नाना! वारंवार दर्शनासाठी बोलवा नाना!

विवेक मराठी    11-Nov-2025
Total Views |
@चारुदत्त कहू  9209863948
त्रिपदी परिवार दत्तभक्तीचा सजीव धागा आहे. नानामहाराज आणि बाबामहाराज यांच्या माध्यमातून दत्तभक्ती केवळ पूजा किंवा कर्मकांडापुरती मर्यादित न राहता ती एक जीवनमार्ग बनली आहे. गेल्या 25 वर्षांपासून हा उत्सव अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्या देशभरातील सर्व शाखांमध्ये आणि नाना महाराजांच्या स्मृतिनिमित्त उभारलेल्या 18 स्थानी साजरा केला जातो. श्री दत्तजयंती हीरकमहोत्सव आणि डॉ. बाबासाहेब तराणेकर अमृतमहोत्सवाचा अनोखा सोहळा नुकताच संपन्न झाला.
 
vivek
श्री दत्तजयंती हीरकमहोत्सव आणि डॉ. बाबासाहेब तराणेकर अमृतमहोत्सवाचा अनोखा सोहळा 24, 25 आणि 26 ऑक्टोबरला अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदूर आणि श्री शांतीपुरुष सेवा संस्थान, नागपूर यांच्या सहकार्याने इंदूर येथील आनंद मांगलिक भवनाच्या पटांगणात पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा अखिल भारतीय त्रिपदी परिवारातील ऐक्याची भावना, श्री करुणात्रिपदी उपासनेचे महत्त्व, श्री गुरू दत्तात्रेय संप्रदायाची अनुकरणीय कार्यपद्धती, गुरूंबद्दलची ओढ, आपुलकीचा ओलावा, यज्ञकार्यातील पावित्र्य, आयोजनातील सुसूत्रता, सामाजिक परिवर्तनासाठीचे सामूहिक प्रयत्न, शिस्तपालनासोबत कर्मयोगी बाबामहाराजांचे आध्यात्मिकतेतून सामाजिक परिवर्तन साधण्याचे दिशादर्शन, त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री तराणेकर यांचे व्यवस्थापन कौशल्य तसेच तराणेकर परिवाराच्या आतिथ्यशीलतेची प्रचिती आली. देशविदेशातील साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, धर्म, राजकारण आणि समाजकारणातील जाणत्या लोकांच्या सोहळ्यातील सहभाग लक्ष वेधून गेला.
 
समाजातील आध्यात्मिकता नाहिशी होत आहे, लोकांचा देवावरचा विश्वास उडत चालला आहे, युवापिढी देव, देश, धर्म आणि गुरू-शिष्य परंपरेपासून दुरावत चालली आहे, साधू-संतांबद्दलचा आदर दिवसेंदिवस कमी होत चाललाय, कुटुंबांमध्ये महिलांना योग्य स्थान नाही, सामाजिक बदल स्वीकारण्यास समाज सिद्ध नाही, समाजकार्यासाठी पुढाकार घेतला जात नाही, दिव्यांगांकडे दुर्लक्ष होते आहे, गोमातेबद्दल आदर राहिलेला नाही, भारतीय वेशभूषेची लाज वाटू लागली आहे, कपाळी टिळा लावणे मागासलेपणाचे समजले जात आहे, असे सातत्याने मांडणार्‍या लोकांना इंदूरच्या या सोहळ्याने एक दाखला दिला आहे. या सोहळ्याचा साक्षी होण्याची संधी मलाही मिळाली आणि काळानुरूप बदल स्वीकारणार्‍या त्रिपदी परिवारातील सदस्यांचे कौतुकही वाटले.
 
गुरुचरित्रप्रणित दत्त संप्रदायात श्री वासुदेवानंद सरस्वती हे दत्तावतार म्हणून ओळखले जातात. त्यांचे गुजरातमधील नर्मदा किनारी असलेले गरुडेश्वर हे स्थान जगप्रसिद्ध आहे. त्यांनी उज्जैन येथे दंडग्रहण केल्यानंतर पहिल्या दत्तमूर्तीची स्थापना उज्जैन जवळील तराणा या गावी केली. शंकर शास्त्री हे नानामहाराजांचे वडील व तत्पश्चात नानामहाराजांना त्यांनीच मंत्रदीक्षा दिली होती. 131 वर्षांपासून तराणेकर घराण्यात दत्तोपासना सुरू आहे. नाना तराणा सोडून इंदूरला स्थायिक झाले, तेव्हापासून त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपासना पद्धतीप्रमाणे इंदूर येथे दत्तजयंतीला सुरुवात केली. 1950 मध्ये त्यांनी इंदूरमधील हरसिद्धी येथील निवासस्थानी गुरुचरित्र पाठ आणि सामूहिक सत्यनारायणाच्या छोट्या आयोजनातून दत्तजयंतीचा शुभारंभ केला. नंतरच्या काळात या उत्सवाला सामूहिक स्वरूप आले आणि गेल्या 25 वर्षांपासून हा उत्सव अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्या देशभरातील सर्व शाखांमध्ये आणि नाना महाराजांच्या स्मृतिनिमित्त उभारलेल्या 18 स्थानी साजरा केला जातो. या उत्सवाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित भव्यदिव्य आणि दिमाखदार सोहळ्याला राजस्थानातील इटालखेडी येथील सुगंधेश्वरी देवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी समितीचे सदस्य भैयाजी जोशी, राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलास विजयवर्गीय आणि बालाघाट येथील परमहंस यति श्री नरसिंह सरस्वती स्वामीजी यांची विशेष उपस्थिती होती.
 
