बुडबुडा

विवेक मराठी    24-Oct-2025
Total Views |
 @अमित लिमये 
आपण बघतो ते जग आणि आपल्याला जे दिसतं, आकळतं ते जग ह्यात मोठी तफावत असू शकते. आपल्या आकलनामागे आपली समज, विचारशक्ती आणि पूर्वानुभव ह्यांची घट्ट वीण असते आणि त्यामागे असते आपल्या भ्रमाचे अस्तर. मुलाशी बोलण्यासाठी म्हणून थोडं खोलात जाऊन या क्रिएटर इकॉनॉमीचा तुलनात्मक अभ्यास केला. आधी येऊन गेलेल्या अनेक बुडबुड्यांशी, त्यातल्या धोक्यांशी विलक्षण साम्य जाणवलं. क्रिएटर इकॉनॉमीची वाटही धोक्याची आहे आणि यशाची शक्यता फारच अंधुक. हे सगळे बुडबुडे नीट तपासून मगच त्याच्या मागे लागण्यात अर्थ आहे. तोच उहापोह मांडतोय.
AI
 
दोन वर्षांपूर्वी मुलाच्या हट्टाखातर आणि त्याने ए ग्रेड मिळवल्याने त्याला गेमिंग कॉम्प्युटर घेऊन दिला होता. गेमिंग आता मल्टि प्लॅटफॉर्म, मल्टि प्लेअर इकोसिस्टम झाली आहे. त्यातही सोशल मीडियाचा शिरकाव झालेला आहे. गेमिंगवर फोकस असलेले कंटेंट क्रिएटर यूट्यूब आणि ट्विचसारख्या प्लॅटफॉर्म्सवर प्रचंड संख्येने कंटेंट टाकताहेत आणि करोडो लोक तो पाहताहेत. त्यात रममाण झाल्याने मुलाला साहजिकच हे सगळं कळलं. एक दिवस जेवता जेवता तो मला म्हणाला, ‘बाबा, मी फुल टाइम गेमर आणि स्ट्रीमर होतो. खूप पैसे मिळतात. जे गेममध्ये एक्स्पर्ट होतात ते गेम खेळताना लाइव्ह स्ट्रीम करतात आणि लोक पैसे देऊन ते बघतात. ह्यात खूप पैसा आहे बाबा!’
 
मी त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि म्हणालो,‘जेव! नंतर बोलू.’
 
मुलगा जे करू पाहत होता, त्याला कंटेंट क्रिएटर असं नाव आहे आणि सोशल मीडियावर कंटेंट टाकून मोठी उलाढाल होते त्याला म्हणतात क्रिएटर इकॉनॉमी. यात अविचार करून उडी मारली की काय होतं ते मुलाला समजावलं. एक गेमर म्हणून तुझा दिवस/आठवडा/महिना/वर्ष कसं जाईल ते सांगितलं. शिक्षण सोडून तू हे सुरू केलंस आणि 2-3 वषार्ंनी पैसे मिळेनात म्हणून किंवा कंटाळा आला म्हणून सोडायचं ठरवलंस तर तुझ्या मित्रांपेक्षा तू किती मागे पडलेला असशील ते सांगितलं. छंदाचा धंदा झाला की त्यातून राम निघून जाऊ शकतो हेही त्याला समजावलं. त्याचं त्यालाच पटलं आणि त्याने नाद सोडला.
 
 
माझा एक जिवलग मित्र,‘तू इतका भारी स्वयंपाक करतोस, त्याबद्दल लिहितोस, फोटो काढतोस तर तू फूडसंबंधी इंस्टाग्राम चॅनेल काढच’, असं म्हणत माझ्या मागं लागला होता. त्यासाठी लागणारा वेळ, अभ्यास, पैसा आणि सर्जनशीलता ह्याचा मेळ माझ्याकडे असणारा वेळ, अभ्यास आणि असणारी सर्जनशीलता याच्याशी घालून मी प्रेमाने त्याला,‘मी चॅनेल काढणार नाही’, असं सांगितलं. आजच्या इंटरनेट आणि सोशल मिडियामध्ये रमणार्‍या जगात कुठल्याही गोष्टीची हाइप करणं, लाट आणणं फार सोपं आहे आणि त्या लाटेत वाहून बुडून जाणंही. तुमच्या स्वतःबद्दल अवास्तव कल्पना असतील, आणि त्याला खतपाणी देणारे खुशमस्करे लोक आजूबाजूला असतील तर तुमची गटांगळ्या खाण्याची शक्यता जास्त आहे.
 
 
सनसेट बुलेवार्ड सिनेमामधली नॉर्मा डेस्मंड, तिला आपला अभिनयाचा सुवर्णकाळ कधीच संपला आहे हे मान्यच करायचं नाहीये. तिला भ्रमात राहायचं आहे. तिचा नोकर स्वतःच चाहत्यांची पत्रं लिहून तिला वाचून दाखवतोय. तिचा भ्रम बळकट करतोय. यातून पुढं महाभारत घडतं. एकीकडे चित्रपटात नॉर्मा आणि तिचा भ्रम आहे तर दुसरीकडे ब्रुस विलिसची गोष्ट आहे. 35 वर्षात तब्बल 70 सिनेमांमधून काम करून हॉलिवूडमधला एकेकाळचा दिग्गज ऍक्शन हिरो असलेला ब्रूस विलिस आज डिमेन्शियाशी झगडतोय. त्याचा आजार इतका बळावला आहे की आता ब्रूस विलिस आपण एक यशस्वी हॉलिवूड अ‍ॅक्टर आहोत हेच विसरून गेला आहे. त्याची कारकिर्द, दिलेले हिट सिनेमे, लोकप्रियता काही काही त्याला आठवत नाहीये.
 
 
आपण सगळेच थोड्या फार प्रमाणात, बर्‍याच गोष्टींत भ्रम आणि विस्मरण या दोन शक्यतांच्या मध्ये झोके घेतोय आणि आजूबाजूच्या गोष्टींचे आणि आपल्या आयुष्याचे अन्वयार्थ लावतोय. काही बरोबर लागताहेत, बरेच काही चुकताहेत. ज्ञानेश्वर माऊली सांगून गेल्या आहेत की,
 
पाहातां पाहाणें दृष्टिही वेगळें। तें कैसें आकळे म्हणतोसि ॥
 
 
ते जरी परब्रह्म स्वरूपाबद्दल असं म्हणत असले तरी तेच आजच्या भ्रमिष्ट करणार्‍या युगात वस्तुस्थितीच्या आकलनालाही लागू आहे. आपण बघतो ते जग आणि आपल्याला जे दिसतं, आकळतं ते जग ह्यात मोठी तफावत असू शकते. आपल्या आकलनामागे आपली समज, विचारशक्ती आणि पूर्वानुभव ह्यांची घट्ट वीण असते आणि त्यामागे असते आपल्या भ्रमाचे अस्तर. मुलाशी बोलण्यासाठी म्हणून थोडं खोलात जाऊन या क्रिएटर इकॉनॉमीचा तुलनात्मक अभ्यास केला. आधी येऊन गेलेल्या अनेक बुडबुड्यांशी, त्यातल्या धोक्यांशी विलक्षण साम्य जाणवलं. क्रिएटर इकॉनॉमीची वाटही धोक्याची आहे आणि यशाची शक्यता फारच अंधुक. हे सगळे बुडबुडे नीट तपासून मगच त्याच्या मागे लागण्यात अर्थ आहे. तोच उहापोह मांडतोय.
 
