डॉ. ‘चिटणीस’ की अमर कहानी...

विवेक मराठी    10-Nov-2025
Total Views |
@अर्चित गोखले  
Dr. Eknath Chitnis
अनेक नामांकित शास्त्रज्ञांच्या गुरुस्थानी असलेले डॉ. विक्रम साराभाई यांचे सहकारी डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे नुकतेच म्हणजे 22 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या शंभराव्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या भारतीय अवकाश प्रकल्पातील योगदानाविषयी थोडक्यात माहिती.
गेल्या सहा दशकांपासून अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची प्रगती वेगाने होत आहे. भारतीय अवकाश प्रकल्पाचे जनक डॉ. विक्रम साराभाई ह्यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून 1969 मध्ये इस्रोची स्थापना झाली आणि तेव्हापासून आपल्या देशाच्या विकासामध्ये इस्रोचं मोलाचं योगदान आहे. डॉ. विक्रम साराभाई ह्यांच्या बरोबर अनेक शास्त्रज्ञांनी भारतीय अवकाश प्रकल्पासाठी स्वतःला वाहून घेतलं. त्यातील एक अग्रगण्य शास्त्रज्ञ म्हणजेच माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम. अशा अनेक नामांकित शास्त्रज्ञांच्या गुरुस्थानी असलेले डॉ. विक्रम साराभाई यांचे सहकारी डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे नुकतेच म्हणजे 22 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या शंभराव्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या भारतीय अवकाश प्रकल्पातील योगदानाविषयी थोडक्यात माहिती.
 
 
डॉ. चिटणीस यांचा जन्म 25 जुलै 1925 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. ते लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांचं निधन झाले. पुण्यात कॅम्प एज्युकेशन सोसायटी आणि मॉडर्न हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण तर फर्ग्युसन आणि वाडिया महाविद्यालयांमधून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. फिजिक्सचे शिक्षण पूर्ण केले. विज्ञानाची आवड आणि आपल्या विज्ञानातील ज्ञानाचा देशाला कसा फायदा होईल ह्या ध्यासापोटी त्यांनी ऑल इंडिया रेडिओमधील उच्च पगाराची नोकरी न स्वीकारता अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी मध्ये संशोधन करण्यास सुरुवात केली. तिथे त्यांना महिन्याला केवळ शंभर रुपये मानधन मिळत होतं. त्यांच्या पीएच.डी. संशोधनासाठी त्यांनी देशात पहिल्यांदा चेरेनकोव्ह काउंटर तयार केला. हे उपकरण कोडाईकॅनाल येथे वापरून वैश्विक किरणांचा अभ्यास त्यांनी 1956 ते 1958 दरम्यान केला.
 
 
डॉ. चिटणीस ह्यांचं संशोधन बघून त्यांना अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी (एमआयटी) मध्ये संशोधनासाठी आमंत्रित करण्यात आलं. तिथे त्यांनी वैश्विक किरणं ह्या विषयावर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. डॉ. चिटणीस अमेरिकेत संशोधन करत होते तेव्हा भारताची सुद्धा ह्या क्षेत्रात वाटचाल सुरू झाली होती. अगदी प्राथमिक उपकरणांच्या मदतीने वैश्विक किरणांचा अभ्यास भारतात सुरू झाला होता. वैश्विक किरणांचा गाढा अभ्यास असलेल्या डॉ. चिटणीसांच्या अनुभवाची देशाला गरज होती. डॉ. साराभाई ह्यांच्या आग्रहावरुन 1961 मध्ये डॉ. चिटणीस भारतात परतले. भारतात परतल्यावर डॉ. चिटणीस यांनी भारतातले पहिले सॅटेलाईट ग्राउंड स्टेशन स्थापन केले.
 
