भटकती आत्मा

- भावड्याची चावडी

विवेक मराठी    02-May-2024   
Total Views |
सेवटी दाढी बोल्ला. “काळजी नगा करू. मांत्रिक बलिवलाय..!” देव्या, दाढी आनि दाद्या येकमेकांकं पाहून हासले. पब्लिकबी हासाया लागली. संज्या बावळटावानी बगत र्‍हायल्याला बगून शाजी बाप्पूणं त्येला शेठच्या भाश्नाचा हिडीयो दाकवला..! संज्या त्यो ‘भटकती आत्मा’वाला हिडीयो बगत अस्तानीच देव्या पब्लिकला म्हन्ला, “या आसल्या भटकत्या आत्म्यांसाटी इवीयम नावाचा मांत्रिक बलिवला हाये. जाऊन योग्य त्ये बटन दाबा आनि भटकत्या आत्म्यांपासनं मुक्ती मिळवा..!” पब्लिकनं टाळ्या हानल्या तरीबी संज्या बावळटावानी पाहात र्‍हायला..! vivek
अर्कचित्र - अमोघ वझे
संज्या झाडू मारत मारत सैपाकघरात आला तसा यकदम थबकला. समुरच्या ताटाळ्यातली यक बारकी ताटली आपाप हावेत उडली आनि गर्रकनी वळून पुन्ना ताटाळ्यात जाऊन पल्डी. संज्याचा ड्वोळ्यावं इस्वासच बसेणा. त्येनं ड्वोळे चारचारदा चोळले. सोत्तालाच चिंगूटा काडून पाह्यला. आपन सुद्दीत हाये ह्ये कळेकळेपत्तूर मानेवं कोनी तरी खबुद्राचं पीस फिरवत आसल्यावानी भास संज्याला जाला. संज्याला घाम फुटला. म्हागं कोन हाय त्ये बगायची त्येची हिम्मतच हुईणा. धीर येकवटून त्येनं म्हागं पाह्यलं तं म्हागं कुनीच नवतं. पाटकिनी खुली लोटावी आनि कल्टी हानावी म्हनून संज्याणं झाडू माराय घेटला तशी येक क्येसांची गुंतवळ कुटून तरी झाडूच्या समूर यून पल्डी. संज्या जसा झाडू हलवंन तशी हालायची. संज्यानं झाडूखाली घ्यावी म्हन्लं, पन झाडू हावेत ग्येला का गुंतवळबी हावेत. झाडू ट्येकला का पुन्नी फरशीवं आसला ख्येळ चाल्ल्याला. संज्याचं डोकं बधिर झाल्तं. सेवटी घाबरूण संज्या झाडू तितंच टाकून भाईर आला. तितं सुप्रीचा बाप वर्‍हांड्यात खुर्ची टाकूण रेडूवं जुनी गानी आयकत बसल्याला. संज्या हाळूच माजघरात शिरनार यवड्यात सुप्रीच्या बापाणं वळून त्येच्याकं बगिटलं. येका शेकंदासाटी सुप्रीच्या बापाचे डोळे भुताच्या शिरीएलमदी दाकवत्यात तसले निळे-पिवळे दिसले. दुसर्‍या शेकंदाला परत नॉर्मल..! संज्या वर्‍हांड्यातनं थोडा लांबनंच माजघरात शिराय लागला तवा परत सुप्रीच्या बापाणं त्येच्याकं बगिटलं. पुन्ना संज्याला सेम टू सेम वाटलं. आपल्याला आज आसं का हुतंय त्ये संज्याला कळंनाच. मान खाली घालून संज्या माजघरात जानार यवड्यात सुप्रीच्या बापासमुरच्या रेडूतून इचित्र आवाज आला. संज्यानं घाबरूण म्हागं वळून पाह्यलं तं सुप्रीचा बाप रेडून आयकू येनार्‍या गान्यावं येंजॉय करीत हुता. आवाज तं सुप्रीच्या बापाचाच हुता. संज्या हाय तितनंच वराडला, “सायेब, माला काई