 
AI
 
गेल्या शतकाच्या शेवटच्या पाच वर्षांत प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमध्ये डॉट कॉम बुडबुडा येऊन गेला आणि साबणाचा अल्पायुषी बुडबुडा जसा हवेने थोडासा वर जाऊन फुटतो तसा फुटला. 1996 ते 2000 ह्या चार वर्षांत तब्बल 2300 डॉट कॉम कंपन्यांनी आपला आयपीओ बाजारात आणला. माणसाला जे काही हवं आणि बरंच जे नको तेही, अगदी टाचणीपासून बंदुकीपर्यंत सगळं ऑनलाईन विकणार्‍या कंपन्या गल्लीबोळात निघाल्या होत्या. या सगळ्या कंपन्यांना वाटेल ते मूल्यनिर्धारण मिळायचं आणि त्यावर विश्वास ठेवून गुंतवणूकदारांकडून शेकडो मिलियन डॉलर्स गुंतवले जायचे. कोरी करकरीत कंपनी आहे, कुठलेही ठळक असेटस् नाहीत, सॉफ्टवेअर आयपी अजून होऊ घातला आहे, रेव्हेन्यूचा पत्ता नाही अशा कंपन्यांना शंभर मिलियन डॉलर्स गुंतवणूक सहज मिळून जायची, नावात डॉट कॉम पाहिजे आणि इंटरनेट बेस्ड बिझनेस मॉडेल हवं. बस! कारण काय तर...फक्त हाइप! डॉट कॉमचा बुडबुडा 2001 मध्ये फुटला तेव्हा फक्त तीन डॉट कॉम कंपन्या त्यातून वाचल्या होत्या. अ‍ॅमेझॉन डॉट कॉम, इबे डॉट कॉम आणि प्राइसलाईन डॉट कॉम. वाचलेल्या कंपन्यांची टक्केवारी येते 0.1%.
 
 
तेव्हा भारतात अ‍ॅपटेक वगैरे इन्स्टिट्युटस्नीसुद्धा,‘तुम्ही इंटरनेट म्हंजे इन्फॉर्मेशन सुपर हायवेवर नसाल तर रस्त्यावर याल!’ या शब्दात जाहिराती केलेल्या आठवतात. डॉट कॉम बूमची हवा इतकी वाईट पसरलेली होती की कॉलेजेसमध्ये एचओडीच म्हणायचे, ‘कुठं दोन वर्षं वाया घालवता, सहा महिने जावाचा कोर्स करा आणि अमेरिकेला जावा. तिथे लोक जावा प्रोग्रामर पाहिजेत असे बोर्ड घेऊन रस्त्यावर उभे राहून रीक्रूट करताहेत.’ बरेच जण भुलले. बुडबुडा सगळ्या लोकांना घेऊन फुटला. करोडो डॉलर्स आणि हजारो स्वप्नांचा एकाच वेळी चक्काचूर झाला. ज्या वेगात बेंगलोरवरून बॉस्टनला लोक गेले होते त्याच वेगाने ते परत आले. परत आल्यावर हा धक्का पचवून आपल्या घरी न जाता मुंबई, बेंगलोरमध्येच राहून कित्येक दिवस घरच्यांना आपण अमेरिकेत आहोत असं भासवत, पुन्हा तिकडे जायची संधी शोधत राहिले. जावा सोडून काही येत नव्हतं, कोअर प्रोग्रामिंग अनालिस्ट स्किल्स शिकायची तसदी घेतली नव्हती. काही जण जिद्दीने परत शिकले, याच क्षेत्रात सेटल झाले. त्यांचं प्रमाण डॉट कॉम मध्ये वाचलेल्या कंपन्यांइतकंच असावं. बरेचसे हताश होऊन विझून गेले.
 
 
माणूस वसाहत करून राहायला, शेती पिकवायला लागल्यापासून जगाच्या अर्थव्यवस्थेने प्रगतीसाठी अनेक पायाभूत इंडस्ट्रीज निर्माण केल्या. शेती या आद्य इंडस्ट्रीपासून अवजड उद्योग, उत्पादन, तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी अशा अनेक इंडस्ट्रीज भरभराटीला आल्या. त्यांनी आपल्याबरोबर अनेक कुटीरोद्योग सुद्धा निर्माण केले. आयटी इंडस्ट्रीने हेच कुटीरोद्योगाचे मॉडेल जरा जोरात पुढे नेले. त्याला 2000च्या दशकात एकत्रितपणे आयटीईएस म्हणजे आयटी एनेबल्ड सर्विसेस असं नाव होतं. तुम्ही बीपीओ, कॉल सेंटर्स किंवा मेडिकल ट्रान्सक्रिप्शन व्यवसाय ऐकले असतील. हे सगळे आयटी इंडस्ट्रीचे कुटीरोद्योग आहेत. इतर इंडस्ट्रीज आणि आयटी इंडस्ट्रीमध्ये एक मोठा फरक म्हणजे त्यात होणार्‍या बदलांचा प्रचंड वेग, आवाका, त्यातून निर्माण होणार्‍या नव्या संधी आणि जोखमी धंदा. एक तर आकाशात घेऊन जातात किंवा पाताळात. ह्याच गुणाची किंवा अवगुणाची लागण आयटीच्या कुटीरोद्योगांना सुद्धा झालेली आहे. वरच्या परिच्छेदात पाहिलेला डॉट कॉम बबल हाही आयटीचाच एक कुटीरोद्योग. तो प्रचंड वेगवान घुसळणीमुळेच तयार झाला आणि फुटला. मेडिकल ट्रान्सक्रिप्शनचीही तीच कथा आहे. 2000च्या सुरुवातीला भारतात अचानक सगळ्या मोठ्या शहरांत मेडिकल ट्रान्सक्रिप्शन सर्विस कंपन्यांचे पेव फुटले होते. पुण्यात त्यावेळी या कंपन्यांची संख्या चायनीज फूडच्या गाड्यांपेक्षा जास्त असावी. माझ्या ओळखीतले कित्येक जण डिग्री अर्धवट सोडून मेडिकल ट्रान्सक्रिप्शनचं काम करायला लागले होते. त्या काळी त्यांना महिना 10-12 हजार पगार असायचा. भुरळ न पडेल तर काय? काही वर्ष हा जोश राहिला. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तंत्रज्ञान आलं आणि मेडिकल ट्रान्सक्रिप्शन सर्विस कंपन्यांच्या शिडातली हवा घेऊन गेलं. एआय आणि ऑटोमेशन काही वर्षांत बहुतेक त्या इंडस्ट्रीला पार आयसीयूमध्ये घेऊन जाईल.
 