 
Dr. Eknath Chitnis
 डॉ. विक्रम साराभाई यांच्या सोबत डॉ. एकनाथ चिटणीस
 
1962 मध्ये इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च (इन्कोस्पार) ची स्थापना भारत सरकारच्या अणू खात्याअंतर्गत (डिपार्टमेंट ऑफ ऍटोमिक एनर्जी) करण्यात आली. डॉ. साराभाई त्याचे अध्यक्ष झाले तर डॉ. चिटणीस यांनी सचिव म्हणून कार्यभार सांभाळला. डॉ. चिटणीस इन्कोस्पारचे सचिव असताना त्यांच्या शिफारशीवरून डॉ. अब्दुल कलाम यांना रॉकेट प्रशिक्षणासाठी नासा येथे पाठवण्यात आले. भारतातील पहिल्या प्रक्षेपकाने अवकाशात ज्या ठिकाणाहून अवकाशात झेप घेतली ते भारताचं पहिलं प्रक्षेपण केंद्र केरळमधील थुंबा ह्या ठिकाणाची निवड डॉ. चिटणीस यांनी केली. 1968 मध्ये डॉ. चिटणीस यांच्या नेतृत्वात एक्सपेरिमेंटल सॅटेलाईट कम्युनिकेशन अर्थ स्टेशन उभारण्यात आले.
 
 
1969 मध्ये इस्रोची स्थापना झाली. अवकाशातील उपग्रहांशी संपर्क करणारी उपकरणं आणि प्रत्यक्ष उपग्रहात असलेली उपकरणं विकसित करण्याची जबाबदारी तेव्हा डॉ. चिटणीस यांची होती.सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा प्रक्षेपण केंद्राची निवड करण्यात देखील डॉ. चिटणीस यांचा मोठा सहभाग होता. दूरदर्शन कार्यक्रमांसाठी देखील उपग्रहाचा वापर केला जातो. देशातील कानाकोपर्‍यात विशेषतः ग्रामीण भागात माहितीपर दूरदर्शन कार्यक्रम पोहोचवण्यासाठी सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट (साईट) सारखे उपक्रम डॉ. चिटणीस यांच्या नेतृत्वात राबवण्यात आले. ह्या प्रकल्पाच्या यशामुळे खेडा आणि ऍपल प्रयोगांना मंजुरी मिळाली. भारताच्या इन्सॅट उपक्रमातील पहिला उपग्रह डॉ. चिटणीस यांच्या नेतृत्वाखाली प्रक्षेपित करण्यात आला. 1981 ते 1985 ह्या काळात डॉ. चिटणीस इस्रोच्या स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक होते. डॉ. चिटणीस यांनी कंट्रीवाईड क्लासरूम हा उपक्रम सुरु केला. इस्रोमधून निवृत्तीनंतर पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागात त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षापर्यंत अध्यापन केले. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दोनदा कार्यभार सांभाळला. अवकाश विज्ञान, किंवा एकूणच विज्ञान सर्वांपर्यंत विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. चिटणीस कायम तत्पर होते.
भारताच्या अवकाश तंत्रज्ञानाच्या वाटचालीत महत्वाची भूमिका बजावल्यामुळे डॉ. चिटणीस यांना 1985 मध्ये भारत सरकारतर्फे पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरवण्यात आले. जुलै 2025 मध्ये डॉ. चिटणीस यांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा झाला. इस्रोचे विद्यमान प्रमुख तसेच इतर नामांकित अवकाश वैज्ञानिक ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारताच्या विकासात इतकं मोठं योगदान देणारे शास्त्रज्ञ डॉ. चिटणीस अनेक वर्ष पुण्यात राहिले परंतु महाराष्ट्रातील अनेकांना त्यांची ओळख नाही. ते नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिले. परंतु त्यांचं अवकाश क्षेत्रातील योगदान अनेकांना प्रेरणादायी आहे. विशेषतः तरुण विद्यार्थ्यांनी डॉ. चिटणीस ह्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारताला अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सक्षम करण्यासाठी महत्वाचं योगदान देतील असा मला विश्वास वाटतो.