संस्कृतीचा नंदादीप

विवेक मराठी    24-Oct-2025
Total Views |
 @ शैलेंद्र कवाडे 
संस्कृती म्हणजे फक्त धर्म नाही, संस्कृती म्हणजे फक्त देव आणि पूजापद्धती तर मुळीच नाही. पण संस्कृती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची आणि त्याला बिलगून येणार्‍या जगण्याची आठवण, संस्कृती म्हणजे आपल्या इतिहासाला आपल्या वर्तमानाशी जोडणारा धागा. या सार्‍यातून भारतीय संस्कृती नांदत राहिली. उण्यापुर्‍या साताठशे वर्षांच्या अंधारयुगातही हा नंदादीप तेवत राहिला. त्याची ज्योत थरथरली पण विझली नाही, कारण तिच्या मुळाशी हजारो वर्षांत कमावलेले शहाणपण होते, राखेतून पुन्हा पुन्हा जिवंत होण्याचा अनुभव होता. मात्र या कालखंडात आपल्या संस्कृतीत शिरलेले न्यून दूर करण्याची जबाबदारी आपली आणि जे मंगल आहे ते टिकवण्याचे कर्तव्यही आपलेच आहे. आपण सगळे मिळून हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडूया आणि संस्कृतीचा हा नंदादीप असाच तेवत ठेवूया.

Nandadeep
 
संस्कृती म्हणजे जगण्याची पद्धत. संस्कृतीची याहून सोपी पण तरीही सर्वसमावेशक व्याख्या कदाचित दुसरी नसेल. माणसं जगताना जी घडत जाते ती म्हणजे त्या माणसांची संस्कृती. हे जगणे, ही जगण्याची पद्धत त्या समाजाच्या मातीतून आणि मतीतून उगम पावते आणि पुढच्या पिढीत वाहत जाते.
 
 
जिवंत संस्कृतीला अनेकदा वाहत्या नदीची उपमा दिली जाते, जी अनेक अर्थांनी खरी आहे. नदीच्या प्रवाहातील पाणी बदलत जाते पण धार सलग असते. तिच्या किनार्‍यावरचे काठ आणि घाट तेच राहतात, तिची वळणं तशीच राहतात. ती उफाणली तरीही परत पात्रातच येते आणि उन्हाळ्यात सुकली तरी जमिनीत जिवंत असते.
 
 
साधारण दहा-बारा हजार वर्षांपूर्वी जगाच्या अनेक भागात शेतीचा शोध एकाच वेळी लागला आणि टोळ्यांत राहणारा माणूस वसाहतीत राहू लागला. गावं वसू लागली, सीमेवर काळी आणि पांढरीची रेष उमटू लागली आणि समाज घडू लागला. शिकारीमागे फिरणारा माणूस स्थिरावत गेला तशा त्याच्या जगण्याच्या पद्धतीही पक्क्या होत गेल्या, त्याच्या वागण्याच्या पद्धती ठरत गेल्या. जगाच्या अनेक भागात अनेक संस्कृती जन्माला आल्या.
 
 
मात्र त्या सगळ्याच टिकल्या नाहीत, वाहत्या राहिल्या नाहीत. काही परकीय आक्रमणात तुटल्या, काही नैसर्गिक आपत्तीत वाहून गेल्या. काही कदाचित गैरसोयीच्या वाटल्याने मागे पडल्या आणि नष्ट झाल्या. त्यांचा धागा तुटला, प्रवाह आटला. माणसं जगत राहिली पण त्यांची जगण्याची पद्धत बदलली. त्यांची संस्कृती बदलली.
 
 
मात्र जगभर कमीतकमी दोन संस्कृती अशा आहेत ज्या खर्‍या अर्थाने प्राचीन आहेत, एक चीनची आणि दुसरी भारताची. या दोनही भागातील लोकांच्या जगण्यात, त्यांच्या चालीरितीत, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत आजही तो जुना धागा जिवंत आहे, तो जुना प्रवाह वाहता आहे.
 
 
किती जुना आहे हा धागा? किती मागे जातो हा प्रवाह?
 
आपण सध्या भारताबद्दल विचार करूया.
 