बोल्लात..?” सुप्रीच्या बापाणं पुन्ना वळून पाह्यलं तं पुन्ना निळे-पिवळे ड्वोळे..! संज्या ज्याम घाबारला. घाम पुसंस्तवर पुन्ना नॉर्मल..! भानगड काय हाय संज्याला कळंनाच. जिवावं ब्येतन्याआदुगर हितनं निगावं म्हनून संज्या वळला तसा पुन्ना त्यो इचित्र आवाज आला. संज्याणं म्हागं वळूनबी न बगता धूम ठोकली. जरा आंतरावं जाऊण सुप्रीच्या घराकं पाह्यलं तं आख्खं घरच्या घर हावेत तरंगतानी दिसलं..! संज्या थ्येट मारुतीच्या देवळाकं धावला. भीतीनं त्येची यवडी गाळन उडाल्याली की बास. त्येला भीमरूपी यैना का हानुमान चालीसा यैना. म्हनू तं काय म्हनू म्हंजी भीती जाईन ह्ये कळंना. त्यो निस्ताच मारुतीकं पाहात घंटेखाली हुबा र्‍हायला हुता. येकाणं यून जोरात घंटा वाजवली तसा दचकून भानावं आला. मागनं त्येला कुनी तरी हाळी घालीत हुता. पन संज्याची म्हागं वळून पाह्यची हिम्मतच हुईना. सेवटी द्येवळात आलेल्या येका मानसानं हाटकून संज्याला म्हागं वळवलं तवा हातात दगूड घेटल्याला शाजी बाप्पू संज्याला दिसला.. “काय बाप्पू काय म्हन्ता..?” संज्यानं उसनं आवसान आनून उत्तर धिलं. हा शाजी बाप्पू तरी शाजी बाप्पू हाय का ह्येची खातरजमा करावी म्हनून संज्या शाजी बाप्पूकं आला आनि त्येच्या हाताला हात लावला. त्येचं हात लावनं शाजी बाप्पूला काय तरी येगळंच वाटल्यानं त्येनं संज्याच्या थोतरीत हान्ली. ती यवडी जोरात बसली का संज्याला घेरीच आली आनि संज्या शाजी बाप्पूच्या फुड्यात मातीत कोसळला. देव्या, दाढी, दाद्या आनि पब्लिक जमा जालं. संज्या कशानंच सुद्दीवं यीना तवा देव्यानं येकाला कानात काय तरी सांगून पाटवलं. पाच मिंटात येकजन दोन हातांत दोन जोडे घिऊन आला आन् संज्याला हुंगवले. येक जोडा रश्मिआक्काचा हुता आन् दुसरा सुप्रीच्या बापाचा. देव्याचा उपाय नामी ठरला आन् संज्या त्ताडकनी उठून बसला. पब्लिक आपल्याकं आशी का पाहती त्ये संज्याला कळंनाच. “ह्यो आजून येक घावला. काय तरी करावं लागतंय राव..!” सेवटी दाढी बोल्ला. “काळजी नगा करू. मांत्रिक बलिवलाय..!” देव्या, दाढी आनि दाद्या येकमेकांकं पाहून हासले. पब्लिकबी हासाया लागली. संज्या बावळटावानी बगत र्‍हायल्याला बगून शाजी बाप्पूणं त्येला शेठच्या भाश्नाचा हिडीयो दाकवला..! संज्या त्यो ‘भटकती आत्मा’वाला हिडीयो बगत अस्तानीच देव्या पब्लिकला म्हन्ला, “या आसल्या भटकत्या आत्म्यांसाटी इवीयम नावाचा मांत्रिक बलिवला हाये. जाऊन योग्य त्ये बटन दाबा आनि भटकत्या आत्म्यांपासनं मुक्ती मिळवा..!” पब्लिकनं टाळ्या हानल्या तरीबी संज्या बावळटावानी पाहात र्‍हायला..!

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.