 
क्षणार्धात जन्म, काही क्षण आयुष्य आणि लगेच एकतर स्वरूपात आमूलाग्र बदल किंवा पार विस्कोट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्लॅश इन द पॅन म्हणतो हे आयटीने जन्माला घातलेल्या कुटीरोद्योगांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ह्यात प्रचंड प्रमाणात केल्या जाणार्‍या हाइपमुळे भर पडते. 2008च्या जागतिक मंदीमध्ये जन्माला आलेला असाच एक कुटीरोद्योग म्हणजे गिग इकॉनॉमी! म्हणजे उबर, ओला, झोमॅटो वगैरे कंपन्या, त्या वापरून केली जाणारी उलाढाल आणि त्यात पैसा कमावणारे लोक हे सगळं मिळून तयार होते ती गिग इकॉनॉमी असं त्याचं थोडक्यात स्वरूप सांगता येईल. यात अजूनही काही व्हरायटी आहेत पण त्याबद्दल नंतर कधीतरी. गिग म्हणजे छोटं काम! नेहमीच्या 9 ते 5 चालणार्‍या नोकर्‍या न करता छोटी छोटी गिग्स करून तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त पैसा मिळवा, पाहिजे तेव्हा काम करा, नको तेव्हा नका करू. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे कुठलाही बॉस नाही आणि त्याचे नखरे नाहीत. आपली तशी रिकामीच असलेली कार किंवा बाइक असली की झालं. कुणी बॉस नाही आणि तितकाच पैसा हे आमिष एखाद्या नशेपेक्षा कमी नाहीये. सुरुवातीला प्रचंड प्रमाणात लोक ह्या गिग्सकडे आकर्षित झाले. पण नशेनंतर येणारा हँगओव्हर तितकीच मळमळ आणि डोकेदुखी घेऊन येतो हे लोकांना आता कळायला लागलं आहे. सुरुवातीला जमा होणार्‍या पैशाला कमाई समजून खुश असणारे काहीजण पेट्रोल, दुरुस्ती, वाढलेला इन्शुरन्स, डेप्रिसिएशनमुळे झपाट्याने कमी होणारी गाडीची किंमत वगैरे मोजल्यानंतर हातात काही फार येत नाही हे कळून निराश झाले. काहीजण कर्ज काढून गाडी घेऊन हप्ता उरावर आल्याने, बॉस नसला तरी बँक हीच बॉस झाल्याची जाणीव होऊन निराश झाले.
 
 
बर्‍याच जणांना हे प्लॅटफॉर्म चालवणार्‍या उबर ओला कंपन्यांचा मोठा हिस्सा स्वतःकडे ठेऊन गिग करणार्‍या लोकांना चिंचोके वाटायचं, बिझनेस मॉडेल कळल्याने तेही निराश झाले. स्वयंचलित गाड्या आणि ड्रोन वापरुन डिलिवरिज वाढत जातील तसे गिग कामगार अजून अडचणीत येत जातील.
 
 
 
हजारो लोकांना आपणच आपले बॉस, जास्त पैसे आणि मनासारख्या कामाच्या वेळा हे मृगजळ असल्याची जाणीव झाली आहे. जे गिग इकॉनॉमीने केलं तेच कोविडमध्ये आयटीच्या अजून एका कुटीर उद्योगाने म्हणजेच क्रिएटर इकॉनॉमीने सुरू केलं आहे. काळ जसजसा पुढे जात राहतो, तसतसं लोक अनुभवांवरून शहाणे होतील, हाइप झालेल्या गोष्टींमागे आंधळ्यासारखं धावणार नाहीत अशी कितीही अपेक्षा असली तरी पटकन आणि भरपूर पैसा मिळू शकतोय हे गाजर फार वाईट असतं. अशा नवीन, डोळे दीपवून टाकणार्‍या, अतिशय चकचकीत आणि जगभर आपलं जाळं पसरवणार्‍या बुडबड्याचं नाव आहे क्रिएटर इकॉनॉमी. मोठ्या संख्येत प्रचंड वेळ हाताशी असलेले लोक, सर्वव्यापी इंटरनेट, प्रत्येक हातात स्मार्टफोन्स् आणि कुणाचीही चाकरी न करता भरपूर पैसे मिळवायचे दाखवलेले गाजर. सगळा तोच कच्चा माल घेऊन क्रिएटर इकॉनॉमीचा बुडबुडा अवतरला आहे. ह्यात अजून एक जालीम घटक म्हणजे रातोरात प्रचंड लोकप्रिय, एकदम स्टार व्हायची संधी हा आहे. काय आहे क्रिएटर इकॉनॉमी? सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस् म्हणजे फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, टिकटॉक वगैरेवर आपला ओरिजनल कंटेंट म्हणजे फोटो, व्हिडिओ, रील्स, ब्लॉग्स, पॉडकास्ट इ. टाकून फॉलोअर्स गोळा करायचे, आणि त्या बदल्यात ह्या प्लॅटफॉर्मस्कडून त्यांना मिळणार्‍या अ‍ॅडव्हर्टायझिंग रेवेन्यूमधून अगदी थोडा हिस्सा तुम्हाला मिळणार. तुम्ही जर लाखात फॉलोअर्स गोळा केले आणि ते राखले तर सोशल मीडियावर प्रॉडक्ट एंडोर्समेन्ट कॉन्ट्रॅक्टस मिळणार आणि त्यातून परत पैसे मिळणार. ह्या सगळ्या उलढालीला म्हणतात क्रिएटर इकॉनॉमी. गिग इकॉनॉमीमध्ये जशा तिथल्या प्लॅटफॉर्म कंपन्या एखादा माफिया असल्यासारखं वागतात तशा इथेही सोशल मीडिया कंपन्या तेच करतात. सगळं सोडून डिजिटल क्रिएटर बनून पैसा आणि प्रसिद्धीमागे पळणार्‍या लाखों लोकांमध्ये एखाद दुसरा स्टार वगैरे होतोय.
 
 
साल 1996. बिल गेट्सने एक निबंध लिहिला होता. त्यात त्याने कंटेंट इज किंग असं वाक्य वापरलं होतं. म्हणजे भविष्यात इंटरनेटच्या माध्यमातून कंटेंट वापरून प्रचंड पैसा कमावला जाणार आहे अशा अर्थाची भविष्यवाणी होती ती. त्यावेळी सिनेनाट्य इंडस्ट्री, टेलिव्हिजन, मीडिया हाऊसेस, प्रकाशक, पटकथा संवाद लेखक, साहित्यिक, पत्रकार वगैरे लोक सोडले तर कंटेंट लिहून/बनवून इतर कुणी मालामाल होतील ही कल्पना अचाट होती. इंटरनेट म्हणजे TCP/IP जन्माला येऊन जेमतेम दहा बारा वर्ष झाली होती. मूर्स लॉ बाळसं धरत होता. वेग आणि व्याप्तीच्या बाबतीत इंटरनेटला बराच पल्ला गाठायचा होता. सोशल मिडिया तर अजून कुणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हता. अशा वेळी ही भविष्यवाणी करणं म्हणजे आकलन, कल्पनाशक्ती आणि विचारांची झेप खरी.
 
