तारीफ करूं क्या उसकी....

विवेक मराठी    27-Oct-2025   
Total Views |

op
उत्साह, प्रसन्नता, ऊर्जा आणि आनंदाने भरलेले सूर हीच तर ओ.पी. नय्यर यांची खरी ओळख आहे. शृंगार हा ओपींच्या गाण्याचा बेस आहे. रंगेल, रगेल या त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही प्रभाव त्यांच्या चालींवर आढळतो. योग्य त्या वाद्यांचा वापर हा ओपींच्या संगीताचा एक आकर्षक पैलू आहे. अनेक गीतांत पाश्चात्य आणि भारतीय वाद्यांचा फार सुंदर मेळ त्यांनी घातला आणि त्या गीतांना त्यांनी वेगळ्याच उंचीवर नेले आहे. शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेताही ओपींच्या अनेक मेलडीज शास्त्रीय रागांवर आधारित आहेत. ओ.पी. नय्यर यांचे हे शताब्दी वर्ष. आपण या लेखातून संगीतकार ओ.पी. नय्यर यांना जाणून घेणार आहोत.
फाळणीचा रक्तलांच्छित काळ होता तो. असंख्य लोकांनी आपले सर्वस्व गमावले होते, आपली जन्मभूमी गमावली होती. भारतीय चित्रपट संगीताला मात्र तीन निर्वासितांच्या स्थलांतराने एक वेगळेच वळण लागणार होते. 1947 मध्ये, गायक सी. एच. आत्मा हे कराचीवरून अमृतसर येथे आले. येथे त्यांची भेट संगीत शिक्षक ओ. पी. नय्यर यांच्याशी झाली. ते सुद्धा लाहोरहून आलेले निर्वासित. नय्यर यांनी सी. एच. आत्मा यांच्यासाठी 1945मध्ये एक गीत संगीतबद्ध केले होते; जे फाळणीनंतर अत्यंत लोकप्रिय झाले. हे गीत रेडिओवर येण्याच्या काहीच महिने आधी, प्रसिद्ध गायक सैगल यांचे निधन झाले होते. या नवीन गायकाच्या आणि सैगल यांच्या आवाजात कमालीचे साम्य होते. या आवाजाने निर्माते दलसुख पांचोली यांना मोहिनी घातली. ते सुद्धा मूळचे लाहोरवासी. त्यांनी सी. एच. आत्मा यांना आपल्या सिनेमात गाण्याची संधी देऊ केली. या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन करण्याची संधी ओ. पी. नय्यर यांना द्यावी अशी विनंती आत्मा यांनी केली आणि दलसुख पांचोली यांच्या आसमान या सिनेमाने संगीतकार म्हणून ओंकार प्रसाद नय्यर उर्फ ओ. पी. नय्यर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला.
 
 
पुढची वीस वर्षे या नावाने हिंदी चित्रपट संगीतावर न पुसला जाणारा ठसा उमटवला.
 
 
ओ. पी. नय्यर यांची कारकिर्द आणि खाजगी आयुष्य हे गुंतागुंतीचे आहे. त्यात अनेक वळणे आहेत. ते वादग्रस्त सुद्धा आहे.
ओपींच्या संगीताचा आस्वाद घ्यायचा असेल तर या गोष्टींना बगल देऊन त्यांच्या संगीतावर लक्ष केंद्रित करायला हवे. तरच ते समजून घेता येईल.
 
 
ओपींच्या गीतातील हे शब्द रसिकाला सांगतात,
 
दिल की आवाज़ भी सुन मेरे फ़साने पे न जा
 
मेरी नज़रों की तरफ़ देख ज़माने पे न जा
 
आपण या लेखातून संगीतकार ओ.पी. नय्यर यांना जाणून घेणार आहोत. उत्साह, प्रसन्नता, ऊर्जा आणि आनंदाने भरलेले त्यांचे सूर हीच तर त्यांची खरी ओळख आहे.
 
