...चालविसी हाती धरोनिया

विवेक मराठी    05-Oct-2025
Total Views |
@तात्या जोगळेकर  9869070763
 
rss
प्रचारक जीवनाची धुळाक्षरे गिरवण्यापासून दायित्वमुक्त प्रचारक जीवनात कसं आनंदी राहावं याचा वस्तुपाठ देणारे माझे प्रथम शिक्षक मधु सोनटक्के उर्फ माधवराव कुलकर्णी उर्फ मधुभाई यांच्या पावन प्रेरक स्मृतींना शतसहस्र वंदन!
मी मधु सोनटक्के...
 
 
दारात उभ्या राहिलेल्या शर्टपॅन्ट परिधान केलेल्या सामान्य नागरी वेशातील त्या व्यक्तीने नमस्कार केला आणि नजरेनेच मी आत येऊ शकतो का? असं विचारलं.
 
 
इसवी सन 1975. देशात आणीबाणी, संघावर बंदी आणि चहूकडे भीती अन् दहशत असल्यामुळे सावधपणे वागण्याचा काळ. आमच्या शेजारीच राहणारे संघाचे वरिष्ठ प्रचारक असलेले माझे सख्खे मामा बाळासाहेब साठ्ये यांच्या घरात मी बसलो होतो. मामा प्रवासात होता. दारावरील बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर हे सोनटक्के उभे.
 
 
तसं तर आणीबाणीपूर्वीच माझं संघाचं तीनही वर्षांचं प्रशिक्षण झालेलं होतं. त्यावेळी या व्यक्तीला कुठे ना कुठे पाहिलेलं होतंच. परंतु माझा भाऊ मिसाखाली तुरुंगात, पोलीस येऊन चौकशी करून गेलेला, माझा मामा प्रवासात आणि हे दारात उभे. मी पद्मा मामीला हाक मारली, ती त्यांच्या सामोरी गेली आणि मी तिथून सुंबाल्या केला.
 
 
मला तेव्हा पुसटशी देखील कल्पना नव्हती की, हे मधु सोनटक्के उर्फ माधवराव कुलकर्णी हेच पुढे माझ्या आयुष्याला निर्णायक वळण देणारे माझे मार्गदर्शक बनतील...
 
 
संघबंदीच्या काळात प्रचारक म्हणून मी मुंबईच्याच काही भूमिगत योजनेमध्ये सक्रिय होतो. बंदी उठल्यानंतर मला सोलापूरला पाठवण्यात आलं. माझ्या प्रचारक जीवनातील प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील पहिला दिवस मी माझे प्रथम विभाग प्रचारक माधवराव कुलकर्णी यांच्या हातात माझं बोट देऊन सुरू केला आणि तेच नातं पुढील तब्बल पन्नास वर्षे आमचं दोघांचं राहिलं.
 

rss 
 
माणसाच्या आयुष्यात पुढे कितीही गुरू आणि मार्गदर्शक येवोत, प्राथमिक शाळेमध्ये ज्यांच्या हाताखाली धुळाक्षरे गिरवली त्या शिक्षकांना आपण कधीच विसरू शकत नाही. माधवराव हे माझ्या प्रचारक जीवनातील प्रथम शिक्षक होते. प्राथमिक शिक्षण हा जसा पुढील वाटचालीचा पाया असतो तशीच प्रचारक जीवनातील पहिली दोन-चार वर्षे. यश-अपयश, उत्साह-निरुत्साह, आनंद-दुःख, आत्मविश्वास-न्यूनगंड अशा वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये हेलकावे खाण्याचा हा काळ असतो. अशा काळामध्ये माधवरावांसारख्या ज्येष्ठ प्रचारकाचं सान्निध्य व सहवास मिळणं याला फार मोठं भाग्य लागतं. मी भाग्यवान.
 
 
शाखा कार्यकर्ते, नगराचे, शहराचे कार्यकर्ते यांच्याकडे जाताना जिल्हा प्रचारक रवींद्र नवाथे मला सोबत घेऊन जात असत आणि गावातील नामांकित व्यक्ती वकील, डॉक्टर, बँकेचे संचालक, कारखानदार अशा दिग्गज व्यक्तींकडे जाताना कधी कधी माधवराव मला सोबत घेत असत, तर कधी कधी हा आनंद आणि प्रशिक्षण सुरेशराव केतकर यांच्यासोबत सुद्धा मिळत असे. प्रचारकाने राहावं कसं, वागावं कसं आणि बोलावं कसं याचं प्रशिक्षण असं बोटाला धरून चालवण्यातूनच होत असतं.
 
 
आम्ही जिल्ह्यातील तीन-चार प्रचारक दिवसभर एकत्र होतो. माधवराव आमच्याशी सहज संवाद करत होते. त्यांनी सहज विचारले की, मनुष्याला सर्वाधिक आनंद कोणत्या गोष्टीपासून मिळत असतो? आणि तेच पुढे म्हणाले की, निर्मितीचा आनंद हा सर्वात मोठा आनंद असतो आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणजे व्यक्तिनिर्मिती आहे, व्यक्तिनिर्माणाचं कार्य यात तो आनंद आहे. ‘एक दीप दूसरा जलाए ऐसे अगणित होवे’ या काव्यपंक्तीतील गर्भितार्थ अशा सोप्या पद्धतीने अलगदपणे उलगडून सांगण्याची शैली माधवरावांकडे होती.
 