भारतीय संस्कृती म्हटली की अनेकदा आपण वेदांना तिचे उगमस्थान मानतो. काही लोक सिंधू संस्कृतीला वेदांपेक्षा वेगळे मानतात, जास्त प्राचीन मानतात. हा काळ फारतर पाचेक हजार वर्ष मागे जातो पण त्यापूर्वी इथे काय होतं, कोण होतं, कोणती संस्कृती होती?
 
 
आजच्या मध्यप्रदेशात सोन नदीचे खोरे आहे. अमरकंटकला उगम पावणारी ही नदी पूर्वेकडे वाहत शेवटी गंगेला मिळते. ह्या खोर्‍यात मेधौली नावाचे एक गाव आहे. 1980 साली काही पुरातत्व संशोधकांनी तिथे उत्खनन केले. साधारण अकरा बारा हजार वर्षांपूर्वीचा, अश्मयुगीन शस्त्र तयार करण्याचा एक कारखाना त्यांना तिथे सापडला. पण तिथे जी दुसरी गोष्ट सापडली त्याचे त्यांना प्रचंड आश्चर्य वाटले.
 

Nandadeep  
 
त्या अवशेषाला आज बघोर स्टोन किंवा बघोर माई म्हणतात. साधारण त्रिकोणी आकाराचा एक नैसर्गिक अश्मावशेष, जो आतमध्ये तिपेडी होत जातो. त्याच्या गाभ्याशी पिवळ्या रंगाने रंगवलेले आहे आणि त्याचा नैसर्गिक आकार एखाद्या देवीच्या मूर्तीसारखा आहे. ह्या बघोर माईला एका गोलाकार मंचावर स्थापित केले आहे आणि तिच्या भोवती बहुदा विविध प्रकारच्या पूजा होत असाव्यात असा अंदाज आहे. अनेक संशोधकांच्या मते भारतातील काली पूजेची, शक्ती पूजेची ही सगळ्यात पहिली खूण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही आसपासच्या कित्येक गावात अशाच स्वरूपातील, अशाच अश्मकांची पूजा मांडली जाते. त्या देवीला आता माई म्हणतात. थोडक्यात भारतीयांची शक्तीची, कालीची, माईची उपासना कमीतकमी अकरा हजार वर्ष जुनी आहे आणि अजूनही सुरूच आहे. कधी ती बंगालमध्ये काली असते, आसामात कामाख्या असते, महाराष्ट्रात महालक्ष्मी असते तर उत्तरेत शेरावाली असते. त्या अकरा हजार वर्षं जुन्या माईची पूजा आजही सुरूच आहे, भारतीय संस्कृती आजही तिला सांभाळून आहे.
 
 
भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या मूर्तिपूजेची, मूर्तिकलेची, मूर्तींच्या उपासनेची ही बहुदा सुरुवात असावी. संस्कृतीला जेव्हा आपण आपल्या जगण्याची पद्धत म्हणतो तेव्हा कोणत्याही संस्कृतीला एकत्र बांधून ठेवणार्‍या श्रद्धांचा, रुढींचा आणि परंपरांचा विचार करावा लागतो आणि ह्या तीनही गोष्टी देव या संकल्पनेशिवाय अधुर्‍या आहेत. आस्तिक-नास्तिक या वादात न जाताही हे मान्य करावे लागते की माणसांचा समाज देवाच्या उपासनेभोवती जितका रमतो तितका फार थोड्या गोष्टींभोवती रमत असेल. समाजाच्या श्रद्धा हा संस्कृतीचा सगळ्यात चिवट धागा असतो आणि देव हे त्या श्रद्धेचे प्रकटीकरण आहे. एकदा हे समजून घेतलं की आपल्या संस्कृतीचा प्रवाह आपल्याला अजून स्मितीत करतो, कारण आपले देवही आपल्या संस्कृतीसारखेच खूप खूप प्राचीन आहेत. पण काही वर्षांपूर्वी असं मानलं जातं होतं की भारतीयांचे देव बदलले किंवा नव्या देवांना मानणारे लोक भारतात नांदू लागले. अश्मयुगीन देवांपासून ते थेट ज्यांना नंतर वैदिक देवता म्हटले गेले त्यांच्या प्रकट अवशेषांपर्यंत साधारण पाच हजार वर्ष भारताच्या भूमीवर जी संस्कृती होती ती नष्ट झाली असा एक प्रवाद जाणीवपूर्वक पसरवला गेला.
 
