कुटुंबमित्र मधुभाई

विवेक मराठी    05-Oct-2025
Total Views |
@डॉ. जयंतीभाई भाडेसिया
 
आम्हालाच नव्हे तर गुजरातमधील अनेकांना मधुभाई जणू आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यच वाटत असत. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या मधुर स्वभावाची पखरण प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात तशीच ताजेपणाने टिकून आहे.
rss
 
माधव विनायक कुलकर्णी! आमच्या गुजरातमध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी आलेले एक प्रचारक. पण त्यांना या नावाने कोणीच ओळखत नाहीत, तर मधुभाई कुलकर्णी या नावानेच ते येथे सर्वपरिचित होते. संघामध्ये असे म्हटले जाते की, संघप्रचारक म्हणजे बिनपत्त्याचे पोस्टकार्ड असते आणि त्यावर जो पत्ता लिहिला जातो त्या पत्त्यावर जाऊन त्याला संघकार्य करायचे असते. या न्यायाने माधवराव कुलकर्णी यांना गुजरातमध्ये जाऊन राहायचे आणि तेथेच संघकार्य करायचे ही जबाबदारी सोपविण्यात आली. गुजरातमध्ये राहून संघकार्य करायचे तर गुजराती भाषा बोलायला आली पाहिजे, म्हणजे गुजराती भाषा शिकणे आवश्यक झाले. पण माधवरावांनी आपल्या नावातही साजेसे परिवर्तन करून घेतले आणि ते मधुभाई झाले. गुजरात प्रांताचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्वच पुरुषांच्या नावामागे भाई हा शब्द जोडला जातो. येथे असलेले बाबूभाई ओझा या नावाचे संघप्रचारक 1984 साली गेल्यानंतर मधुभाई यांचे येथे आगमन झाले. पूर्वी केशवराव देशमुख हे गुजरात प्रांताचे प्रचारक होते आणि त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी बाबूभाई ओझा यांच्याकडे सोपविण्यात आली होती. बाबूभाई हे तसे गृहस्थी कार्यकर्ता होते, पण त्यांनी आपल्याकडे आलेली जबाबदारी नेटाने पार पाडली होती.
 
 
मधुभाई संघकामासाठी गुजरातमध्ये आले खरे, पण त्यावेळी येथील परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती. या प्रांतात सामाजिक अस्वस्थता माजली होती. 1981 पासून सुरू असलेली आरक्षण चळवळ शमली होती, मात्र समाजामध्ये एक प्रकारची दरी पडलेली होती. समाजजीवन अशांत होते. मधुभाई आल्यानंतर उण्यापुर्‍या वर्षभराच्या काळातच 1985 साली गुजरात सरकारने आरक्षणाच्या नियमांत बदल केले आणि ओबीसी समाजासाठी कोटा ठरवून दिला. यामुळे पुन्हा गुजरातमध्ये आरक्षणविरोधात आंदोलन सुरू झाले. हळूहळू या आंदोलनाचे रूपांतर हिंदूंच्या विरोधात मुस्लीम हुल्लडबाजीमध्ये झाले. हा काळ अत्यंत आव्हानात्मक होता. आपले कार्यकर्ते यांना विचारपूर्वक कृती करण्याचा होता. भडका उडेल अशी भीती दिसत असताना संयम बाळगून कार्य करण्याचा होता. आरक्षणाचे लाभार्थी असलेल्या हिंदू समाजघटकासोबत ठामपणे उभे राहाणे, आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांमध्ये समरसतेची भावना टिकवून ठेवणे या दिशेने प्रयत्न करण्याची गरज होती. ही सर्व आव्हाने तेव्हा कार्यकर्त्यांसमोर होती.
 

rss 
 
कर्णावतीमध्ये आषाढी बीजेला भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात आली होती. या रथयात्रेवर हिंसक मुसलमान टोळक्याने हल्ला केला आणि सर्व वातावरण तंग झाले. हळूहळू हिंसाचार पसरू लागला आणि जाळपोळीसही सुरुवात झाली. यावेळी हिंदू समाजाचे संरक्षण करणे, सर्वांमध्ये धैर्य जागविणे, स्थानिक लोकांना संघटित करून त्यांचे मनोबळ टिकवून ठेवणे अशा प्रकारची मोठी जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांवर येऊन पडली होती. अशा आव्हानात्मक काळात मधुभाईंचे मार्गदर्शन आपल्या कार्यकर्त्यांना लाभले आणि या सर्व परिस्थितीला हाताळण्यात कार्यकर्त्यांना यश आले. याच काळात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे आणि त्यांची कार्य करण्याचे मनोबळ वाढविणे यासाठीही मधुभाईंचे अत्यंत प्रेरक मार्गदर्शन लाभले.
 