‘1952 मध्ये प्रदर्शित झालेला आसमान (अर्थ-आकाश) आपटला आणि मी पृथ्वीवर आदळलो...’ चित्रपट कोसळल्यावर ओपींनी दिलेली ही प्रतिक्रिया बोलकी आहे. याच चित्रपटात गीता दत्त आणि ओपी प्रथम संपर्कात आले आणि गुरुदत्तच्या बाज़ या चित्रपटासाठी गीताने ओपींचे नाव सुचवले. बाझ या सिनेमात गीता दत्तची सहा एकल गीते होती. रोमँटिक, हळवी, खेळकर या सर्व मूड्सना सुरांत बांधण्यात ओपी यशस्वी ठरले होते. चांगली गाणी असून सुद्धा बाज़ आणि त्या नंतर प्रदर्शित झालेला छम छमा छम अपयशी ठरल्याने, निराश होऊन ओपींनी मुंबई सोडायचे ठरवले. ओपींच्या सांगीतिक कारकिर्दीचा हा पहिला टप्पा होता. नियतीने ठरवलेले भविष्य मात्र वेगळे होते.
 
O. P. Nayyar 
 
गुरुदत्त प्रॉडक्शनचे प्रमुख वितरक के. के. कपूर यांनी ओपींसाठी शब्द टाकला आणि आरपार या सिनेमासाठी ओपींची निवड झाली. आरपारच्या संगीताने यशाचा उच्चांक गाठला. या सिनेमामुळे ओपींच्या संगीताला स्वतःची ओळख मिळाली. त्यांच्या कारकिर्दीचा हा अत्यंत यशस्वी असा दुसरा टप्पा 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दो उस्ताद’ या चित्रपटापर्यंत टिकला.
 
 
या काळाबाबत ओपी सांगतात, ‘हे संगीत माझ्या हृदयातून आलेले होते. मी जे देईन ते यशस्वी होणार याची मला खात्री होती. माझ्या चाली उडत्या होत्या. गुणगुणायला सोप्या असल्याने त्या सामान्य लोकांच्या पसंतीला उतरल्या.’
 
 
आरपार, सीआयडी, नया दौर, हावडा ब्रिज, फागुन, मिस्टर अँड मिसेस 55, तुमसा नही देखा या आणि अशा अनेक सिनेमांच्या
 यशात ओपींच्या संगीताचा प्रमुख वाटा होता. असे म्हणतात की, त्या काळात रेडिओ सिलोनवरून प्रसारित होणार्‍या बिनाका गीतमाला या प्रसिद्ध कार्यक्रमात वाजवल्या जाणार्‍या सोळा गाण्यांपैकी निदान चौदा गाणी ही ओपींने संगीतबद्ध केलेली असायची. गीता दत्त, शमशाद बेगम, मोहम्मद रफी आणि आशा भोसले हे त्यांचे प्रमुख गायक होते.
 
 
गीता आणि ओपींची मला अत्यंत आवडणारी दोन गीते आहेत.
 
O. P. Nayyar 
 
बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना...
 
हे आरपार या सिनेमातील गीत. हे गीत आयुष्याच्या अवघड वळणावरील लाल दिवा आहे पण प्रेमात पडत असलेल्या माणसाला अडवता येते?
 
धबधब्यासारखे कोसळायचे आणि सर्व देऊन रिते व्हायचे ज्यांना जमेल त्यांनीच यात हात घालावा. डोळ्यांना दिसते ते खरे नसते ही शक्यता पाहणेसुद्धा अतिशय महत्त्वाचे असते. ही पायरी चुकली तर गडगडणे कपाळमोक्ष करते.
 
