यमगरवाडीच्या उजाड माळरानावर नंदनवन फुलविण्याचे कार्य स्वयंसेवकांनी प्रयत्नपूर्वक हाती घेतले. समाजातील सज्जनशक्तीच्या दातृत्वामुळे आणि संघ संस्कारामुळे आज या नंदनवनातील फुले (मुले) जीवनाच्या विविध क्षेत्रांत आपली योग्यता, क्षमता सिद्ध करत आहेत. अशांपैकीच एक गुणवंत म्हणजे नरेश लिंबेकर. आज नरेश वकील आहे. त्याचे आतापर्यंतचे जीवन आणि त्याची भविष्यातील स्वप्ने यावर या लेखाद्वारे प्रकाशझोत टाकणार आहोत.
अडचणीचा काळ म्हणजे आपल्या जीवनातील परीक्षेचा काळ असतो. याच काळात आपली खरी कसोटी लागते. या कसोटी काळात मन विचलित न होता आपले ध्येय ज्याने प्रयत्नपूर्वक गाठले, असा गुणवंत तरूण म्हणजे अॅड. नरेश लिंबेकर. त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासावर धावती नजर टाकली तरी धाप लागेल, असा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. नरेश कुणी सिलेब्रिटी अथवा सुप्रसिद्ध व्यक्ती नसला तरी त्याच्या जीवन जगण्याच्या, आपले लक्ष्य गाठण्याच्या प्रवासाकडे पाहिले तरी अनेकांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा त्याचा प्रवास आहे.
‘आज नरेश वकील म्हणून स्वतंत्र व्यवसाय करीत आहे’, हे एक वाक्य लिहायला सेकंदही लागला नाही, परंतु नरेशला असं आयुष्य प्रयत्नपूर्वक घडवायला खूप काळ लागला, कष्ट पडले. त्यात त्याला यमगरवाडी प्रकल्पाची बहुमोल साथ लाभली, स्वयंसेवकांचे मार्गदर्शन लाभले आणि अनेक दात्यांनी सहकार्य केले. संघप्रेरणेने यमगरवाडीच्या उजाड माळरानावर नंदनवन फुलविण्याचे कार्य स्वयंसेवकांनी प्रयत्नपूर्वक हाती घेतले. समाजातील सज्जनशक्तीच्या दातृत्वामुळे आणि संघ संस्कारामुळे आज या नंदनवनातील फुले (मुले) जीवनाच्या विविध क्षेत्रांत आपली योग्यता, क्षमता सिद्ध करत आहेत. अशांपैकीच एक गुणवंत नरेश लिंबेकर. त्याचे आतापर्यंतचे जीवन आणि त्याची भविष्यातील स्वप्ने यावर या लेखाद्वारे प्रकाशझोत टाकणार आहोत. भटके आणि विमुक्त समाजातील मुलेमुली यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शालेय शिक्षण द्यावे हा यमगरवाडी प्रकल्पाचा मुख्य उद्देश.
चंद्रकांत गडेकर यांनी नांदेडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक विभागात शिक्षक असलेल्या बालाजींना यमगरवाडी आश्रमशाळेचा उद्देश सांगून वरील निकषात बसणार्या मुलामुलींची जबाबदारी आमचा प्रकल्प घेईल ही शाश्वती दिली. पालकांशी संवाद साधून सहावीत शिकणार्या नरेश लिंबेकर आणि त्याच्या मावसभावाने यमगरवाडीत प्रवेश घेतला.
वडिलांचं आभाळ लहानपणीच गमावल्याने कुणबी समाजातील असूनही स्वतःच्या जमिनीचा तुकडा कसण्याऐवजी दुसर्यांच्या शेतावर मजुरी करून भाकर-तुकड्याची जमवाजमव करण्यात आईची होत असलेली दमछाक नरेश पाहत होता. शिक्षण ही मूलभूत गरज असूनही भाकरीसमोर शिक्षणासाठी खर्च करणे ही न परवडणारी चैन होती. यमगरवाडीत शिक्षणाबरोबर एका मुलाच्या भाकरीचा प्रश्नही सुटणार असल्याने माऊलीने होकार दिला. आणि यमगरवाडीच्या माळरानात नरेश आणि त्याचा मावसभाऊ शिकायला आले.
