विवेक विसरल्याने आम्हाला तुझ्या विरहाच्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. आम्ही तुझ्यापासून दूर गेलो. पण तरीही हे रामा, तूच आता आम्हाला दुर्जनांपासून सोडवून जवळ घे. हे सर्वगुणांनी श्रेष्ठ असलेल्या रामा, तू मला केव्हा भेट देशील? केव्हा तुझे दर्शन होईल? असे साधक कळकळीने विचारत आहे, सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी.’
’सर्वोत्तमा कैं मज भेट देसी’ या करुणाष्टकाच्या मागील श्लोक क्रमांक 2 मध्ये स्वामी म्हणाले की, माझ्या ठिकाणी अहंकार असल्याने मला रामाचा वियोग सहन करावा लागत आहे आणि याची माझ्या मनाला खूप काळजी लागून राहिली आहे. ही चिंता मला सतावत आहे. स्वामी पुढे असेही म्हणाले की, रामापासून दूर जाण्याचे मुख्य कारण माझा अहंकार असले तरी हा अहंकार काही केल्या सुटत नाही. अहंकार घातक आहे हे माहीत असूनही माझ्या मनातून तो जात नाही याला कारण माझे प्रारब्ध असावे. माझे प्रारब्ध चुकीचे असल्याने, खोटे असल्याने मनातील हा अहंकार, गर्व, ताठा पूर्णपणे जात नाही. असे असले तरी हे रामा, तुझ्या वियोगाने माझ्या मनाला यातना होत आहेत. वियोगाच्या या वेदना कदाचित तुला दिसणार नाहीत कारण ही सर्व माझ्याच पूर्वकर्माची फळे आहेत. आणि त्यामागची कारणे स्वामी पुढील श्लोकातून मांडत आहेत. तो श्लोक असा आहे-
तुझिया वियोगें बहु वेदना रे ।
विवेक नाहीं आम्हां दिनां रे ।
पडिला समंधु या दुर्जनेसी।
सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ॥3॥
अन्वयार्थ - (हे रामा) तुझा वियोग झाल्यामुळे (मला) खूप दुःख होत आहे रे. आमच्यासारख्या दु:खीकष्टी (अज्ञानी) जीवांच्या ठिकाणी विवेक नसल्यामुळे (आमचा) संबंध दुर्जनांसी येत असतो. (त्यामुळे तुझा वियोग सहन करावा लागतो.) हे (गुण-ऐश्वर्यसंपन्न) सर्वोत्तमा रामा, तू मला केव्हा भेट देशील.
रामाचा वियोग का झाला याची कारणे सांगताना प्रथम अहंकार हे कारण स्वामींनी सांगितले आहे. इच्छा असूनही आणि अनेक प्रयत्न करूनही या अहंकारावर ताबा मिळवता येत नाही असे समजल्याने स्वामींनी प्रारब्धाचा मुद्दा उभा केला. स्वामी मागील श्लोकात म्हणाले की, ‘माझे प्रारब्ध वाईट आहे, त्यामुळे मी अहंकारावर विजय मिळवू शकत नाही.’ समर्थांनी त्यांच्या वाङ्मयात अनेकवेळा प्रयत्नांची महती गायिली आहे. यत्न, साक्षेप समर्थांना आवडतात.
अनेकदा प्रयत्न करूनही ज्यांना यश मिळत नाही ती माणसे प्रारब्धाला दोष देत बसतात. समर्थांच्या मते प्रयत्न नीट होत नाहीत म्हणून अपयश येते. ’यत्न तो देव जाणावा’ अशा शब्दांत समर्थ प्रयत्नवादाचे महत्त्व सांगतात. असं असताना समर्थ या करुणाष्टकात ’प्रारब्ध ठीक नसल्याने अभिमान आला,’ असे का म्हणाले असावेत? येथे अशी शक्यता आहे की, प्रारब्धामुळे अहंकार, अहंकारामुळे रामाचा विरह आणि रामाच्या विरहाने यातना या अवस्था स्वामींनी सर्वसाधारण साधकाच्या अध्यात्म साधनेच्या सुरुवातीच्या काळातील सांगितल्या असाव्यात.
येथे मांडलेले विचार नवीन साधकाला मार्गदर्शन मिळण्यासाठी मांडले असावेत. साधकाचे पारमार्थिक साधन योग्य मार्गाने निष्ठापूर्वक व्हावे असा स्वामींचा साधनमार्गातील अडचणी सांगण्याचा उद्देश आहे. असो, महत्त्वाचे म्हणजे यामुळे मनाला यातना होतात, खूप चिंता वाटते. आता यापुढे जाऊन स्वामी सांगत आहेत की हे रामा, तुझ्या वियोगाने अतिशय वेदना होत आहेत. रामाच्या विरहाचे, त्यातून उत्पन्न होणार्या दुःखाचे कारण शोधताना स्वामी प्रस्तुत श्लोकात सांगतात की, आमचा संबंध नेहमी दुर्जनांबरोबर आला. दुर्जनांच्या संगतीत सद्विचार मनापर्यंत पोहोचत नाहीत. आपण व्यवहारातही पाहातो की, संगतीचा बरा-वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. सत्संगतीने सदाचरण होते. दुर्जनांच्या संगतीत राहिल्याने माणूस सद्गुणांना मुकतो आणि क्वचित प्रसंगी दुराचरणाकडे आकृष्ट होतो.
