एक प्रेरक व्यक्तिमत्व

विवेक मराठी    04-Oct-2025
Total Views |
@सुहास हिरेमठ
 
suhas
संघामध्ये अखिल भारतीय स्तराच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे विविध संघटनांपैकी एका संघटनेचे किमान तीन ते पाच वर्ष संपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी असते. मधुभाईंकडे देखील एका संघटनेचे संपर्क अधिकारी म्हणून काम असायचे. त्यावेळी मी पाहिले की, मधुभाई त्या कार्याशी एकरूप होत असत.
मानव मर्त्य आहे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती जाणार आहे, हे सत्य माहीत असूनही मा. मधुभाई कुलकर्णी यांच्या नावामागे कै. हा शब्द कधी लावावा लागेल असा विचार मनात कधी आलाच नाही.
 
 
जून 1971 मध्ये मा. मधुभाई म्हणजे त्या वेळचे माधवराव कुलकर्णी सोलापूर विभाग प्रचारक म्हणून आले. त्यावेळी विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्र एकच होता. त्यात मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि बीड हे जिल्हे जोडून सोलापूर विभाग बनला होता. त्यांच्याआधी कै. सुरेशराव केतकर आमचे विभाग प्रचारक होते. तेव्हा ते कधी कधी आमच्या शाखेत येत असत आणि तेव्हा त्यांची ओळख झाली होती. पुढे मी इयत्ता दहावीत गेल्यानंतर शाखेचा मुख्य शिक्षक झाल्यावर हळूहळू जिल्हा विभाग कार्यकर्त्यांशी संबंध येऊ लागला. 1971 मध्ये सुरेशराव केतकर प्रांताचे शारीरिक शिक्षण प्रमुख झाले. त्यामुळे माधवराव कुलकर्णी त्यांच्या पदावर विभाग प्रचारक म्हणून सोलापूरला आले. मी त्यावेळी श्रीराम शाखेचा कार्यवाह होतो व एफवायबीएस्सीला शिकत होतो. हळूहळू त्यांचा प्रवास आमच्या शाखेवर होऊ लागला. शाखेवर ते गोष्टी सांगत. प्रत्येक वेळी नवीन गोष्ट सांगत. गोष्ट अतिशय रंगवून सांगत असत. त्यामुळे शाखेतील स्वयंसेवक खूष असत. शाखा सुटल्यावर आम्ही त्यांच्याबरोबर काही घरी संपर्कासाठी जात असू. त्यांच्याबरोबर असे स्वयंसेवकांच्या घरी जाणे हे आम्हा उदयोन्मुख कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण असे. कारण वेगवेगळ्या घरांत वेगवेगळे वातावरण असायचे. घरातील लोकांचे स्वभावदेखील वेगवेगळे असायचे. प्रेमाने आदराने स्वागत करणे, बोलणे अशा व्यक्तींपासून उपेक्षेने, कोरडेपणाने, उपहासाने बोलणारेही असत. (अर्थात ही संख्या थोडीच होती.) पण त्या प्रत्येकाशी माधवराव अतिशय प्रेमाने व आदराने बोलत असत. त्या मंडळींचे सुरुवातीला बोलणे कसेही असो पण आम्ही तेथून निघताना ते माधवरावांशी आदराने बोलत असत. पुन्हा अवश्य या असे म्हणत.
 
 
मला आठवते, आमच्या शाखेत एक आठवीत शिकणारा स्वयंसेवक होता. तो शाखेत गटनायक होता. त्याच्या वडिलांना त्याचे शाखेत जाणे फारसे आवडत नव्हते. त्यांच्या घरी माधवरावांना घेऊन आम्ही गेलो. ओळख वगैरे झाल्यावर, मधुभाईंनी तुमचा अनिल अतिशय चांगला गटनायक आहे असे म्हटले. ते एवढे बोलल्याबरोबर त्या गटनायकाचे वडील एकदम उखडले. अतिशय रागाने म्हणाले, कसला गटनायक? त्याचा काय उपयोग? आता सहामाही परीक्षेत दोन विषयांत नापास झाला आणि त्यानंतर काही वेळ ते त्याच्याविषयी अतिशय रागाने बोलले. माधवरावांसोबत मी व आणखी एक कार्यकर्ता होता. आम्ही दोघेही खाली मानू घालून बसलो होतो. वडिलांचे असले बोलणे ऐकून मला तर राग आला आणि वाईटही वाटले. माधवराव मात्र शांतपणे त्यांच्याकडे पाहत त्यांचे बोलणे ऐकत होते.
 
