कुटुंब आणि आपण

विवेक मराठी    01-Nov-2025   
Total Views |
कुटुंबातील प्रत्येकाची आपली भूमिका आहे. त्या भूमिकेतूनच व्यक्तीची जडणघडण होते. आई म्हणजे कुटुंबातील कोमलता, प्रेम आणि पहिली गुरू. तर वडील म्हणजे शिस्त, जबाबदारी आणि संरक्षण. आजोबा-आजी म्हणजे गोष्टी, परंपरा आणि अनुभव. आणि भावंडं म्हणजे सामायिकीकरण, सहकार्य आणि स्पर्धा. प्रत्येक नातं व्यक्तीच्या वेगळ्या पैलूला आकार देतं.
 
family
 
मानव हा सामाजिक प्राणी आहे, असे आपण वारंवार ऐकतो. परंतु हा सामाजिक स्वभाव कुठे घडतो? व्यक्तीची पहिली शाळा कुठली? त्याच्या वर्तनाला, विचारांना, मूल्यांना पहिला आकार कुणी दिला? याचं सोपं उत्तर म्हणजे - कुटुंब. एखादा व्यक्ती त्याचा पहिला श्वास आईच्या कुशीत घेतो, पहिल्यांदा हात धरून चालायला शिकवणारे वडील असतात, पहिली गोष्ट सांगणारे आजी-आजोबा असतात, पहिली भांडणं आणि खेळातील साथीदार म्हणून असतात ती भावंडं. यालाच आपण कुटुंब म्हणतो.
 
 
कुटुंब म्हणजे फक्त राहण्यासाठी एकत्र आलेले लोक नाहीत; ते म्हणजे संस्कारांची शाळा, नात्यांचा गंध, सुरक्षिततेचं कवच आणि आपल्याला स्वतःची ओळख देणारी पहिली संस्था. कुटुंब हेच माणसाचं पहिलं विद्यापीठ आहे असे म्हटले जाते. कारण व्यक्तीची जडणघडण, तिचं मूल्यविश्व, तिचा स्वभाव आणि तिचा जीवनदृष्टीकोन यामागे कुटुंबाचेच हात असतात.
 
 
कुटुंब - संकल्पना व बदलते स्वरूप
 
 
भारतीय संस्कृतीत कुटुंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा पायाच भारतीय कुटुंब पद्धती आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतीय संयुक्त कुटुंब - जिथे तीन-चार पिढ्या एकत्र राहतात. आजोबा-आजींचा अनुभव, आई-वडिलांची शिस्त, काका-मामांची साथ, आत्या-भाचीचं प्रेम, चुलतभावंडांचं खेळकर जग - हा एक रंगीबेरंगी संसार असतो.
 
 
लहान कुटुंब - आधुनिक युगात आई-वडील आणि मुले एवढंच कुटुंब राहिलं आहे. नोकरीसाठी स्थलांतर, शहरातील वेगवान जीवनशैली यामुळे ही पद्धत वाढली आहे. असं असूनही दोन्ही प्रकारचं कुटुंब व्यक्तीच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतं. संयुक्त कुटुंब व्यक्तीला सामायिकीकरण, सहजीवन आणि जबाबदारी शिकवतं. लहान कुटुंब मुलांवर जास्त लक्ष, शिक्षणासाठी अधिक सुविधा आणि स्वातंत्र्य देतं.
 
प्रथम सामाजिकीकरण
 
मूल जन्माला येतं तेव्हा ते कोर्‍या पाटीप्रमाणे असतं. त्याला कसं बोलायचं, कसं वागायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसं जेवायचं - हे सगळं घरातूनच शिकायला मिळतं. अगदी सोपं उदाहरण म्हणजे, जर रोज सकाळी घरातील आजी श्लोक, ओव्या म्हणताना दिसत असेल तर त्या घरातला लहानगा नकळत तिच्या मागे शब्द बोलायला शिकतो.
 
 
संस्कारांची पेरणी
 
संस्कार म्हणजे हात धरून शिकवलेलं नव्हे तर करून-दाखवून घडवलेलं. प्रत्येक व्यक्तीवर झालेले संस्कारच त्या व्यक्तीच्या विचारसरणीचा, वागणुकीचा पाया आहेत. एखाद्या परिवारात वडील सामाजिक काम करतात हे पाहूनच मूल ‘मदत करणं हा आपला कर्तव्यभाव आहे’ हे शिकतं. आई एखाद्या शेजार्‍याला अन्न देताना मुलाला सांगते, जगणं म्हणजे वाटून खाणं, तेव्हा त्याच्या मनावर आपुलकीचा संस्कार होतो.
 
