केईएम - आरोग्य वटवृक्षाची शताब्दी

विवेक मराठी    27-Oct-2025
Total Views |
@अलका जोशी  
मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्याही सीमा ओलांडून हजारो रुग्णांचा ओघ केईएम रुग्णालयाकडे गेली शंभर वर्षे अव्याहतपणे वाहतो आहे. इथे कार्यरत असलेले जागतिक दर्जाचे निष्णात डॉक्टर्स, परवडणारी रुग्णसेवा आणि औषधोपचार म्हणजे चोवीस तास अविश्रांत चाललेला आरोग्ययज्ञ आहे. मुंबईचे हृदय असलेल्या आणि गोरगरिबांच्या आरोग्याचे आशास्थान राहिलेल्या केईएम रुग्णालयाची आणि तिथल्या सेवाव्रतींची घोडदौड सदा निरंतर राहो.
 
kem hospital
 
संख्य रुग्णांसाठी केईएम हा मदतीचा श्वास आहे. या रुग्णालयात उपचार घेऊन भारताच्या कानाकोपर्‍यात परत जाणारे रुग्ण फॉलोअपसाठी दूरच्या प्रदेशातून पुनश्च केईएमची वाट धरतात, पुन्हा त्याच डॉक्टरांची वाट पाहत थांबतात, इतका विश्वास त्यांचा केईएममधल्या आरोग्यसेवेवर असतो. रुग्णसेवेची पंढरी अशी परळ विभागाची ख्याती आहे. ही श्रद्धा इतकी दृढ आहे की परळ हे जर रुग्णांचे पंढरपूर मानले तर केईएम रुग्णालय हे निश्चितच विठूमाऊली म्हणावे लागेल.
 
 
किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलची स्थापना 22 जानेवारी 1926 या दिवशी झाली आणि त्याचवेळी सर गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजदेखील स्थापन झाले. या दोन्ही संस्था 2025- 26 या वर्षात शतकपूर्ती करत आहेत. त्या निमित्ताने किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलच्या वाटचालीचा मागोवा घेताना सगळ्यात आधी केईएम रुग्णालयाचा इतिहास पाहणे आवश्यक आहे.
 
 
kem hospital
 
मुळात केईएम रुग्णालयाची स्थापना करण्याची आवश्यकता तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरला का वाटली, हे पाहिले तर त्याचे मूळ आपल्याला मुंबईच्या आर्थिक भरभराटीत आणि या संपन्नतेमुळे मुंबई बेटावर झपाट्याने झालेल्या लोकसंख्या वाढीत सापडते. 1896 साली प्लेगच्या साथीने मुंबई बेटावर लाखो लोकांचे प्राण गेले होते. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशी इस्पितळे आणि रुग्णसेवा उपलब्ध नाहीत हे लक्षात आले होते. त्यामुळे मुंबई बेटावर नवीन रुग्णालयांची निर्मिती करणे आवश्यक आहे असे तत्कालीन सरकारने ठरविले. परळची हाफकिन इन्स्टिट्यूट हा पूर्वी गव्हर्नरचा दरबार होता. या हाफकिन इन्स्टिट्यूटकडील सुमारे 50 हजार स्क्वेअर यार्ड इतका मोठा भूखंड मुंबईमध्ये आधुनिक इस्पितळाच्या उभारणीसाठी देता येणे शक्य आहे असा विचार मुंबई इलाख्याच्या ब्रिटिश गव्हरर्नरपुढे आला.
 
