संघटनशास्त्री - प्रा. यशवंतराव केळकर!

विवेक मराठी    24-Oct-2025
Total Views |
 
@हर्षवर्धन जतकर
 
 
yashwant kelkar
 
आज देशभर पसरलेल्या विद्यार्थी संघटनेचा म्हणजे ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चा भक्कम पाया घालणारे प्रा. यशवंत वासुदेव केळकर यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच झालं. ‘जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना’ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा लाल किल्ल्यावरून गौरविलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही हे शतकोत्सवी वर्ष आहे. हा विलक्षण योगायोग. यशवंतराव यांची संघात जडणघडण कशी झाली आणि परिषदेचे ‘प्रमुख’ या नात्याने यशवंतरावांनी माझ्यासारख्या नवख्या तरुणांना व जुन्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेत त्यांची जडणघडण कशी केली हे मांडायचा हा एक प्रयत्न आहे. 1964 ते 1970 या पाच-सहा वर्षांत, त्यांच्यासोबत परिषदेच्या मुंबई शाखेत काम करताना आलेले अनुभव तसंच अलीकडेच वाचण्यात आलेल्या त्यांच्यावरील पुस्तकातील माहितीचा आधार या लेखनाला आहे.
शवंतराव विद्यार्थी परिषदेसाठी नेमके काय होते? ते होते कौटुंबिक सौहार्दाची प्राणशक्ती, सळसळते चैतन्य नि सनातन पण तरीही नित्यनूतन अशा आपल्या सांस्कृतिक चिंतनमूल्यांची अ.भा.वि.प.च्या घरकुलाला बैठक देणारे यजमान कार्यकर्ते! ते होते, 1958 साली ज्येष्ठ संघप्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या सूचनेनुसार परिषदेची जबाबदारी स्वीकारून ती सलग 27 वर्षे म्हणजे 1985 पर्यंत निभावून नेणारे असामान्य संघटनशास्त्री! ते होते महाभारतातील युद्धात संभ्रमित झालेल्या अर्जुनासाठी गीतोपदेशातून मार्गदर्शन केलेल्या भगवान श्रीकृष्णासारखे जीवनाच्या संघर्षात झुंजणार्‍या आमच्यासारख्या असंख्य तरुणांना मार्ग दाखवणारे समर्थ सारथी! ते होते या संघटनेत पूर्वीच्या गुरुकुलातील शिष्यांशी असणारे ‘मित्रवत् वा पुत्रवत्’ नातं निभावून नेणारे ’आमचे हक्काचे गुरुजी’ आणि माझ्यासारख्या नव्याने परिषदेत आलेल्या युवकांबरोबर चार पावलं चालत येऊन गप्पा मारताना कधीमधी आम्हाला आवरत-सावरत तर कधी शाबासकीची थाप देणारे पित्याप्रमाणे जपणारे अन् जोपासणारे सांभाळकरी पालक!
 
यशवंतरावांचे प्रत्यक्ष दर्शन
 
नागपूरला विद्यार्थी परिषदेच्या 12व्या अखिल भारतीय अधिवेशनात यशवंतरावांना भाषण करताना जवळून पाहिलं होतं. पण चाळिशीतल्या चारचौघा कुठल्याही मध्यमवर्गीय पांढरपेशा मुंबईकरांसारखं रूप, साधा पांढराशुभ्र कुर्ता-पायजमा अशी वेशभूषा... लक्ष वेधलं जावं असं यांपैकी काहीच नव्हतं. त्या आधी स्वामी चिन्मयानंद यांचं उद्घाटनाचे भाषण ऐकलेलं असल्याने, त्यांची उंची, भगवा पेहेराव, तेजस्वी चेहरा, ओजस्वी वाणी, इंग्रजीवरील असामान्य प्रभुत्व, स्पष्ट व मुद्देसूद मांडणी यांनी आम्ही भारावून गेलो होतो. अत्र्यांची घणाघाती आणि पुलंची खुसखुशीत विनोद पेरलेली भाषणं मुंबईत मी ऐकली होती. त्या पार्श्वभूमीवर यशवंतरावांचा ढाला आवाज, अनोळखी भाषा नि कैक उदाहरणांसह मांडलेले विचार हे सगळं माझ्या डोक्यावरून गेलं. किंबहुना आकर्षक व्यक्तिमत्व व प्रभावी वक्तृत्व यांचा अभाव असल्याने मी त्यांना अधिवेशनात पाहिल्याचं व ऐकल्याचं लगेच विसरूनही गेलो.
 
 
माझ्या कॉलेजातील वर्गात व होस्टेलमध्ये असलेला नाशिकचा राजा मोगल हा संघाचा बालपणापासूनचा स्वयंसेवक. यशवंतरावांचा एक शिष्य. अत्यंत साधा, तडफदार व अभ्यासात हुशार. तो मराठी मुलांच्या कोंडाळ्याचा नेता होता. सर्वांशी मैत्री करून एकेकाला परिषदेत नेण्याचा त्याचा प्रयत्न असे. त्याच्या आग्रहाने मी कापूरबावडीच्या सहलीला परिषदेच्या कार्यकर्त्यांसह गेलो होतो. माझी हिंदी सिनेमातील गाणी ऐकून सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं होतं. त्याच्याच आग्रहाने मी 1964साली नागपूरच्या अधिवेशनाला (त्याने नंतरची जबलपूरची सहल व भेडाघाटचे आमिष दाखवल्याने) गेलो. नागपूरपर्यंतच्या प्रवासात मला गाऊ देऊन मग अधिवेशनाच्या पहिल्या रात्री हिंदीत मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे निरूपण करायला उभं केलं गेलं! ते मी उत्तमरित्या पार पाडल्यावर खांद्यावर बसवून मिरवलं गेलं! याचा परिणाम असा झाला की, दुसर्‍या दिवशी मी अधिवेशनाच्या प्रत्येक सत्रातल्या घटनाक्रमांची, वक्त्यांच्या भाषणांची नावानिशी टिपणं काढली. मला जी कामं सांगितली गेली ती मी चार जणांना घेऊन आनंदाने पूर्ण केली. त्यानंतरची जबलपूर व भेडाघाटची सहल व मुंबईस परत येईपर्यंतचा प्रवास यात मला भोजन प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
 
 
थोडक्यात काय, माझ्यासारख्या नवख्या तरुणाला सतत उत्तेजन व पाठिंबा देत लहानमोठ्या कामांत गुंतवून ठेवण्यामागे माझ्यातील उत्साह व ऊर्जा अर्थात ’युवाशक्तीचे रचनात्मक कार्यांसाठी संयोजन करणे’ हे उद्दिष्ट होतं अन् हेच तर परिषदेचे घोषवाक्य होतं! एकेकाला परिषदेतल्या खेळीमेळीच्या वातावरणात रमवून व नंतर जबाबदार्‍या देऊन त्याला कार्यकर्ता व अधिक काम करणारा अधिकारी करणं अशी परिषदेची कार्यपद्धती होती. अर्थात नागपूरच्या अधिवेशनात व नंतरच्या सहलीत मला हे कळलं नाही, पण परतीच्या प्रवासात विचार करत येताना थोडंबहुत समजत गेलं.
 