 
त्यांचे बोलणे थांबल्यावर माधवरावांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली, तुम्ही म्हणता तसे असेलही पण तुमच्या अनिलमध्ये किती तरी चांगले गुण आहेत आणि मी खात्रीने सांगतो. असे म्हणून त्यांनी त्याच्या काही चांगल्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन केले आणि शेवटी म्हणाले की, तो वार्षिक परीक्षेत सर्व विषयांत नक्की पास होईल. खरंतर आमच्या शाखेत येण्याची त्यांची ही तिसरीच वेळ असावी पण तेवढ्यात त्यांनी या स्वयंसेवकाचे एवढे गुण हेरले होते. त्यावेळी त्याची आई स्वयंपाकघराच्या दरवाजात उभी राहून सर्व काही ऐकत होती. वडिलांशी बोलणे संपवून आम्ही जाण्यासाठी उभे राहिलो त्याचवेळी ती आई पुढे आली. (बहुतेक त्यांनी अनिलच्या वडिलांचे सर्व बोलणे ऐकले असावे आणि माधवरावांचे ही बोलणे ऐकले असेल.) त्या माधवरावांना म्हणाल्या, तुम्ही असे कसे जात आहात, आता तुम्ही जेऊन जा. सगळा स्वयंपाक झालाच आहे.
 
 
माधवराव त्यांना प्रेमाने व नम्रपणाने म्हणाले, वहिनी, माझं जेवण दुसर्‍या एका कार्यकर्त्याकडे ठरले आहे. ते माझी वाट बघत असतील पण मी पुढच्या वेळी या शाखेवर येईन तेव्हा तुमच्या घरी जेवायला येईन. तेव्हा त्या म्हणाल्या, ठीक आहे पण चहा तरी घेऊन जा. आम्ही चहा घेऊन निघालो. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले, मला क्षमा करा. मी उगीचच रागावून बोललो. मलाही माहीत नव्हते आमच्या अनिलमध्ये एवढे गुण आहेत. म्हणूनच मी वर म्हटले की, त्यांच्याबरोबर असे जाणे हे आमच्यासाठी कसे वागावे याचे प्रशिक्षण होते.
 
 
त्यानंतर दोनच वर्षांनी 1973 च्या जून महिन्यात मी प्रचारक म्हणून गेलो. त्यानंतर आमची भेट बैठकीत होत असे. पुढे माधवराव 1981 ला सोलापूरहून पुणे महानगर प्रचारक म्हणून गेले. तेथे त्यांना तीनच वर्षे मिळाली. कारण त्या काळात गुजरातचे अगोदरचे प्रांत प्रचारक आणि नंतरचे क्षेत्र प्रचारक लक्ष्मणराव इनामदार हे कर्करोगाने आजारी होते. उपचार पुण्यात चालू होते.
 

rss 
 
गुजरातसाठी त्यांना कोणीतरी प्रांत प्रचारक पाहिजे होते. बहुधा लक्ष्मणराव इनामदार यांनीच मधुभाईंना मागून घेतले असावे. 1984 च्या जून महिन्यात माधवरावांची गुजरात प्रांताचे सह प्रांत प्रचारक म्हणून घोषणा झाली. (तिथे गेल्यावर त्यांचे मधुभाई म्हणून नामकरण झाले. ते अखेरपर्यंत राहिले.) त्यांच्या जागेवर माझ्याकडे पुणे महानगर प्रचारक ही जबाबदारी आली. तोपर्यंत मी सातारा जिल्हा प्रचारक होतो.
 
 
1984 च्या जून महिन्यात मी सातारकरांचा निरोप घेऊन पुण्याला आलो. सुमारे पंधरा दिवस माधवरावांच्या बरोबर मी पुणे महानगरात फिरत होतो. प्रमुख संघ कार्यकर्ते, विविध क्षेत्र कार्यकर्ते यांच्या घरी जाणे झाले. तेथेही त्यांनी या घरात किती उत्कृष्ट संबंध निर्माण केले होते हे मी पाहिले. त्यांच्याबरोबर काही बैठकीत राहिलो. तेथेही त्यांचे बोलणे ऐकून, निरीक्षण इत्यादी पाहून माझ्या मनावर खूपच दडपण आले. मी माधवरावांपेक्षा वयाने 26 वर्षांनी लहान होतो पण बाकी सर्व दृष्टीने क्षमता, गुणवत्ता, अनुभव याबाबत कितीतरी लहान होतो. असे असूनही पुण्याच्या कार्यकर्त्यांनी मला खूप सांभाळून घेतले, सहनही केले म्हणून मी प्रचारक म्हणून जगलो/जिवंत राहिलो. त्यानंतर विविध कारणामुळे माधवराव दोन-तीन वेळा पुण्यात आले. त्यांनी मला योग्य मार्गदर्शनही केले. त्यानंतर त्यांचा सहवास कमी होत गेला पण बैठकीतून त्यांना पाहात होतो, त्यांचे बोलणे ऐकत ऐकत होतो.
 
