झरी गावचा आधुनिक भगीरथ

विवेक मराठी    20-Apr-2024   
Total Views |
zari
परभणी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. गोदावरी, पूर्णा आणि दूधना या नद्यांमुळे इथली भूमी हिरवीगार बनली आहे. शिवाय इथल्या काळ्या कसदार जमिनीला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची साथ लाभली आहे. पांढरीशुभ्र ‘ज्वारी’ही परभणीची खास ओळख आहे. परभणीच्या कृषी व उद्योगविश्वाची ओळख करून देणारी ही खास पुरवणी.
परभणी जिल्ह्यातील झरी गावातील स्वातंत्र्यसैनिक पंडितराव देशमुख व वच्छलाबाई यांच्या पोटी 2 ऑक्टोबर 1955 रोजी कांतरावांचा जन्म झाला. घरी शेतीवाडी व देशमुखी वतन. आईवडिलांच्या संस्कारातून आणि संतविचारांच्या वैचारिक मुशीत कांतरावांची जडणघडण झाली. झरीच्या मातीतली जिद्द व ऊर्जा त्यांची प्रेरणा बनून गेली. पुढे त्यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून कृषी पदवीचे शिक्षण घेऊन स्वतःची शेती करायला सुरुवात केली.
शेतीला फळबागेची जोड
 
पारंपरिक शेती पद्धत ही सोपी पद्धत असली तरी उत्पादनवाढीच्या दृष्टीने या पद्धतीमधून शेतकर्‍यांचे नुकसानच होत आहे. तेच ते पिकाचे उत्पादन घेतले तर शेतकर्‍यांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळत नाही, हा धोका लक्षात घेऊन त्यांनी शेतीतला ‘क्रॉप पॅटर्न’ बदलला. झरीसारख्या दुष्काळजन्य भागात मोसंबीसारखे फळ लागवड करणारे ते पहिले शेतकरी ठरले. पाण्याची उपलब्धता पाहून मोसंबीचे क्षेत्र हळूहळू वाढवीत नेले. नंतरच्या काळात त्यांना राज्य शासनाने ‘कृषिभूषण’ पुरस्काराने गौरविले. त्यांनी आपल्या संपूर्ण शेतीला ठिबक सिंचनाची जोड दिली आहे.
 
vivek 
 
कांतरावांनी गेल्या 35-40 वर्षांपासून मोसंबीची बाग सातत्याने जोपासली आहे. सध्या त्यांच्याकडे 22 एकर मोसंबी, 9 एकर सीताफळ, 9 एकर पेरू, 8 एकर लिंबू अशा एकूण 48 एकरांवर केवळ फळबाग लागवड आहे. मोसंबीपासून दरवर्षी प्रति एकरी चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कांतरावांचा मूळ पिंड हा कृषी व समाजकल्याणाचा. सामाजिक कार्याद्वारे समाजाचा विकास व्हावा, असा त्यांचा ध्यास होता. झरीचे सरपंच झाल्यानंतर त्यांच्या कल्पनेला वाव मिळाला.
ग्रामविकासाची दृष्टी
 
कांतरावांना झरी गावाचे पंचवीस वर्षे सरपंचपद (सन 1978) भूषविण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी झरी गावाचा चौफेर विकास केला. त्यासाठी कांतरावांचा स्वभाव, आत्मविश्वास आणि चारित्र्य ‘झरी’च्या विकासासाठी उपयोगी ठरले. ग्रामीण महिलांच्या प्रतिष्ठेचा विचार करून त्यांनी गावात महिलांसाठी शौचालय बांधण्यासाठी प्राधान्य दिले. 30-35 वर्षांपूर्वी झरी गावात स्वतंत्र महिला शौचालय असलेले परभणी जिल्ह्यातील पहिले गाव ठरले. सतत पंचवीस वर्षे सरपंचपदी राहून लोकांच्या विश्वासाला पात्र राहून त्यांनी सार्वजनिक नळ योजना, लोकसहभागातून दवाखान्याची उभारणी, ‘स्टेट बँक ऑफ हैदराबाद’च्या पहिल्या शाखेची स्थापना, गोबर गॅस प्लँट, सांस्कृतिक कार्यालय, ग्रामपंचायतअंतर्गत 26 गाळ्यांची निर्मिती, कापूस फेडरेशनच्या निर्मितीतून झरीचा सर्वांगीण विकास घडवून आणला. वीस हजार लोकसंख्या असलेल्या झरी गावाचा चेहरामोहरा बदलला आणि सुधारणाच्या बाबतीत त्यांनी ‘झरी’ला तिसर्‍या क्रमांकावर आणले. 1997-98 साली ग्रामसुधारणा योजनेंतर्गत झरी ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. कांतरावांच्या विकासकार्यामुळे झरी ग्रामपंचायत ही महाराष्ट्रात तिसरी, मराठवाड्यात प्रथम क्रमांकाची ग्रामपंचायत ठरली होती. यामध्ये कांतरावांच्या ग्रामविकासाच्या दूरदृष्टीचा महत्त्वाचा वाटा होता.
 
vivek 
 
झरीतील जलक्रांती
 
कांतरावांनी जलसिंचनाच्या संदर्भात केलेले कार्य अद्वितीय व चिरंतन आहे. ज्या वेळी जलयुक्त शिवारसारख्या योजना शेतकर्‍याच्या बांधावर नव्हत्या तेव्हा कांतरावांनी 1989 साली आपल्या शेतात जलप्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला. 82 फूट खोलीची विहीर खोदून तिचे पुनर्भरण केले, परिणामी पाणीपातळी वाढली. याद्वारे आजही फळबागेला पाणीपुरवठा केला जातो. जलपुनर्भरणाचा हा प्रयोग पाहण्यासाठी विविध भागांतील शेतकरी येत असतात.
 