 
आम्ही छ. संभाजीनगरला (तेव्हाचं औरंगाबाद) चांगली संगत व संस्कार मिळावेत म्हणून आईने 1950 सालापासून नगरकार्यवाह अप्पा पुळुजकर यांच्याबरोबर तिथल्या हनुमान शाखेवर पाठवलं होतं. मी शाखेत रोज जाऊ लागलो ते खेळायला सवंगडी मिळाले म्हणून. पण लवकरच मला शिशुगणाचा शिक्षक व ध्वजप्रमुख नेमलं गेलं व मग दोनदोनशे स्वयंसेवकांना मी प्रार्थना सांगू लागलो. व्यक्तिनिर्माण करण्याची ही संघाची कार्यपद्धती आहे हे मला 14 वर्षांनी परिषदेत तिचा पुनःप्रत्यय आल्याने आठवलं.
 
 
यशवंतरावांकडे माझं पहिल्यांदा लक्ष गेलं ते मुंबईत त्यांनी घेतलेल्या अधिवेशनाच्या अवलोकन बैठकीत, अचानक मला अनुभवकथन करण्याची सूचना केल्याने. अर्थात मला एव्हाना याची सवय झाली होती अन् मी केलेली सर्व निरिक्षणं सविस्तर मांडली. ती त्यांनी लक्ष देऊन ऐकली व अधूनमधून मान डोलावून दादही दिली. याचं फार बरं वाटून माझा आत्मविश्वास वाढला. हळूहळू मी परिषदेत रूळलो, रमलो, एक जबाबदारीचा कार्यकर्ता झालो. परिषदेने माझ्यातल्या कार्यकर्ता घडवला आणि माणूसही. इथे परिषदेने म्हणताना त्यात यशवंतरावांचा वाटा मोलाचा आहे. माझ्यासारख्या असंख्यांना त्यांनी घडवलं आहे. एप्रिल 2025मध्ये त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जीवनप्रवासाचा, त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा घेतलेला हा धांडोळा आहे.
 

vivek 
 
यशवंतरावांचे बालपणीचे दिवस
 
यशवंतरावांचे वडील वासुदेवराव केळकर हे निःस्पृह व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी होते. घरी कडक शिस्तीचे म्हणून त्यांचा दरारा होता. वासुदेवराव हे स्वतःला दुर्वास म्हणवून घेण्यात गौरव मानीत. ते कडवे हिंदुत्ववादी, अत्यंत धार्मिक, परंपरा व रूढी यांबद्दल आस्था असणारे होते व सुधारणांबद्दल त्यांना फारसं प्रेम नव्हतं. परंतु त्यांचे वडील न.चिं.उर्फ ’साहित्यसम्राट’ तात्यासाहेब केळकर हे नाटककार, पत्रकार, राजकारणी व टिळकांचे सहकारी होते. यशवंतरावांची आई जानकीबाई म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या उकिडवे वकिलांची मोठी मुलगी द्वारका. त्या स्वभावाने अतिशय शांत व प्रेमळ असल्याने त्यांच्याकडे माणसं जोडण्याची कला होती. पतीच्या धाकाच्या छायेत संसार करत सहा मुलांना त्यांनी व्यवस्थित वाढवलं. यशवंतराव यांना आईवडिलांकडून हा समृद्ध सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला होता. शिवाय लहानपणी शाखेत जात असल्याने कोवळ्या वयात त्यांच्यावर संघाचेही संस्कार झाले होते. समाज हा संघटित होण्यासाठी ’माणूस हेच एक काम आहे’ हे समजून त्यांनी सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं सूक्ष्म निरिक्षण, त्याच्या वागण्याबोलण्याचा सखोल अभ्यास अन् मग त्याचं विश्लेषण करून त्या व्यक्तीची पारख करण्याचा सराव केला.
 
 
यशवंतराव-एक आध्यात्मिक वृत्तीचे स्वयंसेवक
 
आषाढी व कार्तिकीला पंढरीच्या पांडुरंगाच्या पायी आपला माथा टेकण्यासाठी लाखोंच्या संख्येने ज्या भक्तिभावाने वारकरी जातात त्याच श्रद्धेने संघाच्या शाखेवर भगव्या ध्वजाला प्रणाम करण्यासाठी रोज स्वयंसेवक जातात हे लहानपणी पंढरपुरी असताना शाळकरी वयातल्या यशवंतरावांनी पाहिलं होतं व देशभरातील लक्षावधी स्वयंसेवक प्रतिनित्य ध्वजापुढे असेच नतमस्तक होतात हेही त्यांनी ऐकले होतं. त्यांच्या घरात कडक धार्मिक वातावरण होतं. कर्मकांडांची प्रक्रिया जशी पूजेत आवश्यक असते तशी संघाच्या शाखेवरील प्रत्येक क्रियांचा एक विशिष्ट क्रम आणि त्यासाठी आज्ञा असतात अन् त्या अत्यंत शिस्तीने स्वयंसेवक पाळतात हे त्यांनी जाणलं होतं. वारकरी ज्या शिस्तीने ठरलेल्या मार्गावरून भजनं म्हणत शेकडो मैल चालत जाऊन विठ्ठलाचं नामस्मरण करत रांगेत उभे राहून देवदर्शन करतात व तीच शिस्त संघातही असते हे त्यांच्या लहानपणीच अंगवळणी पडलं होतं. समाज बांधण्याच्या या यज्ञात स्वतःला समिधास्वरूप करत आपणच यज्ञरूप झालेले अनेक संघप्रचारक हे त्यांचे आदर्श होते.
 
