रे...हिरव्या चाफ्या

विवेक मराठी    25-Oct-2025
Total Views |
@राजेंद्र अत्रे
 
 
green chafa
हिरव्या रंगाने आणि मंद मादक गंधाने मन धुंद करतोस. हुंगणारा देहभान विसरून जातो. तुझ्याविषयी एवढं समजल्यावर, मला सांग, कोणाला तुला भेटण्याची उत्सुकता वाटणार नाही? माझ्याही मनात तुला पाहण्याची प्रचंड ओढ निर्माण झाली. तू कुठं सापडशील, याचा शोध मी तेव्हापासून घेत राहिलो आणि अखेर तुला शोधलं. तुझ्याकडून शिकलो की, व्यवहारी दृष्टीकोन पेरणारी माणसं आपल्या अवतीभवती खूप असतात, पण आपण आपल्या विचारावर ठाम असावं, हे तूच शिकवलंस ना रे, हिरव्या चाफ्या!
हिरव्या चाफ्या, खूप आवडतोस तू मला. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. अगदी चकोराचं चंद्रावर आणि चातकाचं पावसाच्या सरीवर असतं ना, तितकंच हे प्रेम आपोआप आणि नकळत कसं निर्माण झालं, हे मलासुद्धा कळलं नाही! मला ते नाही सांगता येणार! माझ्या किशोरवयातच एकानं मला तुझ्याबद्दल सांगितलं होतं. तेव्हाच माझ्या मनात तुला पाहण्याची प्रचंड ओढ निर्माण झाली होती. तुला म्हणे खूप सुगंध असतो. तो खूप मंदही असतो. तो सुगंध येताच म्हणे मन अगदी वेडावून जातं आणि ती व्यक्ती शोध घ्यायला लागते की, हा एवढा मंद सुगंध कुठून येतोय? म्हणजे तुझं साम्य अगदी कस्तुरीशीच! ती बहीणच शोभते तुझी! पण तू लपून बसलेला असतोस म्हणे झुुपकाभर हिरव्या पानात, त्यांचाच रंग घेऊन! दिसतंच नाहीस बघणार्‍यांच्या साध्या दृष्टीला! मग अतिशय सूक्ष्म दृष्टीने आणि एकाग्र होऊन शोध घ्यावा लागतो तुझा!... मग तू दिसतोस. तुझ्या हिरव्या रंगाने आणि मंद मादक गंधाने मन धुंद करतोस. हुंगणारा देहभान विसरून जातो. तुझ्याविषयी एवढं समजल्यावर, मला सांग, कोणाला तुला भेटण्याची उत्सुकता वाटणार नाही? माझ्याही मनात तुला पाहण्याची प्रचंड ओढ निर्माण झाली. तू कुठं सापडशील, याचा शोध मी तेव्हापासून घेत राहिलो.
तुझ्या संबंधीची चर्चा निघायची, तेव्हा तुझ्याबद्दल अनेकजण काही-काही बोलायचे. असंच एकदा एकानं सांगितले की,‘त्याचा सुगंध लांबूनच घ्यायचा असतो. त्याच्या जवळ कधी जाऊ नये कारण त्याच्या तळाशी विषारी सर्प बसलेले असतात, त्याला वेटोळे घालून. फुलाजवळ जायला गेलो तर ते दंश करतात. तू त्यांनासुद्धा हवा-हवासा वाटतोस! ते तुला सोडायला तयार नसतात.’ चंदनाच्या झाडाबद्दल असं ऐकून होतो. त्यानंतर तुझ्या बाबतीतही हे जेव्हा ऐकण्यात आलं, तेव्हा तुझ्याबद्दलचा आदराचा एक नवा कप्पाच काळजात तयार झाला. या कथा खर्‍या की खोट्या माहिती नाही, पण त्यात, तुझ्याबद्दलचा मोठेपणा नक्कीच आहे आणि तो मनाला वेडावून टाकणारा नक्कीच आहे.