 
2014-15 साली परभणी जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला होता. झरी परिसरातील गावामध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष होते. पाचशे-हजार फूट बोअरवेल घेतले तरी पाण्याचा पत्ता लागत नव्हता. तेव्हा कांतरावांसमोर 1989 सालचा स्वतःच्या शेतीत विहिरीच्या पुनर्भरणाचा केलेला प्रयोग डोळ्यासमोर उभा राहिला. त्यानंतर कांतरावांनी गावाला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला. शासन, नाम फाऊंडेशन व लोकसहभाग यांच्या मदतीने 1975 साली बांधण्यात आलेल्या दूधना नदीवरील कोल्हापुरी बंधार्‍याची दुरुस्ती करून घेतली. गावशिवारातील सर्व ओढ्यांचे खोलीकरण केले. लेंडी नावाच्या मोठ्या ओढ्याचे 40 फूट खोल, 120 फूट रुंंद व 9 किलोमीटर लांब असे काम करून त्याला नदीचे स्वरूप प्राप्त करून दिले. परिणामी, झरीतील भूजल पातळी वीस फुटांवर आली. यामुळे माता-भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरला आहे. पिकांना मुबलक पाणी मिळत आहे.
 
vivek 
 
सुंदर स्मशानभूमीची संकल्पना
 
झरी हे परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव. या गावात विविध जाती-धर्मांच्या स्मशानभूमी आहेत. यातील अनेक स्मशानभूमी गैरसोयीच्या विळख्यात सापडल्या होत्या. त्यामुळे मरणानंतरही येथे माणसाची छळातून सुटका होत नसल्याचे चित्र दोन दशकांपूर्वी कांतरावांच्या नजरेस पडले. मृतदेहाची होणारी अवहेलना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. त्यानंतर गावात ‘स्वच्छ स्मशानभूमी’ असावी, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी त्यांनी 2001 साली गावापासून एक किलोमीटर अंतरावरील नदीजवळ स्वतः एक एकर जमीन विकत घेऊन त्यास मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम नाव दिले. या स्मशानभूमीत गावातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांचे अंत्यविधी केले जातात. जिल्हा परिषदेच्या निधीतून स्मशानभूमीला संरक्षक भिंत व अंत्यसंस्कारासाठी मोठ्या शेडचे बांधकाम केले. भौतिक सुविधा, संरक्षक भिंतीवर उद्बोधक घोषवाक्ये पाहायला मिळतात, याखेरीज ‘ऑक्सिजन पार्क’ची उभारणी केल्यामुळे स्मशानभूमी ‘पर्यटना’चे केंद्र बनले आहे. सेवासुविधा व भौतिक विकास लक्षात घेऊन 2022 साली या स्मशानभूमीला ‘आय.एस.ओ.’ मानांकन मिळाले. असे मानांकन मिळणारी ही महाराष्ट्रातील पहिली स्मशानभूमी ठरली. या स्मशानभूमीला भेट देण्यासाठी शाळांच्या सहली येत असतात. हे कार्य करत असताना कांतरावांना ‘एक गाव - एक स्मशानभूमी’ ही कल्पना सुचली. 2002 साली सुरू केलेली ही चळवळ आता लोकचळवळ झाली आहे. या माध्यमातून सुमारे शंभर गावांत सुंदर स्मशानभूमी तयार झाल्या आहेत.
 

zari 
 
 
जांभूळबेट संवर्धनासाठी पुढाकार
 
परभणी जिल्ह्याचे भूषण असलेले पालम तालुक्यातील ‘जांभूळबेट’ हे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी कांतरावांनी मोठे कार्य हाती घेतले आहे. त्यासाठी शासनाकडे जांभूळबेट संवर्धन निधी मिळण्यासंदर्भात पुढाकार घेऊन प्रस्ताव पाठवला आहे. याशिवाय जांभूळ बेट महोत्सव, श्रमदान, वृक्षारोपण आणि कवी संमेलनासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
 
विविध देशांचा प्रवास
 
कांतरावांना विविध देशांतील शेती व समाजजीवन समजून घेण्याची आवड आहे. इस्रायल, तुर्कस्तान, मलेशिया, मालदीव, दुबई, रशिया, सिंगापूर, श्रीलंका, भूतान आदी देशांत त्यांनी प्रवास केला आहे. कांतराव इस्रायलमध्ये दहा दिवस राहिले. त्या काळात त्यांनी तेथील अपुर्‍या पाण्यावर आधुनिक तंत्राद्वारे कशी उत्तम शेती केली जाते आणि समुद्राच्या पाण्याचे रूपांतर पिण्यायोग्य पाण्यात करणारी यंत्रे आणि तंत्र बारकाईने समजून घेतले. शिवाय भूतान दौर्‍यातून तेथील आनंदीमय जीवन त्यांनी समजून घेतले.
1988 साली राज्य शासनाने त्यांना ‘शेतीनिष्ठ’ शेतकरी पुरस्काराने गौरवांकित केले, तर 2012 साली शासनाचा ‘कृषिभूषण’ पुरस्कार मिळाला. 2016 साली ‘मराठवाडा भूषण’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. याव्यतिरिक्त कांतरावांना त्यांच्या ग्रामसुधारणा आणि कृषी क्षेत्रातील कामगिरीसाठी राज्यपाल, राज्य आणि केंद्र शासनाकडून तीन सुवर्णपदके देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला आहे.
 
 
ग्रामीण मातीच्या संस्कारातून, समाजाची बांधिलकी बाळगून झरी गावाच्या विकासात मोलाची भर घालणार्‍या या आधुनिक भगीरथाची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.