क्यूँ हो खोये हुये सर झुकाये,
जैसे जाते हो सब कुछ लुटाये
ये तो बाबूजी पहला कदम है
नज़र आते हैं अपने पराये
 
 
या गीतावर एका स्पॅनिश गाण्याची छाप आहे असे म्हटले जाते पण गुरुदत्तनेच काही पाश्चिमात्य संगीताच्या रेकॉर्डस् ओपींना देऊन मला अशा प्रकारचे संगीत या सिनेमासाठी हवे आहे अशी मागणी केली होती. ह्या गीताचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गुडी सिरवाई या पारशी वादकाने वाजवलेले एकॉर्डियन.
 
 
गुरुदत्त हा संवेदनशील कलाकार. नृत्याची आणि संगीताचीही उत्तम जाण असलेला अभिनेता, दिग्दर्शक. नवल नाही की आरपार, 12े’ लश्रेलज्ञ, सी.आय.डी. आणि मिस्टर अँड मिसेस 55 मधली ओपींची सर्व गीते सुरेल आणि देखणी होती.
 
O. P. Nayyar 
 
ओपींच्या सांगीतिक कारकिर्दीत गीता दत्त यांच्या बासष्ट गीतांचे योगदान आहे. गीताच्या आवाजातील सेक्स अपीलचा पुरेपूर फायदा ओपींनी चाली देताना करून घेतला आहे हे जाणवते.
 
12े’ लश्रेलज्ञ या सिनेमातील ‘कैसा जादू बलम तुने डाला’ या गाण्यात रोमान्स आहे, सुरांत भिजलेले प्रेम आहे.
 
बानी (वहिदा रहेमान) ही अजय (गुरुदत्त)च्या ऑफिसमध्ये त्याची सेक्रेटरी म्हणून काम करते आहे. तिच्या सौंदर्याने तो आधीच घायाळ झाला आहे पण ते सांगायचे त्याला धैर्य नाही. तिला मात्र त्याचे गुपित माहीत आहे. ते त्याच्याच तोंडून वदवून घेण्यासाठी ती त्याच्या समोर आणि एकाची स्तुती करते. थोडासा मत्सर, प्रेमाची तीव्रता नेहमीच वाढवतो. त्या दिवशी जरी दोघांच्यात वाद होतो तरीही रात्रीच्या एकांतात आपल्या प्रेमाची कबुली देताना नायिका म्हणते,
 
तीर सैंया अजब अजब तुने मारा,
 
खो गया नन्हासा दिल हमारा
 
ह्या गीतात मँडोलिन या तंतुवाद्याचा फार सुंदर उपयोग केला आहे.
 
ओपींच्या संगीतात खुल्या आणि नशील्या आवाजाच्या शमशाद बेगम यांचेही स्थान फार वरचे आहे. गाण्यांच्या संख्येचा विचार केला तर ती कमी भरेल पण त्यांच्या उडत्या चालीच्या गाण्यांना त्यांनी पुरेपूर न्याय दिला आहे. मेहबुबा या सिनेमात संगीतकार रोशनची जागा घेतल्याने चित्रपटसृष्टीतल्या अनेक गायक गायिकांनी ओपींवर बहिष्कार टाकला. अशा वेळी त्यांची बाजू घेण्यासाठी शमशाद बेगम पुढे आल्या. छम छमा छम या सिनेमात त्या मुख्य गायिका होत्या. सीआयडी मधली त्यांची गाणी नायिकेसाठी नसूनही गाजली.
 
यातले पूछ मेरा क्या नाम रे या गाण्याला गावातील मातीचा गंध आहे, कही पे निगाहें हा मुजरा आहे तर लेके पहला पहला प्यार हे रोमँटिक गीत असले तरी एका स्ट्रीट सिंगरचे गीत आहे. वूडब्लॉक, पेटी, घुंगरू, बासुरी, मँडोलिन या वाद्यांचा एवढा सुंदर मेळ आहे या गीतांत!
 
 
रेशमी सलवार कुर्ता जाली का आणि कजरा मोहब्बतवाला या गाण्यांनी तर आजच्या तरुणाईलासुद्धा मोहून टाकलेले आहे. किती तरी वेळा नवीन संचात हे गाणे आलेलं आहे आणि तेवढेच लोकप्रिय झालेले आहे.
 
