@डॉ. अविनाश भोंडवे
‘कोल्डरिफ कफ सिरप’ या खोकल्याच्या औषधामुळे मध्यप्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या 14 बालकांचा मृत्यू झाला. या वैद्यकीय शोकांतिकेमुळे औषधनिर्मितीतील गुणवत्ता नियंत्रणाबाबतची ढिलाई, नियामक यंत्रणांची अकार्यक्षमता, औषध निर्मिती कारखान्यांमधील बेबंद प्रवृती आणि पालकांच्या जागरूकतेबाबत गंभीर प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या दुर्घटनेमधून सर्दी-खोकल्यासाठी सर्वसामान्यपणे वापरल्या जाणार्या औषधांची गुणवत्ता योग्यरित्या राखली गेली नाही, तर त्यामुळे केवढा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे.
नेमकं काय घडलं?
कोल्डरिफ हे खोकल्याचे औषध तमिळनाडूतील ‘श्री सन फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी बनवते. या कंपनीतून मे 2025 मध्ये या औषधाची एसआर-13बॅच वितरित करण्यात आली होती. या बॅचमधील औषधांमध्ये डायथिलीन ग्लाइकॉल (DEG) हे अत्यंत विषारी गुणधर्म असलेले रासायनिक द्रवपदार्थ आढळले. या बॅचचे नमुने गुणवत्तेच्या कसोटीत अवैध म्हणून घोषित करण्यात आले.
मानवांमध्ये डायथिलीन ग्लाइकॉल (DEG) चा घातक डोस 0.5 ते 1.0 ग्रॅम/किलोग्रॅम इतका असतो. परंतु, 0.014ग्रॅम/किलोग्रॅम इतक्या कमी डोसमध्येही विषबाधा होऊ शकते. दुर्दैवाने कोल्डरिफच्या या बॅचमध्ये डीईजीचे प्रमाण तब्बल 48.6ग्रॅम/किलोग्रॅम इतके आढळले. ते मानवी शरीरासाठी कमालीचे घातक ठरावे, इतक्या जास्त प्रमाणात होते.
कोल्डरिफ सिरपची ही बॅच मध्यप्रदेशमध्ये वितरित झाली. तेथील डॉक्टरांनी हे औषध पाच वर्षांखालील मुलांना दिल्यावर, त्या मुलांमध्ये लघवी बंद होणे, उलटी, पोटदुखी, भ्रमिष्ट होणे अशी लक्षणे दिसून आली आणि केवळ 2 ते 3 दिवसांच्या कालावधीत, त्यांच्या यकृत, मूत्रपिंडे तसेच मेंदूवर अतिशय गंभीर दुष्परिणाम झाल्याचे आढळले.
औषधनिर्मितीतील प्राणघातक त्रुटी
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या या दुर्घटनेच्या चौकशीमध्ये, अनेक स्तरांवरील त्रुटी आढळल्या.
कच्च्या मालाची निवड
औषधनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा प्रॉपिलिन ग्लायकॉल हा घटक फार्मास्युटिकल दर्जाच्या मान्यताप्राप्त पुरवठादारांकडून न मागवता, रंग आणि रसायन उद्योगातील पुरवठादारांकडून घेतला गेला. त्याशिवाय औषध निर्मितीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या कच्च्या मालातील घटकांची शुद्धता तपासली गेली नाही, त्यामुळे या औषधात डायथिलीन ग्लाइकॉल आणि इथिलीन ग्लाइकॉलसारख्या विषारी घटकांचा समावेश झाला.
उत्पादन प्रक्रियेत गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव
: उत्पादन केंद्रात स्वच्छता, उपकरणांची स्थिती, प्रशिक्षित रसायनतज्ज्ञांची उपस्थिती आणि सुरक्षितता उपाय यांचा अभाव होता. पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा स्वच्छ स्रोत वापरण्यात आलेला नव्हता.
नियामक यंत्रणांचे दुर्लक्ष
: औषध बाजारात येण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणी, प्रमाणपत्र, वितरण नियंत्रण आणि विक्रीनंतरचे परीक्षण याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले होते.
डीईजी आणि ईजी
: कोल्डरिफमध्ये आढळलेली डायथिलीन ग्लाइकॉल आणि इथिलिन ग्लाइकॉल ही दोन्ही रसायने औद्योगिक वापरासाठीच वापरली जातात. त्यांचा वापर अँटीफ्रिझ, प्लास्टिक्स, रेझिन्स, ब्रेकफ्लुइड्स आणि द्रावक म्हणून होतो. गोडसर चव असलेले हे दोन्ही द्रव पदार्थ, औषधांमध्ये जाणूनबुजून किंवा अजाणता मिसळले गेले, तरी ते वरवर पाहिल्यास सहजासहजी लक्षात येत नाहीत.
