@रवि वाळेकर
जगन्नाथाची ‘रथयात्रा’ ओडिशातील सर्वात मोठा सण आहे, पर्वणी आहे, उत्सव आहे, महोत्सव आहे. मात्र या रथयात्रेला केवळ एक उत्सव म्हणून पाहणे म्हणजे या भव्य परंपरेचा आत्मा न समजल्यासारखे आहे. ही यात्रा म्हणजे अनेक शतके जुन्या परंपरा, गहन श्रद्धा आणि मानवी भावनांचा संगम आहे. दरवर्षी, जेव्हा जगन्नाथाचे रथ पुरीच्या रस्त्यांवरून पुढे सरकतात, तेव्हा केवळ तीन लाकडी रथ पुढे जात नाहीत, तर त्यासोबत ओडिशाची समृद्ध संस्कृती आणि लोकांचे जगन्नाथावरील उत्कट प्रेमही पुढे सरकत असते. रथयात्रेच्या माध्यमातून महाप्रभू वर्षातून एकदा मंदिराबाहेर येतात आणि सार्या भक्तांना दर्शन देतात! देव आपल्यातील आणि भक्तांमधील अंतर कमी करतो.
ही वेळा माणसे ओळखण्यात आपली चूक होते. तशीच गत एखादी जागा, स्थळ, शहर ओळखण्यातही होते. काही अनोळखी, जागा आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देतात तर काही निराशा करतात. फार कौतुक ऐकून गेलेली काही ठिकाणे ‘नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा’ या प्रकारची सापडतात, तर काही ठिकाणे अनपेक्षित प्रसन्न, तरल अनुभव देतात.
ओडिशा राज्याने मला असाच प्रसन्न अनुभव दिला! ओडिशा राज्याबद्दल मला जास्त माहिती नव्हती. दोनच स्थळे ऐकिवात होती. एक म्हणजे कोणार्क मंदिर आणि दुसरे जगन्नाथ पुरी! प्रत्यक्ष राहायला गेल्यानंतर बर्याच नव्या गोष्टी समजल्या, नवी स्थळे समजली, इथले पारंपरिक रितीरिवाज समजले, काही आगळ्या हिंदू सणांविषयी समजले पण सर्वात अनोखे समजले ते जगन्नाथाच्या यात्रेविषयी.
मोठे लोभसवाणे राज्य आहे हे! ज्याच्याकडून शून्य अपेक्षा आहेत अशा एखाद्या पोरसवदा अनोळखी गायकाने सूर धरावा आणि काही वेळातच मैफिलीला अवाक करावे, संमोहित करावे, तसे ओडिशा आपल्याला संमोहित करते!
प्रतिदिनी काही तरी नवेच समजते, आणि आपण दिवसेंदिवस ओडिशाच्या प्रेमात पडू लागतो! इथे काय नाही?
स्वच्छ असे समुद्रकिनारे आहेत, उच्च दर्जाचे रस्ते आहेत, घनदाट जंगले आहेत, प्रचंड पर्वतराजी आहे, टुमदार शहरे आहेत, हजारो पर्यटन स्थळे आहेत, लोखंडाच्या तसेच कोळशाच्या महाप्रचंड खाणी आहेत, मोठमोठ्या नद्या आहेत, तळी आहेत, मुख्य म्हणजे असंख्य पुरातन मंदिरे आहेत. संपूर्ण ओडिशात आजमितीस सात हजारांहून जास्त मंदिरे आहेत! मोजदाद अवघड, कारण नवनवीन मंदिरे बांधण्याचे काम गावोगावी अव्याहत चालूच असते! राजधानी असलेल्या एकट्या भुवनेश्वर शहरातील मंदिरांची संख्या जाते पाचशेच्या वर! मोठी भाविक लोक आहेत इथली. जंगलाच्या खूप अंतर्भागात असलेल्या एखाद्या पडक्या, निर्मनुष्य दगडी मंदिरातही दिवा लावलेला दिसतोच!
ओडिशाभर वेगवेगळ्या देवांची मंदिरे आहेत, अगदी ऋषीमुनींचीही! सर्वात अचंबित करते ते महर्षी व्यासांचे मंदिर! महर्षी व्यासांनी ओडिशातील आताच्या रौरकेला जिल्ह्यातील एका स्थानी ‘महाभारत’ सांगितले आणि गणपतीने लिहिले, अशी आख्यायिका आहे. या स्थानी महर्षी व्यास मुनींचे ‘वेदव्यास’ नावाचे मंदिर आहे! आपल्याला नावे सुद्धा माहिती नसलेल्या असंख्य देवतांची मंदिरे आहेत. देवांची आहेत, देवींची आहेत, पण सर्वात जास्त मंदिरे आहेत ती भगवान जगन्नाथाची! हे राज्यच जगन्नाथाचे आहे! जगन्नाथ संपूर्ण राज्याचा आहे!