चंद्रमोळी झोपडीतून थेट यमगरवाडीच्या मोकळ्याढाकळ्या माळरानावर आलेली ही बालमने बावरली, गांगरली. कैक महिने उलटले तरी रात्रीच्या अंधाराला नरेशच्या आोलावलेल्या डोळ्यांच्या कडांची साथ लाभली. दिवसामागून दिवस सरत गेले तसे यमगरवाडीतील कर्मचारी, शिक्षकांशी नरेशचे ऋणानुबंध विणले जाऊ लागले. यमगरवाडीत सुजाताताई, संगीताताई, अप्पा, काका, तात्या, दादा, मामा, आबा अशा घरगुती संबोधनांमुळे आणि त्यामागच्या अकृत्रिम जिव्हाळ्यामुळे यमगरवाडी हेच आपले घर आहे असे मनोमन वाटू लागले आणि नरेश यमगरवाडीत पुरता रूळला.
यमगरवाडीतील अनुभव सांगताना नरेशच्या स्वरांत कृतज्ञभाव होता. तो म्हणाला,‘यमगरवाडी ही आश्रमशाळा नसून जीवनशाळा आहे. आयुष्याच्या वाटेवर येणार्या असंख्य पाठांची उजळणी तेथे होत असते. यमगरवाडीतच संघशाखेचा श्रीगणेशा झाला. विजयराव पुराणिक, रामदासजी निकम, तेव्हाचे आमचे जिल्हा प्रचारक श्रीकांतजी पाठक, अप्पा लातूरे, अप्पा कारखानीस यांच्यासारख्या प्रचारक व ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या आचरणामुळे व शिकवणुकीमुळे माझ्यावर संघाचा प्रभाव पडत गेला. संघ संस्काराचे गारूड इतके आहे की, आता व्यग्र दिनचर्या असली तरी संघकाम चुकत नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, शंकराचार्य संकुल, इ. संघ आयामाच्या विविध जबाबादार्यांत मी सक्रीय सहभाग घेत असतो.’ नरेश द्वितीय वर्ष संघशिक्षित आहे.
नरेश पुढे म्हणाला,‘यमगरवाडीला जीवनशाळा म्हणण्यामागचा एक किस्सा सांगतो...यमगरवाडीच्या संघ शाखेत मी मुख्य शिक्षक होतो. अशीच एके दिवशी शाखा लागली असता, आप्पा कारखानीस आले होते. शाखा संपल्यानंतर त्यांनी मला बोलावून शाखा वेळेत का लागली नाही? असा प्रश्न केला. वेळेचं महत्त्व आणि त्याचे मूल्य आप्पा कारखानीसांच्या त्या मायेच्या शब्दांनी मनात कोरले गेले आणि त्याचे पालन कायम होत राहिले.
सुरूवातीपासून अबोल स्वभावाचा असलेला नरेश आज सर्व क्षेत्रातील माणसांशी जोडलेला आहे. हाताची पाचही बोटं जशी सारखी नसतात तशी समाजातील सर्व माणसं सारखी नसतात. त्यामुळे कोणताही संकोच अथवा न्यूनगंड न बाळगता सर्वांशी प्रेमाने व सलोख्याने वागून प्रत्येकाशी बंधुभाव निर्माण करावा, हीच समरसता आहे. वेळेचे मूल्य, शिस्त, काटेकोरपणा, या रोजच्या जीवनात क्षुल्लक वाटल्या तरी या गोष्टींच्या पालनाने आयुष्यात अमूलाग्र बदल घडतो, याचा धडा मला संघ संस्कारातच मिळाला आहे. आज मी ज्या व्यवसायाशी निगडीत आहे, तिथे दिलेल्या शब्दाचे मूल्य असते. या मूल्याची शिकवण मला संघ आणि यमगरवाडीतून मिळाली आहे. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीला शब्द देताना विचारपूर्वक देतो आणि दिलेला शब्द पाळतोच, असं नरेश अभिमानाने सांगत होता.
यमगरवाडीच्या माळरानावर नरेशचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. आज आश्रमशाळा सुसज्ज रूपात पाहायला मिळते, पण सुरूवातीच्या काळात तसं नव्हतं. परंतु मायेची ऊब या सर्व गोष्टी सांधणारी ठरली. शिक्षकांची मुलांना शिकविण्याची तळमळ, आयुष्याच्या जत्रेत न हरवता स्वतःचे स्थान निर्माण करण्याची उमेद, समरसतेचा भाव, स्वप्न बघायला प्रवृत्त करणे आणि त्याची पूर्तता करण्यासाठी बळ देणे, या जमेच्या बाजूंमुळे सोयीसुविधांचा अभाव बोचत नव्हता.