 
मधुभाईंचे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट पूर्वयोजना करणे व त्याची उत्तम अंमलबजावणी करणे. 1974- 75 हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 300 वे वर्ष होते. त्या वेळचे महाराष्ट्र प्रांताचे माननीय प्रांतसंघचालक अ‍ॅड. बाबासाहेब भिडे यांनी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सर्वांना दिला. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती असणारे एक घडीपत्रक (शिवसंदेश पत्रिका) महाराष्ट्रातील प्रत्येक गावात व प्रत्येक घरात नेऊन द्यायचे. त्यावेळी माधवराव सोलापूर विभाग प्रचारक होते. त्यांनी सोलापुरातील कार्यकर्त्यांच्या सहाय्याने सोलापूर शहरातील प्रत्येक कुटुंबात हे पत्रक पोहोचवण्याची अतिशय उत्कृष्ट योजना केली होती परंतु दुर्दैवाने ज्या दिनांकाला ती पत्रके येणे अपेक्षित होते त्यावेळी ती आली नाहीत. त्यांना उशीर झाला. अर्थात नंतर त्याचे वितरण झाले असणारच पण ती वेळेवर आली असती तर मधुभाईंच्या उत्कृष्ट पूर्व व पूर्ण योजनेचे प्रात्यक्षिक सर्वांना पाहायला मिळाले असते.
 
 
मधुभाई दहा वर्षे गुजरात प्रांताचे प्रांत प्रचारक होते. तेथेही त्यांनी आपल्या या गुणांचा, कौशल्याचा ठसा उमटविला. त्यानंतर ते दहा वर्ष अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते. बौद्धिक विभागाची उत्तम योजना करून सर्व प्रांतात त्याची उत्तम अंमलबजावणी करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. प्रयत्न शब्द एवढ्यासाठी की सर्व प्रांताची स्थिती सारखी नसते, त्यामुळे अंमलबजावणी सारखी होऊ शकत नाही.
 
 
संघामध्ये अखिल भारतीय स्तराच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे विविध संघटनांपैकी एका संघटनेचे किमान तीन ते पाच वर्ष संपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी असते. मधुभाईंकडे देखील एका संघटनेचे संपर्क अधिकारी म्हणून काम असायचे. त्यावेळी मी पाहिले की, मधुभाई त्या कार्याशी एकरूप होत असत. प्रांत प्रचारकांसमोर ते त्या संघटनेबद्दल अतिशय आत्मीयतेने अपेक्षा मांडत असत. त्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनाही त्यामुळे मधुभाईंच्या विषयी फार आदर व आधार वाटत असे.
 
 
वयाची 80 वर्षे ओलांडल्यानंतर त्यांना दायित्व मुक्त केले गेले. त्यांचे केंद्र संभाजीनगर केले. तेथेही मधुभाईंचा व्यवहार व भूमिका सर्वांसाठीच मार्गदर्शक होती.
 
माझ्यासाठी मधुभाई मार्गदर्शक होते, दोन-तीन वेळा तरी मी माझ्या मनातील वादळ त्यांच्यासमोर ठेवले व त्यांनी त्यांच्या शैलीने ते शांत केले. काही वेळा माझ्याकडे लोक लेख मागत असत. अशावेळी तो लेख मी अगोदर मधुभाईकडे पाठवत होतो व त्यांच्या सूचना घेऊन आवश्यक ते फेरफार करून संबंधितांच्याकडे पाठवीत असे. आज ही पहिलीच वेळ आहे की, मी लेख लिहिला पण वाचायला मधुभाई नाहीत.
 
 
मा. मधुभाई गेले. तसा मी शरीराने त्यांच्याजवळ फार कमी होतो, पण ते गेल्याची बातमी आल्यानंतर आपल्या अगदी जवळचे आणखीन एक जण गेले व आपल्या जीवनातील पोकळी आणखीन वाढली हे जाणवले.
 
अर्थात असे होत राहणार. मी जेव्हा त्यांच्या जवळ जाईन तेव्हाच असं वाटणे बंद होईल.
 
कै. मधुभाईंच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली.
 
 
लेखक रा.स्व. संघाचे अखिल भारतीय
कार्यकारिणी सदस्य आहेत.