@डॉ.अरुणचंद्र शं. पाठक
9303859826
आर्य समाज म्हणजे चारित्र्य, सचोटी, त्याग, बलिदान व राष्ट्रीयता या मूल्यांचे प्रतीक मानले जाते. तसेच आर्य समाजाने स्त्री-शिक्षण, समाजसुधारणा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत मौलिक कार्य केले. स्वातंत्र्यपूर्व काळात धार्मिक स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादली असताना आर्य समाजाने धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढा दिला. समाजाला समर्थपणे संघटित केले. आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनात त्यांचा वाटा फार मोठा आहे. याच स्वामी दयानंद सरस्वती यांच्या महत् कार्यामुळे ते केवळ धार्मिक सुधारक नव्हे, तर आधुनिक भारताच्या सामाजिक पुनर्जागरणाचे शिल्पकार ठरले. आर्य समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण होत असताना आर्य समाजाच्या कार्याविषयी उजाळा.
आधुनिक वेदमहर्षी, निर्भय धर्मसुधारक, महापंडित, कुशल संघटक व आर्य समाजाचे संस्थापक अशी सार्थ ओळख असलेल्या महर्षी दयानंद सरस्वती यांचा जन्म काठेवाडमधील मोरवी राज्यातील टंकारा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करसनजी तिवारी असे होते. हे पिढीजात सावकार व जमीनदार होते. तसेच ते महसूल खात्यात मोठे सरकारी अधिकारीही होते. करसनजी हे शैवपंथी होते. समाजात त्यांना बराच मान होता. दयानंद यांचे मूळ नाव मूलशंकर असे ठेवण्यात आले होते. वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी संस्कृत ग्रंथांच्या अभ्यासास सुरुवात केली. आठव्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी वेदाध्ययनास प्रारंभ केला.
सामवेदी असूनही त्यांनी प्रथम शुक्ल यजुर्वेदाचे अध्ययन केले चौदाव्या वर्षी त्यांनी वेदाध्ययन पूर्ण केले. मुंजीनंतर त्यांनी शैव पंथाची दीक्षा घेऊन पार्थिवपूजा स्वीकारली. मात्र वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल होण्याचा काळ आला. शिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जागरण करीत असता, शिवाच्या पिंडीवर उंदीर फिरताना त्यांनी पाहिला व देव म्हणजे मूर्ती नाही, हे त्यांना उमगले. वडिलांना त्यांनी हा प्रश्न विचारला पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. देव आणि धर्म यांच्यासंबंधी विचारांना मात्र चालना मिळाली.
वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची धाकटी बहीण व प्रेमळ चुलते अंबाशंकर यांचा मृत्यू त्यांनी डोळ्यांनी पाहिला. मृत्यूच्या भीतीतून सोडविणारा मोक्ष कसा मिळेल याचाच मूलशंकर सतत विचार करू लागले. अनेकांना त्यांनी या संबंधी प्रश्न विचारले. योगाभ्यास केल्याशिवाय याचे उत्तर मिळणार नाही, हे त्यांना समजले. मुलाच्या मनात वेगळेच विचार चालले आहेत हे लक्षात येताच वडिलांनी त्यांच्या विवाहाचा घाट घातला परंतु हे समजताच मूलशंकरांनी 1845 मध्ये गृहत्याग केला, तो कायमचाच.
याच साली त्यांनी संन्यास घेतला व पंधरा वर्ष विंध्य हिमालय पर्वतात भ्रमण केलं. या काळात त्यांनी वेदान्त व योग यांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर मथुरेचे विरजानंद यांच्याकडून दयानंदांनी अनुग्रह घेतला. त्यानंतर सत्याचा प्रचार, जुन्या अनिष्ट रूढींचं उच्चाटन व वैदिक ज्ञानाची पुनःस्थापना करण्यासाठी ते 1883 साली आसेतु हिमालय यात्रेसाठी निघाले. मूर्तिपूजा व अंधरूढींचं खंडन करत त्यांनी वैदिक साहित्याची नव्याने मांडणी केली.