 
का आणि कसा?
 
इस्लामी आक्रमणानंतर साधारण सात-आठशे वर्ष भारतात एक अंधारयुग नांदत होते. ब्रिटिश सत्ता स्थिरावल्यानंतर ब्रिटिशांच्या लक्षात आले की ही संस्कृती प्राचीन आहे आणि या संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधल्या पाहिजेत, हा ठेवा अभ्यासून पाहिला पाहिजे. पण भारतीयांचे दुर्दैव असे की त्यांचा हा ठेवा जिथे लिहून ठेवला होता ती मंदिरं तोडली गेली होती, नालंदासारखी विद्यापीठं जाळली गेली होती. मौखिक परंपरेत देव राहिले पण त्यांचे लिखित पुरावे नष्ट झाले होते. अठराव्या शतकाच्या शेवटी संस्कृत भाषेचे अनेक युरोपियन भाषांशी असलेले साम्य लक्षात आले आणि पाश्चात्य विद्वान बुचकळ्यात पडले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा सिंधू संस्कृतीचा शोध लागला तेव्हा तर या सगळ्या गोष्टींचा अर्थ कसा लावायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. या प्रश्नापाशी युरोपियन लोकांच्या वांशिक श्रेष्ठत्वाच्या भावनेने त्यांच्या ज्ञानापिपासू वृत्तीवर मात केली.
 

Nandadeep  
 
भारतीय संस्कृतीचे सगळ्यात प्राचीन पुरातत्वीय अवशेष शंभरेक वर्षांपूर्वी मोहनजदरो हरप्पा येथे सापडले पण त्यापूर्वीच सगळ्या युरोपियन विद्वानांचा संस्कृतला आणि संस्कृत भाषेतील ज्ञानाला प्राचीन भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. संस्कृत ही भाषा, वेदांसह त्यातील सर्व साहित्य व ते साहित्य निर्माण करणारे लोक हे सगळे भारताबाहेरून आले होते अशी थिअरी त्यांनी मांडली. या थिअरीतून दोन तीन गोष्टी साध्य होत होत्या. पहिली म्हणजे भारतीयांत तेव्हा ठळक असलेली जातीय फूट अजून खोल करता येत होती, शिवाय युरोपियन व भारतीय भाषांत असलेले साम्य आणि भारतात आढळून येणारी पण युरोपात अनुपस्थित असलेली प्राचीन संस्कृती या सत्याची आभासी संगती लावता येणार होती. एकदा असे म्हटले की मध्य आशियातून काही लोक भारतात आले आणि काही युरोपात गेले, त्यामुळे त्यांच्या भाषेचे मूळ समान आहे की मग भारतातून पश्चिमेला काही लोक, काही ज्ञान, भाषेतील काही देवाणघेवाण झाली असेल ही शक्यताच संपून जाते. युरोपियन लोकांनी या मध्य आशियातून आलेल्या तथाकथित लोकांना आर्य म्हटले व त्यांच्या संस्कृतीला वैदिक संस्कृती म्हटले. सात आठशे वर्षाच्या अंधकारातून नुकत्याच चाचपडत जागे होणार्‍या भारताला, भारतातल्या अभिजनांना हे सगळे खरे वाटले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी साक्षात लोकमान्य टिळकांसारखा महापंडित या प्रचारामुळे त्या दिशेने विचार करू लागला आणि वेदांचे जन्मस्थान ध्रुवीय प्रदेश असावा असा सिद्धांत मांडता झाला. दयानंद सरस्वतींनी आर्य समाज नावाची चळवळ सुरू केली आणि आर्य मूर्तिपूजा करत नसावेत असे गृहितक मांडले. युरोपियन लोकांच्या या चालीने मागच्या शंभर वर्षात भारतात आर्य-अनार्य किंवा आर्य-द्रविड हे अनावश्यक वाद निर्माण झाले.
 