 
व्यष्टी, समष्टी नि सृष्टी या परमेष्टीतून उत्पन्न झालेल्या असून व तिच्यात त्या पुन्हा एकरूप होत असतात. हे कालचक्र निरंतर चाललेलं आहे. परमेष्टीचे अधिष्ठान असल्याने त्यांच्यांत स्वाभाविक परस्पर आत्मीयताही असते. या आत्मीयतेमुळेच व्यष्टी म्हणजे व्यक्ती ही समष्टी म्हणजे समाज व सृष्टी म्हणजे निसर्गातील परमेष्टी अर्थात आद्य निर्मात्यात एकरूप होत जाते. यालाच आत्म्याचं परमात्म्यात सायुज्य वा एकजीव होणं म्हणतात. यशवंतराव याला ’अपूर्णांकाचा पूर्णत्वाकडे वा मानवाचा देवत्वाकडे होणारा प्रवास’ म्हणत. हे देवत्व म्हणजेच माणसातील चांगुलपण असून ते प्रत्येकाला ’नराचा नारायण’ होण्याची क्षमता प्रदान करतं. त्यामुळे तो आहे तसा स्वीकारून त्याच्यावर आधी प्रेम करून, त्याला नीट समजून घेऊन एक प्रेरणादायी उद्दिष्ट त्याच्यापुढे ठेवलं तर तो मोठा होणार यावर त्यांचा ठाम विश्वास होता. एखाद्या व्यक्तीच्या गुणांचा समाजाला उपयोग होण्यासाठी त्याच्या चुकांकडे उदारपणे पाहण्याची भूमिका हा यशवंतरावांच्या संघटनाशास्त्राचा मूलाधार होता. सगळेच हवे असले तरी कुणीही अनिवार्य नाही हेही ते जाणून होते. कुंभार जशी चाकावर गरगर फिरणार्‍या ओल्या गोळयातील नको असलेली माती हलक्या हाताने अलग करून त्याला आकार देतो तसे एकेकाचे दोष दूर करीत हजारो कार्यकर्त्यांना घडविणारे ते आध्यात्मिक कर्मयोगी होते.


yashwant kelkar 
 
संघातल्या स्वयंसेवकांमध्ये असलेला कौटुंबिक जिव्हाळा त्यांना सर्वात भावला. तोच त्यांनी परिषदेतही जपला. हा कौटुंबिक जिव्हाळा आम्हाला विद्यार्थी परिषदेतही जाणवला अन् आज 61 वर्षांनंतरही तो जाणवतो आहे याचं मुख्य कारण त्यावेळी यशवंतराव व त्यांच्या सहकार्‍यांनी ही संस्कृती परिषदेत रूजवली आहे.
 
 
यशवंतरावांच्या मुंबईतील शिष्यांमधील अनेकांचा सहवास मला लाभला हे माझे परमभाग्य...कोण होते हे शिष्य? नागालँडचे राज्यपाल झालेले पद्मनाभ आचार्य, राज्यसभेचे सदस्य झालेले प्रा. बाळासाहेब आपटे, संघाचे प्रचारक व संघाच्या अ.भा. सहसरकार्यवाहपदी पोहोचलेले मदनदासजी देवी, प्रचारक म्हणून कार्यरत असताना उत्तरेत व पूर्वांचलात शेकडो शिशु विहार व प्राथमिक शाळांचे जाळे विणलेले विद्या भारतीचे शंतनु शेंडे, भारतीय मजदूर संघातील एका कामगार संघटनेची जबाबदारी घेतलेले अ‍ॅड. श्रीकांत धारप, पुढे गोमंतकात संघचालक झालेले प्रभाकर देसाई, मुंबई व कोकणातील काही शिक्षण संस्थांचा विस्तार नि विकास केलेले रविंद्र पवार अन् वर्षानुवर्षे कार्यालय सांभाळलेले सुरेशराव मोडक हे दिवंगत दिग्गज व रत्नागिरी जिल्हा प्रचारक गेलेले सुरेशराव साठे, कार्यक्रमाची आखणी, जबाबदार्‍यांचे वाटप व निर्वहन बैठकीत ठरल्याप्रमाणे व्हावे यासाठी स्वतः व इतर कार्यकर्त्यांना ’डायरी’ची सवय व शिस्त लावलेले मधु गुजराती, कोषाध्यक्ष नाना जुनागडे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, सहकार भारतीचे अध्यक्ष व रिझर्व्ह बँकेचे आर्थिक सल्लागार असलेले सतीश मराठे व ’आंतरराज्य छात्र जीवनदर्शन’ व ’मेरा घर भारत’ हे अद्भुत प्रयोग व प्रकल्प परिषदेला देणारे पद्मनाभ आचार्यांचे सहकारी दिलीप परांजपे आणि वर उल्लेख केलेले नाशिकचे विख्यात आर्किटेक्ट राजाभाऊ मोगल अशा हयात व अद्यापही सक्रीय असलेल्या सर्वांचा सहवास मला तेव्हा मिळाला हे माझे परम भाग्य आहे.
 
 
हेडगेवारकुलोत्पन्न यशवंतराव
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे आत्मीयतेने उत्पन्न होणार्‍या प्रभावांची साक्षात प्रतिमूर्ती होते. त्या एका गुणामुळेच संघविचाराने जगणार्‍या राष्ट्रसमर्पित कार्यकर्त्यांची अविरत शृंखला व संघाची विचारधारा ते निर्माण करू शकले. लहानपणी जसं आम्हाला घरच्यांनी सांभाळलं तसं कॉलेजात असताना परिषदेनं आणि मग आम्हीच या सगळ्यांना सांभाळणारे झालो. विद्यार्थी परिषदेत संघाची ही प्रक्रिया यशस्वीरित्या राबवणारे ’यशवंतराव हे हेडगेवारकुलोत्पन्न होते’ या शब्दांत 7 डिसेंबर, 1987 रोजी यशवंतराव गेल्यावर तृतीय सरसंघचालक प.पू. बाळासाहेब देवरस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
 
 
शाखेवरील प्रतिनित्य उपस्थित स्वयंसेवक ते प्रचारक यशवंतराव
 
यशवंतरावांच्या सर्वांगाने झालेल्या व्यक्तिविकासाचा मूळ स्रोत होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा नि कार्यपद्धती. वैयक्तिक जीवनातील सर्व अपेक्षांना योग्य तो न्याय देत त्यांनी मनापासून संघाने दिले ते कार्य केले. वर्षानुवर्षं नित्य शाखेतील उपस्थिती, जबाबदार्‍यांचं यशस्वी निर्वहन, बैठकींमधील चर्चेत सक्रिय सहभाग आणि कार्यकर्त्यांसह टोळीयुक्त काम करण्याची सवय, हे सर्व त्यांच्या अंगी भिनलेलं होतं. पुण्यातल्या स.प. कॉलेजजवळ भरत असलेल्या रामदास शाखेवरील बरोबरीचे स्वयंसेवक मित्र व पुढे ’ज्ञान प्रबोधिनी’ स्थापन केलेले अप्पा पेंडसे, थोर समीक्षक स.ह. देशपांडे, मिरज जवळ म्हैसाळ येथे दलित मुक्ती व सहकारी तत्त्वावर चालवलेली सामूहिक शेती इ. प्रयोग केलेले ’दलित मित्र’ मधुकरराव देवल, सामाजिक विचारवंत भा.कृ.केळकर अशांशी संघाची विचारधारा व कार्यपद्धती यांविषयी तावातावाने केलेल्या चर्चा नि वादविवाद, यांचाही खोल परिणाम त्यांच्या मनाची मशागत करण्यात झाला होता.
 