दुर्जनांच्या संगतीविषयी स्वामींनी मनाच्या श्लोकांत बरेच काही सांगितले आहे. दुर्जन आपला मोठेपणा इतरांना दाखविण्यासाठी लोकांची निंदानालस्ती करीत असतात. थोडीशी थट्टामस्करी चालून जाते. पण हे दुर्जन सतत तथ्यहीन पांचट विनोद करून विकृत आनंद मिळवतात व इतरांना देऊ पाहातात. प्रसंगी ते भगवद्भक्तीची, रामचरित्राची टिंगल-टवाळी करायला मागेपुढे पाहात नाहीत, पण लोकांची तर्हा अशी आहे की, या दुर्जनांची संगत, सहवास लोकांना प्रिय असतो. दुर्जनांच्या संगतीत आपले समाधान टिकणार नाही हे माहीत असूनही लोकांना दुर्जनसंगतीचे आकर्षण असते, त्यात गोडी असते. मनाच्या श्लोकांत स्वामी म्हणतात,
जयाचेनि संगे समाधान भंगे।
अहंता अकस्मात येऊनि लागे।
तये संगतीची जनी कोण गोडी।
जये संगतीने मती राम सोडी ॥45॥
दुर्जनांच्या संगतीचे लोकांना आकर्षण वाटते. कारण त्यांच्या सूक्ष्म मनातील सुप्त विचार कोणीतरी उघडपणे मांडत आहे, ते चुकीचे असेल पण त्या विचारांना वाट मिळते. अशा या दुर्जनांच्या संगतीने तात्पुरती मजा वाटली तरी त्यामुळे आपल्या ठिकाणचा अहंकार आणखी वाढीस लागतो. गर्विष्ठपणा वाढल्याने सदाचरणापासून आपण दूर होऊ लागतो. अर्थात सत्वगुणांपासून दुरावत सर्वोत्तम गुणसंपन्न रामाचा आम्हाला विसर पडतो, अशा या दुर्जनांशी आमचा संबंध आला, असे स्वामी या श्लोकात सांगत आहेत. दुर्जनांच्या संगतीने रामभक्तीत व्यत्यय येऊन समाधान हरपले तरी दुर्जनांची संगत सोडावी असे लोकांना वाटत नाही, याचे मुख्य कारण अज्ञान आहे, त्याचप्रमाणे लोक विवेक विसरतात त्यामुळेही असे होते. अविवेकी व्यवहार हे अज्ञानाचे लक्षण आहे. अर्थात अज्ञानी जनांच्या ठिकाणी विवेक संभवत नाही हे उघड आहे. त्यासाठी साधक या श्लोकात ’विवेक नाही आम्हां दिना रे’ असे कबूल करतो. परमार्थात आणि प्रपंचातही विवेकाला महत्त्वाचे स्थान आहे. समर्थांनी दासबोधात जागोजागी विवेकाचे महत्त्व सांगितले आहे.
समर्थ म्हणतात, विवेकाने शहाणपण शिकता येते. समाजातील ज्ञानी पुरुषाने भोवतालची माणसे विवेकसंपन्न केली पाहिजेत, शहाण्या माणसाची योग्यता समाज जाणतो. समर्थांच्या इतका विवेकाचा पुरस्कार करणारा तत्त्वज्ञ क्वचितच आढळतो. विवेक याचा अर्थ सारासारबुद्धीने चांगल्याची निवड करणे व वाईटाचा त्याग करणे. समर्थ त्यापुढे जाऊन विचार करतात. समर्थांच्या मते दोन ग्राह्य घटना समोर आल्या तर आपल्या बुद्धिसामर्थ्याने त्यांतील अधिक चांगली घटना शोधून तिची निवड करणे, ती स्वीकारणे हा खरा विवेक समजावा.
या श्लोकात स्वामी आपले मनोगत व्यक्त करतात की, विवेक न बाळगल्याने आमचा दुर्जनांशी संबंध येत गेला. विवेक बाळगला असता तर तर आम्ही सत्संगती स्वीकारून दुर्जनसंगतीचा त्याग केला असता. विवेक विसरल्याने आम्हाला तुझ्या विरहाच्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. आम्ही तुझ्यापासून दूर गेलो. पण तरीही हे रामा, तूच आता आम्हाला दुर्जनांपासून सोडवून जवळ घे. हे सर्वगुणांनी श्रेष्ठ असलेल्या रामा, तू मला केव्हा भेट देशील? केव्हा तुझे दर्शन होईल? असे साधक कळकळीने विचारत आहे, सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी.’