 
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आजच्या पाकिस्तानात, सिंधू नदीच्या खोर्‍यात मोहनजदारो आणि हरप्पा या दोन ठिकाणी उत्खनन सुरू झाले आणि युरोपियन पुरातत्ववेत्त्यांना अजून मोठा धक्का बसला. आजवर या लोकांना फक्त लिखित आणि मौखिक ग्रंथ मिळाले होते, तत्त्वज्ञान आणि काव्य समजले होते. या उत्खननात मात्र अतिशय सुव्यवस्थितपणे आखलेली नगरे त्यांना सापडली. धान्याची कोठारे, सांडपाण्याची व्यवस्था, सुंदर रंगकाम केलेल्या मूर्ती, सुबक खेळणी, मातीच्या मुद्रिका असं सगळं त्यांना सापडलं. युरोपियन विद्वानांनी पूर्वीच मांडलेल्या आर्यांच्या आक्रमणाच्या थिअरीत आता हे सगळे पुरावे कसे बसवायचे हा त्यांना प्रश्न पडला आणि त्यावर एक चतुर उत्तर त्यांनी शोधून काढलं. त्यांनी अशी भूमिका मांडली की या सिंधू खोर्‍यातील लोक भारतातील मूळ रहिवासी होते व आर्यांनी आक्रमण करून त्यांची संस्कृती संपवली. दक्षिणेतल्या शिवगलाईपासून सिंधू खोर्‍यातील मोहनजदरोपर्यंत पसरलेल्या या सगळ्या लोकांना त्यांनी आर्य-अनार्य ह्या आभासी जंजाळात अडकवून टाकले आणि समोर दिसणार्‍या कित्येक पुराव्यांना दडपून ठेवले. दुर्दैवाने भारत स्वतंत्र झाल्यावरही अनेक इतिहासकारांनी या ढळढळीत सत्याकडे पाठ फिरवली आणि जुनाच दृष्टीकोन पुढे ढकलला गेला.
 
 
गंमत म्हणजे ह्या पुरातन भारतीय लोकांनी स्वतःच्या संस्कृतीला कधीही वैदिक म्हटले नव्हते आणि स्वतःच्या सगळ्या लोकांना कधीही आर्य म्हटले नव्हते. आज आपण ज्या अर्थाने श्रीमान किंवा श्रेष्ठी हा शब्द वापरतो त्या अर्थी आर्य हा शब्द यायचा. आर्य म्हणून समाजातील अभिजन स्वतःला संबोधित करायचे किंवा करवून घ्यायचे. वेद हे त्यांचे ज्ञानग्रंथ होते. ना ती वेगळी संस्कृती होती ना ते कुठून बाहेरून आलेले लोक होते. वेद आणि उपनिषदे इथल्याच लोकांना, इथेच स्फुरली, त्यांनी ती इथेच रचली, मग इथेच गायली. त्यातले सगळे वर्णन ह्याच प्रदेशाचे, इथल्याच लोकांचे आहे. रामायण आणि महाभारत हा इथल्याच भूमीत घडलेला पण नंतर लोकांनी काव्यमय स्वरूपात सांभाळून ठेवलेला इतिहास आहे ही गोष्ट समजून यायला एकविसावे शतक उजाडावे लागले.
 

Nandadeep  
 
जसे वैदिक संस्कृती हे युरोपियन लोकांनी दिलेले नाव आहे तसेच सिंधू संस्कृती हे देखील युरोपियन लोकांनीच दिलेले नाव आहे. ही संस्कृती काही फक्त सिंधू नदीच्या खोर्‍यापुरती मर्यादित नव्हती. मोहनजदरो आणि हरप्पासारखीच, तितकीच प्रगत शहरं सरस्वतीच्या काठावर होती. समुद्राच्या मुखाशी असलेल्या द्वारकेपासून ते थेट गंगा यमुनेच्या खोर्‍यापर्यंत, पश्चिमेला अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत ही संस्कृती पसरलेली होती. या संस्कृतीच्या खुणा आजच्या भारताशी जोडून पाहताना आपण विस्मयचकित होतो आणि मागच्या शतकातील पुरातत्वशास्त्रज्ञांनी हे सगळं आपल्यापासून का लपवले तेही आपल्याला कळत नाही.
 