 
हा लेख लिहिताना कोणत्याही वादग्रस्त घटनांपासून लांब राहायचे ठरवले तरीही एक प्रश्न टाळता येत नाही. ज्या दोन गायिकांनी सुरुवातीला तरी ओपींची कारकिर्द घडवली, त्याच दोघींना ओपींनी यशाच्या काळात का वगळले?
 
 
असे म्हटले जाते की, ओपी आणि आशा भोसले यांच्या नात्याने समीकरण बदलले पण मला याबाबतीत थोडे वेगळे म्हणायचे आहे. काही गैरसमज झाल्यामुळे असेल पण ओपी यांनी लता मंगेशकर यांच्याबरोबर कधीही काम केले नाही. त्यामुळे त्यांच्या गाण्यांच्या दर्जात काहीही कमतरता आली नाही तरीही लता मंगेशकर यांच्या दर्जाची गायिका आपल्याकडे असायला हवीच ही त्यांची इच्छा असणे स्वाभाविक होते.
 
1949 मध्ये महल प्रदर्शित झाला. आयेगा आनेवाला हे गीत लताबाईंनी अजरामर केले. ल ता मं गे श क र या सप्त सुरांनी चित्रपट संगीताच्या सर्व दिशा भारून गेल्या असताना लता शिवाय मी यशस्वी होईन ही प्रतिज्ञा करणारा होता ओ. पी. नय्यर आणि ती पूर्ण करणे शक्य झाले कारण तेवढ्याच प्रभावी नावाने त्यांना साथ दिली. ते नाव होते आशा भोसले.
 
 
लता मंगेशकरांची जागा आशा भोसले यांनी घेतली नसेल पण त्यांनी आपली स्वतःची स्वतंत्र जागा निर्माण केली.
 
खरं तर 1956 मध्ये प्रदर्शित झालेला सीआयडी या सिनेमातील ‘लेके पहला पहला प्यार भरके आँखों मैं खुमार’ हे गीत शमशाद आणि रफीचे असताना, गुरुदत्तच्या मागे लागून ओपीने या सिनेमाच्या नायिकेसाठी आशा भोसलेंचा आवाज वापरला.
 
त्यांच्या सांगीतिक आयुष्यातील नायिकेचे स्थान, कुठेतरी त्यांनी पक्के केले असणार. ओपींची झेप खूप मोठी होती. लताबाईंशी टक्कर हा केवळ प्रतिष्ठेचा नाही तर अस्तित्वाचा प्रश्न होता. गीताने आपले गाणे तेव्हा फक्त गुरुदत्तच्या सिनेमापुरते मर्यादित ठेवले होते आणि शमशादचा पंजाबी खणखणीत आवाज सर्वच नायिकांसाठी योग्य नव्हता. लतापेक्षा वेगळे गाऊन आपण यशस्वी होऊ शकतो याची कल्पनासुद्धा तेव्हा आशाबाईंनी केली नव्हती. अशा वेळी ‘जादू नगरी से आया है कोई जादूगर’ हे गीत देणार्‍या जादूगाराचा परिसस्पर्श झाला आणि आशा भोसले यांनी हिंदी चित्रपट संगीतात भरारी घेतली.
 
 
आशाबाईंच्या आवाजातली मादकता आणि भरीवपणा त्यांना इतर गायिकेत मिळाला नाही असे एक कारण त्यांनी स्वतःच, त्यांच्या आशा फिक्सेशनसाठी दिले आहे.
 
 
‘तुला स्वतःचा स्वर आहे. तो वापरायला शिक. लता मंगेशकरांसारखे गाऊन तुला काहीही मिळणार नाही,’ केवळ असे म्हणून ओपी थांबले नाहीत. बी. आर. चोप्रांना त्यांनी नया दौर या सिनेमासाठी दोन पर्याय दिले, एक -ओपी-आशा किंवा लता. चोप्रानी पहिला पर्याय निवडला आणि नंतर इतिहास घडला.
 