दहावीनंतर धाराशिवला यमगरवाडीचे जे वसतिगृह चालते, तिथे विज्ञान शाखेतून ज्युनिअर कॉलेज केले. प्रथम वर्षालाच उन्हाळ्याच्या सुट्टीत एका प्रसंगाने हॉस्टेल सोडावे लागले. बारावीचे शिक्षण प्रा. भराटे सरांनी त्यांच्या क्लासमध्ये निःशुल्क शिकविले. शिक्षणाचा प्रश्न सुटला असला तरी राहण्याचा प्रश्न मोठा होता. कॉलेज सुरू व्हायच्या आधी दोन महिने धाराशिवच्या एस. टी. कॅन्टीनमध्ये राहण्याची व खाण्याची व्यवस्था झाली. रात्री तिथे वीज नसल्यामुळे अभ्यास करता येत नसे. दोन महिन्यांनंतर डॉ. अभय शहापूरकर सरांकडे जाऊन व्यथा मांडली. सरांनी क्षणाचाही विचार न करता प्रभाकर नळदुर्ग काकांच्या सेवेस रूजू होण्यास सांगितले. दिवसभर क्लास-कॉलेज करायचं आणि एकटे राहणार्या नळदुर्ग काकांना हवं नको ते पाहायचं. बारावीपर्यंत तिथे राहून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. पुण्यातील क्रमांक एकच्या कॉलेजला प्रवेश घेण्याचे ठरविले, परंतु आर्थिक मर्यादांमुळे शक्य झाले नाही.
बारावीनंतर धाराशिवला नरेशची काहीच व्यवस्था होत नव्हती. त्यासंबंधी बोलताना नरेश सांगत होता की,‘दहावीत असताना नाशिकला पौराहित्य वर्गास गेलो होतो, तेथील पदाधिकार्यांना संपर्काचा फोन केला. संस्थेचे विश्वस्त अशोक बाबा खोरगे यांनी निश्चिंत होऊन नाशिकला ये, आपण राहण्याची, खाण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था करू’, असा शब्द दिला. त्याचवेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, मात्र इथे तुला इंजिनिअरिंग करता येणार नाही. शंकराचार्य न्यास आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक परिस्थिती बेताची असणार्या पण शिक्षण घेऊ इच्छिणार्या मुलांसाठी वसतिगृह चालते.
दुधाची तहान ताकावर भागवावी तसं नरेशने बीएससी कॉम्प्युुटर सायन्स करण्याचे ठरविले. एका वर्षाची फी 27हजार इतकी होती. धाराशिवला डॉ. शहापूरकर सरांकडे व छोटीमोठी कामे करून दहा हजार गाठीशी होते. मुख्याध्यापकांना अडचण सांगितली. त्यांनी एका सज्जन गृहस्थांचा संपर्क देऊन पुढील दहा हजारांची व्यवस्था झाली. तरीही सात हजारांचा प्रश्न होताच. कॉलेजमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील अंतर्गत कमवा आणि शिका, या योजनेतंर्गत ग्रंथालयात काम करून सात हजार आणि अतिरिक्त शैक्षणिक खर्च कसाबसा भागत होता. कॉलेज सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत, शैक्षणिक खर्च भागवता भागवता नाकीनऊ येत असताना कॅन्टीनचा खर्च तर कुठून करणार, कित्येक वेळा उपवासही घडायचा. कॅन्टीन चालविणारे सचिन कोचे यांनी त्यांच्या भाच्याला शिकविण्याच्या बदल्यात मधल्या वेळेच्या खाण्याची सोय केली. वर्ष असं रडतखडत चालू होतंच. दुसर्या वर्षाची फी अधिक दहा हजार आणि अतिरिक्त शैक्षणिक खर्च हे न परवडणारेच होते. म्हणून नरेशने थांबण्याचा निर्णय घेतला.