 
लेखाच्या सुरुवातीला आपण बघोर माई या देवीच्या स्वरूपाचा उल्लेख केला, जिच्या गुह्य भागावर पिवळ्या रंगाची नक्षी होती. आज भारतात नसलेल्या बलुचिस्तानमध्ये नौशेरो म्हणून एक गाव आहे. जेव्हा तिथे पुरातत्व खात्याने खोदकाम केले तेव्हा त्यांना भाजलेल्या मातीची एक मूर्ती सापडली. ह्या मूर्तीचा मधोमध भांग पाडला गेला होता आणि त्या भांगात ठसठशीत लाल रंग भरला गेला होता, अगदी आजही आपल्याकडच्या स्त्रिया भांगात सिंदूर भरतात तसा.. त्या लाल रंगाच्या खुणा तब्बल 6000 वर्ष टिकल्या. अशा अनेक कुंकू भरलेल्या प्रतिमा सिंधू संस्कृतीच्या पोटात सापडल्या. सिंधू सरस्वती संस्कृतीमधले अतिशय प्रसिद्ध शिल्प म्हणजे हातभर बांगड्या भरून एक पाय उचलून उभी असलेली स्त्री. तिच्या डाव्या हातात खांद्यापर्यंत बांगड्या आहेत, उजव्या हातातही मोजक्या बांगड्या आहेत. तिचे केस मागे बांधलेले आहेत. तिच्या गळ्यात जे आभूषण आहे त्यावर अगदी आजही वापरली जाणारी त्रिदल नक्षी आहे, ती अल्प वस्त्र ल्यायलेली आहे.
 
 
हजारो वर्षानंतर गुप्त किंवा चालुक्य काळात भारतात जी स्त्री शिल्प घडवली गेली त्याच्या सगळ्या खुणा या शिल्पात सहजपणे दिसतात. मंदिरांच्या बाहेर खोदलेल्या दगडी शिल्पांच्या मानाने ही मूर्ती ओबडधोबड आहे पण वेगळी अजिबात नाही. तिचा पेहराव आणि आभूषणे आजही भारतीय स्त्रीच्या रोजच्या वापरात आहेत.
 
 
ब्रिटिशांनी तिला नर्तिका ठरवले पण भारतीय परंपरेत हातभर भरलेला चुडा, केसांत भरलेला सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक आहे, पावित्र्याची खूण आहे, बहुदा सिंधू संस्कृतीतही ती तशीच असावी म्हणूनच ती पुढे चालत आली.
 
 
पुढच्या काळात अनेक मंदिरांत भारतीयांनी या भाळात कुंकू लावणार्‍या स्त्रीच्या प्रतिमा कोरून ठेवल्या, काळ्या पाषाणात सजवून ठेवल्या. बलुचिस्तानातील, हिंगलाज मातेच्या मूळ ठिकाणची ही मातीची मूर्ती त्यामानाने ओबडधोबड आहे पण फार महत्त्वाची आहे. ती भारतीय संस्कृतीच्या सलग धाग्याची निशाणी आहे.
 

Nandadeep  
 
आपल्या संस्कृतीत आजही वापरली जाणारी एक ठसठशीत खूण म्हणजे स्वस्तिक. पूजेच्या वेळी अक्षतांनी काढलेलं, दरवाजावर कुंकवाने रेखलेलं स्वस्तिक आपण नेहमी बघतो पण हे स्वस्तिक किती जुने आहे ते आपल्याला माहीत नसते. आज आपण जसे स्वस्तिक काढतो अगदी तसेच स्वस्तिक कोरलेल्या मुद्रा मोहनजदरो आणि इतरही अनेक ठिकाणी सापडल्या. स्वस्तिक चिन्ह पुढेही भारतीय संस्कृतीत सतत आढळून येते. मंदिरांत आणि राजचिन्हात कोरले जाते पण हे दिसत असूनही इतिहासकार मानतात की सिंधू संस्कृती संपली आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो.
 