ओडिशी नागरिकांच्या जीवनात जगन्नाथाचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. सर्वात उच्च! जगन्नाथाला येथे केवळ देव मानले जात नाही, तर जगन्नाथ इथल्या जनतेचा मित्र, पालक आणि संरक्षक मानला जातो! ओडिशातील जगन्नाथाला मानवासारख्या भावना आहेत. तो रागावतो, रुसतो, बायकोशी (लक्ष्मीशी) भांडतो, तिची मनधरणी करतो! त्याला थंडी वाजते, तो आजारी पडतो, राजवैद्याने दिलेली कडू औषधे पितो, दरवर्षी चौदा दिवस कोणाला न भेटता गपगुमान घरातच दडी मारतो! ओडिशाचा जगन्नाथ बायकोची नजर चुकवून सहलीला जातो! संपूर्ण जगाचा नाथ असलेला जगन्नाथ आवडत्या मावशीच्या हातचा आवडता खाऊ मिळावा म्हणून मावशीच्या घरी मुक्कामही ठोकतो!
अशा असंख्य कहाण्या इथे जगन्नाथाभोवती गुंफलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाचे धडधडणारे जिवंत हृदय आजही या मूर्तीत आहे, यावर येथे प्रचंड श्रद्धा आहे. यामुळेच दर 12 किंवा 14 वर्षांनी जगन्नाथाची (लाकडी असलेली) मूर्ती बदलतात, तेव्हा संपूर्ण पुरी शहरात अंधार करून, पुजार्याचे डोळे बांधून ते हृदय नवीन मूर्तीत ठेवले जाते! (या दिवशी संपूर्ण पुरी शहराचा वीजपुरवठा खंडित केला जातो!)
जगन्नाथाचा रथ लाकडी सांधे आणि दोर्यांनी जोडलेला असतो, हे विशेष.
पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र सोडून ओडिशात राहायला आलो, तेव्हा यातले काहीच मला ठाऊक नव्हते. जगन्नाथाच्या रथयात्रेबद्दल, वर्षातून एकदा जगन्नाथाची मूर्ती मंदिराबाहेर काढून वाजत गाजत मिरवणूक काढतात आणि परत मंदिरात ठेवतात, एवढेच मला माहिती होते. मी किती चुकीचा होतो, हे लवकरच मला समजले.
जगन्नाथ हे विष्णूचे रूप. इथे जगन्नाथाला अनेक नावांनी संबोधले जाते. जगन्नाथ म्हणजे ओडिशावासियांचा जीव की प्राण! ओडिशात परस्परांना गुड मॉर्निंग, आफ्टरनून किंवा हाय, हॅलो करणार्यांपेक्षा दोन्ही हात जोडून ‘जय जगन्नाथ’ म्हणणार्यांची संख्याच जास्त आहे. जगन्नाथाशिवाय ओडिशावासियांचे पान हलत नाही. ओडिया भाषेत एक म्हण आहे, तिचा मथितार्थ असा- ‘मिळाले ते जगन्नाथाच्या कृपेने आणि मिळाले नाही, ते जगन्नाथाच्या मर्जीने!’ सगळे जगन्नाथाच्या भरवशावर सोपवून, इथली मंडळी निवांत असतात!
माझ्या एका ओडिया मित्राचा मुलगा जगन्नाथाचा निस्सीम भक्त. इंजिनिअरींग आटोपल्या नंतर दोन वर्षे घरीच होता. हवी तशी नोकरी मिळत नव्हती. मी गमतीने त्याला म्हंटले,‘असा कसा रे तुझा जगन्नाथ? एवढी भक्ती करतोस, पण काही मदत करत नाहीये तुला...’ यावर तो उत्तरला,‘यात जगन्नाथाची काय चूक? माझ्यातच काहीतरी दोष असेल.’
काही दिवसांनी हाच पोरगा माझ्या घरी पेढे घेऊन आला. पाया पडत म्हणाला,‘काका, जगन्नाथाची कृपा झाली. बंगलोरमध्ये चांगली नोकरी मिळाली!’ मी थक्कच झालो! बेकार होता, त्यात जगन्नाथाची काही चूक नव्हती, पण नोकरी मिळाली ही मात्र जगन्नाथाची कृपा! याच्यासारखे भक्त संपूर्ण ओडिशात पसरले आहेत. या आणि अशा भक्तांसाठीच महाप्रभू वर्षातून एकदा मंदिराबाहेर येतात आणि सार्या भक्तांना दर्शन देतात! देव आपल्यातील आणि भक्तांमधील अंतर कमी करतो. जगन्नाथाची ‘रथयात्रा’ हा ओडिशातील सर्वात मोठा सण आहे, पर्वणी आहे, उत्सव आहे, महोत्सव आहे. नऊ दिवसांसाठी जरी गाभार्याबाहेर येत असले, तरी ‘रथयात्रा’ सोहळा एकूण 24 दिवस (कधी कधी 25 दिवस) चालतो! मोठे भारलेले दिवस असतात हे. राज्यभर एकच जल्लोष असतो. गावोगावी नागरिक स्वयंस्फूर्तीने गाव स्वच्छ करतात, घरे रंगवली जातात, नव्या कपड्यांची खरेदी होते. महाप्रभूंचा महासोहळा, त्यामुळे सगळेच ‘महा’ आनंदी! पूर्ण ओडिशा या काळात,‘जगन्नाथमय’ झालेले असते.