 
1945 ते 1952 या सात वर्षांत ते नाशिक व सोलापूर जिल्ह्यात प्रचारक होते. या अवधीत केलेल्या अखंड प्रवासातून खेडी व शहरे यातील जनजीवनाचा त्यांनी अभ्यास केला होता व शेकडोंशी संपर्कातून आपुलकीचे संबंध जुळवून घेतले होते. ते संघाचे ‘प्रतिज्ञित’ स्वयंसेवक व म्हणून परिषदेतही ‘आज्ञांकित कार्यकर्ते’च होते. खरे तर, संघ म्हणजे शाखा व शाखा म्हणजे कार्यक्रम, या चौकटीत राहून काम करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. परंतु त्यांच्या शाखेतील काही अशाच हरहुन्नरी स्वयंसेवकांनी स्वतंत्रपणे सुरू केलेले उपक्रम वरील एक-दोन अपवाद वगळता बहुतांशी अपयशी ठरलेले पाहून त्यांनी निमूटपणे चौकटीच्या मर्यादा सांभाळत, मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीतच नवीन ऊर्जा फुंकली नि त्यात यशस्वी झाले. संघ ही एक वर्षानुवर्षे विचारपूर्वक ठरलेलेे कार्यक्रम करणारी व त्यातून सामर्थ्यवान होत गेलेली संघटना आहे आणि तिची या विशाल नि बहुआयामी जीवनाकडे चौकस नि चौफेर नजरेने पाहणारी दृष्टी असल्याने, चाकोरीबाहेरचे व चौकट ओलांडून वेगवेगळे उपक्रम करणार्‍या परिवारातील संघटना हजारो सेवा प्रकल्प चालवत आहेत याचा त्यांना विलक्षण अभिमान होता.
 

yashwant kelkar 
 
व्यवस्थापन कौशल्य नि टीमवर्क
 
सोलापूरला प्रचारक असताना यशवंतरावांची जिल्ह्याचे काम पाहणार्‍या रामभाऊ म्हाळगींशी छान गट्टी जमली होती. नंतर दोघांकडे जनसंघाचे काम आल्यावर रामभाऊंनी यशवंतरावांना 1953 ते 1955 या अवधीत महाराष्ट्र प्रांताचे कार्यालय मंत्री म्हणून नियुक्त केले. या किचकट व कंटाळवाण्या कामाची त्यांनी तेव्हा व नंतर परिषदेत अशी काही व्यवस्था लावली होती की, हौशीने ही जबाबदारी घ्यायला नंतर कुणीही कार्यकर्ता तयार होऊ लागला. अधिवेशन जवळ आले की, आम्ही त्यांच्या घरातील कार्यालयात रात्ररात्र त्यांच्याशी गप्पा मारत काम करत असू. तेव्हा शिकलेले व्यवस्थापन कौशल्य आम्हाला पुढे जन्मभर उपयोगी पडले.
 
 
कुठल्याही कार्यक्रमात त्याची जबाबदारी घेतलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना सहकार्य करण्यास यशवंतराव तत्पर असत. कार्यक्रमाच्या पूर्वयोजनेची व कार्यक्रम आटोपल्यावर त्याच्या अनुवर्तन योजनेची मार्गदर्शिका असणारे ’पुस्तक’ आधी तयार झाले असेल हे ते जातीने पाहत.
 
 
कार्यक्रमाचे त्याचे म्हणून महत्त्व असतेच पण दुसरे मुख्य प्रयोजन हे कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी होण्यास वाव देऊन नवे कार्यकर्ते जोडणे व प्रशिक्षण देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा विकास व्हावा, यासाठी त्यांनी कार्यक्रम प्रमुख व त्याच्याबरोबर काम करणारी नव्या व जुन्या कार्यकर्त्यांची टीम उभी करण्याची परंपरा सुरू केली. त्यातून नवख्यांना कार्य, कार्यपद्धती व टोळीयुक्त काम करण्याचा बहुमोल अनुभव मिळे.
 
 
परिषदेतील अन्य कामांसाठीही ’टीमवर्कचा’ म्हणजे संघात त्यांच्या अंगवळणी पडलेल्या गटपद्धतीचा ते प्रयोग करीत. परिषदेतील बैठकीत मांडायचा विषय, त्याचा विस्तार व समारोप यांवर ते एका अनौपचारिक बैठकीत आधी अनुभवी कार्यकर्त्यांशी चर्चा करीत व बैठक जणू गाण्याची असावी तशी ते रंगवत. अधूनमधून हास्यविनोदाचा शिडकावा करीत सगळ्यांच्या विचाराने निर्णय घेत आमची मर्जीही ते सांभाळायचे.
 
 
सुट्टी, निरर्थक गप्पा, वादविवाद, कुणाला दुखावणारी टिपण्णी किंवा न विचारता दिलेला सल्ला, यांपासून ते नेहमीच दूर राहायचे. स्वीकारलेले प्रत्येक काम यशवंतराव आनंदाने, लक्ष देऊन, ठरलेल्या वेळेत व परिपूर्णतेने करत. परिणामी त्यांच्यापाशी स्वतःच्याआवडींसाठी भरपूर उसंत नि ऊर्जा शिल्लक राहायची. तिचा उपयोग उत्तम वाचन, मनन, चिंतन व कार्यकर्त्यांशी ’बोलणं’ करण्यात घालवीत. ’यशवंतरावांकडे आमच्यासाठी वेळच वेळ असतो’ असे आम्हां सगळ्यांना वाटायचे. ते अनेकदा हातातलं काम बाजूला ठेवून आमचं बोलणं संपेपर्यंत शांतपणे व डोळ्याला डोळा भिडवून लक्ष देऊन ऐकायचे. अखेर आमचा मुद्दा कळाल्याचं त्यांच्या चेहेर्‍यावर दिसायचं व ते उत्साहाने एक भुवई सावकाश वर ताणत उद्गारत,‘बरोबर!’ तेव्हा आम्हाला त्यांच्या उत्फुल्लतेचं आश्चर्य वाटून कुठेतरी आपलं चुकलं असावं असं मनात येऊन त्याच विषयावर वेगळाच मुद्दा तितक्याच हिरीरीनं आम्ही मांडायचो. त्यावरही त्यांची प्रतिक्रिया ‘बरोबर!’ अशीच असे.
 