औषध उद्योगात, औषधे बनवल्यावर ती व्यवस्थितपणे एकत्र मिसळावीत, त्यांचे मिश्रण स्थिर राहावे यासाठी औषधांबरोबर ग्लिसरिन किंवा प्रॉपिलीन ग्लाइकॉलही प्रमाणित अॅडिटिव्हज द्रावक म्हणून वापरली जातात. या प्रकरणात औषधातल्या घटकांची शुद्धता तपासली गेली नसल्याने, ग्लिसरिन किंवा प्रॉपिलीन ग्लाइकॉलऐवजी, डीईजी तसेच ईजी मिसळले गेल्याचे लक्षात आले नाही. त्याची परिणिती पुढच्या दुर्घटनांमध्ये झाली.
विषारी दुष्परिणाम
या औषधांबरोबर डीईजी तसेच ईजी तोंडावाटे प्राशन केल्यावर ते घशातून, अन्ननलिकेत आणि मग जठरात जाते. तिथून ते लहान आतड्यात गेल्यावर त्याचे अभिशोषण होऊन ते रक्तात मिसळले जाते. शरीराच्या रक्ताभिसरण क्रियेद्वारे ते सर्व शरीरात पसरते, तसेच ते यकृतातही पोहोचते.
तिथे यकृतामधील एडीएच (अल्कोहोल डीहायड्रोजीनेज) या पाचकरसाद्वारे त्यांचे विघटन होते. या विघटनातून ऑक्झॅलिक अॅसिड आणि ग्लाइकॉलिक अॅसिड ही बाधक आणि विषारी रसायने निर्माण होतात. हे रासायनिक घटक मूत्रपिंडातील सूक्ष्म नलिकांना इजा पोचवतात. तसेच मूत्रपिंडात दूषित पदार्थ गाळून त्याचे शरीराबाहेर मूत्ररूपात उत्सर्जन करणार्या ग्लोमेरुलर फिल्टर्स या सूक्ष्म गाळणीसारख्या विभागाची छिद्रे बंद होतात, त्याबरोबरच मूत्रपिंडाच्या पेशीही नष्ट होतात. ही मूत्रपिंडे पूर्ण निकामी झाल्याची (अॅक्युट रीनल फेल्युअर) चिन्हे असतात.
औषध घेतल्यानंतर किती वेळात कोणते दुष्परिणाम?
6-12 तास - उलटी, पोटदुखी, गुंगी, श्वास घेण्यास त्रास होणे.
12-24 तास - मेटाबॉलिक अॅसिडोसिस, भ्रम, झटके येणे.
24-72 तास - किडनी निकामी होणे, मूत्रनिर्मिती बंद होणे.
उपचार - या औषधाने होणार्या विषबाधेच्या उपचारात फोमीपिझोल किंवा इथेनॉल वापरून एडीएच एन्झाइमची निर्मिती रोखली जाते आणि डायलिसिसद्वारे विषारी घटक बाहेर काढले जातात. त्याच सोबत ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर, सलाईन, इंजेक्शनस या द्वारे रुग्णाला आवश्यक ती सहाय्यक काळजी घ्यावी लागते.
औषध निर्मितीतील कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी
औषधनिर्मितीमध्ये डीईजी किंवा इजी वापरणे पूर्णपणे, चुकीचे, बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. फक्त सुरक्षित औषध म्हणून प्रमाणित असलेले ग्लिसरीन किंवा प्रॉपिलिन ग्लाइकॉल (युएसपी)वापरणे बंधनकारक आहे.
प्रत्येक बॅचचे परीक्षण करणे, नियामक यंत्रणांनी नियमित तपासणी करणे, आणि कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी रसायन न बदलणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या घटनेची जबाबदारी, या औषधाची निर्मिती करणार्या उद्योजकाप्रमाणेच त्या चाचण्या न करता, त्यांना त्या बॅचच्या वितरणाची परवानगी देणार्या प्रशासकीय विभागाचीही आहे, हे निश्चित.
लहान मुलांना औषधे देताना घ्यावयाची काळजी
पालकांनी लहान मुलांना औषध देताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात-
* डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषध द्यावे. स्वतः निर्णय घेऊ नये.
* मुलाचे वय, वजन, आणि आजारानुसार औषधांचे डोसेजेस ठरलेले असतात. त्यामुळे अंदाजे पाव चमचा, अर्धा चमचा असे डोस ठरवू नयेत.
* नवे आजार किंवा नवीन वजनानुसार डोस वेगळा असतो.
* प्रौढांसाठी असलेली औषधे किंवा घरात असलेली इतर औषधे मुलांना देऊ नयेत.
* साधी सर्दी किंवा खोकला असला तरी डॉक्टरांनी सांगितलेलेच औषध त्यांनी सांगितलेल्या प्रमाणात आणि सांगितले आहेत, तेवढेच दिवस द्यावे.
* औषधाचा डोस नेहमी औषधाच्या बाटलीसोबत असलेल्या औषध मोजण्याच्या मापाने किंवा ड्रॉपर, सिरींजनेच द्यावा, चमच्याने देऊ नये.