‘रथयात्रे’चा सोहळा भगवान श्रीमंदिराबाहेर (इथे जगन्नाथाच्या मंदिराला श्रीमंदिर म्हणण्याचा प्रघात आहे.) यायच्या 15 दिवस आधीच सुरू होतो. ज्येेष्ठ महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेला - जिला इथे ‘स्नान पौर्णिमा’ असे म्हणतात - मंदिरातील तिन्ही मूर्तींना (बलभद्र , जगन्नाथ आणि सुभद्रा) सकाळी वाजत गाजत गाभार्याबाहेर आणले जाते. मंदिराच्या आवारातच ‘स्नानवेदी’ नामक खास देवांच्या स्नानासाठीच बनवलेल्या दगडी बैठकीवर त्यांना स्नान घातले जाणार असते. या सोहळ्याला ‘देबस्नाना’ असे नाव आहे. तीनही मूर्ती वाजत गाजत स्नानवेदीवर आसनस्थ होतात. मंत्रघोष चालू असतात. स्नानवेदी पानाफुलांनी सजवलेली असते. मुख्य स्नानाआधी तुळशीच्या पानांनी तिघांनाही मढवले जाते. मग ती काढून त्यांच्यावर रेशमी वस्त्रे टाकून झाकण्यात येते. हे चालू असतानाच मंदिराच्या आवारात असलेल्या ‘सुना कुआ’ (सोनेरी विहीर) विहिरीतून 108 कलश पाणी काढले जाते. नंतर पाण्याने भरलेले सर्व कलश भोग मंडपात नेले जातात. पल्ल पंडे (ब्राह्मण पुजार्यांमधली एक पोटजात) नंतर हळद, अक्षता, चंदन, फुले, सुगंधी तेल आणि औषधी वनस्पतींनी पाणी शुद्ध करतात. हा दिवस भगवान जगन्नाथांचा प्रकट दिवस मानला जातो. यथावकाश मंत्रघोषात 108 कलशांमधील पवित्र पाण्याने तिघांनाही स्नान घातले जाते. स्नान सुरू असतानाही सर्वत्र प्रचंड जयघोष चालू असतो! महाप्रभूंचे दर्शन भक्त डोळ्यात साठवून ठेवत असतात. कारण पुढचे 15 दिवस देव गाभार्यात जाणार नसतात, कोणालाही दिसणार नसतात!
देवांचे अंग कोरडे केले जाते. नव्या कपड्यांनी, दागिन्यांनी सजवले जाते आणि या नंतर देवांना चक्क हत्तीचे मुखवटे चढवले जातात! या समारंभाला म्हणतात - ‘हत्ती बेसा’ किंवा ‘गणेशा बेसा’ जगन्नाथाचा आणि गणपतीचा काय संबंध? हा प्रश्न साहजिकच मनात येतो! भगवान विष्णूंचा म्हणजेच जगन्नाथाचा आणि गणपतीचा काय संबंध? या संदर्भात एक कहाणी सांगितली जाते. एक ब्राह्मण जगन्नाथाचा निस्सीम भक्त असतो. त्याला महाप्रभूंचे दर्शन घ्यायचे असते. मजल दरमजल करत तो जगन्नाथाच्या मंदिरात पोहोचतो. का कोण जाणे, पण त्याला जगन्नाथ आपल्याला ‘गणेशा’च्या रूपात दिसतील, अशी उगाचच एक भाबडी अशा असते. तो मंदिरात येतो, तो नेमका ह्याच स्नान पौर्णिमेच्या दिवशी! महाप्रभू नुकतेच स्नान आटोपून आलेले असतात. जगन्नाथाच्या लाकडी मूर्तींवर आधुनिक रंग लावलेले नसतात. नैसर्गिक रंगांनी मूर्ती रंगवलेली असते. नुकतेच स्नान आटोपून आल्यामुळे महाप्रभूंच्या चेहर्यावरचे रंग काही ठिकाणी उडालेले असतात, काही ठिकाणी ओघळलेले असतात. जगन्नाथाच्या ‘या’ रूपाकडे पाहिल्यावर ब्राह्मणाची भयंकर निराशा होते, तो खिन्न मनाने धर्मशाळेत परततो. आपला निस्सीम भक्त असा नाराज होऊन परतल्यामुळे भगवंतांनाही वाईट वाटते. ते त्या ब्राम्हणाच्या स्वप्नात जाऊन दृष्टान्त देतात आणि परत मंदिरात येण्याविषयी सांगतात. तो ब्राह्मण परत मंदिरात येतो, तर त्याला गणेश स्वरूपातील दर्शन होते. समोरच्या भाविकांच्या गर्दीत त्या ब्राह्मणाला बघून महाप्रभू पण उल्हसित होतात! समोरच्या प्रत्येक भक्ताला इच्छित वरदान, मनसोक्त आशीर्वाद देतात. यामुळेच, ‘गणेशा बेसा’ मधील जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड झुंबड उडते!