 
हा संवाद ऐकणारा एखादा कार्यकर्ता त्यावर भिन्न मत प्रकट करायचा. त्यावरही ते ‘बरोबर’चा शिक्का मारत. मी एकदा त्यांना याचं स्पष्टीकरण विचारलं. ते म्हणाले, ‘असं समजा की, या खोलीत मधोमध एका टेबलावर एक मोठा लोलक ठेवलेला आहे. मला त्यात जे काहीतरी दिसतं त्यापेक्षा तुम्हाला तुमच्या जागेवरून वेगळंच दिसतं व ते तुम्ही वर्णन करता. मी आधी ते नीट ऐकतो. तेवढ्यात तुम्ही जरा सरकून त्या लोलकात नव्यानं जे दिसतं ते सांगता आणि हे ऐकणारा कुणी दुसरा त्याला त्याच्या जागेवरून त्याला दिसतं ते. तुम्हा सर्वांच्या प्रामाणिकपणावर माझा पूर्ण विश्वास असल्याने तीन ठिकाणी दिसणारी दृश्यं मला बसल्या जागी कळतात व मी त्यावर ’बरोबर!’ असा शेरा मारतो.’ लोलक हे एखाद्या विषयाचं प्रतीक आहे. त्याचे विविध पैलू उलगडले तर प्रत्येकाचा त्याकडे पाहायचा दृष्टिकोन ध्यानी येईल व सर्वांनी मिळून त्यावर काही निर्णय घेता येईल. बैठकीत न आलेल्या कार्यकर्त्यांविषयी नकारात्मक चर्चा होऊ न देण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. अशा कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून त्याची मतं समजून घेण्याची त्यांची सवय होती. बैठकीत एखादा कार्यकर्ता गप्प-गप्प वा उदासीन असला वा तावातावाने बोलला तर ते त्याची नोंद घेत व नंतर भेटून प्रेमाने विचारपूस करून त्याचं समाधान करीत.
 
 
इतकंच नाही तर ती व्यक्ती बैठकीत नसली तरी तिचं म्हणणं काय असू शकेल याचं अनुमान अशा आधीच्या अनुभवांवरून लावता येतं व नाव न घेता सामूहिक निर्णयात ते सामील करण्याचा पर्याय हाताशी असतो. ’टीमवर्क’साठी हा अभ्यास आवश्यक आहे. ही टीम विकसित होण्यासाठी संघटनेत प्रत्येक कामासाठी योग्य कार्यकर्ता व प्रत्येक कार्यकर्त्याला कुठलं तरी काम सुपूर्त करण्याचे दर वर्षी नवनवे प्रयोग करून पाहिले जात. त्यात उत्तेजन मिळाल्याने आम्ही दिलेलं काम आनंदाने करायचो. याखेरीज, कोणतीही परिषदेच्या कामाशी संबंधित, गुंतागुंतीची वैयक्तिक वा कौटुंबिक समस्या असो, ते तिच्या परिहारासाठी तयार उत्तर देण्यापेक्षा आम्हाला विचार करून, पर्यायी उपाय शोधण्याची प्रक्रिया शिकवीत व मग आम्हाला मोकळं सोडून देत. परिणामी आम्हीच आमचं उत्तर शोधून परतायचो व स्वतःला सावरायचो. हीच शिकवण आम्ही जन्मभर जपली. अनेक संकटं आली, पण संयम नि मानसिक समतोल आम्ही कधी गमावला नाही आणि संकटांचा सामना करत स्वतःला सावरत पुन्हा त्या त्या कामात झोकून दिलं.
 
 
त्यांच्याकडे असलेला सकारात्मक नि सर्जनशील दृष्टीकोन हा संसर्गजन्य होता. ते जवळपास असले की आमच्यात उत्साह संचारायचा. आम्ही सामान्य माणसंच होतो, पण आपण काहीतरी असामान्य काम करत आहोत, हा आत्मविश्वास त्यांनी आम्हाला दिला व तो जन्मभर आमचं बलस्थान ठरला.
 
 
मुंबापुरी ही एकीकडे सगळ्यांना सामावून घेणारी, स्वप्नवत वाटणारी झगमगती यक्षनगरी होती, तर दुसरीकडे, ते एक गोंधळात टाकणारं अन् भ्रमनिरास करणारं, परकं वाटणारं महानगरही होतं. माझ्यासारखे बाहेरगावाहून शिकायला आलेले, साधे, कोवळ्या वयातले निरागस तरुण इथे येणार्‍या दोन विभिन्न जगांशी जुळवून घेत आपलं मानसिक संतुलन राखून कधी हसत तर कधी रूसत पण तरी धैर्याने जगत होतो. आम्हाला विद्यार्थी परिषदेमध्ये गावगाड्याच्या ओळखीची आपुलकी मिळाली, जगायचं एक उदात्त प्रयोजन लाभलं व स्वतःला सांभाळून हसत खेळत जगण्याची जादूची कांडीही यशवंतरावांनी दिली.
 
 
संघटनशास्त्री यशवंतराव
 
गांधीहत्येनंतर संघावर पहिला निर्बंध आल्यावर देशभर चालत असलेल्या संघाच्या रोजच्या शाखा बंद पडल्या. अशा वातावरणात पुन्हा लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी अन् मोठ्या संख्येने हाताशी आलेल्या तरुणवर्गाला संपर्कात ठेवण्यासाठी ज्येष्ठ संघप्रचारक बाळासाहेब देवरस यांच्या सूचनेवरून शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना अधिकृतरित्या 9 जुलै,1949 रोजी दत्तोपंत ठेंगडी आणि दत्ताजी डिडोळकर या प्रचारकांनी सुरू केली.
 
 
विद्यार्थी परिषदेची भविष्यातील वाटचाल आणि तिचे विकसित रूप पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, संघबंदी हे जरी तात्कालिक निमित्त असले तरी देशाची स्वातंत्र्योत्तर स्थिती व तरुणांचे राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान हा दूरगामी विचारही परिषदेच्या स्थापनेमागे होता. संघबंदी उठल्यानंतर परिषदेचे विसर्जन न होता ती चालूच राहिली ही गोष्टच विलक्षण दूरदर्शित्वाची आहे. परिषद ही बंदीकालापुरती तात्पुरती व्यवस्था नव्हती हे त्यामुळे ध्यानात येते.
 
 
स्थापनेबरोबरच ज्या प्रमुख शहरांत परिषदेचे काम सुरू झाले त्यांपैकीच एक मुंबई होय. परिषदेचे कार्य ज्ञान, चारित्र्य व एकता या त्रिसूत्रीवर आधारलेले होते. स्थापनेनंतर सुमारे दशकभर हे काही प्रासंगिक कार्यक्रम व उपक्रमांपुरते मर्यादित होते.
 