 
दिल जवां और रुत हंसीं, चल यूँही चल दें कहीं
 
तू चाहे ले चल कहीं, तुझ पे है मुझको यकीं
 
हा केवढा मोठा विश्वास आहे जो आशाबाईंनी सुद्धा ओपींवर ठेवला.
 
 
यात वापरलेली घोड्यांच्या टापांची ही लय म्हणजे खास ओपी टच. या लयीतील, यूँ तो हमने लाख हंसी देखे है, पिया पिया पिया मेरा जिया पुकारे, ये क्या कर डाला तुने दिल तेरा हो गया, जरा हौले हौले चल लो मोरे साजना अशी अनेक गीते अजूनही लोकप्रिय आहेत.
 
 
माँग के साथ तुम्हारा, मैने माँग लिया संसार हे गीत म्हणजे सूर आणि आवाज यांची साथ. ती पुढे पंधरा वर्षे सोबत राहिली.
सावन की घटा या सिनेमातील आज कोई प्यार से दिल की बातें कह गया, हाए या गीतातली फेक जेवढी सहज, तेवढ्याच सहजतेने या दोघांचे भावविश्व फुलले. माझ्या गाण्यासाठी आवश्यक असलेला भरीव आवाज लताबाईंकडे नाही. तो पातळ आवाज माझ्या नायिकेला, पर्यायाने माझ्या पंजाबी स्टाईलला शोभणारा नाही हे ओपींनी सांगितले आहे. त्यांना अपेक्षित असलेली स्त्री, मुक्त, धीट, स्वतःला व्यक्त करणारी आणि जगाची पर्वा न करता स्वतःच्या हृदयाचे खरे करणारी होती. त्यांचे संगीतही तसेच होते.
 
उड़े जब-जब जुल्फें तेरी
 
कंवारियों का दिल मचले
 
कंवारियों का दिल मचले, जिन्द मेरिये
 
तुझ्या उडणार्‍या बटांना पाहून माझ्या हृदयाचे ठोके थांबतात, हे आधी कुणी सांगितले असेल? मुळात पुरुषांच्या सौंदर्याला पाहून हृदयावर हात ठेवण्याचे धाडस केले तरी असेल का एका नायिकेने!
 
तसेही नायकाला पाहून नायिका हळूच आपल्या भावना व्यक्त करते याची सवय असताना भर लोकांत आपल्या प्रियकराला माझा यार म्हणण्याचे धाडस करणारी नायिका वेगळीच वाटते.
 
शृंगार हा ओपींच्या गाण्याचा बेस आहे.
 
रंगेल, रगेल या त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही प्रभाव त्यांच्या चालींवर आढळतो. ते स्वतःच म्हणत,‘माझ्या आयुष्यातील स्त्रिया या माझ्या प्रेरणा आहेत. माझ्या व्यक्तिमत्वात जो सकारात्मक बदल घडला, त्यात त्यांचे योगदान आहेच. प्रणय हा माझ्या आयुष्याचा पाया आहे. तो माझ्या चालीतही उतरला आहे. माझे संगीत तरुण आहे.’
 
आईये मेहरबां, इशारो इशारों में दिल लेनेवाले, दिवाना हुआ बादल, आओ हुजूर तुमको, इक परदसी मेरा दिल ले गया, जाईये आप कहाँ जायेंगे, रेशमी सलवार कुर्ता जाली का अशी अनेक चिरतरुण गाणी त्याची साक्ष देतात.
 