 
ही जबाबदारी मोठी होती. ती पेलण्यासाठी आवश्यक असलेले प्रशासकीय सामर्थ्य मुंबई महानगरपालिकेमध्ये होते. त्यामुळे पोलीस ड्यूटीऐवजी आधुनिक रुग्णालयांची उभारणी, वैद्यकीय शिक्षण देणार्‍या महाविद्यालयाची स्थापना या बाबी महानगरपालिकेच्या आवश्यक कर्तव्यात समाविष्ट करण्यात आल्या आणि त्या पालिकेच्या आरोग्यसेवेशी संलग्न झाल्या. अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेकडे या इस्पितळाच्या उभारणीची जबाबदारी सोपविण्यात आली. दरम्यान 1910साली इंग्लंडचा राजा किंग एडवर्ड याचे निधन झाले. हा किंग एडवर्ड म्हणजेच प्रिन्स ऑफ वेल्स. तो 1876 साली मुंबई भेटीवर आलेला असताना त्याचे मुंबईकरांशी आणि मुंबईशी चांगले नाते जुळले होते. किंग एडवर्ड याचे निधन झाल्यामुळे मुंबईत उभारण्यात येणार्‍या नवीन इस्पितळाचे नाव किंग एडवर्ड मेमोरियल असावे अशी सूचना ब्रिटिश गव्हर्नरने केली. मुंबईतल्या सर्वच धुरीणांनी ती तत्काळ उचलून धरली. इतकेच नव्हे तर इस्पितळ उभारण्याकरीता सरकार जरी मदत करणार असले तरीदेखील मुंबईच्या आरोग्यासाठी स्थापन होणार्‍या नवीन इस्पितळाच्या मदतीसाठी अनेक धनिकजनांनी सढळ हस्ते देणग्या दिल्या. सामान्य जनतेकडूनही मोठ्या प्रमाणावर पैसा उभा करण्यात आला. ब्रिटिश गव्हर्नरने रुपये 500000 अधिक 50 हजार स्क्वेअर यार्ड इतकी जमीन रुग्णालयासाठी दिली. केईएम रुग्णालयाच्या आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचा एकूण खर्च केईएम स्थापनेच्या कोनशिलेवर नमूद केलेला आहे. ही रक्कम कशी जमा झाली याची काही उदाहरणेही तिथे लिहिलेली सापडतात. केईएम फंड असोसिएशनने एकूण सात लाखाचा निधी जमा केला होता. सर करीमभाय इब्राहिम एंटरटेनमेंट फंडही उभारण्यात आला होता. त्याचप्रमाणे मुंबईतील दोन दानशूर असामी पुरुषोत्तमदास मंगलदास आणि डॉ. हबीब इस्माईल जानमोहम्मद यांनी अनुक्रमे एक लाख आणि रुपये तीस हजार अशा देणग्या दिल्या होत्या.
 
 
केईएम इस्पितळाचा इतिहास हा राष्ट्रवादाने भारलेला आहे. त्याचे झाले असे की, डॉ. के. एन. बहादुरजी हे मुंबईचे डॉक्टर लंडन येथून एम.डी. ही पदवी संपादन करून मुंबईत परतले. त्यानंतर त्यांनी ग्रँड मेडिकल कॉलेज इथे वरिष्ठ पदावर नियुक्ती मिळावी म्हणून अर्ज केला. परंतु या काळात केवळ ब्रिटिश इंडियन मेडिकल सर्विसेसमधून उत्तीर्ण झालेल्या गोर्‍या डॉक्टर मंडळींनाच हॉस्पिटल्सच्या विभाग प्रमुखपदी आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रमुखपदी नियुक्त केले जात असे. त्यामुळे गोरे युरोपियन डॉक्टर भारतीय रुग्णालयांमध्ये वरिष्ठ पदांवर मोनोपोली गाजवत असत. या गोर्‍यांच्यापेक्षा अधिक गुणवंत असूनही, शैक्षणिक पात्रता आणि दांडगा अनुभव असूनही भारतीय डॉक्टर्सना वरिष्ठ पदे दिली जात नसत. डॉ. बहादुरजी आणि प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. जानमोहम्मद या दोघांनाही या मक्तेदारीमुळे डावलण्यात आले होते.
 
 
डॉ. बहादुरजी हे प्रखर राष्ट्रभक्त होते. त्यांना हा अन्याय सहन झाला नाही. ते मुंबईसिंह सर फिरोजशाह मेहता यांना भेटले आणि हा अन्याय दूर झाला पाहिजे असे त्यांना पटवून दिले. याच दरम्यान मुंबई महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणारे रुग्णालय हे भारतीय डॉक्टर्सनीच भारतीयांकरता चालविले पाहिजे असे ठाम प्रतिपादनही त्यांनी केले. पुढे 22 जानेवारी 1926 रोजी डॉ. बहादुरजी यांचे स्वप्न केईएम रुग्णालयाच्या रूपाने सत्यात उतरले खरे, परंतु ते पाहण्यासाठी डॉ. बहादुरजी मात्र हयात राहिले नव्हते. दिनांक 15 ऑगस्ट 1898 रोजी ते हा इहलोक सोडून गेले होते.
 