* औषध विकत घेताना बाटलीवरील नाव, कंपनी, बॅच नंबर आणि एक्स्पायरी डेट तपासावी
* पातळ औषध वापरण्यापूर्वी बाटली हलवून घ्यावी. औषधे थंड, कोरड्या जागी ठेवावीत. दोन औषधे एकत्र देताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दोन वर्षांखालील मुलांना, जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत, तोपर्यंत खोकल्याची औषधे देऊ नयेत.
* काही औषधे जेवणाआधी, काही जेवणानंतर द्यायची असतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या या वेळा पाळाव्यात. औषध द्यायचे विसरल्यास दुप्पट डोस देऊ नये. बाटलीचे झाकण उघडल्यानंतर सिरप जास्त काळ ठेवू नये. बहुतेक सिरप 1 महिन्यांपर्यंतच टिकतात.
* बाटली उघडताना वास, रंग किंवा दाटपणा बदललेला वाटल्यास वापर थांबवावा.
काही औषधे, उदाहरणार्थ- अँटिबायोटिक ड्राय सिरप, फ्रिजमध्ये ठेवणे आवश्यक असते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा लेबलवर लिहिल्यानुसार फ्रीजमध्ये औषध ठेवावे.
* औषधे मुलांच्या हातात सहज पोहोचणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावीत.
* औषध घेतल्यानंतर अतिशय झोप येणे, अंगावर पुरळ उठणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलटी होणे, लघवीला कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांकडे जावे.
* औषध संपल्यावर बाटली स्वच्छ करून फेकून द्यावी.जुनी औषधे परत वापरू नयेत.
सर्दी-खोकल्यावर औषधांची गरज असते का?
बहुतेक वेळा सर्दी-खोकला विषाणूजन्य संसर्गाने होतो आणि औषधांशिवाय बरा होतो. ताप कमी असेल, नाक वाहत असेल आणि मुलाची भूक-झोप व्यवस्थित असेल, तर औषधांची गरजही नसते.
दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देणे धोकादायक असते. जागतिक आरोग्य संघटना, तसेच इंडियन अॅकडमी ऑफ पेडिअट्रिक्स या दोन्ही संस्थांनी हे पूर्वीच जाहीर केले आहे. याचे कारण या वयोगटातील मुलांचे मेंदूतील श्वसनकेंद्र अत्यंत संवेदनशील असते. औषधांच्या अगदी कमी डोसनेही त्यांचा श्वासोच्छ्वास मंद होऊन मृत्यू होऊ शकतो.
दोन वर्षापेक्षा मोठ्या मुलांमध्ये खोकल्याच्या औषधाचा प्रकार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरावा. खोकल्याच्या औषधाचे तीन मुख्य प्रकार असतात.
अँटिहिस्टामिनिक्स- यात घशात खवखव होऊन साधा ठसका येत असतो.
कफ सप्रेसंट्स - सतत येणार्या कोरड्या खोकल्याची उबळ थांबवण्यासाठी हे वापरतात
ब्रॉन्कोडायलेटर्स किंवा एक्सपेक्टोरंट्स- छाती भरलेली असल्यास, खोकल्यासोबत बेडका पडत असल्यास, अस्थमा असल्यास, छातीतून आवाज येत असल्यास
मात्र यामध्येही डोस हा वयानुसार ठरवला जातो.
पालकांनी अँटिबायोटिक्स किंवा स्टिरॉइडस असलेली औषधे स्वतःहून मुळीच चालू करू नयेत.
मुलांच्या सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय
* कोमट पाणी, द्रव पदार्थ जास्त देणे.
* सलाईन नेझल ड्रॉप्स वापरणे.
* हलकी गरम वाफ देणे.
* छाती, पोट कपाळ हलकेच शेकणे.
* थंड वार्यापासून, पंख्याच्या किंवा एसीच्या झोतांपासून दूर ठेवणे. खोली उबदार ठेवणे.
* अंगात लोकरीचे कपडे, पायात मोजे घालणे.
* व्यवस्थित आहार देणे.
* औषधांची गरज फक्त ताप जास्त असेल, श्वास घेण्यास त्रास असेल, किंवा खोकला दीर्घकाळ टिकत असेल तरच असते.
औषधांच्या गुणवत्तेचे नियंत्रण
कोल्डरिफ सिरप ही दुर्घटना म्हणजे भारताच्या आरोग्य व्यवस्थेला एक धोक्याचा संकेत आहे. औषधनिर्मितीतल्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण आणि नियामक यंत्रणांची दक्षता काटेकोरपणे पाळली जाण्याची गरज आहे. लहान मुलांना औषधे देताना पालकांनीही सजग राहण्याची आवश्यकता आहे.
केवळ औषध देणे, म्हणजे आजाराचा उपचार नसतो. कोणतेही औषध, जेव्हा आवश्यक असते, तेव्हाच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात, योग्य वेळेस आणि योग्य मार्गाने दिले गेले, तरच तो उपचार असतो. अन्यथा ते घातक ठरू शकते.