 
कट टू 2024. बिल गेट्स बरोब्बर सांगत होता. कंटेंट वापरून पैसा कमावण्याच्या धंद्याला आता क्रिएटर इकॉनॉमी असे ऐसपैस नाव पडलं आहे. ही क्रिएटर इकॉनॉमी आज प्रचंड क्रेझ निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. त्याची अनेक कारणे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्यात लोकांना दिसत असलेला अथवा दाखवला जात असलेला पैसा. आकड्यांचा वापर करून बनवलेल्या या पत्त्यांच्या बंगल्याकडे बघू. गोल्डमन सॅक्सचं खरं मानलं तर 2023मध्ये क्रिएटर इकॉनॉमीचा टर्न ओव्हर 250 बिलियन डॉलर्स होता. संदर्भासाठी सांगायचं झालं तर अमेरिकेची रिटेल क्षेत्राची उलाढाल होती 700 बिलियन डॉलर्स. इतकंच नाही तर 2027पर्यंत क्रिएटर इकॉनॉमी दुप्पट होणार आहे. कंपन्या इन्फ्लुएन्सर्स मार्केटिंगवर 6 बिलियन डॉलर्स खर्च करताहेत. आत्ताच सोशल मीडियावर तब्बल 4.2 बिलियन युजर्स आहेत. रोज लाखो नवीन युजर्स येताहेत. हातात सतत असलेला फोन आणि त्याच्यात डोकं खुपसून बसलेल्या लोकांना सतत काहीतरी वाचायला, बघायला, ऐकायला हवं आहे. आणि ते पुरवायला हवे आहेत कंटेंट क्रिएटर्स. बदल्यात तिथे बिलियन्स डॉलर्स वाहताहेत त्यातले जमतील तितके ओढून मिलेनियर व्हायची नामी संधी आहे. तेही तुम्हाला ज्यात आवड आहे ते करून. नाचायला आवडतं, नाचाचे रील्स करा! गायला आवडतं, गा! भटकायला आवडतं, भटका! लिहायला आवडतं, लिहा! आणि हे सगळं सोशल मीडिया वर टाका आणि गबर व्हा! पैशाची गंगा वाहते आहे. ही झाली मागणीची बाजू.
 
 
आता जरा पुरवठ्याची बाजू बघू. 2023चे आकडे पाहिले तर जगभरात 200 मिलियन कंटेंट क्रिएटर आहेत. त्यापैकी फक्त 2 टक्के लोकांकडे लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तब्बल 140 मिलियन कंटेंट क्रिएटर लोकांकडे फक्त 1000 ते 10,000 च्या संख्येत फॉलोअर्स आहेत. म्हणजेच जवळपास 70 टक्के लोकांकडे यातून म्हणता येईल इतका पैसा मिळणं अशक्य आहे. एका सर्व्हेनुसार साधारण 60 टक्के क्रिएटर जनता पहिल्या वर्षात 100 डॉलर्स सुद्धा मिळवत नाही. फॉलोअर्स आणि क्रिएटर लोकांना मिळणारा पैसा यातलं गुणोत्तर सरळ आहे. पैसे कमवायचे तर फॉलोअर्स वाढवा. त्यात परत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसकडे कंटेंट कुणाला, कुठं दाखवायचा ह्याचा पूर्ण ताबा आणि कितीही प्रयत्न केला तरी फॉलोअर्स किती वाढवायचे ह्याचाही ताबा त्यांच्याकडेच. हेच प्लॅटफॉर्मस फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि कंटेंट प्रमोट करण्यासाठी परत क्रिएटर लोकांनाच पेड पॅकेजेस विकणार असा माफिया कारभार आहे.
 
 
तुम्हां-आम्हांसारख्या सामान्य लोकांपर्यंत येऊ शकणारा क्रिएटर इकॉनॉमीमधला पैसा म्हणजे गंगा स्वर्गात आणि तहानलेली जनता पृथ्वीवर असा प्रकार आहे. यातही एखादा भगीरथ गंगा खाली आणेलही पण या बाबतीतही ती गंगा फक्त त्याच्या घरी येईल. बाकीचे डिजिटल क्रिएटर कोरडेच राहणार आहेत. हे नीट लक्षात न घेता तुमच्या आमच्या आजुबाजूला वावरणारे बंड्या, गणू, पिंकी, सप्पीपासून चाळीशी पार केलेले काकाकाकू लोक वेडेवाकडे रील्स, माईक लावून पॉडकास्ट करत सुटलेत. ह्या निसरड्या वाटेवर निघालेल्या अनेकांना पुढे अपेक्षाभंगाची मोठी दरी आहे हे कदाचित लक्षात येत नसेल. अपेक्षाभंग हा फक्त पैशांच्या बाबतीतच नसून, प्रसिद्धी, वलय अशा सर्व बाबतीत होणार आहे. आपल्या पोस्ट्सना येणारे लाइक्स कमी झाले तरी बिथरून, फेसबुकपासून सरकारपर्यंत सगळ्यांना लाखोली वाहणारे लोक मी बघतो तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल मला काळजी वाटते. ही चिडचीड अपेक्षाभंगातून आलेली असते. सातत्याने यशस्वी डिजिटल क्रिएटर बनणं हे जितकं भासवलं जातंय तितकं सोपं नाहीये. यात केवळ आणि केवळ टाइमपास म्हणून कंटेंट तयार करून टाकणार्‍या लोकांना मी गृहीत धरत नाहीये. पण बाकीच्या होतकरू जनतेसाठी हा मार्ग डोळसपणे चालता यावा म्हणून डिजिटल क्रिएटरचा प्रवास थोडा विस्ताराने मांडून बघू.
 
 
सीता और गीता मधला राका आठवा. रोज राका, जमुरा आणि गीता चौकाचौकात आपले खेळ दाखवत फिरतात. गीता दोरीवर चालते, नाचते. लोक आश्चर्याने आ वासतात. राका बडबड करून जमलेल्या लोकांचं रंजन करतो, टाळ्या घेतो. जमुरा मुद्दाम बावळटपणाचं सोंग घेऊन राकाकडून अपमान करून घेतो. टाळ्या जरा जोरात वाजतात. हशा पिकतो. ठरलेला खेळ दाखवून राका जमवलेल्या गर्दीला आवाहन करतो आणि टोपी फिरवतो. वासलेले आ, वाजलेल्या टाळ्या आणि पिकलेल्या हश्याच्या प्रमाणात टोपीत पैसे कधी मिळतात कधी नाही. त्या प्रमाणात झालेला आनंद किंवा निराशा झटकून राका आणि कंपनी पुढच्या चौकात तोच तमाशा घेऊन जाते. दिवस संपतो. दुसर्‍या दिवशी परत तोच खेळ. पोटापुरतं कमवायला, थोडं गाठीला बांधायला.
 
 
क्रिएटर इकॉनॉमी आणि त्यात असलेले, पैसा कमवायची इच्छा धरून उतरलेले क्रिएटर लोक अनेक बाबतीत राकासारखे आहेत. काही बाबतीत थोडे वेगळे. त्यांच्यात समान गोष्टी म्हणजे खेळ बघायला आवश्यक असलेली गर्दी, त्या गर्दीतून किती पैसे मिळतील किंवा मिळतीलच ह्याची नसलेली शाश्वती, रोज न कंटाळता चौकात येऊन खेळ दाखवायची गरज, गोळा कराव्या लागणार्‍या टाळ्या, हशे आणि कधी पैशासाठी आणि नेहमी लोकांनी सबस्क्राईब करावं म्हणून टोपी फिरवणं.
 