 
green chafa
 
एक तरुणी म्हणे, नटून-थटून एकदा बागेत फिरत होती. त्या बागेत अनेक रंगांची खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती. फिरत असताना तिला कुठूनतरी मंद असा सुगंध आला. त्या सुगंधानं ती वेडावून गेली आणि शोध घ्यायला लागली की, हा सुगंध कुठून येतोय? ती सगळी फुलं हुंगून बघायला लागली. ती थकून गेली, पण तिला तो सुगंध काही केल्या सापडला नाही. तू मात्र तिची फजिती बघत होतास. न राहवून तूच तिला शेवटी म्हणालास,
‘हुंगुहुंगुनी कशास बघशी तसा कुठे मी दिसतो गं ।
गर्द भड़क या रंगांमध्ये कधीतरी का असतो गं ॥ ’
रंग आकर्षक म्हणून त्याला सुगंध असतो असे नव्हे।
घोळक्यात या ओळखण्याला ठळकपणा मज नसतो गं ॥
गंध हुंगुनी रंग असावा इच्छा ऐसी धरिशी का? ।
दान सुगंधी ज्यास लाभले त्याशी रंग कशाला गं ॥
असा सहज मी कधी न दिसतो हिरवा चाफा मज म्हणती ।
तुकडे केले, सुकलो तरिही गंध त्यातही असतो गं ॥
ती तरुणी म्हणजे मानवी वृत्तीही असू शकेल कदाचित! तिच्याशी तुझं हे बोलणं माझ्याही काळजाला स्पर्शून गेलं. तेव्हापासून तर तुला पाहण्याची ओढ अधिकच अनावर झाली.
एकदा एका मंदिरात दर्शनाला गेलो होतो. तिथला परिसर निसर्गरम्य होता-तिथं तुझी खूप झाडं होती. पण तू काही दिसला नाहीस. खाली खूप बिया पडल्या होत्या. पुजार्‍यानं सांगितलं, या बिया कोमट पाण्यात एक दिवस भिजत ठेवायच्या आणि दुसर्‍या दिवशी त्याचं रोपण करायचं. तसं केलं पण त्या बियांना अंकुर काही फुटला नाही. खूप निराश झालो. तरी तुला शोधायचा ध्यास मात्र संपला नाही. म्हणतात ना,’मनाचा ध्यास सिद्धीपर्यंत घेऊन जातच असतो!’ अगदी तसंच झालं. नर्सरीत तुझी रोपटी विक्रीला आल्याची बातमी समजली आणि तात्काळ तिथं जाऊन दोन रोपं घेतली, तेव्हा खूप आनंद झाला. घराच्या दोन्ही खिडक्यांच्या बाजूला ती लावली आणि उठता-बसता त्यांच्यावर लक्ष ठेवलं. रोपं मोठी झाली आणि एके दिवशी दोन्ही झाडावर दोन-दोन कळ्या उमललेल्या दिसल्या. दिव्यतेचा साक्षात्कार व्हावा, तसा आनंद मला त्यावेळी झाला. त्या कळ्यांच्या फुलण्यावर मी सातत्यानं आणि बारकाईने लक्ष ठेवून होतो. त्या कळयांचं फुलात रूपांतर होत होतं.
एके दिवशी मी पहाटे उठल्याबरोबर खिडकी उघडली तो मंद सुगंध आला. मी ओळखलं. आजपर्यंत न अनुभवलेला वेगळा असा हा सुगंध तुझाच असणार! आयुष्यात पहिल्यांदा हा सुगंध घेऊन स्वर्गसुख अनुभवलं. तुझी ही पहिली भेट अवर्णनीय होती. मी गडबडीने बाहेर आलो, तुला पहायला. पण तू कुठे आहेस ते काही दिसेना. तुझ्या सुगंधाची भेट झाली पण रूपाची भेट घेण्यासाठी अधीर होतो. शेवटी मी तुला शोधून काढलंच! आणि खूप वेळ डोळे भरून पाहिलं. नाजूकपणा नसला तरी भारदस्तपणा, टवटवी, तजेलपण आणि रसरशीतपण होतं तुझ्यात! सुगंधाला साजेलसं. तू सहज दिसत नाहीस, तुला शोधावंच लागतं आणि त्यासाठी दृष्टीसुद्धा वेगळीच असावी लागते, असे जे ऐकलं होतं, त्याची प्रचिती आली. एक तत्त्वज्ञान प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं! तुझं मोठेपण काळजात साठवून ठेवलं.