kem hospital 
 
केईएम रुग्णालयाचे व्यवस्थापन ब्रिटिश इंडियन मेडिकल सर्व्हिसेस (आयएमएस) ऐवजी भारतीय डॉक्टरांनीच केले पाहिजे ही बाब ज्यांनी उचलून धरली अशा मुंबईतील अन्य प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे सर चिमणलाल सेटलवाड आणि सर नारायणराव चंदावरकर. हाफकीन इन्स्टिट्यूटची जी जमीन केईएम रुग्णालयाला द्यायची होती त्या संबंधात काही वाद सेठ गोरधनदास सुंदरदास यांच्या कुटुंबीयांशी निगडित होता. मुळजी जेठा कुटुंबातील सर गोरधनदास सुंदरदास यांनी तो वाद मागे घेतला आणि ही जमीन केईएम रुग्णालयाला हस्तांतरित होऊ शकली. सर गोरधनदास यांनी मोठी देणगीही रुग्णालयासाठी दिली. त्या बदल्यात भारतीय डॉक्टर्सद्वारे हे रुग्णालय संचालित असावे अशीही अट त्यांनी घातली. नाईलाजाने ब्रिटिश गव्हर्नरला केईएम रुग्णालय हे भारतीय डॉक्टरांच्या स्वाधीन करावे लागले.
 
 
मुंबईत एकाहून एक सुंदर वास्तुशिल्पे घडविणारे श्रेष्ठ वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांच्यावर केईएमचा नियोजन आराखडा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मुंबईतील यापूर्वीची रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये ज्या धर्तीवर बांधण्यात आली होती त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा आराखडा केईएमसाठी असला पाहिजे अशी आग्रही भूमिका केईएमचे पहिले डीन असलेले डॉ. जीवराज मेहता यांनी घेतली आणि त्याप्रमाणे अतिशय उत्तम नियोजन असलेला वास्तू आराखडा डॉ. जीवराज मेहता यांच्या आग्रहानुसार जॉन विटेट यांना तयार करावा लागला. त्यावेळीच्या रुग्णालयांच्या आराखड्यात वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णांची ओपीडी असे. त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय, विभागप्रमुख, डॉक्टर्स आणि रुग्णालय हे सर्व विखुरलेले असत. परंतु केईएममध्ये सर्व ओपीडीज एकाच छताखाली असाव्यात आणि वैद्यकीय महाविद्यालयापासून रुग्णालय अतिशय जवळ अंतरावर असायला हवे, म्हणजे रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यासाठी तसेच रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक, नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टर्स यांना जलद गतीने वावरणे सोयीचे होईल.....अशा अनेक बाबी डॉ. जीवराज मेहता यांनी सुचविल्या आणि त्याप्रमाणे विटेट यांनी केईएम इस्पितळाचा आराखडा तयार केला. त्यानुसार दोन दुमजली भव्य दगडी वास्तू परळ येथे बांधण्यात आल्या. पहिली इमारत ही केईएम रुग्णालय आणि दुसरी इमारत ही सेठ गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय म्हणून स्थापन झाली. या दोन्ही इमारतींना जोडणार्‍या दोन मार्गिकाही डीन डॉ. जीवराज मेहता यांनी सांगितल्यानुसार बांधण्यात आल्या.
 
 
वास्तुविशारद जॉर्ज विटेट हे मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे आणि गेटवे ऑफ इंडियाचेही शिल्पकार होते. परंतु केईएमच्या उभारणीत मात्र हॉस्पिटलच्या डीनचा सल्ला प्रमाण मानूनच वास्तू आराखडे मंजूर करण्यात आले. पुढे जॉर्ज विटेट यांनी रुग्णालयासाठी अत्यावश्यक असलेली संपूर्ण यंत्रसामग्री आणि लॉकर्सदेखील लंडन इथून आयात करावेत असे प्रस्ताविले. परंतु खरेदी समितीमधील भारतीय डॉ. पी. टी. पटेल, कर्नल हॅमिल्टन आणि डॉ. रुस्तम कुपर यांनी सरळ विरोध पुकारला. मतभेद झाले. तरीही या तीन डॉक्टर्सनी संपूर्ण सामग्री ही मुंबईतूनच खरेदी करण्यावर भर दिला आणि अखेरीस ही खरेदी मुंबईमध्ये करण्यात आली. भारतीय अस्मितेचे वैद्यकीय क्षेत्रातले हे पहिले दर्शन होते. पुढे रुग्णालयाचे उद्घाटन झाल्यावर विटेट यांनी बांधलेल्या केईएममधील ऑपरेशन थिएटरच्या छताचा काही भाग अवघ्या आठवड्यातच कोसळला आणि एका महिन्यात रुग्णालयामधील फरशीच्या काही टाइल्सना तडा गेला. तरीही विटेट यांचे कौशल्य वाखाणून त्यांना रुग्णालयातर्फे सोन्याची सिगरेट केस भेट देण्यात आली, असे केईमचा इतिहास सांगतो.
 