1952 ते 1974 या बावीस वर्षाच्या कालखंडात, 61 सिनेमात, 324 गाण्यांची या जोडीने निर्मिती केली. त्यातली 167 गाणी केवळ आशाबाईंच्या आवाजात आहेत. नय्यर यांच्या करिअर ग्राफमध्ये रफीजी, शमशाद बेगम आणि गीता दत्त यांचेही योगदान आहेच पण कदाचित या तिघांच्या गाण्याची बेरीज केली तर कदाचित आशा आणि ओपी यांच्या गाण्यांची बरोबरी होईल. 1973 मध्ये प्रदर्शित झालेला टॅक्सी ड्रायव्हर हा जरी त्यांचा शेवटचा सिनेमा असला, तरी, प्राण जाये पर वचन ना जाये या सिनेमातील, चैन से हमको कभी हे यांचे शेवटचे गीत.
 
सोचके ये दम घुटता है, फिर कैसे गुज़र होगा हे ह्या नात्याच्या इतिश्रीचे सार आहे असे म्हणेन मी. कारणे काहीही असोत, 1959 मध्ये सुरू झालेले हे नाते, 5 ऑगस्ट 1974 ला संपले. चैन से हमको कभी साठी आशाबाईंना फिल्मफेअर अ‍ॅवार्ड मिळाले, ते त्यांनी नाकारले. तिच्या वतीने ओपींनी जरी हे स्वीकारले, तरीही परत जाताना, त्यांनी ती ट्रॉफी समुद्रात फेकून दिली.
 
हे त्यांच्या नात्यातील शेवटच्या टप्प्यावरील गीत आहे हे दोघांनाही माहिती असणार कारण यात जीव ओतला आहे दोघांनी. पियानो नोट्स, चर्च बेल्स आणि शांततेचा उपयोग केला आहे या गीतात. कदाचित येणार्‍या वादळाची सुरांनाही कल्पना असावी!
 
ओपींच्या संपूर्ण कारकिर्दीत मोहम्मद रफी यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. बाज या सिनेमापासून हे दोघे एकत्र आले पण आरपार या सिनेमाने ओपींच्या संगीतात रफींचे स्थान पक्के केले. या सिनेमात गीता दत्त बरोबर गायलेली सुन सुन सुन सुन जालीमा, मोहब्बत करलो जी भरलो, अरे ना ना ना ना तौबा तौबा ही तीनही गाणी गाजली. स्त्री गायिकेबाबत ओपींनी आपले निर्णय बदलले असतील पण रफींच्या नावाबाबत त्यांच्या मनात कधीच शंका नव्हती. संगीतकार आणि गायक या बरोबरच खाजगी जीवनात सुद्धा ते एकमेकांचे चांगले मित्र होते. संगीतकार नौशाद यांच्या शास्त्रोक्त संगीताच्या प्रभावात अडकलेल्या रफींना ओपींनी वेगळा मार्ग दाखवला असे म्हटले जाते. त्यात कितपत तथ्य आहे हे सांगता येणार नाही कारण रफींच्या कारकिर्दीत नौशाद यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. पण ओपींच्या संगीतामुळे रफींच्या गीतांत वैविध्य आले. नौशाद यांचा शास्त्रोक्त संगीताचा पाया पक्का होता तर ओपी यांचे संगीत प्राकृतिक होते. कुठल्याही नियमांपासून मुक्त. नौशाद यांच्या संगीतात लखनौची नजाकत होती तर ओपींचा पंजाबी ढंग उत्स्फूर्त होता. त्यांच्या संगीताने तुमसा नही देखा मधला शम्मी कपूर घडवला. अत्यंत लाजर्‍या प्रेमिकाचे रूपांतर जंगली आणि खोडकर प्रियकरामध्ये होण्यात या सिनेमाच्या संगीताची मुख्य भूमिका होती. तुमसा नही देखा या सिनेमापासूनच शम्मी आणि रफी हे समीकरण सुद्धा यशस्वी झाले. रफी आणि ओपींच्या संगीताने विश्वजीत, जॉय मुखर्जीं ह्यांच्याही कारकिर्दीला हात दिला.
 
रेकॉर्डिंगला उशिरा पोचल्यामुळे रफी आणि ओपींमध्ये वितुष्ट आले आणि ही साथ काही वर्षांसाठी तुटली तरी त्यांनी एकत्र केलेली 200 गाणी त्यांच्या सुरेल प्रवासाची साक्षीदार आहेत.
 