 
नैतिक मूल्यांची जपणूक
 
 
कुटुंब व्यक्तीला चांगलं-वाईट ओळखायला शिकवतं. नेहमीच सत्य बोललं पाहिजे, हे आपण मुलांकडून कितीही गिरवून घेतलं, तरी जर घरात खरं बोलल्यावर प्रोत्साहन मिळत असलेल्या अशा घरात वाढलेलं मूल आयुष्यात प्रामाणिक होतं. याउलट खोटं बोलणं, फसवणूक चालते अशा वातावरणात वाढलेला मुलगा किंवा मुलगी नंतर समाजातही असेच वागताना दिसतात.
 
 
संकटांना सामोरं जाण्याची ताकद
 
कुटुंब म्हणजे आधार. व्यक्ती जेव्हा अपयश, आजार, अडचण यांना सामोरी जाते, तेव्हा तिच्या पाठीशी उभं राहतं ते कुटुंब. हल्लीच्या समस्यांचे मूळ कुठेतरी ह्यातच आहे, प्रत्येक व्यक्तीला जीवन जगताना लागणारा आधार हरवला आणि आपण एकटेच आहोत ही भावना मूळ धरू लागली. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला, पण आई-वडिलांनी, घरातल्या इतरांनी त्याला धीर दिला तर तो पुन्हा प्रयत्न करतो.
 
ओळख घडवणे
 
हा कोण? या प्रश्नाचं पहिलं उत्तर असतं - तो अमुक कुटुंबाचा आहे. म्हणजेच आपली ओळख आपल्या कुटुंबातूनच सुरू होते.तुकाराम महाराजांचे घर म्हणजे मोठ्ठा खटला. घरातील प्रत्येक व्यक्ती वेगळ्या स्वभावाची. पण घरातली मूळ परंपरा भक्तीची. वडील गावचे सावकार, व्यवहाराला चोख तरीही भक्तिरसात न्हालेलं जीवन जगत. त्या संस्कारातूनच तुकारामांना अभंग रचण्याची प्रेरणा मिळाली. ज्ञानेश्वरांचे घर तरी काय वेगळे? वडील बंधू म्हणजे गुरू, ती भावंड एकमेकांना धरून जगली आणि दुनियेला जगण्याची रीत शिकवली. त्यांची ओळख त्यांच्या कुटुंबापासून वेगळी नव्हतीच मुळी.
 
 
महात्मा गांधी
 
गांधीजींची आई पुतळाबाई संयमी, तपस्विनी स्त्री होती. तिच्या सत्यनिष्ठेचे संस्कार गांधीजींवर इतके खोलवर कोरले गेले की, त्यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा मार्ग निवडला.
 
 
सावित्रीबाई फुले
 
जर कुटुंबाने साथ दिली नसती तर स्त्रियांसाठी पहिली शाळा उघडणं शक्य झालं असतं का? जोतिरावांनी सावित्रीबाईंना पाठबळ दिलं, शिक्षणासाठी प्रेरित केलं. त्यामुळेच सावित्रीबाई शिक्षणक्रांती घडवू शकल्या.
 
 
भारतीय समाजरचनेत काळानुरूप कुटुंब आणि त्याची व्यवस्था वेगवेगळी झाली, पण गाभा तसाच आहे.
 
