेद
 
रणांत आणि राज्यकारभारात मुत्सद्देगिरीचे विशेष महत्त्व आहे हे राजांनी जाणले होते. शत्रूच्या अंतर्गत राजकारणाचा आणि युद्धातील सामर्थ्य व कमतरतांचा शिवरायांचा अभ्यास दांडगा होता. ज्या ठिकाणी शत्रूचे सामर्थ्य जास्त आहे अशा बाबतीत सबुरीचे आणि सलोख्याचे धोरण ठेवले. यात आततायीपणाला शिवरायांकडे थाराच नव्हता; पण शत्रूच्या कमजोर बाजूंचा, अंतर्गत वादांचा अधिकाधिक उपयोग करण्यात त्यांनी एकही संधी दवडली नाही. त्यामुळे आदिलशाही आणि मुघलांच्या अंतर्गत राजकारणाचा त्यांना योग्य फायदा झाला. सिद्दी जौहरच्या बंडात आदिलशाही व्यस्त असताना शिवरायांची त्यांच्या मुलखात चढाई आणि आग्र्याच्या भेटीत औरंगजेबाच्या निकटवर्तीयांना फितवून स्वतःची केलेली सुटका, ही याच अभ्यासाची परिणती होती. इस्लामी सत्तांमध्ये असलेल्या धार्मिक, वांशिक आणि भाषिक भेदाचा, भ्रष्टाचाराचा आणि उपेक्षित घटकांचाही शिवरायांनी अभ्यास केला. या सर्व भेगांना कसे वाढवता येईल व आपल्याला त्याचा फायदा कसा होईल यासाठी त्यांनी प्रभावी राजकारण केले. शत्रूकडील बित्तंबातमी मिळण्यासाठी समृद्ध हेरखातं वाढवलं; पण आपल्या राज्यात मात्र शत्रूला भेद-फितुरी अशा गोष्टी करता येणार नाहीत याची नीट काळजी घेतली. शत्रूची किती तरी माणसे शिवरायांना वश झाली; पण महाराजांचे मुरारबाजी आणि रामजी पांगेरा हे सामान्य सेनानीसुद्धा दिलेरखानसारख्या सेनापतीला आम्ही शिवरायांची माणसे, तुझ्या बादशहाचा कौल घेतो की काय? असे ठणकावून सांगत होती. हा महाराजांच्या राजनीतीतील शिकवणुकीचा आणि आपल्या लोकांत पेरलेल्या स्वराज्यनिष्ठेचा महत्त्वपूर्ण भाग होता.
(क्रमश:)

रविराज पराडकर

 
रविराज पराडकर हे  इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.