 
भारतात आजही सर्वत्र पूजले जाणारे अजून एक प्रतीक म्हणजे शंकराची पिंड किंवा शिवलिंग. पण शंकराची उपासना किती जुनी आहे आणि ती किती मोठ्या भूभागावर होत होती हे आपल्याला माहीत नसते. ऋग्वेदात अनेकदा उल्लेख असलेला भगवान शंकर हा वैदिक देव आहे असे म्हणणार्‍या इतिहासकारांना सिंधू खोर्‍यात सापडलेल्या शंकराच्या पिंडीचे स्पष्टीकरण देता येत नाही. सरस्वतीच्या काठावर वसलेल्या कालीबंगन ह्या ठिकाणी तर भाजलेल्या मातीची शाळुंखा सापडली, अगदी आजही आपण देवघरात ठेवतो तशी. म्हणजे मागची कमीतकमी पाच एक हजार वर्ष आपण आपल्या देवालाही त्याच स्वरूपात पूजतोय.
 
 
मात्र सिंधू संस्कृतीत आढळणारे शंकराचे सगळ्यात ठसठशीत रूप या पिंडीत नाही, ते आहे पशुपती किंवा प्रोटो शिवा या नावाने ओळखल्या जाणार्‍या मातीच्या मुद्रिकेमध्ये. पद्मासनात ध्यानस्थ बसलेला शंकर, त्याभोवती फिरणारे हत्ती, वाघ, गेंडा, वृषभ असे अनेक प्राणी या मुद्रिकेवर ठळकपणे कोरलेले आहेत. इतकेच नव्हे तर त्या मूर्तीला तीन चेहरे आहेत. मार्शल नावाच्या पुरातत्वशास्त्रज्ञाच्या मते ही मुद्रा म्हणजे नंतरच्या काळातील त्रिमूर्ती (ब्रह्मा, विष्णू, महेश) या संकल्पनेची सुरुवात असावी. हे इतकं सगळं स्पष्ट दिसत असतांना सिंधू संस्कृती ही वैदिकांपेक्षा वेगळी होती आणि वैदिक संस्कृती ही बाहेरून आलेल्या आर्य नावाच्या लोकांनी वसवली होती हे म्हणायला खूपच धाडस हवं.
 
 
सरस्वतीच्या खोर्‍यात सापडलेल्या अजून काही गोष्टी पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीचा धागा आपल्या उपासनेच्या पद्धतीशी जोडतात. उत्तरेतल्या कालीबंगनपासून ते अगदी गुजरातमधल्या लोथलमध्येही आपल्याला साधारण चौकोनी आकाराचे अग्निकुंड आढळून येतात. भारतासारख्या उष्ण प्रदेशात ही रचना ऊब देण्यासाठी नव्हे तर यज्ञविधी करण्यासाठी वापरली जात असावी हे सरळ आहे. काही ठिकाणी तर हल्ली मंदिरात जसे ओळीत सामुदायिक हवनकुंड असतात तसेही आढळून आलेले आहेत. इतकेच नाही हरप्पामध्ये सापडलेल्या वस्तूंमध्ये एक मातीचे कमंडलू पण आहे, अगदी आजही आपण वापरतो तसेच.
 
 
भारतीय संस्कृतीची ओळख जगात ज्या महत्त्वाच्या गोष्टींमुळे आहे, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग आणि योगासने. गंमत म्हणजे हरप्पा आणि मोहनजदरो या दोन्ही ठिकाणी ज्या लहान लहान मातीच्या मूर्ती सापडल्या आहेत त्यात योगासने करणारे साधक दाखवले आहेत. त्यात एक मूर्तीका तर नमस्काराच्या मुद्रेत आहे, अगदी तसेच जसे आजही आपण एकमेकांना भेटल्यावर करतो.
 
 
आपल्या संस्कृतीत जसा देवांचा हजारो वर्षांचा सलग इतिहास आढळतो अगदी तसाच आपण ज्याला पूर्णब्रह्म म्हणतो त्या अन्नाचाही सलग इतिहास पाहता येतो. आलमगीरपूर नावाच्या जागी झालेल्या उत्खननात काही मातीची भांडी आढळली, गंमत म्हणजे त्यात पोळपाट आहे, तीन पायांचा. अगदी आजही आपल्या स्वयंपाकघरात असतो तसाच. आजही आपण ज्या घाटाची थाळी, हंडी किंवा लोटा वापरतो तशाच वस्तू तिथे सापडल्या. थोडक्यात जे कुंभार आणि लोहार पिढ्यानपिढ्या या वस्तू घडवत आलेत त्यांच्या हातात आजही ती सिंधू संस्कृतीतली कला जिवंत आहे.
 
