रतन टाटा - काही हृद्य आठवणी

विवेक मराठी    04-Oct-2025
Total Views |
@ माधव जोशी
tata
9 ऑक्टोबर रोजी रतन टाटा यांची पहिली पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहकार्‍याच्या काही हृद्य आठवणी.
 
तो दिवस होता 4 एप्रिल 2011. महाराष्ट्रात त्या दिवशी गुढीपाडवा होता. दुपारी सव्वादोन वाजता मी, रतन टाटा, आमचे एमडी एन. श्रीनाथ, टाटा सन्सचे संचालक आणि ताजमहाल हॉटेलचे अध्यक्ष कृष्णकुमार, कोरस स्टील आणि जग्वार लँडरोव्हर याच्या अधिग्रहणात प्रमुख भूमिका बजावणारे टाटा सन्सचे संचालक अरुण गांधी संसद भवनातील सेक्रेटरी जनरल यांच्या दालनात बसलो होतो.
 
 
रतन टाटा यांना प्रथमच एका संसदीय समितीने - लोकलेखा समितीने (Public Accounts Committee - PAC)अडीच वाजता टू जी घोटाळा प्रकरणात साक्ष देण्यासाठी पाचारण केले होते. आतापर्यंत समूहातील कुणालाही कोणत्याही समितीने साक्ष देण्यासाठी बोलावले नव्हते, त्यामुळे थोडी अस्वस्थता होती. मी त्यावेळी टाटा टेलीसर्विसेस या प्रमुख टेलिकॉम कंपनीत प्रेसिडेंट नियामक (Regulatory) आणि प्रेसिडेंट कायदा विभाग होतो. मी त्याचवेळी मोबाईल कंपन्यांच्या संघटनेचा अध्यक्ष होतो आणि त्या नात्याने पीएसीपेक्षा मोठी (30 खासदार सदस्य) असलेल्या जेपीसीसमोर दोनदा साक्ष दिली होती.
 
 
आम्ही पीएसी बैठकीसाठी खूप तयारी केली होती. टाटा पॅरिसमध्ये होते आणि त्या दिवशी सकाळी 6.30वाजता दिल्लीतील ताजमानसिंग हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी विश्रांती न घेता सकाळी पावणेनऊ वाजता तयारीसाठी आमची बैठक सुरू झाली. या साक्षीचे महत्त्व समजण्यासाठी हे टू जी प्रकरण काय होते याची माहीत करून घेणे आवश्यक आहे.
टू जी घोटाळा
 
डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात द्रमुकचे ए. राजा दूरसंचार मंत्री होते. त्यांनी जानेवारी 2008 मध्ये 122 नवीन दूरसंचार परवाने 2001 साली ठरविलेल्या शुल्कावर जारी केले होते. राष्ट्रपती ज्यांची नेमणूक करतात आणि जे आपला अहवाल संसदेला देतात असे महालेखापरीक्षक (कॅग) यांनी 2010 च्या अखेरीस एक अहवाल सादर केला, ज्यात म्हटले होते की, 122 परवाने सरकारने सात वर्षांपूर्वी ठरवून दिलेल्या किमतीत दिले. त्यामुळे सरकारी तिजोरीला 1,76,000 कोटी रुपये (38 अब्ज डॉलर) मिळू शकले असते ते मिळाले नाहीत.
 
 
सर्वोच्च न्यायालयात प्रशांत भूषण यांनी जनहित याचिका दाखल केली आणि न्यायालयाने स्वत:च्या देखरेखीखाली सीबीआयला तपास करायला सांगितले. मंत्री ए. राजा, करुणानिधी यांची मुलगी खासदार कानिमोझी आणि अनेक दूरसंचार कंपनी मालकांना अटक झाली. 2011 आणि 2012 मध्ये टू जी विवाद आणि नीरा राडिया विवाद यांच्यामुळे टाटा समूह आणि रतन टाटा यांच्यावर हितशत्रू टीका करीत असताना आम्ही अनेकदा दिवसातून आठ-आठ तास बाजूबाजूला बसून काम केले.
 
