@अनिल भालेराव 9822044639
आम्ही पूर्व राष्ट्रपतींचा सत्कार करण्याकरिता शाल व पुष्पगुच्छ सोबत घेतला होता. आम्ही राष्ट्रपतींना ते देणार त्याआधीच त्यांनी आमच्या हातून दोन्ही वस्तू मागून घेतल्या व त्यांनीच मधुभाईंचा शाल व पुष्पगुच्छ प्रदान केले व अशा रितीने सत्कार करून त्यांना अभिवादन केले.
मी स्वतःला भाग्यवान समजतो की, गेली सहा दशके मा. मधुभाईंचा सहवास मला लाभला. मधुभाई संभाजीनगर शहरात 1963ला शहर प्रचारक म्हणून आले त्यावेळी मी वैजापूर येथून मॅट्रिक पास होऊन 1965ला संभाजीनगर शहरात पुढच्या शिक्षणाकरता आलो. वैजापूरला शाखेच्या दैनंदिन कामात असल्यामुळे इथे हनुमान सायं शाखेत तरुणांचा गणशिक्षक म्हणून काम करू लागलो.
अनेक वेळी संघाच्या कार्यालयात मधुभाई यांच्याबरोबर मुक्कामाचा प्रसंगही आला, त्यावेळेचे कार्यालय चौराहात मधुकर जोशी यांच्या वाड्याच्या एका हॉलमध्ये होते. त्यात एक सतरंजी, एक प्रायमस कंपनीचा रॉकेलवर चालणारा स्टोव्ह व एक जर्मन पातेले होते. कार्यालयात कै. दत्ताजी भाले पण असत. त्या जर्मन पातेल्याचा उपयोग म्हणजे त्यात पाणी गरम करणे व कधीकधी जेवणाची व्यवस्था झाली नसल्यास त्यात खिचडी शिजवणे. एकदा मी ही दत्ताजी भालेंनी तयार केलेली चविष्ट खिचडी खाल्ली. मधुभाईंचा शहरात सायकलवर किंवा पायीच प्रवास असायचा. त्याच काळात त्यांच्या हृदयामध्ये एका झडपेला समस्या असल्याचे कळले. त्यामुळे नंतर ते स्कूटरवर फिरत.
मधुभाईंशी अनेक वेळा गप्पा व्हायच्या. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांचे भाऊ म्हणाले होते तू प्रचारक निघतोयस पण पुढे चालून तुझ्या म्हातारपणी कसं करशील? त्याकाळी संघ लहान होता, संघाचे कार्यकर्ते हे पण सर्वसाधारण परिस्थितीत जीवन जगत होते आणि त्या वेळेला कोणालाही कल्पना नव्हती की, पुढचा काळ कसा असेल. अशी अनिश्चितता व काळजीपोटी केलेले ते भावाचे वक्तव्य असेल. मधुभाईंनी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक घरांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं.
आमच्यासारख्या अनेक स्वयंसेवकांना मधुभाई हे घरातील एक वडीलधारी व्यक्ती वाटत. शहरामध्ये अनेकांच्या घरी त्यांचे राहाणे झाले. शेवटचा एक महिना मधुभाईंची काळजी घेणारे अनेक स्वयंसेवक सेवा देत होते.
मधुभाईंचा एक प्रसंग मला इथे नमूद करावा वाटतो. मी संघ शिक्षा वर्गाला जावे म्हणून मधुभाई आमच्या वडिलांना भेटण्याकरता बसने गारजला जाऊन व तेथून 30 किलोमीटर पायी अंतर कापून गावी पोहोचले. एक दिवस मुक्काम करून परत तीस किलोमीटर पायी परतले. एवढे करूनही परवानगी मिळाली नाही ती नाहीच, पण मधुभाईंची नाराजी कुठेही दिसली नाही. शेवटी मी काही वर्षांनंतर घरच्यांची परवानगी न घेता 1969 ला प्रथम वर्ष पूर्ण केले.