 
हे साम्य फक्त स्वयंपाकाशी थांबत नाही. शेतीसाठी जी अवजारे आज वापरली जातात अगदी तशीच अवजारं हजारो वर्षांपासून वापरात आहेत. सिंधू संस्कृतीत बांधलेल्या विहिरी आणि शंभरेक वर्षांपूर्वी बांधलेल्या विहिरीच्या रचनेत फारसा फरक पडलेला नाही. इतकेच नव्हे तर रहाटाची जी रचना अगदी आत्तापर्यंत वापरली जात होती, ती थेट सिंधू सरस्वती संस्कृतीमधून आलेली आहे.
 
 
खेळ आणि करमणूक हेदेखील संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग असते. खासकरून जेव्हा समाज सुखवस्तू असतो, सुखी असतो तेव्हा त्यातला अभिजन वर्ग तरी विविध प्रकारचे खेळ खेळतो. भारतीय संस्कृतीत असे खेळ प्रामुख्याने बैठे असतात. सिंधू सरस्वती संस्कृतीतही अगदी हेच आणि असेच खेळ खेळले जायचे. सरस्वतीच्या मुखाशी लोथल नावाचे बंदर होते. आजच्या गुजरातमध्ये असलेल्या ह्या जागेवरून जगभर व्यापार चालायचा. या लोथलमध्ये बुद्धिबळाच्या सोंगट्या सापडल्या ज्या मातीने घडवून मग भाजल्या होत्या. आज आपण साप शिडी खेळतांना जी चौकोनी सोंगटी वापरतो अगदी तशीच एक ते सहा ठिपके असलेली सोंगटी हे लोक वापरायचे.
 
 
या प्राचीन संस्कृतीला आजच्या भारतीय संस्कृतीशी जोडणारा सगळ्यात मोठा दुवा आजवर अंधारात होता, तो म्हणजे या लोकांची लिखित भाषा. उत्तरेतील बहुतेक जुनी मंदिरं आणि नालंदासारखे विद्यापीठ नष्ट झाल्याने एका मोठ्या कालखंडातील लिखित भाषा आपल्याला सापडत नाही. जी सगळ्यात जुनी लिपी आपल्याला सापडते ती म्हणजे ब्राह्मी. ब्राह्मी ही लिपी आहे आणि संस्कृत, पाली ह्या भाषा. सिंधू संस्कृतीच्या लिपीचा पूर्ण उलगडा आजवर झालेला नाही पण क्रिप्टोग्राफ आणि कॉम्प्युटर मॅचिंग ह्या नवीन पद्धतींचा वापर करून यज्ञदेवम किंवा भरत राव या संशोधकाने सिंधू संस्कृतीमधल्या बहुतेक सगळ्या लिखित मुद्रिका वाचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या मते जुन्या सिंधू लिपीमधूनच ब्राह्मीचा उगम झाला आणि सिंधू लिपीची भाषा प्राचीन संस्कृत हीच होती. यज्ञदेवमच्या मते पुढे रचल्या गेलेल्या पाणिनीच्या व्याकरणातील अनेक नियम सिंधू भाषेत पाळलेले आहेत. सिंधू लिपीतील काही चिन्ह थेट गुप्त काळापर्यंत वापरली जात होती, जी हळूहळू देवनागरीच्या वापरानंतर कमी झाली. जरी हा दावा शास्त्रीयदृष्ट्या अजून सिद्ध झाला नसला तरी ब्राह्मी आणि सिंधू लिपीकडे सगळे पूर्वग्रह दूर ठेवून पाहिल्यास, त्यातील साम्य नक्की जाणवते. आज आपण हे जाणतोच की भारतातील बहुसंख्य भाषांची जननी संस्कृत आहे. आपली भाषाही अशा प्रकारे हजारो वर्षापासून वाहती आहे, ती अटली नाही आणि तुटलीही नाही.
 