kem hospital 
 
Non Sibi Sed Omnibus
(Not for self but for all) ‘स्वतःसाठी नव्हे समष्टीसाठी’ हे केईएम रुग्णालयाचे बोधवाक्य आहे. या बोधवाक्याला अनुसरूनच अब्जावधी रुग्णांसाठी हे रुग्णालय शंभर वर्षे कार्यरत आहे, ज्याचे प्रशिक्षण सर गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळते. याच भावनेने प्रेरित झालेल्या 1926 आणि 1928च्या बॅचची छायाचित्रे पाहिली तेव्हा पहिल्या वर्षी एकंदर तीन विद्यार्थिनी आणि दुसर्‍या वर्षी दोन विद्यार्थिनी डॉक्टर झाल्या होत्या असे लक्षात येते.
 
 
भारतीय वैद्यकक्षेत्रात झालेल्या क्रांतीचे मूक साक्षीदार म्हणजे केईएम रुग्णालय. सुरुवातीच्या दिवसात जिथे जागा मिळेल तिथे क्षयरोगाचे रुग्ण दिसत असत. कालांतराने क्षयरोग बरा होऊ लागला. पुढे पेनिसिलिनचा शोध आणि वापर ही औषधक्षेत्रातील क्रांतीही या रुग्णालयाने पाहिली. लेप्रोस्कॉपीचे, रोबोटिक शल्यक्रियांचे आणि लिव्हर, किडनी, हृदयाच्या प्रत्यारोपणाचे मूक साक्षीदारदेखील हे रुग्णालय राहिले आहे. जेनेटिक मेडिसिन विषयामुळे वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदलही केईएम पाहते आहे. या शंभर वर्षाच्या उज्ज्वल कारकिर्दीत केईएम रुग्णालयाने आशिया खंडातील आणि भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मूलभूत क्रांतींचा ओनामा केलेला आहे. त्यातल्या मैलाचे दगड ठरणार्‍या काही ठळक गोष्टी अशा आहेत.
 
 
* भारतीय डॉक्टर्सद्वारा पूर्णतः संचालित पहिले आधुनिक भारतीय रुग्णालय.
 
 
* भारतात ECG तंत्रज्ञान अंगीकारणारे, 1968 साली पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे आणि पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय.
 
* भारतातील पहिले ICCU उभारणारे रुग्णालय
 
* आशियातील पहिली Documented टेस्ट ट्यूब बेबी KEM इथे जन्माला आली.
 
* भारतातील पहिली लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
 
* दक्षिण पूर्व आशियातील पहिले फिजिओथेरेपी सेंटर
 
* आशियातील पहिले occupational therepy center
 
* आशियातील पहिले प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटर
 
* आयुर्वेदाची मॉडर्न मेडिसिनशी सांगड घालून त्यावर संशोधन करणारे भारतातील पहिले केंद्र
 
* भारतातील पहिले sexology क्लिनिक
 
* शरीरशास्त्र आणि न्यूट्रिशन याची सांगड घालणारे पहिले न्यूट्रिशन संशोधन केंद्र.
 
* भारतातील पहिले कार्डीओव्हॅसक्यूलर व थोरॅसिक पॅथॉलॉजी सेंटर
 
* पश्चिम भारतातील पहिले ट्रान्स कॅथेटर क्लोजर
 
* पहिले भारतीय महाविद्यालय जिथे इंडेक्स जर्नल फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिसिन केले.
 