rss 
 
नंतर काही कालांतराने कर्णावतीमध्ये स्थानिक पातळीवरील निवडणुका झाल्या आणि शासनात सत्ताबदल झाला. यामुळे संपूर्ण प्रांतातच राजकीय परिस्थिती बदलू लागली. मधुभाई प्रांतप्रचारक असल्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारीत मोठी वाढ झाली. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून त्यांनी अतिशय उचित मार्गदर्शन या काळात केले. त्यांच्या कार्यकाळातच गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषद, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच इत्यादी संघसंबंधित संस्था आणि संघटनांचा अतिशय चांगला कार्यविस्तार घडून आला. यात त्यांचे मोठे योगदान आहे.
 
 
यानंतरच्या काळात रामजन्मभूमी आंदोलनाने जोर पकडला. या काळात रामपादुकापूजन, रामशिलापूजन असे कार्यक्रम ठिकठिकाणी पार पडले. पुढे 1990 आणि 1992 मध्ये अयोध्येत कारसेवा करण्यासाठी गुजरातमधून बहुसंख्य कार्यकर्ते गेले होते. या काळात हिंदू समाजाला संघटित करणे आणि आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर जे कारसेवक अयोध्येत गेले होते त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क ठेवणे आणि त्यांची विचारपूस करणे, त्यांना आश्वस्त करणे, त्यांचे शंकासमाधान करणे असे नाना प्रकारचे कर्तव्य मधुभाईंनी पार पाडले. दुर्दैवाने कारसेवेत सहभागी झालेल्या काही लोकांचे त्या संघर्षात बलिदान झाले. अशा परिवारांच्या भेटीगाठी घेणे, त्यांचे मायेने आणि आपुलकीने सांत्वन करणे अशा अनेक गोष्टींकडे मधुभाईंनी लक्ष पुरविले. मी स्वत: दुसर्‍या वेळेस झालेल्या कारसेवेत गेलो होतो. तेव्हा मधुभाईंनी माझ्या घरी संपर्क करून माझ्या परिवाराचीही विचारपूस आवर्जून केली होती. असा त्यांचा सर्व कार्यकर्त्यांसोबत जिवंत संपर्क होता.
 

rss 
 
एक अनोखी योजकता मधुभाईंकडे होती. प्रत्येक कार्यकर्त्यांची मानसिकता आणि स्वभाव लक्षात घेऊन त्याला वेगवेगळ्या कामांशी जोडणी करण्यात त्यांचा हातखंडा होता. एक दुर्लभ योजकत्व त्यांच्या अंगी होते. आपल्या समविचारी संघटनांना बिनीचे कार्यकर्ते पुरविण्याचे कामही त्यांनी चांगल्या प्रकारे निभावले. कार्यकर्त्यांची नियुक्ती आणि त्यांना पुढच्या काळात मार्गदर्शन करणे यात मधुभाईंचे अव्वल दर्जाचे संघटनकौशल्य दिसून आले. डॉ. प्रवीणभाई तोगडिया हे चांगले डॉक्टर असून त्यांची मेडिकल प्रॅक्टिसही चांगल्या प्रकारे चालली होती. अशी चांगली प्रॅक्टिस सोडून तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कामासाठी स्वत:ला झोकून दिले. त्या या कार्यात जोडण्यासाठी मधुभाईंनी खूप मेहनत घेतली होती.
 
 
मी मोरबी येथील चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये कामासाठी दाखल झालो आणि नंतर माझ्याकडे नगर संघचालकाची जबाबदारी देण्यात आली. परंतु अल्प काळातच माझ्याकडे जिल्हा संघचालक ही जबाबदारी देण्यात यावी असे मधुभाईं यांनी आमच्या विभागाचे प्रचारक नटवरसिंहजी वाघेला आणि विभाग संघचालक मनोजभाई यांना सुचविले आणि माझ्याकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली. जिल्हा पातळीवरचा अधिकारी झाल्यामुळे मग वेळोवेळी प्रांत प्रचारक असलेल्या मधुभाईंना भेटणे मला भाग पडले व आमच्या खूप भेटीगाठी होउ लागल्या. वाकानेर हे माझे मूळ गाव आहे. एकदा मधुभाईंचा वाकानेरला प्रवास होता आणि नेमका त्या काळात मी घरी नव्हतो. मधुभाईंना हे माहीत असूनही ते आवर्जून माझ्या घरी गेले आणि माझ्या कुटुंबाची त्यांनी विचारपूस केली. त्यांचे सलगी देणे हे इतके मधुर होते. वाकानेर येथे विद्याभारतीची शाळा होती. या शाळेच्या प्रगतीमध्येही मधुभाईं यांचे प्रेरक मार्गदर्शन आहे.
 