आणीबाणीच्या काळात भूमिगत असताना मधुभाईंच्या मागावर सोलापूरचे पोलीस होते, पण मधुभाई त्यांना सापडू शकले नाहीत कारण मधुभाईंनी त्यांचा वेष पूर्ण बदलला होता. संभाजीनगरमध्ये ते आले असताना मी व माझी पत्नी शैलजा त्यांना भेटलो. त्यावेळी आबासाहेब देशपांडे व मेधावहिनी तिथे होत्या. शर्टपॅन्ट, हातामध्ये कडं, नाव बदललेले, माधव सोनटक्के आम्हाला भेटले. भूमिगत राहून मिसाबंदीमधील संघस्वयंसेवकांच्या कुटुंबाची काळजी घेण्याकरता ते बाहेर राहिले. जसे आपल्याला माहिती आहे की, मा. दत्ताजी भालेही त्याकाळी भूमिगत होते. खरोखरच त्याकाळचे प्रचारकांचे खडतर जीवन प्रत्यक्ष बघायला मिळाले.
मधुभाई सोलापूरनंतर पुणे महानगरचे प्रचारक झाले. त्याकाळी त्यांनी महाराष्ट्र प्रांताच्या तीन दिवसीय भव्य दिव्य शिबिराचे उत्कृष्ट आयोजन केले होते. त्यावेळी जवळपास 35 हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते.
मधुभाईंनी बोलताना सांगितले की, ज्यावेळी त्यांची गुजरात प्रांताचे सहप्रांत प्रचारक म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर एक दिवस लक्ष्मणराव इनामदार मोतीबागेत आले व त्यांनी मधुभाईंना आपल्याबरोबर राजकोटच्या बैठकीत नेले. लक्ष्मणरावांनी मधुभाईंना विचारलं की, तुम्हाला घरगुती नावाने काय म्हणायचे. त्यावेळी मधुभाईंनी सांगितलं की त्यांना ’मधु’ म्हणायचे. मग लक्ष्मणरावांनी ठरवलं की, आता गुजरातमध्ये तुम्हांला मधुभाई म्हणणं सोपे जाईल आणि तिथूनच माधवराव कुलकर्णीचे मधुभाई झाले. पुढे लक्ष्मणराव इनामदार क्षेत्र प्रचारक झाल्यानंतर मधुभाईकडे प्रांत प्रचारकाची जबाबदारी आली.
मधुभाईंचे चिंतन विलक्षण होते. छत्रपती संभाजीनगरला आल्यापासून त्यांचा सहवास कायम असायचा. प्रत्येक बैठकांमध्ये ते उपस्थित असायचे. माझ्यासारख्याला एखाद्या विषयाची मांडणी केल्यानंतर ती कशी झाली, याचं मार्गदर्शन मला मिळत असे. तसेच त्यांचे अभ्यासपूर्ण बौद्धिक ऐकण्याची संधीही मिळत असे. मला आठवतं की, संघाच्या एका प्रतिज्ञेच्या कार्यक्रमात मधुभाईंनी प्रतिज्ञेतील प्रामाणिकता व नि:स्वार्थ बुद्धी या दोन शब्दांचा अर्थ व फरक अतिशय समर्पक उदाहरणातून समजावून सांगितला आणि प्रतिज्ञेत ते दोन्ही शब्द का आवश्यक आहेत, याचे महत्त्व सांगितले.
मधुभाईंचे देशात किती आदर्श स्थान होते ते एका छोट्या प्रसंगावरून कळले. दोन वर्षापूर्वी मी आणि संघाचे काही अधिकारी पूर्व राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांना भेटायला सुभेदार गेस्ट हाऊसला गेलो. माननीय मधुभाई आमच्यासोबत होते. आम्ही पूर्व राष्ट्रपतींचा सत्कार करण्याकरिता शाल व पुष्पगुच्छ सोबत घेतला होता. आम्ही राष्ट्रपतींना ते देणार त्याआधीच त्यांनी आमच्या हातून दोन्ही वस्तू मागून घेतल्या व त्यांनीच मधुभाईंचा शाल व पुष्पगुच्छ प्रदान केले व अशा रितीने सत्कार करून त्यांना अभिवादन केले.
मा. मधुभाई अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असतांनाही माझ्या कुटुंबाला शिवाय शहरातील अनेक कार्यकर्त्यांस त्यांचा प्रेरक सहवास मिळत राहिला. मधुभाईंच्या ह्या आठवणी आम्हासाठी आयुष्यभराची शिदोरी आहे. मधुभाईंना सर्व स्वयंसेवकातर्फे व माझ्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
लेखक देवगिरी प्रांताचे मा. प्रांत संघचालक आहेत.