 
मुंबईतील काम रुपारेल, रुईया व पोदार या फक्त तीनच महाविद्यालयांत चाललेले होते. 1949 ते 1958 या काळात एक सूत्रबद्ध, सुसंघटित, निश्चित सैद्धांतिक भूमिकेवर आधारित असे परिषदेचे स्वरूप नव्हते. या काळात माधव परळकर, पद्मनाभ आचार्य, शशी गाडगीळ, अरुण साठे, दिलीप परांजपे, अरविंद वैशंपायन, मधू जोशी व प्रा. दादा पुणतांबेकर अशा कार्यकर्त्यांचा एक गट मुंबईतील कामात सक्रिय होता. विवेकानंद जयंती, कालिदास जयंती, लो. टिळक पुण्यतिथी असे निवडक कार्यक्रम करण्यावर विशेष भर या काळात असे.
 
 
1958-1959 मध्ये यशवंतरावांकडे परिषदेची जबाबदारी आल्यानंतर मात्र त्यांनी वरील साधे व सोपे कार्यक्रम अतिशय सुनियोजित पद्धतीने आखून, त्यातील लहानमोठ्या जबाबदार्‍या माझ्यासारख्या नव्या कार्यकर्त्याला देत त्यांचे निर्वहन त्यांच्या तालमीत तयार झालेल्या अनुभवी स्वयंसेवक कार्यकर्त्यांच्या मदतीने केले. यातून सतत नवनवे कार्यकर्ते मिळत गेले आणि शिक्षण संपलेले विद्यार्थी सोडून गेले तरी परिषदेचं कार्य वाढतच गेलं व तिला आजचं तिचं विराट रूप हळूहळू प्राप्त होत गेलं.
 
 
देशकाल, सामाजिक परिस्थिती व आपले कार्य याचे सतत भान ठेवून आपल्या कार्याची दिशा व पुढील पाच वर्षांचे कार्यक्रम निश्चित करण्यासाठी दर चार वर्षांनी ’विचार बैठका’ (अभ्यास वर्ग) घेण्याचा उपक्रम यशवंतरावांनी सुरू केला. विद्यार्थी परिषदेच्या अशा अभ्यासवर्गाचं प्रारूप (ड्राफ्ट्) शाखेपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा खूप उपयोग झाला.
 
 
यशवंतराव कुठल्याही अभ्यासवर्गातील सगळे विषय स्वतः घेत नसत. प्रत्येक विषयाचे प्रारूप व्हावे, त्यात दर वेळी नवी भर घालून ते नव्याने लिहिले जावे असा प्रघात होता. लिखित प्रारूप देण्याची प्रथा त्यांनी आग्रहाने सुरू केली. परिषदेची प्रत्येक शाखा, तिची क्षमता, कार्यक्रमातून कार्य, आंदोलने, निवडणुका, सहभागातून भूमिका, सामाजिक दायित्व, समता, सामाजिक परिवर्तन, स्त्री शक्ती, आपली सैद्धांतिक भूमिका, कार्यकर्ता व आपली प्रतिमा अशा अनेक विषयांवरची प्रारूपे त्यांच्या आग्रहाने साकार झाली. पूर्णकालीन कार्यकर्ता ही संकल्पना, त्यामागील भूमिका, व्यवहार व आदर्श या बाबतीत ते आग्रही होते. पूर्णवेळ निघणार्‍या कार्यकर्त्यांशी सुरुवातीलाच चर्चा व त्यांना मार्गदर्शन करण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली.
 
 
चित्ताकर्षक चाकोरीबाहेरच्या योजना व कार्यक्रमांच्या अभिनवतेचा ध्यास असलेल्या स्वागतशील यशवंतरावांनी वैविध्यपूर्ण कार्यक्रम व उपक्रम संघटनेच्या चौकटीत बसवून परिषदेची मूळ उद्दिष्टे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे त्यांवरील ध्यान अन् त्यांची भव्य दिव्य असे काहीतरी करून दाखवण्याची हौस या दोन्हींचा सांभाळ केला. त्यांनी एकेका कार्यकर्त्याला गाठून प्रेमाने व नीट समजावून सांगितल्याने हे घडले. आम्ही सहकारी नि अनुयायीही त्यांचं अनुकरण करत गेलो व त्यातून कामात यश मिळत गेल्याने ते अधिक उत्साहाने करू लागलो. साहचर्य रजनी (फेलोशिप नाईट), ’इंडो फॉरेन स्टुडंट्स ब्युरो’, सुट्टीतील रोजगार योजना, आंतरराज्य छात्र जीवनानुभव व ’मेरा घर भारत’, वनवासी भागात जाऊन सर्वेक्षण व श्रमानुभव अशा सार्‍या देशाचे लक्ष वेधून घेणार्‍या, वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणार्‍या, स्मृतिमंजूषा ही त्याची काही वानगीदाखल उदाहरणं.
 
 
मुंबईतील स्थानिक कामाबरोबर प्रांत व देशभर प्रवास करणार्‍या अनुभवी कार्यकर्त्यांची एक फळी सतत तयार होत गेली व यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचं काम सर्वदूर पसरत गेलं. ते स्वतः शनिवार-रविवारी प्रवास करून जागोजागीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करीत व बैठका घेत आणि रात्रभर परतीचा प्रवास आटोपून सोमवारी सकाळी वेळेवर कॉलेजात हजर राहात. तीच गोष्ट प्रा. बाळासाहेब आपटे, डॉ. अशोकराव मोडक, डॉ. बापू केंदुरकर यांचीही. मला प्रा. अशोक खांडेकर, प्रा. दा सी. देसाई, सुरेन्द्र धारप, विश्वास देशपांडे व अंजली परचुरे ही प्रदेशातील कार्यकर्ते मंडळी व गुजरातचे प्रा. नारायणभाई भंडारी व वसंतराव खोखाणी, कर्नाटकातील प्रा. कृष्ण भट व आज संघाचे सरकार्यवाह असलेले दत्तात्रेय होसबाळे, प्रा. गिरिराज किशोर, राजकुमार भाटिया, गोविंदाचार्य, रविकुमार अय्यर अशा प्रवासी कार्यकर्त्यांना मुंबईत भेटल्याचं आठवतं.
 
