अ‍ॅग्रोव्हिजन कृषि प्रदर्शन - एक सामाजिक चळवळ

विवेक मराठी    11-Nov-2025
Total Views |
@डॉ. सी. डी. मायी
vivek 
शेतकर्‍यांचा शाश्वत विकास व्हावा, या हेतूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2007 साली अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनाची सुरुवात केली. अ‍ॅग्रोव्हिजन केवळ एक कृषिप्रदर्शन नव्हे तर, ती एक सामाजिक चळवळ आहे. गेल्या 15 वर्षांत अ‍ॅग्रोव्हिजनने शेतकर्‍यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.. अ‍ॅग्रोव्हिजनचे सोळावे प्रदर्शन 21 ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान, नागपूर विद्यापीठ मैदान, अमरावती रोड, नागपूर येथे होणार आहे.
भारताची अर्थव्यवस्था आजही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. देशाची सुमारे 55 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, विशेषतः अल्पभूधारक शेतकरी. उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या तुलनेत कृषीक्षेत्राच्या उत्पन्नात झालेली घसरण, कमी उत्पन्न, पारंपरिक पद्धतीच्या वापरामुळे जीडीपीमधील कृषीच्या हिश्श्यात लक्षणीयरित्या घट झाली आहे. ही स्थिती महाराष्ट्रातील विदर्भ क्षेत्रात सर्वाधिक जाणवते. घटते उत्पन्न आणि वाढते कर्ज या कारणांमुळे शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर 2007 मध्ये ’अ‍ॅग्रोव्हिजन’ हा कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारा उपक्रम जन्माला आला. शेतकर्‍यांना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी विशेषतः पावसावर अवलंबून आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी हा उपक्रम संजीवनी ठरला.
 
अ‍ॅग्रोव्हिजनचा जन्म
 
कृषी क्षेत्रातील या समस्यांची जाणीव असलेले व स्वत: प्रगतिशील शेतकरी असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2007 मध्ये अ‍ॅग्रोव्हिजनची सुरुवात केली. अ‍ॅग्रोव्हिजन केवळ एक कृषिप्रदर्शन नव्हे तर, ती एक सामाजिक चळवळ आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे, कृषी क्षेत्रात आधुनिकता आणणे आणि ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे त्याचे ध्येय आहे. शेतकर्‍यांना तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि व्यवसायाच्या संधींशी जोडून अ‍ॅग्रोव्हिजन ग्रामीण समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवत आहे.
 
 
अ‍ॅग्रोव्हिजनची वैशिष्ट्ये
 
कार्यशाळा, राष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदांचे संयोजन या माध्यमातून शेतकर्‍यांना नव्या शेती पद्धती, पीक व्यवस्थापन आणि पूरक व्यवसायांची माहिती देण्यात येते.
 
vivek 
 
प्रमुख घटक
 
अ‍ॅग्रोव्हिजनचा आत्मा म्हणजे त्याच्या कार्यशाळा. मृदा परीक्षण, पशुपालन, पीक लागवड, सरकारी योजना अशा विषयांवर 30 हून अधिक कार्यशाळा दरवर्षी घेतल्या जातात. कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ, सरकारी अधिकारी आणि यशस्वी शेतकरी या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करतात. अ‍ॅग्रोव्हिजनचे प्रदर्शन हे मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आहे. 400 पेक्षा जास्त स्टॉलधारक आधुनिक कृषी यंत्रे, बियाणे, खते, जैवउत्प्रेरके, ड्रोन तंत्रज्ञान आणि इतर नवकल्पना सादर करतात. त्यामुळे हे प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरतो. परिषदा आणि विचारमंथन सत्रातून कृषी उद्योजकता, वैविधीकरण आणि नव्या व्यवसाय संधींवर भर दिला जातो. बांबू शेती, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय अशा विषयांवर चर्चा होत असते.
 