स्वामी दयानंदांनी सामान्य लोकांसाठी हिंदी माध्यमाचा स्वीकार करून आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ’आर्य समाज’ ही संस्था स्थापन केली. वेदांचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ’सत्यार्थ प्रकाश’ व ’वेदभाष्य’ हे ग्रंथ लिहिले. आर्य समाजाची चळवळ पुढे स्वातंत्र्यलढ्याला तीव्रता येण्यास कारणीभूत ठरली. 30 ऑक्टोबर 1883 रोजी त्यांच्या विरोधकांनी त्यांची विषबाधेने हत्या घडवून आणली. मात्र त्यांच्या तेजस्वी कार्याने अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह अशा समाजसुधारणांना गती मिळाली.
दयानंद हे स्वतः शरीराने, मनाने व वाणीने दणकट होते. अत्यंत विरूद्ध वातावरणात आपली मते मांडण्यात ते कधीही माघार घेत नसत. अनेक संकटे आली तरी त्यांनी ती तेजस्वीपणे स्वीकारली व त्यांवर मात केली. ख्रिस्ती, इस्लाम धर्मांच्या पंडितांशी वाद घालून त्यांनी त्यांना नामोहरम केले. परधर्मात जाऊ पाहणार्या हिंदूना वैदिक धर्म पटवून दिला. परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. वैदिक धर्माला त्यांनी पुन्हा तेजस्वी बनविले. शाहपूरचे महाराज नहरसिंग, जोधपूरचे महाराज जसवंतसिंग यांसारख्या अनेक राजेरजवाड्यांना त्यांनी आर्य समाजाची दीक्षा दिली. सहस्रावधी लोकांना समाजाच्या कार्याकडे प्रवृत्त केले. आर्यसमाजाचा परदेशातही प्रचार व्हावा, भारतातील अनाथ व गरीब लोकांस विद्या आणि आश्रय मिळावा या हेतूने दयानंदांनी उदेपूर येथे ‘परोपकारिणी सभा’ या नावाची आणखी एक संघटना उभारली.

मराठवाड्यातील उदगीरचे पंडित बन्शीलाल आणि पंडित शामलाल या दोघा बंधूंनी मराठवाडा, हैद्राबाद व कर्नाटकात आर्य समाजाचे कार्य जोरात सुरू केले. उदगीर येथे माणिकराव या आर्यसमाजी कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला. माणिकराव गंभीर जखमी झाले पण त्यांचा बचाव करीत असताना त्यांचे आर्यसमाजी मित्र भीमराव मात्र या हल्ल्यात मरण पावले. माणिकरावांना हैद्राबादमधील अफजलगंज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व तेथेच त्यांचा मृत्यू झाला. माणिकराव यांच्या अंत्ययात्रेस मोठे व प्रक्षोभक स्वरुप प्राप्त झाले होते. हजारो लोक त्यात सहभागी झाले होते. निजामाच्या विरोधाची ही संधी लोकांनी पुरेपूर वापरली. या पाठोपाठ उदगीरला ऐन दसर्यात हिंदू-मुस्लीम दंगल उसळली. तिच्यावरूनच आर्य समाजाचे कार्य ज्यांनी अतिशय जोमाने सुरू करून मराठवाडा व कर्नाटकात चांगलेच वाढवले होते, ते पंडित शामलालजी (उपप्रधानमंत्री, निजाम संस्थान, आर्य प्रतिनिधी सभा) पोलिसांच्या नाराजीचे कारण बनले. या अगोदर काही प्रकरणात त्यांच्यावर खटले भरण्यात आले होते. यावेळेस त्यांना इतर सतरा जणांसह अटक करून बिदरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा, 17 डिसेंबर 1938 रोजी मृत्यू झाला. या घटनेचे पडसादही हैद्राबाद राज्यात तीव्रतेने उमटले आणि आर्य समाजाची निजामविरोधी चळवळ अधिक गतिमान झाली. त्यामुळेच 1938 मध्ये झालेल्या आर्य समाजाच्या सत्याग्रहामध्ये जवळपास 11 हजार लोकांनी सत्याग्रही म्हणून नावे नोंदवली होती. या सत्याग्रहात मराठवाड्यातील जवळपास 75 ते 80% लोक सहभागी होते. त्यात निलंग्याचे शेषराव वाघमारे, लातूरचे दिगंबरराव शिवणगीकर, अंधोरीचे शंकरराव पाटील, अहमदपूरचे निवृत्ती रेड्डी व दिगंबरराव लाटकर इत्यादींनी स्थानिक तुकड्यांचे नेतृत्त्व केले होते. अशा प्रकारे स्वातंत्र्य आंदोलनावरही आर्य समाजाचा मोठा प्रभाव राहीला तो केवळ दयानंद सरस्वती यांच्या प्रेरणेमुळेच.