 
1965 साली माझ्यासारख्या अननुभवी, नवख्या कार्यकर्त्याला माझा एकूण कल पाहून प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला नेण्याचा, त्या बैठकीचे प्रमुख प्रा. बाळासाहेब आपटेंनी इतरांशी बोलून, निर्णय घेतला व नेलं. याच बैठकीत द.मा.मिरासदारांना भेटल्याचा माझ्यावर झालेला दीर्घकालीन परिणामही मला चांगलाच आठवतो. 1968 साली मला वर्षभरासाठी पूर्णकालीन कार्यकर्ता जाण्याचा आग्रह पद्मनाभ आचार्य यांनी केला. त्या अवधीत शीव ते शिवडी व पार्ले ते परळ या दक्षिण मध्य मुंबईतील भरगच्च रहिवासी भागात चालत व सायकलने तासन्तास फिरून शेकडो कुटुंबांशी मी संपर्क ठेवला. कार्यकर्त्यांच्या घरी चाळींमध्ये मी एक रात्र राहातही असे. सर्वसामान्य मुंबईकर परस्पर सहकार्याने इथलं कष्टप्रद, दगदगीचं आयुष्य कसे आनंदाने जगतात हे पाहून मला कौटुंबिक जीवनातील सुखाचा मूलमंत्र सापडला व पुढे आर्किटेक्ट म्हणून प्रॅक्टिस करताना हा ’हॅपिनेस कोशंट’ असेल अशी शेकडो घरं डिझाईन करून मी क्लायंट्सची दुवा मिळवली!
 
 
पद्मनाभजी आचार्यांबरोबर एका अधिवेशनाच्या तयारीसाठी अहमदाबादला ’प्रवासी कार्यकर्ता’ म्हणून अनोळखी प्रदेशात जाण्याचं धाडस केल्याचंही माझ्या लक्षात आहे.
 
त्याच वर्षी यशवंतरावांच्या सूचनेवरून मी सुधीर जोगळेकर यांच्याबरोबर मुंबईत शिकणार्‍या ’नेफा’च्या वीसेक मुलामुलींना दुर्गम प्रदेश अरुणाचलातील त्यांच्या गावी आईवडिलांच्या हाती सुरक्षितपणे पोहोचवण्याचं कामही हिमतीने निभावलं. नंतर त्यांनीच मला पुण्यास ’संघ शिक्षा वर्गाच्या प्रथम वर्गाला’ही पाठवलं व मी एक ’प्रशिक्षित व प्रतिज्ञित’ संघ कार्यकर्ता झालो !
 
प्राध्यापक आणि पालक यशवंतराव
 
’सत्ता’ व ‘संपत्ती’ या दोन्ही गोष्टी ‘अर्थ’ या पुरुषार्थाशी म्हणजे एका मूलभूत कर्तव्याशी निगडित आहेत. या दोन्हीसाठी वेळेवर पास होणे, आपल्या पायावर उभे राहाणे व पुढील गृहस्थाश्रमाची जबाबदारी घेण्याची पात्रता मिळवणे हे विद्यार्थ्यांचं पहिलं कर्तव्य आहे हे यशवंतराव आवर्जून सांगत. प्राध्यापक म्हणून व पालक म्हणून ते विद्यार्थ्यांचं वर्तमान आणि भवितव्य सांभाळत असत. त्यांनी स्वत:ही जेवढा शक्य होता तितका कसून अभ्यास केला नि एम.ए.ला ते पहिले आले. वर्षभराने वांद्रे येथील नॅशनल कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांची उदंड ख्याती होती. अफाट वाचन, दीर्घ व्यासंग नि अनेक उदाहरणं देत शिकवण्याची कला, यामुळे ते त्यांच्या विद्यार्थ्यांत विलक्षण लोकप्रिय होते. शिवाय वक्तशीरपणा, अनुशासन, सर्वांबरोबर संपूर्ण सहकार्य व सौहार्दपूर्ण व्यवहार यांमुळे भिन्न राजकीय मतांच्या प्रा. चंपाताई लिमये वा रुईयातील प्रा. वसंत बापट या इतर कॉलेजातील अध्यापकांच्याही ते आदरास पात्र झाले होते. खेरीज व्यवस्थापन कौशल्यामुळे ते काही वर्षे कॉलेजात उपप्राचार्यही होते. विद्यार्थी परिषदेतील शिक्षक नि अध्यापक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर प्राध्यापक यशवंतराव हा प्रत्यक्ष चालताबोलता आदर्श होता.
 
 
त्यांनी ऐहिक जीवनात व सामाजिक कामात अधिकाधिक जबाबदार्‍या सांभाळूनच उच्च पदं प्राप्त केली होती. परंतु ते स्थान हे लोकात मिरवण्यासाठी नसून विनम्रपणे ’ही नवी जबाबदारी मी आत्ता स्वीकारत आहे याचा अर्थ, आजपासून मी तुमच्यापैकीच असलेला पण अग्रेसर असणारा एक कार्यकर्ता आहे’ असं ते कृतीतून दाखवून देत. इंदूरच्या अखिल भारतीय अधिवेशनात नव्या पदांच्या घोषणा जाहीर होण्याचा मुख्य कार्यक्रम सुरू होण्याआधी स्पीकरवरून व्यासपीठाशेजारी पडलेला कचरा स्वच्छता प्रमुखांनी ताबडतोब दूर करावा, अशी सूचना ऐकू येताच नियोजित अध्यक्ष म्हणून प्रेक्षागृहात सर्वात पुढे आसनस्थ असलेले यशवंतराव, चटकन् उठून धावत जात खाली वाकून केर उचलायला लागलेले जसे आम्ही पाहिले तसेच अध्यक्षपदी बसल्यावर संध्याकाळी शोभायात्रेत उघड्या कारमध्ये हार घालून आपण उभे न राहता स्वामी विवेकानंद नि सरस्वतीच्या मूर्ती ठेऊन, स्वतः पायी चाललेले हे परिषदेचे पाईकही इंदूरकरांनी पाहिले! संपत्तीच्या विषयात ते ’गरिबीची ऐट बाळगणारे’ समाजसेवकही नव्हते व ’श्रीमंतीचा थाट मिरवणारे’ नेतेही नव्हते. आम्ही त्यांना सुटाबुटात कधी पाहिलं नाही. आधी सायकलने व मग सेकण्ड हॅण्ड स्कूटरने ते कॉलेजला वेळेवर जाऊन यायचे.
 