 
कॅगचा अहवाल संसदेच्या लोकलेखा समितीकडे (Public Accounts Committee - PAC) कारवाईसाठी पाठविला जातो. समिती सभापती हे विरोधी पक्षाचे असतात. त्यावेळी मुरलीमनोहर जोशी अध्यक्ष होते. या समितीत राज्यसभा आणि लोकसभेचे मिळून 22 खासदार असतात ज्यात उद्योगपती नवीन जिंदाल, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा हे होते.
 
 
पीएसी बैठक
 
टाटा यांना जेव्हा पीएसीसमोर बोलावण्यात आले तेव्हा त्यांनी समितीच्या अध्यक्षांना पत्र लिहून टाटा टेलिसर्विसेसचे एमडी एन. श्रीनाथ आणि प्रेसिडेंट माधव जोशी (मी) त्यांच्यासोबत असले तर चालेल का, अशी विचारणा केली. तशी परवानगी मिळाली. 11 एप्रिल 2011 रोजी दुपारी अडीच वाजता पीएसीसमोर रतन टाटा यांची साक्ष ठरली.
tata 
 
जेव्हा आम्ही त्या दुपारी संसदभवनात पोहोचलो तेव्हा सकाळी नीरा राडिया यांनी आपल्या साक्षीत सर्व प्रश्नांना ‘मला माहीत नाही’ किंवा ‘मला आठवत नाही’ अशी उत्तरे दिल्याने समिती सदस्य संतप्त असल्याचे आम्हाला समजले. आम्ही बैठक कक्षात प्रवेश केला तेव्हा सर्व सदस्यांना रतन टाटा यांच्याबद्दल खूप कुतूहल असल्याचे आम्हाला जाणवले. रतन टाटांनी श्रीनाथ आणि माझी ओळख करून दिली आणि स्वत:चे दूरसंचार क्षेत्रासंबंधी ज्ञान हे सखोल नसून पायलटसारखे पस्तीस हजार फुट उंचीवरचे आहे म्हणून श्रीनाथ आणि माधव यांना प्रश्नांची उत्तरे देण्याची मुभा असावी अशी परवानगी समितीकडे मागितली. अध्यक्ष मुरलीमनोहर जोशी यांनी मिश्किलपणे, ’जोशी है तो मुझे आपत्ती नाही’, असे म्हणत तत्परतेने सहमती दर्शवली, पण सभेच्या कामकाजात ही उत्तरे टाटा यांनी दिलेली उत्तरे म्हणून नोंदविली जातील, असा इशारा दिला. रतन टाटा यांनी तत्परेतेने होकार देऊन आम्हावर विश्वास दाखविला.
 
 
बैठक दीड तासाची असल्याचे ठरले होते पण तब्बल तीन तासांनंतर आम्ही बाहेर आलो. बहुतांशी प्रश्नांची उत्तरे मी दिली. या बैठकीची तयारी करताना मी रतन टाटा यांना शक्यतो उत्तरे तीन मिनिटांपेक्षा जास्त नको अशी सूचना केली होती, पण दूरसंचार क्षेत्राच्या खाजगीकरणाचा इतिहास सांगणारे माझे एक उत्तर तब्बल अर्धा तासाचे होते. बाहेर आल्यानंतर माझ्या खांद्यावर थोपटून हसत टाटा म्हणाले, ’तू माझा गुरू होतास पण तुझेच एक उत्तर 29 मिनिटांचे झाले. पण बरं झालं तू दहा प्रश्न वाचवलेस.’
मुरलीमनोहर जोशी आणि अनेक खासदार टाटांशी बोलले. त्यानंतर पत्रकार परिषदेत जोशी म्हणाले, श्री. टाटा यांनी आमच्या सर्व प्रश्नांची मोकळेपणे आणि थेट उत्तरे दिली. एव्हढेच नव्हे तर आमचे आणखी काही प्रश्न असतील तर त्यांची तीन दिवसांत लेखी उत्तरे देण्याचीही तयारी दर्शविली आहे.
 