शहरातील मध्यमवर्गीय कुटुंब : जिथे आई-वडील रोज मुलांसोबत बसून अभ्यास घेतात. चर्चेतून मुलांच्या विचारशक्तीचा विकास होतो. तर दुसरीकडे आहे गावातील शेतकरी कुटुंब. मुलं लहानपणापासून शेतकाम पाहतात. कष्ट, धैर्य आणि निसर्गाशी जवळीक हे गुण त्यांच्यात पेरले जातात. आणि हल्ली घरा-घरांतून दिसणारं परदेशात स्थलांतरित कुटुंब. मुले परदेशी वातावरणात वाढतात पण आई-वडील घरात मराठी भाषा, सण, परंपरा जपतात. त्यामुळे मुलांमध्ये द्वैभाषिकता आणि सांस्कृतिक जाणीव दोन्ही रुजतात. कुटुंबातील प्रत्येकाची आपली भूमिका आहे. त्या भूमिकेतूनच व्यक्तीची जडणघडण होते. आई म्हणजे कुटुंबातील कोमलता, प्रेम आणि पहिली गुरू. तर वडील म्हणजे शिस्त, जबाबदारी आणि संरक्षण. आजोबा-आजी म्हणजे गोष्टी, परंपरा आणि अनुभव. आणि भावंडं म्हणजे सामायिकीकरण, सहकार्य आणि स्पर्धा. प्रत्येक नातं व्यक्तीच्या वेगळ्या पैलूला आकार देतं.
 
 
मानसशास्त्र सांगतं की, व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी पहिल्या सात वर्षांत होते. त्या काळात कुटुंबाचं वातावरण अत्यंत निर्णायक असतं. सुरक्षित बांधिलकी (secure attachment) - जिथे मुलाला आपुलकी, माया मिळते तिथे मूल आत्मविश्वासाने मोठं होतं. आणि या विरुद्ध जर असुरक्षित बांधिलकी (insecure attachment) - जिथे सतत ओरड, दुर्लक्ष असतं तिथे मूल घाबरट, न्यूनगंडाने ग्रासलेलं राहतं. भारतातील परिस्थिती बदलली, सामाजिक रचना बदलली, जागतिकीकरणामुळे जग जवळ आलं, पण त्याबरोबर काही दुष्परिणाम देखील आले, आणि या सगळ्याचा परिणाम भारतीय कुटुंब व्यवस्थेवर सर्वाधिक झाला. आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरी, स्थलांतर यामुळे संयुक्त कुटुंबं कमी झाली. पण दुसरीकडे, पालक जास्त वेळ मुलांना देऊ लागलीत कारण आता कुटुंबात तेच जबाबदार आहेत. नवीन संसाधन अर्थात संवादासाठी मोबाइल, व्हिडिओ कॉलमुळे दूर गेलेल्या नात्यांची ओल अजून टिकून आहे, (अगदी पूर्णपणे नसली तरी एक धागा जोडलेला आहे).
 
 
तरीही आव्हानं आहेतच, पिढ्यांमधली दरी वाढते आहे. कामाच्या व्यापामुळे पालक मुलांसोबत कमी वेळ घालवतात. टी.व्ही. आणि मोबाईलच्या आहारी जाऊन प्रत्यक्ष संवाद कमी होतो. ह्यातून समतोल राखत, विचारपूर्वक पर्याय काढायची आवश्यकता आहे.
 
 
समाजात एखाद्याला पाहिलं की लगेच म्हणतात - हा मुलगा चांगल्या घरातून आलाय. म्हणजेच आपली नाळ आपल्या कुटुंबाशी घट्ट जोडलेली असते. आपल्या बोलण्यात, वागण्यात, निर्णय घेण्यात कुटुंबाचे संस्कार डोकावत असतात.
 
 
कुटुंब म्हणजे व्यक्तीच्या आयुष्याचं मूळ. ते फक्त नात्यांचा गट नाही; तर संस्कारांची शाळा, मूल्यांची बाग आणि आपुलकीचा निवारा आहे. आजचा काळ कितीही बदलला तरी कुटुंबाचं महत्त्व कमी होऊ शकत नाही. कारण व्यक्तीचं खरं प्रतिबिंब तिच्या कुटुंबातच दिसतं. म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील नातेसंबंध जपले पाहिजेत. कारण कुटुंब म्हणजे आपण आणि आपण म्हणजे कुटुंब.

सोनाली तेलंग

व्यवसाय - प्रशिक्षक (soft skill trainer) आणि समुपदेशक (counsellor)
गेली २३ वर्षे विविध कंपन्यांमधून कामाचा अनुभव. मानसशास्त्र हा विषय घेऊन नाशिक आकाशवाणीवरून विविध कार्यक्रम प्रस्तुत केले आहेत. कार्यक्रमांचे प्रभावी सूत्रसंचालन, तसेच संहिता लेखन. मानसशास्त्र, इतिहास, अध्यात्म ह्या विषयांची विशेष आवड.