 
मधुभाईंकडे संपर्क करण्याचे चांगले नियोजन होते. स्वयंसेवकांसोबत वागण्याबोलण्याची त्यांच्याकडे एक विशेष कला होती. एकदा ते मोरबी येथील जेतपूरच्या संघशाखेवर गेले होते. संघस्वयंसेवकांसोबत त्यांच्या गप्पा सुरू होत्या. त्यांनी विचारले, ‘आप की शाखा कैसी है?’ तेव्हा स्वयंसेवकाने उत्तर दिले, ’अच्छी चलती है।’ मग मधुभाईंनी लागलीच विचारले, ’वह चलकर कहाँ गई?’ हे ऐकून स्वयंसेवक आश्चर्याने त्यांच्याकडे पाहायला लागला. शाखा चालत कोठवर जाते याचा त्याला विस्मय वाटत होता. मग मधुभाईंनी त्याला समजावून सांगितले, एखादी शाखा आपण चांगली चालते असे तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा त्या शाखेमुळे आणखी एक नवी शाखा सुरू होते. एका लहानशा वाक्यात सक्षम शाखा ही संकल्पना मधुभाईंनी त्या स्वयंसेवकाला उलगडून दाखविली होती. असे मधुभाईंचे संवादकौशल्य होते.
 
 
जुन्या कार्यकर्त्यांच्या अनेक आठवणी त्यांच्याकडे होत्या आणि उदाहरणादाखल ते असे छोटे छोटे किस्से स्वयंसेवकांना सांगत असत. याच छोट्या किस्स्यांमधून स्वयंसेवकांच्या मनावर संस्कार कोरला जात असे. त्यांची संघकार्याला पूरक मानसिकता आकाराला येत असे. गुरुदक्षिणेच्या संदर्भात त्यांनी स्वयंसेवकांना आपली एक आठवण सांगितली होती. ते म्हणाले, ’मी जेव्हा जिल्हा प्रचारक होतो तेव्हा ग्रामीण भागातील एका शाखेचे मुख्य शिक्षक माझे चांगले परिचित होते. त्यांची आर्थिक स्थिती फारशी समाधानकारक नव्हती. त्यांनी मनोमन त्या वर्षी दहा रूपयांची गुरुदक्षिणा देण्याचा निश्चय केला होता. पण त्यांना ते शक्य झाले नाही. ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागली, पण त्यांचा नाईलाज होता. ते मला त्या दिवशी खूपच उदासवाणे वाटत होते. काही केल्या त्यांचे मन थार्‍यावर येत नव्हते. त्यांच्या उदासपणाचे हे खरे कारण मला खूप उशीराने समजले. एका निष्ठावान कार्यकर्त्याची मानसिकता कशी असते, हे मला तेव्हा उमगले.’ संघनिष्ठेच्या संदर्भात हे जुने उदाहरण ते अनेकदा सांगत असत.
 
 
मी जेव्हा द्वितीय संघ शिक्षा वर्गाला गेलो होतो तेव्हाच त्यांना क्षेत्र प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि मनमोहनजी वैद्य आमचे प्रांत प्रचारक झाले. गुजरातमध्ये 2000 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य संकल्प शिबीर झाले होते. तेव्हाच्या काळात त्यांचे या शिबिराच्या यशस्वितेसाठी चांगले मार्गदर्शन लाभले होते. मधुभाईंचा सर्वच नव्याजुन्या संघस्वयंसेवकांशी अतिशय उत्तम परिचय आहे, असे तेव्हा आम्हाला अनुभवायला आले.
 
 
2001 साली कच्छ आणि गुजरातमध्ये भूकंप झाला होता. तेव्हाही मधुभाईंचा संकटग्रस्त भागामध्ये प्रवास झाला होता. तेथे चाललेल्या मदतकार्याचा त्यांनी आढावा घेतला. तेथील कार्यकर्त्यांची विचारपूस केली व त्यांचे मनोबळ टिकवून ठेवण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनही केले. त्यांनी भूकंपग्रस्त भागामध्ये महाराष्ट्रातील स्वयंसेवकांची टीमसुद्धा मदतकार्यासाठी पाठविली होती.
 