 
पण या दोन्हीत जे फरक आहेत ते बघितले की यशस्वी कंटेंट क्रिएटर होणं किती अवघड आहे हे कळायला सोपं जाईल. पहिला महत्त्वाचा फरक म्हणजे राकाला त्याच्या धंद्यात, त्याच्या ठरलेल्या चौकांमध्ये स्पर्धा नाहीये. तो ज्या चौकात आपला खेळ दाखवतोय त्याच चौकात दुसरा कुणी तोच खेळ दाखवायला आला आहे असं होत नाही. थोडक्यात राकाचे प्रेक्षक त्या वेळी फक्त राकाचेच असतात. डिजिटल क्रिएटर लोकांकडे तुलनेत भरपूर प्रेक्षक दिसत असले तरी ते केवळ त्यांचेच नसतात. राकाकडे जी exclusivity आहे ती डिजिटल क्रिएटर लोकांकडे नाहीये. काही उदाहरणे बघू. ब्लॉगर्स आणि व्हिडिओ ब्लॉगर्स (vloggers) पाहिले तर जगात एकूण 250 मिलियन अ‍ॅक्टिव्ह ब्लॉगर्स आहेत. त्यात स्पेशालिटी बघायची झाली तरी ट्रॅव्हल ब्लॉगर्स, फूड ब्लॉगर्सही करोडोंच्या घरात आहेत. त्यातही सेलिब्रिटी ब्लॉगर्सचा कंटेंट जास्तीत जास्त बघितला जातो. पॉडकास्टस्ची सुद्धा तीच तर्‍हा आहे. जगात एकूण साडेचार मिलियन पॉडकास्टर आहेत. जरी पॉडकास्ट ऐकणार्‍या, बघणार्‍या जनतेत वाढ होत असली तरी तिथेही सगळ्यात जास्त पॉडकास्टस् प्रथितयश लोकांचेच पाहिले जातात.
 
 
Exclusivity मुळे राकाला आपल्या खेळांच्या रूटीनमध्ये काहीही बदल केला नाही तरी चालतो. तेच दोरीवर चालणं, त्याच हातचलाख्या, तेच विनोद आणि तेच गाणं. अजून एक उदाहरण देतो. मी लहान असताना, चातुर्मास लागला की गळ्यात पेटी घेऊन, सोबत आपल्या सहा-सात वर्षाच्या मुलाला घेऊन एक जण चाळीत यायचा. मळकं धोतर, मळका सदरा, कपाळाला गंध, डोक्यावर मरून रंगाची खादीची टोपी असा अवतार. अंगणात बैठक जमवून, पेटी वाजवत अभंग म्हणायचा. चातुर्मासात दानधर्म करून पुण्य गाठीला बांधायला आतुर असलेल्या पापभीरू, मध्यमवर्गीय आज्या, काकवा, वहिन्या, ताया हे त्याचे exclusive, captive प्रेक्षक. पंडित भीमसेन, अभिषेकी बुवांच्या अभंगांची यथेच्छ मोडतोड करून झाली की तो आर्जव करायचा. दहावीस रुपये, काहीतरी खायला, मुलाच्या शाळेसाठी वह्या पुस्तकं वगैरे मिळायची. मी कधीही त्याला नवीन काही गाताना किंवा गाण्याचा दर्जात सुधारणा करताना पाहिलं नाही. राकासारखीच त्याला त्याची गरजच नव्हती.
 
 
डिजिटल क्रिएटर लोकांना मात्र आधी प्रचंड संख्येने फॉलोअर्स गोळा करण्यासाठी, ते टिकवून ठेवण्यासाठी आणि नवनवे फॉलोअर्स मिळवण्यासाठी आपल्या कंटेंटमध्ये नावीन्य, ताजेपणा आणि दर्जात सातत्य राखणं ही आद्य गरज होऊन बसली आहे. कंटेंट क्रिएशन सारख्या सर्जनशील व्यवसायात रोज किमान एक नवीन कंटेंट टाकायचा ताण असताना सातत्य, दर्जा आणि नावीन्य टिकवणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीये. सर्जनशीलता आणि कॅलेंडरची शिस्त ह्या दोन गोष्टींचं विळ्याभोपळ्याएवढं सख्य आहे. साक्षात दिलीप प्रभावळकर लोकसत्तेत अनुदिनी सदर लिहायचे तेव्हा एका मुलाखतीत अनुदिनीची रोज येणारी डेडलाईन, रोज नवीन काय लिहायचं हा यक्षप्रश्न आणि संपादकाच्या फोनची भीती घेऊन यायची आणि बर्‍याच वेळा जबरदस्त रायटर्स ब्लॉक देऊन जायची हे प्रांजळपणे कबूल केलेलं मला आठवतंय. कुणी बॉस नसला, आपण आपल्या मर्जीचे मालक वाटलो तरीही व्यावसायिक डिजिटल क्रिएटर बनणं ही रॅट रेसच आहे. आणि रॅट रेस जिंकायचे नियमसुद्धा तेच आहेत. काही यशस्वी आणि काही अयशस्वी उदाहरणे आणि त्या अनुषंगाने थोडे डूज आणि डोन्टस् बघू.
 
 
गॅरेट गार्सिया ओव्हरबोर्ड ह्युमर नावाचं चॅनेल चालवायचा. रस्त्यात, साईडवॉकवर, दुकानातून येता जाता लोकांना थांबवायचं आणि अतिशय विचित्र, अपमानास्पद प्रश्न विचारायचे. त्यांची प्रतिक्रिया घ्यायची आणि त्याचा व्हिडिओ टाकायचा. एम टीव्ही रोडिज शो होता, तसंच काहीसं. लोकांनी सुरुवातीला प्रचंड डोक्यावर घेतला. दुसर्‍याचा झालेला अपमान, फजिती बघायला लोकांना आवडतं. त्याला लाखोंनी हिट्स, शेअर मिळायला लागले. दोन वर्षात यूट्यूबने गोल्ड प्लेट पाठवली. मीडियाने त्याला यूट्यूब मिलेनियर किताब दिला. म्हणजे त्याची नेटवर्थ मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे असं जाहीर केलं. ही नेटवर्थ म्हणजे सबस्क्राईबर्स, त्यावेळच्या कंटेंटचे अ‍ॅव्हरेज हिट्स आणि मॉनेटायझेशनची काही गृहितके वापरून काढलेला आकडा असतो. कॅपॅचिनोवरचा जाड फोम कसा असतो? दिसायला कप भरलेला पण प्यायला गेलं की फुस्स. अगदी तसाच प्रकार. गार्सियाला इतरांच्या तुलनेत पैसे मिळायला लागले खरे पण जितक्या लवकर झोका उंच गेला होता त्यापेक्षा वेगाने तो खाली आला. लोकांना फजिती बघायला आवडत असली तरी तेच तेच व्हिडिओ किती वेळ करणार? त्यात नावीन्य कसं आणणार? त्याने वेगवेगळे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, लोकांनी त्याला रामराम केला. त्याच्यासारखे प्रँकस्टर्स लाखोंच्या संख्येने असल्याने त्याचा भाव कमी झाला. सबस्क्राइबर्स घटले, एकेकाळी मिलियनच्या घरात असलेले व्ह्यूज शेकड्यावर आले तसा पैसाही आटला. गार्सियाला पॅनिक अटॅक आला. ऍडमिट करायची वेळ आली. गर्लफ्रेंड सोडून गेली. गार्सिया यूट्यूब व्हिडिओमधून फॅन्स लोकांकडेच दारू प्यायला पैसे मागायला लागला. घर सुटलं. मिलियन डॉलर्स वर्थ असणारा गार्सिया रस्त्यावर आला. लॉस एंजेलिस मधल्या हजारो होमलेस लोकांत अजून एकाची भर पडली. गार्सियाची गोष्ट ही त्याच्या एकट्याची नाहीये. असे हजारो गार्सिया सुरवातीला यश मिळवून लगेच कफल्लक झाले आहेत आणि लाखो गार्सिया काहीच न मिळवता भीकेला लागले आहेत.
 