या आधी, मुळात जगन्नाथाला अंघोळ का घातली जाते आणि नंतरचे 15 दिवस जगन्नाथ कोणालाही दर्शन का देत नाहीत, या विषयी पण एक कहाणी आहे! होते असे की, वैशाख महिन्याच्या उन्हाळ्याने सर्वसामान्य भक्तांप्रमाणे महाप्रभू पण त्रस्त झालेले असतात. ते पुजार्यांना ‘मला गार पाण्याने आंघोळ करायची आहे’ अशी आज्ञा देतात.
प्रत्यक्ष भगवंताची आज्ञा कशी टाळणार? मग ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेला सकाळी देवांना अंंघोळ घालण्याची तयारी केली जाते! कहाणी अजून पुढेच आहे. मोकळ्या हवेत, सकाळी सकाळी, विहिरीच्या थंड पाण्याने स्नान केल्याने तिघाही भावंडाना सर्दी होते, ताप येतो! बाहेरच्या गार वार्याने ताप अजून चढू नये म्हणून तिघाही भावंडांना सफेद सुती वस्त्र गुंडाळून परत मंदिराच्या आत आणले जाते. मात्र आजारी असल्याने त्यांना परत त्यांच्या मूळ गाभार्यात न नेता अधिक शुश्रूषेसाठी ‘अनासार घर किंवा अनासार पिंडी’ या नावाने ओळखल्या जाणार्या विशिष्ट दालनात नेले जाते. तातडीने राजवैद्यांना पाचारण केले जाते. भगवंतांना आणि त्यांच्या भावंडांना भक्तमंडळींचा व्यत्यय होऊ नये म्हणून दालनाबाहेर बांबूच्या चटयांची तात्पुरती भिंत बांधली जाते. अर्थात या तात्पुरत्या भिंतीला एक फट सोडली जाते, ती राजवैद्य आणि ‘दैत्यपती’ या आदिवासी समूहातील काही विशिष्ट व्यक्तींच्या जाण्या-येण्यासाठी. हे ‘दैत्यपती’ भगवंतांना बरे वाटावे म्हणून काहीतरी गुप्त विधी करत असतात! इतर कोणालाही ‘अनासार घरा’त 15 दिवस प्रवेश नाही! पुजार्यांनासुद्धा नाही! या 15 दिवसांच्या महाप्रभूंच्या आजारपणाच्या कालखंडाला ‘अनासार पर्व’ असे संबोधतात आता बरे होईपर्यंत - (म्हणजे पुढचे 15 दिवस) महाप्रभूंचा भाऊबहिणीबरोबर मुक्काम इथेच! उपचार सुरू होतात. बाहेर भक्तमंडळींमध्ये चलबिचल चालू असते! त्यांच्या समाधानासाठी राजवैद्य दररोज सायंकाळी मंदिराच्या पायर्यांवरून तब्येतीची खुशाली कळवत असतात. भक्तमंडळी अतिशय उत्सुकतेने राजवैद्यांची वाट बघत असतात. राजवैद्य ओडिया भाषेत काहीतरी बोलतात, आणि भक्तांच्या उत्साहाला उधाण येते. आरत्या सुरू होतात, काही जण अगदी ढोल वगैरे घेऊन येतात! खरे तर ते राजवैद्य वर्षानुवर्षे तेच तेच सांगत असतात! ते तरी नवीन काय सांगणार? ‘आज देवांच्या तब्येतीत चांगली सुधारणा जाणवली’ असे सांगितले की इकडे ढोलताशे सुरू! काय तो जयघोष, काय तो जयजयकार! मंदिरात, मंदिराच्या आवारात, आवाराबाहेर फक्त आणि फक्त ‘जोय जगन्नाथ, जोय जगन्नाथ’; एवढेच ऐकू येते! त्या लाकडी मूर्तींमध्ये देव आहे, हा प्रचंड विश्वास! इतका की आपण घरातील आजारी व्यक्तीला सुरुवातीचे काही दिवस जड अन्न देत नाही, तसेच इथेही. पहिले चार दिवस जगन्नाथांना ‘अनासार पाना’नामक गोड दुधाचे द्रव्य (पंचामृत सदृश्य) दिले जाते! दुसरा काही घन-स्वरूप प्रसाद दिला आणि अपचन झाले तर काय घ्या? देवाच्या तब्येतीची एवढी काळजी, की एकदा (पाचव्या दिवसापासून) देवांना थोडे थोडे बरे वाटायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना इतर काही प्रसाद अर्पण करण्याऐवजी, ‘दशमूला मोदकां’चा भोग चढवतात! या ‘मोदका‘त दहा वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची मुळे सुकवून केलेली भुकटी, इतर काही आयुर्वैदिक औषधे, मध, साखर, दूध आणि बरेच पौष्टिक पदार्थ असतात. राजवैद्य स्वतःच्या हाताने हा ‘मोदक’ बनवतात. दररोज 120 ‘मोदकांचा’ प्रसाद भगवंतांना अर्पण केला जातो. या ‘पौष्टिक आणि औषधी मोदका’मुळे महाप्रभू आणि त्यांच्या भावंडांची तब्येत झपाट्याने सुधारू लागते. उपचार सुरू झाल्यानंतर खरे तर 12 व्या दिवशीच जगन्नाथाची तब्येत सुधारते, पण डॉक्टरी धर्माला जागून राजवैद्य अजून 2-3 दिवस आराम करण्यास सांगतात! ‘घरी जायची घाई करू नका. अजून थोड्या टेस्ट करू आणि दोन-तीन दिवसांनी डिस्चार्जचे बघू!’ देवाला किती माणसात आणलेय यांनी! देव हा देव आहेच, पण त्याला मानवाप्रमाणे भावभावना, पीडा, दुःख, आजारपण आहे, हे अगदी आतपर्यंत झिरपले आहे. प्रश्न भावनांचा आहे, भक्तीचा आहे. त्या गाढ भक्तीतून निर्माण होत असलेल्या प्रबळ विश्वासाचा आहे. मला या गोष्टी खूप मनोहारी वाटतात. अशा भक्तीचे, विश्वासाचे खरे तर मूल्यमापनच करू नये! विज्ञानाच्या कसोटीवर तपासता येणार नाहीत, अशा बर्याच गोष्टींशी जगन्नाथाच्या यात्रेचे नाते आहे.
