संघशाखेची वाट दाखवणारे पुस्तक

विवेक मराठी    05-Oct-2025   
Total Views |
rss 
भारतीय विचार साधना, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘अथातो संघजिज्ञासा‘ या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ लेखक, विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहिली आहे. ती प्रस्तावना येथे प्रकाशित करत आहोत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्तेच्या राजकारणात नसला तरीही संघाबद्दल राजकीय क्षेत्रात भरपूर चर्चा चालू असते. देशातील एक विचारधारा अशी आहे की, जी रा. स्व. संघाला शत्रूस्थानी मानत आहे. संघाविरुद्ध भन्नाट आरोप करण्याची त्यांना सवय लागलेली आहे. संघ फॅसिस्ट आहे, संघ मुस्लीमविरोधी आहे, संघ संविधानविरोधी आहे, संघ दलितविरोधी आहे, संघ लोकशाहीविरोधी आहे, अशी अंतहीन आरोपांची मालिका असते. संघाचे वैशिष्ट्य असे की, संघ कधीही आरोप-प्रत्यारोपाच्या विवादात भाग घेत नाही. शांतपणे आपले काम करीत राहणे, हा संघाचा स्वभाव आहे.
 
संघाविषयी वाङ्मयदेखील खूप निर्माण होत असते. त्याचे तीन प्रकार आहेत.
 
1) संघस्वयंसेवकांकडून लिहिलेली पुस्तके

2) संघविरोधकांकडून लिहिलेली पुस्तके

3) संघअभ्यासकांनी लिहिलेली पुस्तके
 
दत्तोपंत ठेंगडी, हो. वें. शेषाद्री, के. आर. मलकानी, रतन शारदा, सुनील आंबेकर, रमेश पतंगे इ. अनेक स्वयंसेवकांनी संघावर पुस्तके लिहिलेली आहेत. अ‍ॅन्डरसन-दामले यांनी संघावर दोन पुस्तके लिहिली आहेत. दोघेही संघअभ्यासक आहेत. विरोधकांमध्ये बद्रीनारायण, दिनेश नारायणन, निलंजन मुखोपाध्याय, ’आर.एस.एस. अँड अ‍ॅटम’ लेखक हिन्झ विट्टेनब्रिंक.
 
संघाचे अभ्यासक आणि विरोधक यांच्या पुस्तकातून संघाचे यथार्थ दर्शन घडणे अतिशय अवघड असते. अभ्यासक सरसंघचालकांची भाषणे, संघाच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांची भाषणे, संघाचे ठराव यावरून संघाचे आकलन करतात. संघाच्या महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांशी ते चर्चा करतात, त्यातून त्यांना जो संघ समजतो तो संघ ते आपल्या भाषेत मांडतात. संघविरोधकांची संघावरील पुस्तके ही संघ - अज्ञानावर लिहिलेली असतात. ही मंडळी युक्तिवादाच्या अनेक क्लृप्त्या वापरून संघाचे विकृत चित्र रंगवितात. त्यातील अनेक पुस्तके कचर्‍याच्या पेटीत टाकण्याच्या लायकीची ठरतात.
 
 
’अथातो संघजिज्ञासा’ हे मधुभाई कुलकर्णी यांचे संघावरील छोटे पुस्तक आहे. मधुभाई कुलकर्णी हे अनेक दशके प्रचारक असलेले संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक, गुजरातचे प्रांत प्रचारक, महाराष्ट्र-गुजरात-विदर्भ या प्रांताचे क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, सामाजिक समरसता या विषयाचे अखिल भारतीय दायित्व पार पाडणारे प्रचारक असा त्यांचा संघप्रवास आहे. या पुस्तकात त्यांनी संघस्वयंसेवकांची दोन वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. ती त्यांच्याच शब्दात, ”स्वयंसेवकांची व्यवच्छेदक लक्षणे दोन. एक राष्ट्रनिष्ठा दुसरे संघटनकुशलता.” ही दोन्ही वैशिष्ट्ये त्यांना तंतोतंत लागू होतात. संघटनकुशलता हे त्यांच्या संघकामाचे फार मोठे वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वत:चे पूर्ण जीवन अर्पण केलेला कार्यकर्ता संघ कसा आकलन करून घेतो, हे पुस्तकाच्या प्रत्येक पानावर वाचकाला आढळेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी 1925 साली केली. डॉक्टरांचे शब्द ”आपण आजपासून संघ सुरू करीत आहोत” असे आहेत. संघ स्थापन करीत आहोत, असे शब्द नाहीत. स्थापन करणे आणि सुरू करणे या शब्दातील अंतर समजणे म्हणजे संघ समजणे आहे. संघटित समाज ही समाजाची स्वाभाविक अवस्था असते. आपसातील भेदाभेदांमुळे हिंदू समाजाची ही स्वाभाविक अवस्था दुर्बळ झाली.
 