 
अमेरिकेतला NPR नावाचा रेडिओ चॅनेल आहे. भारतातल्या अखठसारखा. त्यावर अतिशय उच्च दर्चाचे टॉक शोज, गेम शोज असतात. या शोजचं दर्जा आणि सातत्य फार वरच्या पातळीचं आहे. त्यातल्या कार टॉक नावाच्या शो बद्दल थोडं बोलू. अमेरिकेत गाडी हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. गाडीचं तेलपणी, दुखणं खुपणं ते स्वतः निस्तरतात. त्यासाठीचा जामानिमा घरातल्या गॅरेजमध्ये असतो. अगदीच नाईलाज झाला तर गाडी रिपेअर शॉपमध्ये जाते. गाडीवरचं प्रेम हे जसं भावनिक कारण तसंच मेकॅनिक तासाला 80 ते 100 डॉलर्स चार्ज करतो हे आर्थिक कारणही त्यामागे आहे. कुणा तज्ज्ञ माणसाचा सल्ला बहुमोल असायचा. लोकांचा कल, गरज बघून NPR ने कार टॉक शो सुरू केला. टॉम आणि रे माग्लिओझी भाऊ हा शो चालवायचे. टॉम आणि रे दोघेही MIT चे engineering ग्रॅज्युएट. टॉमने त्यावर इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं. रे पेशाने मोटार मेकॅनिक. दोघांनाही प्रचंड तीक्ष्ण विनोदबुद्धीचं वरदान. टॉम आणि रे म्हणजे अमेरिकेत विकल्या जाणार्‍या कार्सचा ज्ञानकोश. कुठलंही मेक, मॉडेल, वर्ष व्हेरियंट असो. गाडी अमेरिकन, जपानी वा युरोपियन. प्रश्न इंजिनचा, ट्रान्समिशनचा, चासीस, बॉडी वा इंटिरिअरचा असो. प्रश्न जनरल देखभालीबद्दल असो किंवा एखाद्या क्लिष्ट रिपेअरबद्दल. टॉम आणि रे यांच्याकडे उत्तर नाही असं व्हायचं नाही. लोक शो मध्ये फोन करून आपल्या कारच्या मेक मॉडेल, वर्ष आणि व्हेरिएंट सांगून आपली समस्या/लक्षण मांडायचे. फोन केलेल्या माणसाशी त्याच्या प्रश्नांचं उत्तर देतानाच त्याच्या शहराबद्दल, राज्याबद्दल, तत्कालीन सामाजिक, राजकीय किंवा ऐतिहासिक मुद्दे उचलून विनोद पेरत, कधी स्वतःवरच विनोद करत दोघं धमाल आणायचे. 1977 साली सुरू झालेला शो टॉम आणि रे निवृत्त झाल्याने 2012 साली बंद झाला. काही वर्षांनी कार टॉकचे भाग पॉडकास्टचा साज लेवून NPR पॉडकास्ट, ऍपल पॉडकास्ट आणि स्टिचर वर आले. कार टॉक शो सुरू असताना तो आठवड्याला 3.3 मिलियन लोक ऐकायचे. शो बंद होऊन 13 वर्ष झाल्यानंतर आणलेल्या पॉडकास्टस ची viewership आहे 2 मिलियन. ह्याला कंटेंट म्हणतात.
 
 
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची डिजिटल क्रिएटर लोकांना पैसे वाटायची पॉलिसी म्हणजेच मॉनेटायझेशन पॉलिसी ही कुणालाच नक्की माहिती नसली तरी ती अनेक गोष्टींवर अवलंबून असते. फॉलोअर्स, रिच, इंप्रेशन्स आणि एंगेजमेंट या चार पायांवर मॉनेटायझेशनचा डोलारा उभा आहे. ह्या चारीचे अर्थ वेगवेगळे आहेत, ते मोजण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि मॉनेटायझेशनवर त्याचा होणारा परिणामही. फॉलोअर्स आणि रिच थोडा नाविन्याने, थोडा मार्केटिंगने, थोडा पैसे खर्च करून सुरुवातीला मिळेलही. पण ते टिकवणे आणि वाढवणे हे सर्वथा एंगेजमेंटवर अवलंबून आहे आणि एंगेजमेंट कंटेंटच्या दर्जावर. तुमचा कंटेंट हा चारी कसोट्यांवर सतत उत्तीर्ण होणारा हवा. लोक आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त हुशार असतात आणि आग्रही पण. विचित्र हावभाव करत, कुठल्या तरी वायरल झालेल्या ट्रेंडवर स्वार होऊन, सतत लोकांच्या फजितीचे व्हिडिओ बनवून किंवा अंगात अजिबात नसलेल्या कला, ज्ञान वगैरेचा आव आणून, रेटून कंटेंट टाकून जर तुम्ही कंटेंट किंग बनायची स्वप्नं बघत असाल, तर गार्सियाची गोष्ट लक्षात ठेवा.
 
 
या वर्षीच्या एप्रिलमधली गोष्ट आहे. मिशा अग्रवाल. शिक्षणाने वकील. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायची जोरात तयारी सुरू करणारी. गंमत म्हणून इंस्टाग्राम चाळता चाळता क्रिएटर इकॉनॉमीशी तिची तोंडओळख झाली. मिशाला फॅशनमध्ये फार इंटरेस्ट. तिने मग आपल्या प्रोफाईलवरून फॅशन आणि सौंदर्याशी संबंधित रिल्स आणि फोटोज टाकायला सुरू केलं. हळूहळू फॉलोअर्स मिळत गेले, थोडेफार पैसेही मिळायला लागले. मिशाचा आत्मविश्वास वाढला. महत्त्वाकांक्षाही वाढली. आपण इंस्टाग्रामवर एक मिलियन फॉलोवर्स करायचेच या ध्येयाने मिशाला झपाटून टाकले. लोकसेवा आयोगाची तयारी मागे पडली. एक मिलियन फॉलोवर्स मी करणारच असं ध्येयवाक्य तिने तिच्या फोनच्या वॉलपेपरवरसुद्धा लिहून ठेवलेलं होतं. तिने स्वतःला ऑनलाइन इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये, रिल्स करण्यात झोकून दिले. दिवसरात्र आपले फॉलोअर्स मिलियन ही जादुई संख्या कधी पार करतात याचाच मिशा विचार करायला लागली. फॉलोअर्स वाढले की खूश व्हायची. फॉलोअर्स तितकेच राहिले किंवा कमी झाले की नाराज असायची. जे अनेक इन्फ्लुएन्सर्स बाबतीत होतं तेच मिशाच्या बाबतीत व्हायला लागलं. एका ठराविक आकड्यावर तिचे फॉलोवर्स स्थिर झाले. बहुतेक तिच्या कंटेंटमध्ये तोचतोचपणा यायला लागला होता किंवा इंस्टाग्रामने आपला अल्गोरिदम बदलला होता. कारण काहीही असो पण मिशाचे फॉलोअर्स दिवसेंदिवस कमी व्हायला लागले. तिचा धीर सुटायला लागला. तिच्याही नकळत मिशा नैराशेच्या खोल गर्तेत जात होती. आपण एलएलबी झालो आहोत. हुशार आहोत. लोकसेवा आयोगाची तयारी करतो आहोत. आपल्यावर प्रेम करणारी असंख्य मित्रमंडळी, नातेवाईक आपल्या आजूबाजूला आहेत. आपल्यापुढे आपलं अख्खं आयुष्य आहे. यातलं काहीही तिला महत्त्वाचं वाटेना. इंस्टाग्रामवरचं आपलं प्रोफाइल आणि आपले फॉलोअर्स हेच तिचं सर्वस्व बनलं होतं. फॉलोअर्सची घटती संख्या तिला एखाद्या सापासारखी डसायची. एक दिवस ही निराशा सहन न होऊन मिशाने आत्महत्या केली. मिशा फक्त 24 वर्षांची होती.
 