मुझे देखकर आपका मुस्कुराना, लाखों है निगाह में, सुभान अल्लाह हंसी चेहेरा, हमदम मेरे मान भी जाओ, आपके हसीन रुख पे, झुल्फो को हटाले चेहरे से, पुकारता चला हूँ मै आणि अशी असंख्य गीते आजही आवर्जून ऐकली जातात, गायली जातात.
 
योग्य त्या वाद्यांचा वापर हा ओपींच्या संगीताचा एक आकर्षक पैलू आहे.
 
 
जाता कहाँ है दिवाने (एकार्डीयन), थंडी हवा काली घटा (वूडब्लॉक), आपके हसीन रुख पे (बासरी), इशारो इशारो में (घुंगरू), किसी ना किसी से कहीं ना कहीं (हार्मोनिका), बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी (पेटी), मेरा नाम चीन चीन चू (गिटार), जवानीया ये मस्त मस्त बिन पिये (मंडोलीन), बेकसी हद से गुजर जाये (सारंगी), आज कोई प्यार से (संतूर) अशा अनेक गीतांत पाश्चात्य आणि भारतीय वाद्यांचा फार सुंदर मेळ आहे, ज्यांनी या गीतांना वेगळ्याच उंचीवर नेले आहे.
 
 
शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेताही ओपींच्या अनेक मेलडीज शास्त्रीय रागांवर आधारित आहेत. फागुन या सिनेमातील जवळजवळ सर्व गीते पिलू राग वर आधारित आहेत आणि तरीही ती विभिन्न आहेत.
 
 
पिया पिया न लगे मोरा जिया (पिलू), अकेली हूँ मै पिया आजा (शिवरंजनी), फिर मिलोगे कभी (यमन), आप युंही अगर हमसे मिलते रहें (फिर वही दिल लाया हूँ), बेकसी हद से (देस), ये है रेशमी जुल्फो का (मधुवंती), मन मोरा बावरा (दरबारी कानडा) अशी अनेक गीते ऐकली की अचंबा वाटतो आणि लक्षात येते की सुरांनीसुद्धा या कलाकारावर जीवापाड प्रेम केले म्हणून तर अशा रचना जन्माला आल्या.
 
 
1973 मध्ये ओपी आणि आशा भोसले यांनी एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या नंतर त्यांची कारकिर्द उताराला लागली. ओपींच्या कारकिर्दीचा हा तिसरा टप्पा होता. या नंतर त्यांनी बारा सिनेमांना संगीत दिले पण काळ बदलला होता आणि सिनेमातले संगीताचे स्थान सुद्धा बदलले होते. मेलडी निघून गेली होती.
 
 
ओपी यांनी कोणत्याही संगीत दिग्दर्शकाकडून संगीताचे धडे घेतले नाहीत, ते जन्मजात संगीतकार होते असे म्हणावे लागेल. कारण संगीताचे शिक्षण न घेताही त्यांनी जे काही निर्माण केले ते पाहिले तर वाटते, सूर त्यांना वश होते. कारकिर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात व्यावसायिक यश मिळवण्यासाठी त्यांनी आपली शैली बदलली पण गुणवत्तेशी मात्र तडजोड केली नाही.
 
 
यशाचे मोजमाप करायचे तर असे म्हणता येईल, ओपी यांनी संगीत दिलेला सीआयडी हा सिनेमा गुरुदत्त बॅनरचा सर्वात यशस्वी सिनेमा होता. तसेच नया दौर या सिनेमाच्या यशाने बी. आर. फिल्म्स ही संस्था आर्थिकदृष्ट्या स्थिरावली. या सिनेमाच्या संगीताने ओपींना त्यांचे पहिले फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळाले.
 