* भारतातील पहिला स्वतंत्र ऑर्थोपेडिक विभाग
 
* भारतातील पहिला कार्डीओथोरॅसिक पॅथॉॅलॉजी विभाग
 
* पश्चिम भारतातले पहिले स्पेशल एपिल्पसी सर्जरी सेंटर
 
* पश्चिम भारतातले पहिले इंटरव्हेंन्शनल इलेक्ट्रॉफीजिऑलॉजी सेंटर
 
केईएम रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा शोभणारे आणि इथल्या निष्णात डॉक्टरांच्या नावे जमा असलेले कित्येक विक्रम आहेत ज्यांची यादी पुष्कळ मोठी आहे. डॉ. गिल्डर, डॉ. पुरंदरे, डॉ. भरूचा, डॉ. कुपर, डॉ. खानोलकर, डॉ. परूळेकर, डॉ. देशमुख, डॉ. बाच्छा, डॉ. बालिगा, डॉ. फडके, डॉ. सेन, डॉ. आर्थर डिसा, डॉ. उडवाडिया, डॉ. देसाई, डॉ. शेठ, डॉ. अविनाश सुपे, डॉ. शरदिनी डहाणूकर आणि डॉ. रवी बापट अशा असंख्य साक्षात धन्वंतरींनी केईएम रुग्णालयाला प्रतिष्ठा दिली आहे, निरलस सेवेचे उत्तुंग आदर्श प्रस्थापित केले आहेत. खाजगी व्यवसाय करून करोडोची प्रॅक्टिस अत्यंत सहजपणे करता येईल अशी ही आधुनिक युगातली निःस्वार्थ देवमाणसे. ती केईएमने आपल्याला दिली आहेत. रोगनिदान म्हणजे शंभर तपासण्या असा रिवाज रूढ झालेल्या मेडिकल इन्शुरन्स स्कॅमच्या युगात केईएमसारखी रुग्णालये आशेचा दीपस्तंभ होऊन गरिबांना परवडेल अशी सेवा बजाविताना दिसतात तेव्हा अजूनही आशेला जागा आहे अशी भावना दृढ होते.
 
 
डॉ. रवी बापट यांच्यासारख्या निष्णात धन्वंतरींनी केईएम रुग्णालय हे कार्यमंदिर मानले आहे. ज्यांच्या उल्लेखाविना केईएमबद्दल कितीही लिहिले तरी ते पूर्ण ठरणार नाही. या कार्यमंदिरात कोणाचीही पतप्रतिष्ठा न पाहता बापट डॉक्टरांनी सर्वांना आपुलकी आणि समदृष्टीने रुग्ण म्हणून वागविले. मग तो एखादा मंत्री असो किंवा मारामारी करून आलेला गुंड असो. डॉक्टर म्हणून वैद्यकीय सल्ला देताना कधीही परतफेडीचा विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. तांत्रिक बाबी, महाग तपासण्या यांच्या आहारी जाणारे आणि रुग्णाऐवजी तपासणीला केंद्रस्थानी ठेवणारे अनेक डॉक्टर त्यांनी पाहिलेत. कोणाचीच तमा न बाळगता त्यांनी त्यांचे केईएममधले अनुभव लिहिले आहेत. ते पुस्तक म्हणजे ‘वॉर्ड नंबर पाच, केईम’. हे पुस्तक खरेतर शिकणार्‍या डॉक्टरांचे बायबल व्हावे.
 
 
डॉ. रवी बापट हे ज्ञान आणि अनुभव या दोन्हीही बाबतीत डॉ. शरदिनी डहाणूकर यांच्यापेक्षा सीनियर. वयाने, अनुभवाने आणि ज्ञानाने ते ज्येष्ठ. परंतु डॉ. शरदिनी यांनी गुळवेल वनस्पतीबद्दल आयुर्वेदाधारित रसायनावर केलेले अनेक प्रयोग त्यांनी ज्यावेळी पाहिले आणि त्यातील तथ्य त्यांना समजले तेव्हा आयुर्वेदाला अशास्त्रीय म्हणणार्‍या डॉ. बापट यांनी स्वतःचे मत बदलले आणि सर्वार्थाने ज्युनियर डॉ. शरदिनी यांचा क्लिनिकल सहकारी होण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर केईएम रुग्णालयात आणि भारतात एक इतिहास घडला. भारतातील पहिले आयुर्वेदिक संशोधन केंद्र केईएम रुग्णालयात स्थापन झाले. आयुर्वेदिक संशोधनांमध्ये अधिक लक्ष घातल्यामुळे डॉ. रवी बापट यांची चेष्टाही झाली, परंतु त्यांनी आधुनिक शिक्षित समाजाला पटेल असे संशोधन आयुर्वेदामध्ये सातत्याने सुरू ठेवले. केईएम रुग्णालय ही प्रयोगशील डॉक्टरांची भूमी आहे. हा बापट डॉक्टरांसारख्या जगप्रसिद्ध शल्यचिकित्सक धन्वंतरीने स्वतःच्या उदाहरणाने घालून दिलेला धडा आहे.
 