आजारातून उठल्यानंतर भगवान हवापालट करण्याचे ठरवतात. तीनही भावंडांसाठी तीन भव्य रथांची सिद्धता केली जाते! खरेतर, रथांच्या बांधकामाची तयारी वसंत पंचमीपासून सुरू होते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याचा श्रीगणेशा होतो. हे रथ पूर्णपणे विशिष्ट प्रकारचे लाकूड वापरून तयार केले जातात. रथांच्या बांधकामात सुमारे 750 घनमीटर लाकूड वापरले जाते.
विशेष म्हणजे, यासाठी एकही खिळा किंवा लोखंडी वस्तू वापरली जात नाही. संपूर्ण रथ लाकडी सांधे आणि दोर्यांनी जोडलेला असतो. दरवर्षी असे नवीन रथ बनवले जातात.
जगन्नाथाच्या रथाचे नाव नंदीघोष! या रथाला 16 +1 अशी 17 चाके असतात (असे का, हे पुढे येईलच) आणि त्याची उंची जवळपास 14 मीटर असते. रथाच्या कळसाच्या वर लाल आणि पिवळ्या रंगाचे कापड असते. तिन्ही रथांची रंगसंगती वेगवेगळी असते. बलभद्राच्या ‘तालध्वज’ या रथासाठी लाल आणि हिरव्या रंगाचे तर सुभद्रेच्या ‘दर्पदालन’ नावाच्या रथाच्या कळसावरचे कापड असते लाल आणि काळ्या रंगाचे. बलभद्र आणि सुभद्रेच्या रथाची उंची जगन्नाथाच्या रथापेक्षा थोडी कमीच असते.
चौदा दिवस आराम करून, भक्तांपासून दूर राहून अखेर भगवान जगन्नाथ पंधराव्या दिवशी भक्तांना दर्शन देतात!
आजारपणातून खडखडीत बरे झालेले देव अतिशय प्रसन्न आणि तेजस्वी दिसतात. यामागची श्रद्धा अशी आहे की, या काळात देव पुन्हा नवीन ऊर्जा आणि शक्तीने परिपूर्ण होतात. ताजेतवाने झालेल्या जगन्नाथाचे दर्शन अतिशय शुभ मानले जाते. या दर्शनाचा एक वेगळाच उत्सव असतो, त्याला ओडिया भाषेत ‘नबा जौबना’ म्हणतात. सुरुवातीला मला हा ओडिया शब्द समजलाच नव्हता! नंतर कळले की हा शब्द ‘नवं यौवन’ आहे!
जगन्नाथाची मूर्ती लाकडाची बनवलेली असते. त्या मूर्तीवरील रंगकामासाठी संपूर्णपणे नैसगिर्क रंग दिलेले असतात. हे रंग वर्षभरात फिके पडत जातात, काही ठिकाणी तर पोपड्यासारखे निघून जातात. त्यात ‘स्नान पौर्णिमेला’ 108 कळश पाणी त्या मूर्तींवर ओतलेले! यामुळे मूर्तींवरचे रंग उडतात, ओघळतात. मूर्ती विद्रुप भासू लागते! भक्तांना भगवंताचे दर्शन ‘अशा’ स्वरूपात कसे घडवणार? म्हणून स्नान आटोपल्या आटोपल्या मूर्तींवर हत्तीचा मुखवटा लावला जातो! ‘हत्ती बेसा’ किंवा ‘गणेश बेसा’चे रहस्य आले लक्षात? या रंग उडालेल्या मूर्तींवर नवे रंगकाम करण्यासाठी, ते रंगकाम सुकण्यासाठी देवांच्या मूर्ती 14 दिवस मंदिरातच स्वतंत्र जागी आणि भक्तांपासून दूर ठेवल्या जातात. 15व्या दिवशी देव ‘नवयौवन’ प्राप्त झाल्यासारखे दिसतात, ते यामुळेच! तटस्थपणे विचार केला की, हे आपल्या लक्षात येते, पण इथले जगन्नाथाचे भक्त तसे मानत नाहीत! अतिशय भाबडे आहेत इथले लोक! आता खरी ‘रथयात्रा’ सुरू होणार असते!