आर्य समाजाच्या स्थापनेला आज 150 वर्ष पूर्ण होत आहेत. लातूर जिल्ह्यात उदगीर (1924), निलंगा (1930) व लातूर (1938) येथे आणि उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद (1924) व औरादशहाजनी (1928) या ठिकाणी शाखा स्थापन झाल्या. आर्य समाजाने समाजप्रबोधनासाठी मौलिक कार्य केलेले आहे. धार्मिक स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादल्यामुळे आर्य समाजाने धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आर्य समाज म्हणजे चारित्र्य, सचोटी, त्याग, बलिदान व राष्ट्रीयता या मूल्यांचे प्रतीक मानले जात असे. वेदांतील तत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी ‘सत्यार्थ प्रकाश’ नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर पंथमतांचे खंडनही त्यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरिता यांनी वेदभाष्य लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर ‘संस्कारविधी’ हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. ‘पंचमहायज्ञविधी’ या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे त्यांनी विवेचन केले. ‘गोकरुणानिधी’ या ग्रंथात त्यांच्या अंतःकरणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.
आर्य समाजाच्या तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी ते प्रथम अहमदाबाद, बडोदा, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले. त्यानंतर दिल्ली येथे भरणार्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. दयानंदांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषतः पंजाबात त्यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला. शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी आपल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीमध्ये वेदांना पुन्हा समाजजीवनाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, वेदांमध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाचे तत्त्वज्ञान दडले आहे. त्यांनी गोकरुणानिधी या ग्रंथातून गायींचे संरक्षण, निसर्गसंवर्धन आणि सजीवप्रेम या मूल्यांवर भर दिला. 1882 मध्ये त्यांनी गौरक्षणी सभेची संकल्पना मांडली, जी पुढे आर्य समाजाच्या सामाजिक कार्याचा आधारस्तंभ ठरली. त्यांच्या विचारांनी धार्मिक सुधारणेबरोबरच पर्यावरणीय आणि सामाजिक जबाबदारी यांचाही प्रसार झाला.
आर्य समाजाची स्थापना झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती झाली. स्वामी दयानंद यांनी मुलींसाठी शिक्षणाचा प्रसार, तसेच जातिव्यवस्थेच्या विरोधात जनजागृती करण्यावर भर दिला. त्यांनी आधुनिक शिक्षण आणि वैदिक संस्कृती या दोन्हींचे संतुलन साधणार्या एंग्लो-वैदिक शाळा आणि गुरुकुलांची निर्मिती घडवली. आर्य समाजाने स्त्री-शिक्षण, समाजसुधारणा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत मौलिक कार्य केले. आधुनिक भारताच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले. निष्प्रभ वैदिक धर्माला त्यांनी तेजस्वी बनविले. समाजाला समर्थपणे संघटित केले. परधर्मियांचे आक्रमण परतवून लावले व हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान दिले. आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनात त्यांचा वाटा फार मोठा आहे. त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती हे केवळ धार्मिक सुधारक नव्हे, तर आधुनिक भारताच्या सामाजिक पुनर्जागरणाचे शिल्पकार ठरले.