 
प्रचारक निघण्यापूर्वीच माझं तृतीय वर्षपण झालं होतं आणि वर्गात एक-दोन वर्षे शिक्षक म्हणून राहाण्याचासुद्धा अनुभव गाठीशी होता. परंतु तोपर्यंत आमची संघकार्यातील निपुणता म्हणजे खांद्याखाली मजबूत एवढीच होती. शाखेत बोलायचं म्हटलं की, अंगावर भीतीचा काटा. या शारीरिककडून थोडं का होईना बौद्धिककडे वळण्याचे धडेसुद्धा माधवरावांकडे पाहात पाहात शिकायला मिळाले. मी शहर प्रचारक असताना त्यांचा कधीतरी सलग दोन-चार दिवस प्रवास मिळत असे. अन्य कार्यक्रमांबरोबरच रोज एका नवीन सायंशाखेमध्ये प्रवास होत असे. अर्थातच प्रत्येक शाखेवर शेवटची दहा मिनिटे बाल-किशोर स्वयंसेवकांसाठी माधवराव यांची गोष्ट. एका प्रवासात निरनिराळ्या शाखांवर ते एकच गोष्ट सांगत असत. प्रत्येक शाखेला ती एकदाच ऐकायची असे. पण त्यातून सांगणार्‍याची मात्र उजळणी आणि शैली अधिक चांगली चांगली होत असे. असं वाटलं की, अरे हे तर सोप्पं आहे. आणि मग सुरू झालं कॉपी-पेस्ट.
 
 
पुढे मग माधवराव पुणे महानगर प्रचारक झाले आणि त्यानंतर गुजरातचे सह प्रांत प्रचारक व प्रांत प्रचारक. आता माधवराव यांचे मधुभाई झाले. मधुभाई मग कधी इकडे आले की, कोणी त्यांना म्हणत असे, काय मधुभाई, आता गुजरातमध्ये जाऊन वजन चांगलंच वाढलेले दिसत आहे. मग मधुभाई म्हणायचे, ‘हो. आता मी इतकं तेल-तूप खात आहे की, मी चालायला लागल्यावर चप्पलमधून पच्याक पच्याक असा आवाज येतो.’ गंमतीचा भाग सोडून देऊ पण माधवराव गुजरात प्रांताशी पूर्ण समरस होऊन गेले.
 
 
त्यानंतर ते क्षेत्र प्रचारक झाले. पुढे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख झाले आणि नंतर त्यांच्या भेटीचा योग दुर्मीळ होऊ लागला. कधीतरी अचानक दिल्लीच्या केशवकुंजमध्ये, लखनऊच्या भारती भवन मध्ये तर कधी भाग्यनगरच्या केशव निलायममध्ये भेट होत असे. काय तात्या, नवीन काय? सध्या काय वाचत आहेस? असं आपुलकीने विचारत असत. दायित्व मुक्त झाल्यावर ते संभाजीनगरला संघ कार्यालयात राहू लागले. त्यानंतर मी दरवर्षी एक आठवडाभर केवळ त्यांच्या सहवासात राहण्यासाठी संभाजीनगरला जाऊ लागलो.
 
 
अनेक विषयांवर अगदी मनमोकळ्या गप्पा होत असत. संभाजीनगरमधील त्यांची प्रभात शाखा, तिथे सुरू केलेले उपक्रम सांगत असत. डॉ. हेडगेवार रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर्स सह तेथील सर्व कर्मचार्‍यांच्या व्यक्तिगत भेटींची योजना एक वर्ष केली होती. एकदा ते म्हणाले उद्या राखी पौर्णिमा आहे. मी राखी बांधून घ्यायला सुशीलताई अभ्यंकर यांच्याकडे जाणार आहे. तू येणार का बरोबर?.... इतक्या अनौपचारिक भेटी आणि गप्पा त्यांच्याबरोबर होत असत.
 
 
रंगा हरी जी अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख झाल्यानंतर संघ शिक्षा वर्गातील पाठ्यक्रम तयार करण्यासाठी ते दरवर्षी यशवंत भवनला आठ-दहा दिवस राहात असत. रोज संध्याकाळी साडेपाच वाजता भोजनगृहामध्ये चहा पिण्याच्या निमित्ताने सर्वांना रंगा हरी जी यांचं सान्निध्य मिळत असे. ते त्याला पार्लमेंट म्हणत असत. सर्वांना मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळत असे आणि त्यासोबतच रंगा हरी जी यांचे संघजीवनातील प्रदीर्घ अनुभवांचे किस्से.
 
 
तोच आनंद आता ‘समर्पण’मध्ये गेल्यावर मिळत असे. सकाळी दहाच्या सुमारास मधुभाई यांच्या खोलीत सर्वांची पावले वळत असत. त्यात दुर्गादासजी असायचे, कधी संस्कृत भारतीचे सुरेशजी, कधी प्रांत प्रचारक स्वप्नीलजी, तर कधी क्षेत्र प्रचारक प्रमुख तात्या देशपांडे, क्षेत्र समरसता गतीविधी प्रमुख निलेशजी अशा सार्‍यांबरोबर चहा गप्पा रंगत असत. ज्ञान, मनोरंजन आणि हास्याचे फवारे यांच्यामुळे बिनसाखरेच्या चहाची सुद्धा गोडी वाढत असे.
 
 
अशा प्रकारे प्रचारक जीवनाची धुळाक्षरे गिरवण्यापासून दायित्वमुक्त प्रचारक जीवनात कसं आनंदी राहावं याचा वस्तुपाठ देणारे माझे प्रथम शिक्षक मधु सोनटक्के उर्फ माधवराव कुलकर्णी उर्फ मधुभाई यांच्या पावन प्रेरक स्मृतींना शतसहस्र वंदन!