पुरीचा राजा स्वतः सोन्याच्या झाडूने जगन्नाथाचा रथ आणि समोरचा रस्ता झाडतो! हा सुद्धा एक मोठा उत्सव असतो! तसे बघायला गेले, तर रथयात्रेतील कुठली घटना उत्सव नसते? या सणाला ‘चेरा पहारा’ म्हणतात! सोन्याच्या झाडूने रथ झाडणार्या राजाला बघायला अलोट गर्दी उसळते! प्रचंड जल्लोषात तिघे भावंडे आपापल्या रथात स्थानापन्न होतात. रथयात्रा सुरू होते! पुढच्या 9 दिवसांसाठी महाप्रभूंचा मुक्काम जगन्नाथ मंदिरापासून 2.5 किलोमीटर दूर असलेल्या ‘गुंडीचा’ मंदिरात असणार असतो. हे तीनही रथ भक्त तिथपर्यंत ओढून नेतात. यासाठी जाडजूड दोरखंड रथांना बांधलेले असतात! रथ ओढायला मिळणे हे पूर्वजन्मीचे पुण्य! एवढेच काय त्या दोरखंडाला हात लावायला मिळणे, हे सुद्धा सौभाग्य समजले जाते! मोकळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भगवंतांचे, जगन्नाथाचे दर्शन! सभोवताली पसरलेले असंख्य भाविक बेभान होतात! सगळीकडे जगन्नाथाचा एकच जयघोष सुरू असतो! लाखो लोक दर्शन घेत असतात, जयजयकार करत असतात, कित्येक जण तर आनंदाने रडतात सुद्धा! गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ‘रथयात्रे’स येणार्या परदेशी भक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एका अंदाजानुसार, 2025 सालच्या रथयात्रेस जवळपास 70,000 परदेशी भक्तांनी हजेरी लावली. (भारतीय भक्तांची संख्या दहा लाखांवर!). ‘बडा दांडा’ या रस्त्यावरून जाणार्या भगवंतांचे दर्शन घेण्यास इतर धर्मीयही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. इतर धर्मियांना जगन्नाथाचे दर्शन फक्त रथयात्रेच्या प्रवासातच होते. याचे कारण म्हणजे जगन्नाथाच्या मंदिरात फक्त हिंदू धर्मीय प्रवेश करू शकतात, इतरांना ती परवानगी नसते.
सकाळी निघालेले रथ संथगतीने संध्याकाळपर्यंत गुंडीचा मंदिरात पोहोचतात. अडीच किलोमीटर प्रवासासाठी पूर्ण दिवस! उशीर झाल्यामुळे भगवान लगेचच मंदिरात जात नाहीत. ती रात्र महाप्रभू रथातच झोपतात! पुढच्या काही दिवसांमध्ये गुंडीचा मंदिरात अनेक पारंपरिक विधी पार पडतात. भावा-बहिणीबरोबर आराम करत, भक्तांना दर्शन देत, दररोज आपले आवडते ‘अड्डा पोप’ (भाजलेल्या तांदळाचा एक ओडिया प्रकार) खात भगवान सहलीचा आनंद घेत असतात, सुखाची अनुभूती घेत असतात. भगवंतांचे पहिले दोन-चार दिवस मजेत जातात.
पण सगळ्या जगाचे संकट हरण करणार्या महाप्रभूंना काय माहिती की थोड्याच दिवसात त्यांच्यावर एक घरगुती संकट कोसळणार आहे! याची मोठी सुरेख आख्यायिका आहे!
भगवान इकडे गुंडीचा मंदिरात असताना तिकडे श्रीमंदिरात चौथ्या दिवशी देवी लक्ष्मीला समजते की जगन्नाथ मंदिरात नाहीत! (श्रीमंदिर सोडण्यापूर्वी जगन्नाथ पुजार्यांना लक्ष्मीच्या गाभार्याच्या दरवाजाला कडी लावायला सांगतात!) मंदिरात उपस्थित असलेल्या उरल्यासुरल्या पुजार्यांची देवी लक्ष्मी झाडाझडती घेते. त्यात तिला यात्रेसाठी जगन्नाथ एकटेच नाही, तर आपल्या भावाबहिणीला घेऊन गेल्याचेही कळते! लक्ष्मी क्रोधित होते! बरोबरच आहे. आपला नवरा आपल्याला सोडून सहलीला गेला, हे समजल्यावर कोणती स्त्री रागावणार नाही? आगीत तेल म्हणजे चक्क आपल्या भावाबहिणीला घेऊन? एकटा गेला असता तर बहुतेक एवढा राग आला नसता! झाले! क्रोधित झालेली लक्ष्मी पाचव्या दिवशी स्वतःच ‘गुंडीचा’ मंदिरात पोहोचते! जगन्नाथाचे सेवक दुरूनच लक्ष्मीचा रथ येताना बघतात आणि जगन्नाथाला कळवतात. घाबरलेले जगन्नाथ गुंडीचा मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्यास सांगतात! लक्ष्मीच्या हे लक्षात येते, ती अजूनच क्रोधित होते. आपल्या सेविकांच्या साहाय्याने मंदिराच्या आत शिरते आणि जगन्नाथाला फैलावर घेते!