पण तुला अधून-मधून माझी गंमत करायचीही लहर येते की काय, कुणास ठाऊक? एकदा, खिडकीतून तुझा सुगंध आला म्हणून तुला शोधण्यासाठी गडबडीनं बाहेर आलो आणि तुला शोधू लागलो, पण तू सापडतच नव्हतास. झाडाच्या तिकडच्या बाजूनं सुगंध येतोय म्हणून तिकडच्या बाजूला गेलो तर सुगंध इकडच्या बाजूनं यायचा. सगळ्या बाजू अगदी नीट न्याहाळून तुला शोधत राहिलो, पण तू कुठं दिसतंच नव्हतास. तुझा आता विस्तारही बराच झाला होता. मला सापडेनास म्हणून घरातल्या छोट्या पनूला बोलावलं आणि म्हटलं, ’बघ रे, फुलं कुठं दिसताहेत ते?’ त्यानंही खूप शोधलं. शेवटी तो म्हणाला,‘अहो दादा, मी पान न् पान तपासलं, पण फूल कुठंच दिसत नाहीये. कधी-कधी झाडालाच सुगंध येत असतो, तुमच्या लक्षात कसं येत नाही?’ शेवटी तू सापडलाच नाहीस! अशी गंमतही तू आता करायला लागला आहेस!
तू आता फुलत असतोस. बहरून जात असतोस. पानोपानी लगडून जात असतोस. तुझ्या संगतीत मी माझी सारी दुःखं विसरून जातो. श्वासातून तू माझ्या शरीरभर पसरत आहेस. धमन्या- धमन्यातून वाहत आहेस आणि रंध्रारंध्रातून हुंकार देत आहेस. मी तुझा बहर वेचून घेत असतो. चांदीच्या वाटीत थोडं पाणी घालून त्यात तुझी स्थापना करून ती वाटी घरातल्या देव्हार्‍यापुढे ठेवतो. घरभर तुझा सुगंध दरवळत राहतो. जणू तू माझं अवघं जगणंच सुगंधी करून टाकलंयस. हे तुझं ऋण मी कसं फेडू? हेच मला समजत नाही. खिडकीच्या बाजूनं असलेल्या रस्त्यावरून जाणारीयेणारी माणसं सुगंधाने भारून जातात. काहीजण क्षणभर थांबतात. इकडेतिकडे बघून तुला शोधतात, पण तू दिसत नाहीस. एकदा एक पाहुणी घरी आली. तिला तुझ्याबद्दल सांगत होतो, तेव्हा ती म्हणाली,‘काय करायचंय नुसत्या वासाला? एखादं आंब्याचं झाड लावलं आस्तं तर आंबे तरी आले आस्ते खायला! वासाला काय, अत्तर आणून लावलं तर म्हणीन तसला वास येतोय!’ तिच्या या व्यवहारी बोलण्यानं माझं डोकं चक्रावून गेलं! तिला काय उत्तर द्यावं, तेच मला कळेना. मी म्हटलं, ’आंब्याची जागा शेतात किंवा मोकळ्या रानात आणि शेत नसलं तरी आंबे आणता येतातच ना बाजारातून! घराभोवती सुगंधी फुलंच हवीत!’
असा व्यवहारी दृष्टीकोन पेरणारी माणसं आपल्या अवतीभवती खूप असतात. पण आपण आपल्या विचारावर ठाम असावं. यात चुकीचं काही नाही ना? एवढं मात्र तपासून पहावं. हे तूच शिकवलंस ना रे, हिरव्या चाफ्या!