 
साल 2014 मॅडिसन हॉलेरान पेनसिल्व्हानिया युनिव्हर्सिटीची ट्रॅक अँड फील्ड मधली स्टार प्लेयर होती. इंस्टाग्रामवर एकदम लोकप्रिय. सोशल मीडियावर आदर्श कॉलेज स्टुडन्ट आणि यशस्वी अ‍ॅथलिट अशी प्रतिमा होती. सोशल मीडियावर असलेली एकदम लोकप्रिय मॅडिसन आणि प्रत्यक्ष आयुष्यातला नैराश्याशी झगडणारी मॅडिसन या विरोधाभासाच्या कात्रीत मॅडिसन सापडली होती. प्रत्यक्षात तसं काही वाटत नसताना आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर आपली आनंदी, यशस्वी, उत्साही आणि म्हणून आदर्श अशी प्रतिमा जपायच्या ताणाने तिच्या नैराश्यात प्रचंड भर पडत गेली आणि तिने आ*त्महत्येचा मार्ग स्वीकारला. मॅडिसन फक्त 19 वर्षाची होती.
 
 
जून 2025. मकायला रेने. युट्युब स्टार आणि प्राणीमित्र. तिने ‘सेव द फॉक्स’ नावाची प्राण्यांचा सांभाळ करणारी संस्थाही काढली होती. आपल्या यूट्यूब चॅनलवरून ती आपल्या संस्थेचा प्रचार आणि एकूण प्राण्यांवर होणार्‍या जुलमाविरुद्ध खणखणीत आवाज उठवायची. तिला, तिच्या संस्थेला मिळणारी प्रसिद्धी बघून तिच्याशी स्पर्धा करणार्‍या संस्थांनी तिला हेरून, मोहीम आखून तिची पद्धतशीर ऑनलाइन बदनामी सुरू केली. स्वभावाने हळव्या असलेल्या मकायलाने दुर्लक्ष करायचा पूर्ण प्रयत्न केला. पण सततच्या या हल्ल्याने हताश होऊन तिने आपलं आयुष्य संपवलं. मकायला 29 वर्षांची होती.
 
 
अपयश, निराशा, बदनामी किंवा ताण. मिशा, मॅडिसन आणि मकायला ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. 72% डिजिटल क्रिएटर लोकांना बर्नआउटचा त्रास आहे. यातले फक्त व्यावसायिक डिजिटल क्रिएटर धरले तर हा आकडा 83 टक्क्यांवर जातो. यातल्या 66% लोकांनी बर्नआउटचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतोय हे मान्य केलंय. सतत वाढत्या फॉलोअर्स पाठीमागे धावण्याच्या चिंतेमुळे, त्यात असलेल्या स्पर्धेमुळे आणि इंस्टाग्राम, यूट्यूब, टिकटॉक वगैरेच्या बदलत्या पॉलिसीजमुळे 72% डिजिटल क्रिएटर लोकांना एन्क्झाईटी जडली आहे. हा सगळा उपद्व्याप आपल्याला जमणं शक्य नाही असा विचार करून 32% व्यावसायिक डिजिटल क्रिएटर्स गाशा गुंडाळायच्या विचारात आहेत. जगभरातले एकूण 200 मिलियन कंटेंट क्रिएटर्स गृहीत धरता मानसिक परिणाम होत असलेल्या लोकांचा हा आकडा किती भीषण आहे ते लक्षात येईल. ह्यामध्ये अनेक जण असह्य होऊन मिशा, मॅडिसन किंवा मकायलाच्या मार्गावर जायचा धोका हे कंटेंट क्रिएटर्सच्या जगाचे भयंकर वास्तव आहे. हवे तितके पैसे मिळवण्याचा किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा राजमार्ग प्रत्यक्षात चिंचोळा, वळणावळणाचा आणि अनेक खड्ड्यांनी भरलेला आहे.
मी स्वतः हौशी अथवा व्यावसायिक कंटेंट क्रिएटर नसलो तरी इथे यशस्वी व्हायचे आणि माझ्या दैनंदिन कामात यशस्वी व्हायचे ठोकताळे बर्‍याच अंशी सारखे आहेत. मी जर व्यावसायिक कंटेंट क्रिएटर व्हायचं ठरवलं तर त्याची आखणी कशी करेन याची एक झलक देऊन लेख संपवतो आहे.
 
 
समोरचा उमेदवार 10 वर्ष अनुभवी असो अथवा 20 वर्ष. माझ्यासमोर इंटरव्ह्यूला आला की मी पहिला प्रश्न विचारतो की तुझ्या करिअरची थोडक्यात ओळख करून दे. सहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊ नकोस. मला आजपर्यंत 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेतलेला उमेदवार सापडला नाहीये.
 
 
महत्त्वाच्या क्लायंट मीटिंगची तयारी सुरू असते. मीटिंगचा वेळ थोडा असतो, भरपूर काही कव्हर करायचं असतं. मी सांगतो आपली इंट्रोडक्शन अर्ध्या मिनिटात संपवा. शक्यतो एक स्लाईडवर फोटो आणि रोल लिहा, पुरे होईल. क्लायंटकडून आणि आमच्याकडून कमीत कमी तीनचार लोक तीन-चार मिनिटं प्रत्येकी घेतात. तासाच्या मीटिंगमधली 15 मिनिटं अशीच जातात. मीटिंगमध्येही सगळा भर स्वतः बोलण्यावर. क्लायंटला बोलतं करण्यावर नाही. जर तासाभराच्या मीटिंगमध्ये तासभर तुम्हीच बोललात तर तुमच्या माहितीत शून्य भर पडलेली असते. असे लोक मला फार यशस्वी होताना दिसत नाहीत.
 