पुढचा भाग फार मजेशीर आहे. इथे लक्ष्मी आणि जगन्नाथ यांच्यात भांडण होते. लक्ष्मीच्या वतीने फिर्याद मांडायचे काम काही ओडिशी नर्तकी (पूर्वी देवदासी असायच्या) करतात. जगन्नाथाची बाजू गुंडीचा मंदिराचे पुजारी सांभाळतात! तासभर चालणार्या या भांडणातले ओडिया भाषेतील संवाद मोठे मनोरंजक असतात. सुरुवात होते, ती अशी -
लक्ष्मी (चिडून) - मला बघितल्यानंतर तुम्ही सेवकांना प्रवेशद्वार बंद करण्यास का सांगितले?
जगन्नाथ (गयावया करत) - छे छे, मी नाही सांगितले. बाहेरच्या वार्याने मंदिरात पालापाचोळा येत होता, म्हणून सेवकांनीच बंद केले असावे.
लक्ष्मी (थयथयाट करत) - खोटे. साफ खोटे! त्या सेवकाला आत्ताच्या आत्ता दंड करा.
जगन्नाथ (अजिजीने) - हो तर. लगेच करतो!
बघण्यासारखा कार्यक्रम असतो हा! सुरुवातीला गयावया करणारा जगन्नाथ (पुजारी) मध्यभागात थोडा चिडतो, पण कार्यक्रमाच्या अखेरीस परत दीनवाणा होतो! ‘अजून दोन-तीन दिवसांनी परत घरी येतो’ असे सांगून लक्ष्मीची कशीबशी समजूत काढतो. देवी परत घरी जायला निघते. मंदिराच्या बाहेर येते पण राग पूर्ण गेलेला नसतो. त्यात तिला गुंडीचा मंदिराच्या बाहेर उभा असलेला जगन्नाथाचा ‘नंदीघोष’ रथ दिसतो. अजूनही क्रोधित असलेली लक्ष्मीदेवी आपल्या सेविकांना त्या रथाचे एक चाक तोडायला सांगतात! त्याही आज्ञा पाळतात! हा चाक तोडण्याचा रितसर कार्यक्रम असतो. अर्थात हे प्रतिकात्मक चाक असते. रथाची मूळ 16 चाके आणि हे 1 प्रतिकात्मक! रथयात्रा सुरुवात होते, तेव्हा ’रथाला 17 चाके असतात’, असे म्हटले होते, ते यासाठीच! या सोहळ्यालाही लाखो लोक उपस्थित असतात! ही सर्व घटना म्हणजे ‘हेरा पंचमी’!
पुढचे चार दिवस झर्रकन निघून जातात. जगन्नाथाची श्रीमंदिरात परतायची तयारी सुरू होते. गुंडीचा मंदिरापासून परत मूळ श्रीमंदिरात पोहोचण्याच्या प्रवासास ‘बहुडा जात्रा’ असे संबोधले जाते. येताना तीनही रथ ‘मौसी माँ मंदिर’ या ठिकाणी थांबतात. येथे जगन्नाथाला त्याच्या आवडीच्या ‘पोडा पिठा’ या गोड पदार्थांचा नैवेद्य दिला जातो! हळू हळू रथ श्रीमंदिरापर्यंत पोहोचतो! रथ तर पोहोचतो; पण बघतात तर, मंदिराचा दरवाजा बंद!
लक्ष्मीदेवीचा राग कमी झालेला असतो पण पूर्ण गेलेला नसतो. लक्ष्मीनेच आपल्या सेविकांना सांगून दरवाजा बंद केलेला असतो! मग जगन्नाथ लक्ष्मीची मनधरणी करतो, परत न सांगता जाणार नाही, असे खोटे खोटे वचन देतो. तरीही लक्ष्मी रूसलेलीच! मग महाप्रभू रसगुल्ले मागवतात आणि लक्ष्मीला देतात! रसगुल्ले बघताच लक्ष्मीची कळी खुलते, आणि जगन्नाथाचा श्रीमंदिरात प्रवेश होतो!
किती गोडवा आहे या आख्यायिकांमध्ये! देव हा देव तर आहेच, त्याला देव म्हणून आदर दिलाच जातो, मान ठेवलाच जातो, पण ओडिशातील भक्त त्यातही माणूस शोधतात! भक्तमंडळी निःशंकपणे प्रत्येक कहाणीवर विश्वास ठेवतात!
भोळेपणा तो किती, आणि भाबडेपणा तो किती! भगवान जगन्नाथ ‘आजारी’ पडतात, त्या काळात देवाच्या प्रकृतीच्या काळजीने कित्येकजण तेवढा काळ अन्न ग्रहण करत नाहीत, आजारपणाच्या काळात मंदिराच्या आवारात लाखो लोक काळजीने संध्याकाळच्या राजवैद्यांच्या घोषणेची वाट बघतात, शेवटच्या दिवशी देवी लक्ष्मी जगन्नाथाला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी देते, तेव्हा सगळीकडे एकच हर्षोल्लास होतो! लक्ष्मीचा जयजयकार होतो! जणू काही हे सगळे खरे आहे, असेच मानले जाते किंबहुना तसा ठाम विश्वास असतो!