सोळावे प्रदर्शन आणि नवी क्षितिजे
 
अ‍ॅग्रोव्हिजनचे सोळावे प्रदर्शन (सत्र) 21 ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान नागपूर विद्यापीठ मैदान, अमरावती रोड, नागपूर येथे होणार आहे. या वर्षीच्या प्रदर्शनात अनेक नव्या तंत्रज्ञानांचा समावेश असेल, त्यात इथेनॉल-चलित शेतीयंत्रे, ड्रोन तंत्रज्ञान, सेन्सर-आधारित सिंचन प्रणाली, तसेच हायड्रोपोनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आधुनिक कापूस आणि ऊस लागवड, अ‍ॅग्रोे टुरिझम, चारा शेती आणि पावसावर आधारित संभाव्य पिके उदा. केसर आंबा, सीताफळ, तेलबिया, डाळी, सोयाबीन, हळद, आल्याची शेती यांवर कार्यशाळा होतील. कार्बन क्रेडिट्स या विषयावर शेतकर्‍यांसाठी उत्पन्नाचे नवे साधन म्हणून चर्चा तसेच शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) साठी ई-मार्केटिंग विषयाचा देखील यात अंतर्भाव राहणार आहे. यावर्षीच्या प्रदर्शनात यावर विशेष भर देण्यात येणार आहे. ऊस शेतीसाठी नवे तंत्रज्ञान, मत्स्यपालन व कोळंबी पालनाच्या संधी, विदर्भातील लिंबूवर्गीय शेतीचा विकास, अन्न प्रक्रिया उद्योग या विषयावर आयटीसी आणि लिटू अ‍ॅल्युम्नी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिषद आयोजित केली जाईल. त्यात यशस्वी उद्योजक आपले अनुभव कथन करतील. बांबू शेती या शाश्वत पिकाच्या वाढत्या महत्त्वाविषयी विशेष कार्यशाळा घेतली जाईल. मदर डेअरीच्या सहकार्याने दुग्ध व्यवसायावरील मेगा सेमिनार आयोजित करण्यात येईल. यात जनावरांच्या विविध जातींचे वैशिष्ट्य, चारा व्यवस्थापन, पुरवठा साखळी, दुधप्रक्रिया आणि गायींमध्ये ‘लम्पी’ रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले जाईल.
 
 
मधमाशी पालन, रेशीम उत्पादन, मशरूम शेती, फुलशेती, कुक्कुटपालन, बकरी पालन आदी पूरक व्यवसायांवर विशेष भर देण्यात येईल. हैदराबाद येथील एनआय-एमएसएमई संस्थेतर्फे मधमाशी पालनाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. 400 हून अधिक स्टॉल्समध्ये बियाणे, खते, कीटकनाशके, जैव-उत्प्रेरके, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, रोबोट्स, ट्रॅक्टर आदी तांत्रिक उत्पादनांचे प्रदर्शन देखील शेतकर्‍यांना अनुभवता येणार आहे.
 
vivek 
 
शेतकर्‍यांना शिक्षित, सक्षम आणि प्रेरित करणे हा अ‍ॅग्रोव्हिजनचा मुख्य उद्देश आहे. लहरी पावसावर अवलंबून शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी पीक वैविधीकरण, पशुपालन, मत्स्यपालन, आणि पूरक व्यवसायांद्वारे शाश्वत शेती कशी करावी हे या माध्यमातून शिकविण्यात येईल.
 
 
उपलब्धता
 
गेल्या 15 वर्षांत अ‍ॅग्रोव्हिजनने शेतकर्‍यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, वैविधीकरण, आणि व्यवसायाभिमुख दृष्टीकोन वाढविण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. विदर्भात दुग्धव्यवसाय, फळबाग, भाज्यांचे उत्पादन, बकरीपालन आणि मत्स्यपालन यासारख्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती दिसते. निर्यातक्षम पिकांच्या (विशेषतः संत्रा उत्पादन) प्रसारातही अ‍ॅग्रोव्हिजनचा मोठा हातभार लागला आहे. शेतकर्‍यांना नव्या बाजारपेठांशी आणि तंत्रज्ञानाशी जोडून उत्पन्न आणि आत्मविश्वास दोन्ही वाढविण्यात अ‍ॅग्रोव्हिजनने मदत केली आहे.
 
 
शेती परिवर्तनाची विश्वसनीय संस्था
 
वार्षिक कार्यक्रमांसोबत शेतकर्‍यांना सतत साहाय्य मिळावे म्हणून अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. ही अशासकीय स्वयंसेवी संस्था असून संस्थेतर्फे वर्षभर प्रशिक्षण, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यात सघन लागवड प्रणाली, समन्वित पोषण तंत्रज्ञान, यंत्राद्वारे कापणी, कीड व्यवस्थापनासाठी ‘मेटिंग डिस्रपशन’ यांसारख्या आधुनिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक कार्यक्रम विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये राबवले जातात. या सातत्यपूर्ण कार्यामुळे अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशन ही विदर्भातील शेती परिवर्तनाची विश्वसनीय संस्था बनली आहे.
 
 
एकूणच अ‍ॅग्रोव्हिजन हे केवळ एक प्रदर्शन नसून भारतातील शेतकर्‍यांसाठी आशेचा किरण आहे. कार्यशाळा, प्रदर्शन आणि परिषदा यांच्या अभिनव मिलापामुळे शेतकर्‍यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे. आज विदर्भासह भारतभरातील पावसावर अवलंबून शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनवण्यासाठी अ‍ॅग्रोव्हिजन मार्गदर्शक ठरले आहे. अ‍ॅग्रोव्हिजनमुळे भारतीय कृषीचे भविष्य अधिक उज्ज्वल, शाश्वत आणि समृद्ध होत असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्य म्हणजे अ‍ॅग्रोव्हिजनमुळे विदर्भातील शेतीमध्ये विविधीकरण आले आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना केवळ एक-दोन पिकांवर अवलंबून न राहता, त्याला अनेक आर्थिक स्रोताची साधने निर्माण करुन दिली आहेत.
 
लेखक सल्लागार परिषद अ‍ॅग्रोव्हिजनचे अध्यक्ष आहेत.