 
ही संस्कृती इतकी जुनी आहे पण म्हणून ती थांबली नाही, आपल्या जुन्या खुणा सांभाळून तिने अनेक नव्या गोष्टी आत्मसात केल्या. भारतीयांनी आपली संस्कृती स्वीकारली. आपल्या संस्कृतीतल्या चुकाही स्वीकारल्या. देशातील बहुसंख्य समाजाने त्या चुका मान्य करून त्या कशा दुरुस्त करता येतील यावर विचार केला. बर्‍याच प्रमाणात ते साध्यही केलं. त्या प्रवासात भारतीय समाज शक्य तितका एकसंघ होत गेला, आपली नवी ओळख घडवत राहिला.
 
 
संस्कृती म्हणजे फक्त धर्म नाही, संस्कृती म्हणजे फक्त देव आणि पूजा पद्धती तर मुळीच नाही. पण संस्कृती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची आणि त्याला बिलगून येणार्‍या जगण्याची आठवण, संस्कृती म्हणजे आपल्या इतिहासाला आपल्या वर्तमानाशी जोडणारा धागा. संस्कृती म्हणजे आपल्या चुकांचा जमाखर्च आणि त्यातून सावरण्याचे शहाणपण. संस्कृती म्हणजे आपल्या टिकून राहण्याची कथा आणि त्यातून मिळणारा घोटभर आत्मविश्वास.
 
 
भारतीयांची हिंदू म्हणून असलेली ओळख ही प्रामुख्याने अशी आहे. हिंदुत्व ही प्रामुख्याने जगण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. तिच्या पोटात अनेक पद्धतीच्या उपासना आहेत, अनेक प्रकारचा आहार आहे, नवनवीन विचार आणि तितकेच प्राचीन तत्त्वज्ञान आहे. आधुनिकतेचा शहाणा स्वीकार आहे आणि तरीही आपल्या मुळांशी जुळलेला जिवंत सांधाही आहे. हिंदू संस्कृतीची मुळं थेट सरस्वतीच्या आणि सप्तसिंधूच्या पाण्यावर पोसलेली आहेत. लुप्त झालेल्या सरस्वतीचे पाणी आजही भारतीयांच्या जगण्यात वाहते आहे.
 
 
आणि हेच ह्या संस्कृतीचे बलस्थान आहे. सुमेरियन, मेसोपोटेमियन, पर्शियन, ग्रीक या सगळ्या संस्कृती वेगवेगळ्या कारणांनी नष्ट झाल्या, पण भारतीय संस्कृती नांदत राहिली. उण्यापुर्‍या साताठशे वर्षांच्या अंधारयुगातही हा नंदादीप तेवत राहिला. त्याची ज्योत थरथरली पण विझली नाही, त्यातले तेल संपले नाही कारण तिच्या मुळाशी हजारो वर्षांत कमावलेले शहाणपण होते, राखेतून पुन्हा पुन्हा जिवंत होण्याचा अनुभव होता. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा समुद्रासारखी सरस्वती नदी सुकत गेली तेव्हाही हे लोक, ही संस्कृती टिकून राहिली आणि जेव्हा पश्चिमेकडून आलेली वावटळ या सप्तसिंधूच्या प्रदेशात धडकली तेव्हाही हा धर्म आणि त्याला चिकटून असलेली संस्कृती, जगण्याची पद्धत जिवंत राहिली.
 
 
दीपावलीसारखे सण हे अशा संस्कृतीची, जगण्याच्या पद्धतीची उजळणी करण्याचे दिवस असतात. गोष्टींत गुंफलेला आपला इतिहास, आनंद साजरा करण्याची पद्धत, खाण्यापिण्याची हजारो वर्ष जिवंत राहिलेली विशिष्ट चव हे सगळे आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. त्यात शिरलेले न्यून दूर करण्याची जबाबदार ी आपली आणि जे मंगल आहे ते टिकवण्याचे कर्तव्यही आपलेच.
आपण सगळे मिळून हे कर्तव्य पार पाडूया आणि संस्कृतीचा हा नंदादीप असाच तेवत ठेवूया.