 
यशवंतरावांचा गृहस्थाश्रम
 
परस्परांवर अनुरक्त झालेले स्त्री-पुरुष विवाहबद्ध झाले व नंतर त्यांच्यातील संबंध उत्तम असले तर त्यातून निपजणारी संतती ही स्वस्थ व सद्गुणसंपन्न असते अन् अशा कुटुंबात परस्पर जिव्हाळा असतो. अशी सुखाने नांदणारी कुटुंबं असलेल्या समाजातून चारित्र्यवान, सेवाभावी, राष्ट्रभक्त व कर्तृत्ववान नेतृत्व उद्वभते. त्याच्यावर विश्वास ठेवून सामूहिक प्रयत्नांनी राज्यात कल्याणकारी शासन लागू होते व त्यातून राष्ट्र हे परमवैभवास पोहोचते अशी संघाची विचारधारा आहे. यशवंतरावांवर याचा प्रदीर्घ परिणाम झाला. त्यामुळे एम.ए.पर्यंत शिक्षण, कॉलेजात नोकरी अन् राहायला बर्‍यापैकी घर अशी तयारी झाल्यावर यशवंतरावांनी ठरवून त्यांच्या आतेभावाची मुलगी प्रा. शशिकला दीक्षित यांच्याशी प्रेमविवाह केला. नंतरच्या काही वर्षांत आलोक, न्यायस्वरूप व शशिधर या तीन मुलांचं संगोपन, एक आश्रित मुलगी व अंध झालेल्या वृद्ध आईला सांभाळण्यासाठी शिवाजी पार्कसारख्या भागात त्यांनी लवकरच मोठी सदनिका घेतली. घरकामं वाटून घेत टुकीने पण मजेत संसार केला, अनेकांना आश्रय व प्रवासी कार्यकर्त्यांना मुंबईत टेकायला एक हक्काचं ठिकाण दिलं. नारीशक्तीवर लंबीचौडी भाषणं न देता ते स्त्रियांशी नेहमीच बरोबरीने, प्रेमाने व आदराने वागत. परिषदेतील प्रत्येक कार्यकर्तीस ते आपल्या लेकीसारखं मानत. घरात वहिनींना घरकामांत व स्वयंपाकात हातभार लावत. मुलांबरोबर ते व वहिनी भाजीपाला आणायच्या निमित्ताने बाहेर फिरून येत. जेवायला मुद्दाम सगळे एकत्र बसत. असंख्य व्याप सांभाळूनही घरात असले की यशवंतराव फक्त घरच्यांचे असत. मुलांवर याचा खूप चांगला संस्कार होत असे.
 
कार्यकर्ता-कार्यकर्ती संबंध आणि यशवंतराव
 
त्या सोळा ते सव्वीस वर्षांच्या वाढत्या वयात आमच्या काही वेगळ्याच व्यथाही होत्या. ’काम’ म्हणजे कामवासना एवढाच संकुचित अर्थ समजण्याचं ते आमचं वय होतं. तो एक पुरुषार्थ म्हणजे जीवनावश्यक कर्तव्य आहे व त्यात पुढील ’गृहस्थाश्रमाची’ जबाबदारी, त्यासाठी शैक्षणिक पात्रता, कौशल्य विकास व उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्याच्या सिद्धतेच्या ’बह्मचर्याश्रमात’ आम्ही आहोत याची आम्हाला तेव्हा समजही नव्हती आणि या गोष्टी गांभीर्यानं घेण्याइतके आम्ही मनाने परिपक्वही नव्हतो. कॉलेजातील काही मुलामुलींनी आपापसात लग्ने केली, याचं आम्हाला कौतुक वाटलं होतं. देशभक्तीने प्रेरित होऊन नाही तर कुणी मित्रानं आग्रह केला म्हणून आम्ही परिषदेत गेलो व तेथील कार्यक्रम, सुविचार व वातावरण यात तरुण मुलंमुली जणू काही एकमेकांची दूरदूरची भावंडं असावीत तशी बरोबर व बरोबरीने काम करत होती, हे पाहून रमून गेलो.
 
 
संघ केवळ पुरुषांसाठी आणि महिलांसाठी राष्ट्र सेविका समिती अशी देशभर विभागणी असली तरी संघाच्या ’परिवार’ संघटनांमध्ये मात्र स्त्रीपुरुष एकत्र काम करत आले आहेत. यशवंतरावांच्या पुढाकाराने परिषदेतही विद्यार्थिनींचा समावेश होऊ लागला आणि मग काही कार्यकर्त्यांच्या कॉलेजात शिकणार्‍या बहिणी आणि त्यांच्या मैत्रिणी परिषदेत येत राहिल्या. इतकंच नाही तर त्यांची उपस्थिती ही शोभेपुरती न रहाता त्या ही उत्तम कार्यकर्त्या झाल्या. निर्मला धारप म्हणजे प्रा. बाळासाहेब आपटेंशी लग्न झाल्यावरची उर्मिला आपटे हिने आणि विश्वास देशपांडेशी लग्न झाल्यावर अंजली परचुरे हिने स्त्रीशक्तीचे काम घेतले व उभय दंपतींनी मिळून बरोबर व बरोबरीने सामाजिक काम केले. गीता गुंडे उच्च पदावरील नोकरी सोडून विवाह न करता जन्मभर समन्वयाचे काम करीत आली आहे. अनेक विद्यार्थिनी ’पूर्णवेळ कार्यकर्त्या’ही झाल्या, यामागेही यशवंतरावांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन याचा प्रमुख भाग आहे. ‘कार्यकर्ता व कार्यकर्ती यांच्यातील संबंध’ याबाबत यशवंतरावांचे विचार अत्यंत समंजस नि आधुनिक होते. ते म्हणत, ‘एका वातावरणात एकत्र वाढलेले, एकमेकांना समजून घेतलेले दोघे जर लग्न करणार असतील तर त्यांनी लगेच परिषद सोडून आधी आपल्या पायावर उभे राहावं नि सरळ लग्न करावं. त्यांना मी मदत करीन. सुखी व निरोगी कौटुंबिक जीवन हे समाजाचं वैभव आहे. या विश्वासामुळे मी आधीही अनेक कार्यकर्त्यांचे विवाह संघपरिवारात वाढलेल्या कन्यांशी घडवले आहेत. माझंही लग्न ‘पूर्वपरिचित विवाहाचं’ उदाहरण आहे. पण आता मला संघटना सांभाळायची आहे.’
 
मुंबईतील परिषदेचं काम सोडून मी दूर धारवाडला गेलो, अल्पावधीतच आर्किटेक्ट म्हणून व्यवसायात स्थिरस्थावर झालो. संघाचा कार्यवाह व ’प्रणामाचा अधिकारी’ झालो आणि यशवंतरावांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून परिषदेच्या गुरुकुलातील त्यांच्या शिष्या उज्ज्वला वेलणकर या त्यांच्या मावसभावाच्या मुलीशी लग्न करून त्यांच्या आशीर्वादाने सांसारिक आणि सामाजिक जीवनात पुढे यशवंतही झालो.
 
वंदनीय यशवंतरावांना अर्पण केलेली माझी ही गुरुदक्षिणा आहे!