नरेशने ठरवलं की, आपल्याला असं क्षेत्र निवडायला हवं की, ज्यातून अर्निंग आणि लर्निंग दोन्ही साध्य होतील. बी. कॉम करण्याचा निर्णय पक्का केला. या निर्णयाबाबत नरेश सांगत होता की, नाशिकमधील बालाजी मंदिरात दर शुक्रवारी अभिषेक असतो. त्या मंदिरात अॅड. मनीष चिंधडे सरांनी माझी ख्यालीखुशाली विचारली. माझ्या आयुष्यातील चढउतार पाहून त्यांनी तुला स्वारस्य असेल तर माझ्याकडे कामासाठी येऊ शकतोस असे सांगितले. बी. कॉमला असल्यामुळे तशी मला सवड होती. ऑफीस बॉय म्हणून चिंधडे सरांकडे कामाची सुरूवात झाली. ती एक लॉ फर्म होती. हळुहळू तेथील कामाची आवड निर्माण झाली आणि सरांकडे मी या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली.
चिंधडे सरांनी आनंदाने स्वीकार केला आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन केले. बी. कॉम झाल्यावर लॉसाठी प्रवेश घेतला. सरांकडे शिकून तयार होत होतो. जानेवारी 2025पासून स्वतंत्र वकिली व्यवसाय करण्यास सुरूवात केली. आज मी बँकिंग आणि कनव्हेसिंगमध्ये प्रॅक्टीस करीत आहे. सरांकडे काम करीत असतानाच मोठ्या रकमेचा स्टॅम्पची चूक झाली होती. चूक झाली आहे-मान्य, ती सुधारण्याची आता संधी आहे, प्रयत्न कर, हा सरांनी विश्वास दाखविला. अगदी कमीत कमी दंडात्मक रक्कम भरून ती केस मी सोडवली. माझ्या या कृतीने बँकिंग आणि इमारत उत्पादक क्षेत्रात माझ्या कामावर शिक्कामोर्तब झाले. वकिली पेशाच हा मुळात विश्वासावर अवलंबून असतो. कवचकुंडलाचे संरक्षण आणि ते भेदून गेल्यावर जीवनाचे धडे अशा सार्याच बाबतीत सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि अजूनही ते मला मार्गदर्शन करीत आहेत.
क्षेत्र कोणतेही असो त्यात नैतिकतेचे पालन असेल तर आपण यशस्वी होतोच. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील, हा इतक्या वर्षांच्या संघर्षातून आणि प्रामाणिकपणे काम केल्यावरचा नरेशचा अनुभव आहे. नैतिकतेचे अधिष्ठान मजबूत असते तर अनैतिकतेचे अधिष्ठान भुसभुशीत असते. अनैतिकतेच्या आधारे फार काळ तग धरता येत नाही. स्वतःच्या क्षमतांचं भरणपोषण केलं तर आपण जोमाने वाढतो. आपले काम हाच आपला देव आहे, हे मी सरांच्या, संघाच्या आणि व्यक्तीगत अनुभवातून शिकलो आहे, असं नरेश सांगत होता.
सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आज वकील झाल्यावर तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया काय? याबाबात नरेशला विचारले असता, तो म्हणतो की, वकिली हे क्षेत्र सोडाच, पण आमच्या घरातील मी पहिला मुलगा आहे, जो पदवीधर आहे. शिक्षण व करीअर संदर्भातील निर्णयाबाबत घरून कधी आडकाठी आली नाही. त्यांचं फक्त एकचं सांगणं असं की,‘नरू, तुला जे काही करायचं आहे ते व्यवस्थित कर. शिक आणि मोठ्ठा हो. एवढं भलं काम कर की अभिमानाने आमचा ऊर भरून येऊदे.’ घरच्यांचा पाठींबा, विश्वास आणि घडण्याच्या वयात यमगरवाडीचं लाभलेलं भक्कम छत, यामुळेच मी इथपर्यंत पोचलो.
आमच्या समाजाच्या उत्थानाविषयी म्हटलं तर आता परिस्थिती बदलली आहे. लोक शिक्षणाकडे वळू लागली आहेत, आता त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. ते देण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न आहे. त्याचबरोबर माझ्या परिने आर्थिक साहाय्य करण्याची माझी इच्छा आहे. आज मी इथपर्यंत पोहोचलो, ते अनेक हातांनी मला मदत केल्यामुळे हा कृतज्ञभाव स्मरून समाजासाठी कर्तव्यभावनेने कार्य केले पाहिजे असे नरेशचे ठाम मत आहे. संघ संस्काराच्या साथीने अशी गुणी मुले राष्ट्र सामर्थ्यवान करण्यास सज्ज आहेत.