 
केईएम रुग्णालयातील वार्षिक अहवाल आणि गोसुमॅकचे अंक इथल्या तरुण डॉक्टर्सच्या प्रगतीचा उत्तम आलेख मांडतात. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने रुग्णालयाच्या आवारात केईएमच्या सर्व विभागांनी शंभर वर्षात घेतलेली गरुडझेप आणि प्रगती यांचे चित्र रेखाटणारे सचित्र फ्लेक्स प्रदर्शनीय रूपात मांडलेले आहेत. डॉ. अविनाश सुपे आणि डॉ. निवृत्ती पाटील यांनी रुग्णालयाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या सर्वच्या सर्व डीन्सची उज्ज्वल कारकीर्द रेखाटणारे कॉफी टेबल बुक संपादित केले आहे. Leaders of Century - Dean on Deans या शीर्षकाच्या पुस्तकात प्रत्येक डीनच्या कारकिर्दीची थोडक्यात ओळख दुसर्‍या डीनने करून दिली आहे.
 
 
केईएम रुग्णालय प्रतिवर्षी 17 लाख आउट पेशंट्सना सेवा देते. इथे 65000 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया दरवर्षी पार पडतात. प्रतिवर्षी सरासरी 64000 रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल होतात. 2250 रुग्णखाटा असलेल्या या रुग्णालयामध्ये त्यापेक्षा कितीतरी अधिक रुग्ण दाखल होत असतात आणि या प्रचंड कामाचा गाडा न थकता ओढणार्‍या 900 नर्सेस, 800 वैद्यकीय अधिकारी आणि 558 विविध आरोग्यशाखांमधले तज्ज्ञ रुग्णालयात अहोरात्र सेवा बजावत असतात.
 
 
केईएम रुग्णालयामध्ये डॉक्टर्सना मिळणारा अनुभव हा अन्य कुठल्याही रुग्णालयापेक्षा अधिक शिकविणारा तसेच थकविणाराही असतो. याचे कारण केईएम रुग्णालयामध्ये देशाच्या कानाकोपर्‍यातून माणसे रोगनिदान आणि उपचारासाठी येत असतात. बरेच अंतर पार करून आल्यानंतर अनेक वेळेला रुग्ण आजाराच्या अंतिम टप्प्यामध्ये सर्व पैसे, मानसिक बळ संपल्यानंतर निर्वाणीचा उपाय म्हणून केईएम रुग्णालयात दाखल होतात. त्यांची मानसिक आंदोलने अतिशय तीव्र असतात. अशा वेळी त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना कुठले उपचार घेणे परवडेल आणि कमीत कमी खर्चात त्यांना बरे आयुष्य कंठता येईल याचा सारासार विवेक डॉक्टर्स करतात. केईएमसारख्या रुग्णालयात डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य सेवा पुरविणार्‍या कर्मचार्‍यांची कसोटी दररोज लागत असते. यातून अनेक वेळेला अवघड प्रसंग येतात. सुरक्षेची कुठलीही हमी नसते. डॉक्टरांना मारहाण, शिवीगाळ, अस्वच्छता आणि अभावग्रस्तता या गोष्टींतून अनेक वेळा जे घडते त्याच्या बातम्या ठळक मथळ्यात सर्वत्र पसरतात.
 
 
शताब्दी वर्षानिमित्त दि. 18 ते 22 जानेवारी 2025 दरम्यान झालेल्या दिमाखदार समारंभात रुग्णालयासाठी 21 मजली नव्या इमारतीची घोषणा करण्यात आली आहे. या इमारतीत हेलिपॅडची सोय असेल. Modular operation theaters उभारणे आणि virtual autopsies द्वारे अचूक परीक्षा करणे, मूलभूत वैद्यकीय संशोधन अशा अनेक गोष्टींकरीता केईएम रुग्णालय यापुढेही सातत्याने प्रयत्नशील असणार आहे.
 
सोशल मीडिया हे आजचे सर्वात बलवान समाज माध्यम आहे. म्हणूनच शताब्दी वर्षात यू ट्यूबवरचे पॉडकास्ट आणि शॉर्ट फिल्म्स यांचा वापर करून केईएम रुग्णालय आणि जी. एस. मेडिकल कॉलेज सुशिक्षित आणि अर्धशिक्षित जनतेच्या मनात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईचे हृदय असलेल्या आणि गोरगरिबांच्या आरोग्याचे आशास्थान राहिलेल्या केईएम रुग्णालयाची आणि तिथल्या सेवाव्रतींची घोडदौड सदा निरंतर राहो अशा शताब्दी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
 
geetreads@gmail.com