खरेतर, या मंदिरप्रवेशाच्या प्रसंगात, लक्ष्मी आणि जगन्नाथ यांच्यातील संवाद दोन पुजारी म्हणत असतात. तिकडे हेरा पंचमीच्या दिवशी गुंडीचा मंदिरात लक्ष्मीच्या वतीने भांडणार्या तरुण ओडिशी नृत्यांगनांच्या पाया पडायला झुंबड उडते! ती मुलगी लक्ष्मीच्या वतीने बोलली म्हणजे ती लक्ष्मीचेच रूप!
‘जगन्नाथ’ या शब्दाचा अर्थ ‘जगाचा स्वामी’ असा आहे. तरीही येथे भक्त जगन्नाथाला आपल्या कुटुंबाचाच सदस्य मानतात. प्रत्येक कामात, संकटात आणि सुखात त्यांचे मार्गदर्शन घेतात. या प्रभावामुळे, ओडिशामधील लोकांमध्ये धार्मिक सहिष्णुता, प्रेम आणि सामाजिक समरसता दिसून येते. हीच मूल्ये त्यांच्या संस्कृतीची, जीवनाची आणि एकूणातच ओडिशाची ओळख बनली आहेत.
पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेला केवळ एक उत्सव म्हणून पाहणे म्हणजे या भव्य परंपरेचा आत्मा न समजल्यासारखे आहे. ही यात्रा म्हणजे अनेक शतके जुन्या परंपरा, गहन श्रद्धा आणि मानवी भावनांचा संगम आहे. दरवर्षी, जेव्हा जगन्नाथाचे रथ पुरीच्या रस्त्यांवरून पुढे सरकतात, तेव्हा केवळ तीन लाकडी रथ पुढे जात नाहीत, तर त्यासोबत ओडिशाची समृद्ध संस्कृती आणि लोकांचे जगन्नाथावरील उत्कट प्रेमही पुढे सरकत असते.
जगन्नाथ रथयात्रेतील अनेक अनोखे विधी पाहताना एक गोष्ट स्पष्ट होते की, ही केवळ एक परंपरा नाही. ही एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक यात्रा आहे. इथे जात, धर्म, आर्थिक वा सामाजिक स्थिती अशा कोणत्याही गोष्टीला महत्त्व नाही. रथयात्रेत, लाकडी मूर्तींना ‘जिवंत’ मानले जाते आणि त्यांच्यावर सर्व मानवी भावनांचा आणि गरजांचा अनुभव घेतला जातो. रथयात्रेमध्ये विश्वाचा अधिपती आपले निवासस्थान सोडून खुल्या आकाशात पाऊल टाकतो, आपल्या भक्तांना भेटण्यासाठी- देव आणि मानव यांच्यातील अंतर मिटवण्यासाठी. या अद्वितीय उत्सवात, भक्तच प्रभूला शोधत नाहीत; तर प्रभूच आपल्या भक्तांना शोधत येतो. भक्तांवर आपल्या अमर्याद प्रेम आणि कृपेचा वर्षाव करतो!
रथयात्रेचा शेवट म्हणजे केवळ रथ थांबण्याचा क्षण नसतो, तो भक्तांच्या हृदयात उमटणार्या भावनांचा उत्कट विस्फोट असतो. भक्तांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात, पण ते दुःखाचे नसतात; ते प्रेमाचे, समर्पणाचे आणि त्या दैवी भेटीच्या आनंदाचे असतात. हे नाते शब्दात मांडता येत नाही, कारण ते जन्मोजन्मीचे नाते आहे. जगन्नाथ कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकाला जवळ घेतो आणि म्हणूनच, रथयात्रा संपली तरी भक्तांच्या मनात ती चालूच राहते.
जगन्नाथाविषयी, रथयात्रेविषयी ओडिशात असंख्य आख्यायिका आहेत. कोणीतरी भक्ताने त्या रचलेल्या असतात. एकाच प्रसंगावर आधारित वेगवेगळ्या आख्यायिकासुद्धा असतात. शेवटी भक्ताने त्या प्रसंगाचे आकलन कसे केले, यावर आख्यायिका आधारित असणार. माझा आख्यायिकांवर विश्वास नाही, पण मला त्या ऐकायला आवडतात.
मागच्या वर्षी मला रथयात्रेच्या पहिल्या दिवशी आणि समाप्तीच्या दिवशी पुरीला जायचा योग आला. दोन्ही वेळा दर्शन घेता आले. महाप्रभू रथात बसताना आणि यात्रा आटोपून परत श्रीमंदिरात प्रवेश करताना. मला असे का वाटले समजत नाही, पण रथयात्रा आटोपून परतलेल्या जगन्नाथाच्या चेहर्यावर मला अधिक प्रसन्नता आणि अक्षरश: तृप्ततेचा भाव दिसला! भास नव्हता तो, हे नक्की!
ओडिशात पाच वर्षे राहिल्यामुळे मी सुद्धा अस्सल ओडिया होत चाललोय की काय!