 
अगदी अलीकडेच सात महिन्यांपूर्वी छ. संभाजीनगरात सावित्रीबाई फुले पुरस्काराचा कार्यक्रम झाला तेव्हा ते प्रेक्षकांमध्ये आवर्जून उपस्थित होते. मी संभाजीनगर कार्यालयात गेलो तेव्हा त्यांच्या खोलीत बसून त्यांच्यासोबत जवळपास दोन तास गप्पा मारल्या होत्या. तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की, त्यांनी लिहिलेले काही लेख गुजरातला साधना साप्ताहिकाकडे पाठविले आहेत, पण त्या लेखांचा विषय महत्त्वाचा असल्यामुळे अन्य वर्तमानपत्रांकडेही पाठवायला हवेत. अलीकडेच त्यांनी मराठीत लिहिलेले ’अथातो संघजिज्ञासा’ या पुस्तकाचे गुजराती भाषेतही भाषांतर झालेले आहे. संघ समजून घेण्यासाठी हे उपयुक्त पुस्तक आहे.
 
 
गंभीर वाटणारे मधुभाई कधीकधी मिष्किलपणे हास्यविनोदही करीत असत. एकदा एक स्वयंसेवक त्यांना म्हणाला, ’मधुभाई मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायची आहे.’ तेव्हा ते त्याला हसतच म्हणाले, ’अरे या सेल्फीमुळे संघकार्य वाढणार असेल तर तू माझ्यासोबत अवश्य सेल्फी घे.’
 
 
2001 नंतर माझ्याकडे प्रांत सहकार्यवाह अशी जबाबदारी आली. त्यामुळे मी अखिल भारतीय स्तरावरील बैठकांसाठी जावू लागलो. अशा बैठकांमध्ये माझी मधुभाईंशी नेहमी भेट होत असे. त्यांचा आमच्या क्षेत्रामध्ये प्रवास होत असे त्यावेळीही आमची भेट आणि विचारविनिमय होत असे. नंतर त्यांच्याकडे अ. भा. बौद्धिक प्रमुख अशी जबाबदारी आली. मधुभाईंची विषयमांडणीचीही एक विशेष पद्धत होती. जसा एखादा शिक्षक शिकवितो त्याप्रमाणे ते एक एक मुद्दा अनुक्रमे मांडत असत आणि समारोप करताना त्या सर्वांचा साररूप आढावा घेत असत. धर्म आणि शिक्षण यासारखे गहन विषयसुद्धा ते अत्यंत सुगमपणे समजावून सांगत असत. अ. भा. जबाबदारी आल्यानंतर ते गुजरातमध्ये जो संघचालकांचा एक वर्ग मोरबी येथे झाला होता त्यात ते पूर्ण दोन दिवस उपस्थित होते. यावेळी संघचालकांची जबाबदारी याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा घडून आली होती.
आरोग्याच्या आणि विश्रांतीच्या दृष्टीने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात निवास करावा असे ठरल्यानंतर त्यांनी तेथे चालणार्‍या सेवाकार्यांमध्ये विशेष रस घेण्यास सुरुवात केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची रुजवात करण्याच्या हेतूने ‘सेवांकुर’ हे कार्य चालविले जाते. एकदा मी अखिल भारतीय बैठकीत सेवांकुरबाबत निवेदन केले होते. या निवेदनामध्ये माझ्याकडून एक त्रुटी राहून गेली. नंतर मला मधुभाईंनी आठवण करून दिली की सेवांकुरच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींसोबत भेट झाली होती ते सांगायचे राहून गेले होते. इतके मधुभाईंचे बारीक लक्ष असे आणि त्यांना सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती असे.
माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नाच्या वेळी मी मधुभाईंना आवर्जून निमंत्रण दिले होते. त्यांची तब्येत त्यावेळी फारशी साथ देत नसल्यामुळे ते विवाहप्रसंगी उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांनी त्या प्रसंगी न विसरता नवदांपत्याला फोनवरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. आम्हालाच नव्हे तर गुजरातमधील अनेकांना मधुभाई जणू आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यच वाटत असत. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या मधुर स्वभावाची पखरण प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात तशीच ताजेपणाने टिकून आहे.
लेखक रा.स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक आहेत.