 
आशा भोसले यांना ओपी यांनी लतांच्या सावलीतून बाजूला काढले. त्यांना स्वतःची ओळख दिली. 1957 पर्यंत केवळ बी आणि सी ग्रेड सिनेमातील नायिकांसाठी गाणारा आवाज, नया दौर या सिनेमापासून ए ग्रेड सिनेमातील नायिकेचा आवाज झाला.
 
 
तुमसा नही देखा या सिनेमाच्या सांगीतिक यशाने नासिर हुसेन हे दिग्दर्शक म्हणून तर शम्मी कपूर हिरो म्हणून स्थिरावले.
 
गीताचे रेकॉर्डिंग झाल्याबरोबरच वादकांना त्यांचा मोबदला देण्याची प्रथा ओपींनी सुरू केली. म्युझिक प्लेयर्स असोसिएशन यासाठी आजही कृतज्ञ आहे. पन्नासच्या दशकात ओपींची फी एक लाख रुपये होती, जी सर्वोच्च मानली जाते.
 
आपल्या गीतकारांना, गायकांना, वादकांना ओपींनी नेहमीच सन्मान दिला. त्यांच्या कामाची वाहवा केली. अनेकवेळा तर आपल्या गीतांचे श्रेय त्यांनी आपल्या सहकार्‍यांना दिलेले आहे.
 
 
ओपींच्या यशाच्या काळात रेकॉर्डवर आणि चित्रपटांच्या पोस्टरवर ओपी नय्यर हे नाव ठळक असायचे. त्या नावावर सिनेमा चालायचे.
 
आदमी का वक्त चलता है, आदमी नही चलता यावर मात्र ओपींचा विश्वास होता. काळापुढे कुणाचेही काहीही चालत नाही हे त्यांना माहिती होते. गृहकलहामुळे त्यांनी आपले घर सोडले. आयुष्याची शेवटची बारा वर्षे त्यांनी एका मराठी कुटुंंंबात व्यतीत केली. ते जरी पेईंग गेस्ट म्हणून राहत असले तरी नाखवा कुटुंबाने त्यांना आपले मानले, त्यांची सेवा केली आणि त्यांना शेवटपर्यंत साथ दिली.
 
 
स्वाभिमान म्हणूया किंवा अहंकार, ओपींनी कधी मागे वळून पाहिले नाही. अगदी शेवटच्या दिवसांत सुद्धा त्यांच्या आवाजात जरब होती, त्यांची मान ताठ होती. त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला होता. हाताला गुण होता. भविष्यशास्त्राची त्यांना जाण होती. त्यामुळे असेल आयुष्यातील चढउतार त्यांनी तक्रार न करता झेलले.
 
 
28 जानेवारी 2007 रोजी ह्या लयीच्या राजाने शेवटचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यूही तितकाच सहज होता. त्यांच्या मानसकन्येने म्हटले आहे, ‘हे इतके अनपेक्षित होते की आतापर्यंत हसत बोलत असलेले ओपी, दुसर्‍या क्षणाला या जगात नव्हते.’
 
ओपी नय्यर यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी. त्यांच्या शेवटच्या दिवसात दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे,
 
इक रोज में हर आँख से छुप जाऊंगा लेकिन
 
धडकन में समाया हुआ हर दिल में रहुंगा
 
दुनिया मेरे गीतों से मुझे याद करेगी
 
उठ जाऊंगा फिर भी इस महफिल में रहुंगा
 
 
हृदयातून आलेले शब्द नेहमीच सत्य होतात. ओपींची गीते अजरामर आहेत.

प्रिया प्रभुदेसाई

प्रिया  प्रभुदेसाई

अर्थशास्त्रात पदवीत्तर शिक्षण.... सा. विवेक आणि दिव्य मराठीत दोन वर्षे चित्रपट विषयक सदर. दिवाळी अंक, मासिके यात चित्रपटाविषयक लेखन. सेन्सॉर बोर्डवर ज्युरी म्हणून चार वर्षांसाठी निवड.