rss 
 
हिंदू समाजाची संघटित असण्याची स्वाभाविक अवस्था जी काही कारणाने बंद झाली ती डॉक्टरांनी पुन्हा सुरू केली. शाखा हे तिचे माध्यम झाले. व्यक्तिनिर्माण हे शाखा पद्धतीचे ध्येय झाले. अशा निर्माण झालेल्या व्यक्ती म्हणजे स्वयंसेवक आपल्या शक्ती, बुद्धीने राष्ट्रबांधणीच्या कामाला लागतो. हे काम तो कसे करतो याची अनेक उदाहरणे मधुभाईंनी आपल्या पुस्तकात दिलेली आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय किसान संघ, राष्ट्र सेविका समिती, विवेकानंद शिला स्मारक, सामाजिक समरसता मंच, डॉ. हेडगेवार रुग्णालय, इ. अनेक संस्थांचा नामोल्लेख या पुस्तिकेत वाचायला मिळतो. या कामामुळे हिंदू समाजात फार मोठे सकारात्मक बदल झालेले आहेत.
 
 
 
संघ व्यक्तिपूजक नाही तर तत्त्वपूजक आहे. भगवा ध्वज हा तत्त्वाचे प्रतीक आहे. मधुभाई लिहितात, ”स्वयंसेवक व्यक्तिपूजक नाही, तत्त्वपूजक असतो. समाजही व्यक्तिपूजक नसावा, तत्त्वपूजक असावा, तरच तो आत्मनिर्भर बनेल. स्वयंशासित, स्वावलंबी बनेल.” समाजापुढे अगणित प्रश्न असतात. त्यांचा दोन प्रकारे विचार करावा लागतो. पहिला विचार प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा असतो आणि दुसरा विचार प्रश्न निर्माणच होणार नाहीत अशा प्रकारे समाजाची रचना करण्याचा असतो. संघस्वयंसेवक प्रश्न सोडवण्यासाठी खटपट करतोच परंतु त्याचवेळी स्वायत्त, संघटित, समर्थ हिंदू समाज उभा करण्यासाठी तो प्रयत्नशील राहतो.
स्वामी विवेकानंद यांनी व्यक्तिनिर्माण, हिंदूसंघटन, हिंदूंची आध्यात्मिकता याबद्दल अतिशय मौलिक अशा प्रकारचे चिंतन मांडलेले आहे. संघकामातून या चिंतनाची अभिव्यक्ती कशी होत जाते याचे विवेचन मधुभाई यांनी या छोट्या पुस्तिकेत केलेले आहे. सध्याचा कालखंड हिंदूंच्या राजकीय जागृतीचा कालखंड आहे. संघाला राजकीय हिंदू उभा करायचा नाही. मधुभाई यांनी विवेकानंदांचे एक वाक्य उद्धृत केले आहे, अध्यात्मप्रधान असलेली व्यक्तीच हिंदू म्हणविण्यास पात्र असते. त्यालाच मी हिंदू म्हणेन.(If a Hindu is not spiritual, I do not call him a Hindu.)
 
 
संघकार्याचे अंतिम लक्ष्य स्वबळावर ’परमवैभव’ प्राप्त करू शकेल असे राष्ट्र निर्माण व्हावे. हे परमवैभव काय आहे? मधुभाईंच्या शब्दांत, परमवैभव सर्व कल्याणकारी, सर्वसमावेशक, एकात्म दृष्टीकोन देणारा विचार आहे. बंधुभावना हा त्याचा आधार आहे. जल, जमीन, जंगल, प्राणीसृष्टी या सर्वांशी सामंजस्य साधत समाजाचा विकास घडवून आणायचा आहे. जगाला दिशा देण्याचे काम भारताला करावे लागणार आहे आणि ही दिशा देणारे समाजजीवन उभे करणे हेच संघाचे ध्येय आहे. या छोट्या पुस्तिकेत मधुभाई यांनी संघविचार आणि संघजीवन यांच्या अनुभूतीच्या आधारे संघ कसा समजून घेतला पाहिजे हे मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
संघ जाणण्याची जिज्ञासा युवा पिढीत फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या विचारांना चालना देण्याचे सामर्थ्य या पुस्तिकेत आहे असे मला वाटते. मधुभाई यांनी जे मांडले आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी संघशाखेत जावे लागते आणि संघाचा जिवंत अनुभव घ्यावा लागतो. शाखेची वाट दाखवणारे हे पुस्तक ठरावे अशी सदिच्छा.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.