 
वैमानिक टाटा
 
रतन टाटा हे जेआरडी टाटा यांच्यासारखेच वैमानिक होते.त्यांना एव्हिएशनची आवड होती. 1932 मध्ये जेआरडी यांनी टाटा एअरलाइन्स ही भारतातील पहिली विमानसेवा सुरू केली, जी नंतर एअर इंडिया झाली आणि नंतर 1953 मध्ये राष्ट्रीयकृत झाली परंतु जेआरडी1978 पर्यंत अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. त्यानंतर 1986-89 या काळात रतन टाटा एअर इंडियाचे अध्यक्ष होते. रतन टाटा यांच्या प्रेरणेने टाटा समूहाने एअर इंडिया सरकारकडून परत विकत घेण्याचा निर्णय घेतला. तब्बल 68 वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटा समूहात आली.
 
 
tata
 
पायलट लायसन्स सुरू ठेवण्यासाठी रतन टाटांना दरवर्षी ठरावीक तास विमान उड्डाण करावे लागायचे. अनेकदा मला त्यांच्याबरोबर छोट्या पाच आसनी जेटमध्ये त्यांच्याबरोबर प्रवास करण्याची संधी मिळाली. टाटा उड्डाण (टेक-ऑफ) आणि लँडिंग दरम्यान विमानाच्या कॉकपिटमध्ये जाऊन सहवैमानिक व्हायचे. उरलेला वेळ ते आमच्यासोबत पॅसेंजर केबिनमध्ये बसायचे.
 नुकतेच निवर्तलेले Rediffuson जाहिरात कंपनीचे मालक दिवाण अरुण नंदा एक दोनदा बरोबर होते. टाटा समूहाचा लॉकहीडमार्टिन या अमेरिकन विमान आणि दारुगोळा निर्मात्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम आहे. टाटा समूह त्यांच्यासाठी सुटे भाग बनवतो. लॉकहीडने रतन टाटांना सहवैमानिक म्हणून एफ 16 लढाऊ विमान उडविण्याचा मान दिला.
 
 
सेवानिवृती
 
रतन टाटा हे डिसेंबर 2012 च्या शेवटच्या आठवड्यात 75 वर्षे पूर्ण करणार होते आणि समूह प्रमुख म्हणून निवृत्त होणार होते. मी त्या नंतर दोन महिन्यांनी 60 वर्षे पूर्ण करून टाटा टेलीसर्विसेस मधून प्रेसिडेंट म्हणून निवृत्त होणार होतो.
 
ऑगस्ट 2012 मध्ये आमचे एमडी श्रीनाथ आणि मी रतन टाटांच्या केबिनमध्ये दिल्लीहून येणार्‍या काही निरोपाची वाट पहात गप्पा मारत बसलो होतो. मी टाटांना सहज विचारले की, ते माझी बिल गेटसकडे त्याच्या इंडिया फाउंडेशनच्या प्रमुख पदासाठी शिफारस करतील का? त्यांना आश्चर्य वाटले ते म्हणाले, बिल गेटस कशाला पाहिजे - माझ्याबरोबर टाटा ट्रस्टमध्ये ये. श्रीनाथ त्वरेने म्हणाले की, माधव मला कंपनीतच दोन-तीन वर्ष पाहिजे त्यामुळे विषय संपला.
 
 
मी स्वतःला भाग्यवान समजतो की, त्यांच्यासोबत बराच काळ काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी विश्वासाने माझ्यावर समूहासाठी काही जबाबदार्‍या सोपविल्या. उदाहरणच द्यायचे झाले तर सायरस मिस्त्री हे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडले गेल्यावर त्यांनी सायरस यांची डॉ. मनमोहन सिंग मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांशी ओळख करून देण्याची जबाबदारी मला दिली. मोबाईल संघटना अध्यक्ष म्हणून मी त्या मंत्र्यांना अनेकदा भेटत असे.
 
 
माझ्या तीन पुस्तकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छा असलेल्या Tatas, the Epitome of Trust या टाटा समूहावरील माझ्या पुस्तकाची पहिली प्रत त्यांना निधनाच्या पंधरा दिवस आधी पाहायला मिळाली याचे मला समाधान वाटते.
 
अशा लोभसवाण्या सुहृदास माझा सलाम !
 
- लेखक टाटा उद्योगसमूहात उच्चपदस्थ
अधिकारी होते.