 
हे असं सारखं होतं कारण माणसाला आपला स्वतःचा आवाज ऐकायला आवडतो. स्वतःच्या गोष्टीवर त्याचं प्रेम असतं, ती लोकांना संधी मिळेल तिथं आणि मिळेल तितका वेळ ऐकवायची असते. स्वतःचे कलागुणसुद्धा स्वतःला थोड्या जास्त तीव्रतेने भावत असतात. संधी मिळाली नाही म्हणून नाहीतर सेहवागचे रेकॉर्ड मोडण्याइतकी धुवांधार फलंदाजी करतो मी. किंवा संसारात बुडले नाहीतर संगीत क्षेत्रात श्रेया-सुनिधी सोबत मीही तळपले असते. आपलं नृत्य, वक्तृत्व, अभिनय, विनोद, लेखन इ. इ. फक्त संधीअभावी यशापासून इतकी वर्षं वंचित आहे. आता प्लॅटफॉर्म्स मिळाले आहेत तर अब कौन है रोकनेवाला अशा विचाराने डिजिटल क्रिएटर बनलेले लाखो लोक असतात. बुडबुडा फुटला की सगळ्यांत आधी हेच लोक खाली आपटतात. खचून जातात. तुम्हाला जर या बुडबुड्यात तगून यशस्वी व्हायचं असेल तर काही मूलभूत गोष्टी व्यवस्थित जमायला हव्यात.
 
 
सध्या यू कॅन डू इट, तू है तुझे शायद नहीं पता पर तू है, तुम्ही बेस्ट द्या युनिवर्स तुम्हाला यश देईल. वगैरे मोटीव्हेशन्स लोकांमध्ये भरून पार काडी पैलवानाचा झीबीस्को करायची फॅशन आहे. मी जे सांगणार आहे ते त्याच्या पूर्ण विरुद्ध आहे. तुम्ही तुमचा कंटेंट मार्केटमध्ये विकायला आणता आहात तर त्याला मार्केटचे नियम लावावे लागतात. एक उदाहरण घेऊ. समजा तुम्हाला स्वयंपाकात गती आहे, आवड आहे. लोकांनी केलेल्या कौतुकाने भारावून जाऊन तुम्ही कुकिंग चॅनेल काढायचा ठरवता. ते प्रत्यक्षात आणायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल:
 
 
1. तुम्ही कुठं उभे आहात? - कुठल्याही नवीन कस्टमरची मीटिंग हवी असेल, किंवा धंदा मिळवायचा असेल तर आम्ही पहिला प्रश्न स्वतःलाच विचारतो. असंख्य सप्लायर तीच सर्विस द्यायला मार्केटमध्ये असताना क्लायंट कशाला देईल आपल्याला मीटिंग? कशाला देईल आपल्याला धंदा? अगदी तेच इथेही लागू आहे. स्वयंपाक आणि खाण्याशी संबंधित पोस्ट्स, रिल्स, व्हिडिओज आणि फोटोज् नी सोशल मीडिया भरून वाहतो आहे. 93 टक्के जनतेला रोज किमान दहा वेळा खाण्याशी संबंधित कंटेंट त्यांच्या फीड मध्ये दिसतो. इथेही आवर्जून फॉलो केले जाणारे शेफस्, सेलिब्रिटी आणि कंटेंट क्रिएटर सेलिब्रिटी लोकांनी अवकाश व्यापून टाकलेलं आहे. इथे अजूनही मोठी संधी आहे. पण तुम्ही शिरकाव कसा करणार? तुम्ही नवा, ताजा, वेगळा असा काय कंटेंट देणार आहात जो रामसे, ऑलिव्हर, ब्रार, कपूर, वाह शेफ यांच्यापासून ते हेब्बार, मधुरा आणि गावरान एक खरी चववाल्या आज्या ह्या रेंजमधले लोक देत नाहीयेत? तुमची खासियत, तुमचा ब्रँड, तुमची वेगळी ओळख काय असणार आहे? ह्या प्रश्नांची उत्तरं नीट लिहून त्याचा व्यवस्थित उहापोह करणं ही पहिली आणि महत्त्वाची चाळणी आहे.
2. स्वयंपाक ते कन्टेन्ट- घरी पदार्थ करणं आणि तो आपल्या रिलमध्ये सादर करणं यात मोठा फरक आहे. रिल हे एक छोटं िीेर्वीलींळेप आहे. त्याला एक स्टोरी लागते, स्क्रिप्ट लागते. एक समान धागा, कधी ह्युमर, कधी एखादी आठवण. कधी पदार्थाचा इतिहास, त्याचा भूगोल. त्यानंतर येतं उत्तम रेकॉर्डिंग, एडिटिंग आणि पोस्ट प्रोसेसिंग. फक्त रेसिपी बघायला लोक कदाचित एकदा येतील. पण एंगेजमेंट मिळणार नाही. आम्ही जेव्हा एखाद्या नव्या क्लायंटकडे डीलवर काम करत असतो, मीटिंग संपताना माझा कटाक्ष मीटिंग लक्षवेधी करण्याकडे असतो. आपण ज्याला भेटलो होतो तो माणूस आपल्या परोक्ष इतरांना आपल्याबद्दल चांगलं काय आणि कसं सांगेल ह्याचं प्लॅनिंग करतो आम्ही. आपल्या परोक्ष जर आपल्याबद्दल चांगलं बोलत असेल, आपणहून आपली प्रेझेंटेशन्स इतरांना पाठवत असेल तर तुम्हाला एकातून दोन, दोनातून चार अशा मीटिंग्ज मिळत जातात आणि शेवटी धंदा मिळतो. इथेही त्याच लॉजिकने एंगेजमेंट मिळेल.
3. तुमच्यात इंधन किती आहे? आधी म्हटलं तसं साधारण लाखभर फॉलोअर्स झाल्याशिवाय म्हणावा इतका पैसा कंटेंट क्रिएट करून मिळत नाही. इंस्टाग्राम ते यूट्यूब अशी नजर टाकली तर एक लाख फॉलोअर्स मिळवायला साधारण 1 वर्ष ते 3 वर्ष लागू शकतात. आणि या काळात तुम्हाला सातत्याने रोज किंवा आठवड्यातून चार वेळा तरी ताजा माल आणून टाकावा लागतो. त्याचा व्यवस्थित प्लॅन बनवावा लागतो. आपल्यात सर्जनशीलता किती आहे? किती प्रकारची आहे? सुरुवातीला किती चांगला कंटेंट टाकला आणि फार कुणी पाहिला नाही तरी हिरमुसून न जाता सातत्य आणि दर्जा दोन्ही राखणं जमेल का? समजा पदार्थ उत्तम करता येतो, पण त्याची रंजक गोष्ट करून सांगता येते का? टेक्निकल प्रोसेसिंग वगैरे तेही एक स्किलच. अशा सगळ्या बाबींचं मिळून होतं ते तुमच्या आतलं इंधन. आम्ही जेव्हा एखाद्या ठराविक धोरणाअंतर्गत नवीन कस्टमरचा पाठपुरावा करतो तेव्हा सतत दुर्लक्ष, अपयश, प्रसंगी अपमान सहन करून प्रयत्न करत राहतो. कधी सहा महिने लागतात, कधी वर्ष. चिकाटी सुटत नाही. यश तेव्हाच मिळतं. सहज मिळालं की ते सहज जातंही.
जाता जाता इतकंच सांगेन की घरचे आणि मित्रमंडळी ह्यांचं कौतुक सातत्याने मिळवणं आणि सोशल मीडियावर मोठ्या स्केलवर तसंच यश मिळवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. You judge yourself based on what you can do; others judge you based on what you have done. हे माझ्या अनेक आवडत्या वाक्यांपैकी एक इथेही लागू आहे.