अखिल भारतीय त्रिपदी परिवार हा दत्त संप्रदायातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी आध्यात्मिक परिवार मानला जातो. या परिवाराची स्थापना नानामहाराज तराणेकर यांनी केली. ते स्वतः अत्यंत विद्वान, संतस्वभावी आणि भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेत संपूर्णपणे लीन असणारे महापुरुष होते. त्यांनी दत्त उपासना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आणि आध्यात्मिक साधना सुलभ व साधी करून सांगण्याचा प्रयत्न केला. भक्तांना त्रिपदी म्हणजेच दत्तात्रेयांच्या उपासनेतील तीन पायर्‍या - श्रद्धा, भक्ती आणि साधना - या तत्त्वांवर आधारलेली साधना शिकवली. दत्तसंप्रदायाची दृढ पायाभरणी करून, दत्तमहिमा सर्वत्र प्रसारित केला.
 
या परिवाराचे विद्यमान प्रमुख बाबामहाराज तराणेकर हे नानामहाराजांचे उत्तराधिकारी असून, त्यांनी गुरूंच्या परंपरेचा वारसा अत्यंत श्रद्धेने आणि समर्पणाने पुढे चालविला आहे. त्यांनी देशभर दत्तसंप्रदायाचा प्रसार करून, अनेकांना आध्यात्मिक जीवनाचा मार्ग दाखविला आहे. त्यांच्या प्रवचनांमधून आणि साधना मार्गदर्शनातून असंख्य भक्तांना जीवनात स्थैर्य, शांतता आणि परमेश्वरप्राप्तीचा मार्ग मिळाला आहे. माजी सरकारी अधिकारी आणि भूगर्भ विज्ञानाचे जाणकार असलेले बाबामहाराज नानामहाराजांचे नातू असून, त्यांनी लहानपणीच आपल्या आजोबांची त्यांचे गुरू दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांवरील अनन्यनिष्ठा आणि दत्तसंप्रदायाविषयी परम आदर अनुभवला आहे.
 
 
त्रिपदी परिवार दत्तभक्तीचा सजीव धागा आहे. नानामहाराज आणि बाबामहाराज यांच्या माध्यमातून दत्तभक्ती केवळ पूजा किंवा कर्मकांडापुरती मर्यादित न राहता ती एक जीवनमार्ग बनली आहे. त्रिपदी परिवाराने गुरुतत्त्वासोबतच सेवा, साधना आणि समर्पणाची मूर्त शिकवण दिली आहे, म्हणूनच या परिवाराला दत्तसंप्रदायात एक विशेष पूज्यस्थान प्राप्त झाले आहे.
 
बाबामहाराजांचा वेदग्रंथ, संतसाहित्यासह अनेक विषयांचा व्यासंग आहे. त्यांची साहित्यसंपदा विपुल आहे. त्यांनी अनेक यज्ञ-यागांचे यशस्वी आयोजन केले असून, त्यातील सामूहिक प्रसादाची प्रचिती भक्तांना आलेली आहे. दत्तयाग, गणेशयाग, विष्णुयाग, धन्वंतरीयाग आणि गोवर्धनयागाचे आचार्यपद त्यांनी भूषविले आहे. महिलांनाही तर्पण अर्थात श्राद्ध करण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी नुसते सांगितले नाही तर कृतीतून प्रत्यक्षातही आणले. यातून अनेक कुमारिका, विधवा आणि विवाहित महिलांचा श्राद्धादिक कर्मकांड करण्याचा मार्ग मोकळा झाला. आदिवासी भक्तांकडून बाबामहाराजांनी सप्तशती गुरुचरित्राची सेवाही घडवून आणली आहे.
 
 
vivek
भव्यदिव्य कार्यक्रमांची आखणी आणि त्यांचे यशस्वी कार्यान्वयन हे त्रिपदी परिवाराचे वैशिष्ट्य आहे. अशा अनेक कार्यक्रमांचा गोवर्धन पर्वत या परिवाराने लीलया उचलून धरला आहे. नागपुरात 2012 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या चैतन्यपीठ लोकार्पण सोहळ्याचे वैशिष्ट्य आजही मनःपटलावर कायम आहे. बीआरए मुंडले शाळेच्या पटांगणात पार पडलेल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांनी तसेच संत यात्रेने सार्‍या नागपूरकरांचे लक्ष त्यावेळी वेधून घेतले होते. नानामहाराज तराणेकर यांच्या 125 व्या जन्मजयंती सोहळ्याच्या निमित्ताने इंदूरमध्ये आयोजित वैविध्यपूर्ण कार्यक्रम अजूनही डोळ्यापुढे रुंजी घालत आहे. त्रिपदी परिवाराच्या कार्यक्रमांमधील वक्तशीरपणा, येणार्‍या-जाणार्‍यांची वैयक्तिक वास्तपुस्त, भक्तांचा सामूहिक सहभाग आणि महिलांना मिळणारा मान कायम चर्चेचा विषय असतो. इंदूरच्या कार्यक्रमातही तो चर्चेचा विषय राहिला नसता तरच नवल. बाबासाहेबांचा अमृतमहोत्सव आणि दत्तजयंतीच्या हीरकमहोत्सवात 750 भगिनींकडून करवून घेतलेली सामूहिक सत्यनारायण पूजा तसेच नानांच्या राजोपचार पूजेदरम्यान महिलांकडून सामूहिकरीत्या केलेला रुद्राभिषेक मातृशक्तीला बळ देणारा ठरला.
 
त्रिपदी परिवाराच्या देश विदेशात 350 शाखा आहेत आणि त्या सर्व ठिकाणी नानामहाराजांनी सुरू केलेल्या दत्तजयंती उत्सवाच्या हीरकमहोत्सवानिमित्त दत्तयाग पार पडले. एरवी याग, यज्ञ, रुद्र, महारुद्र म्हटले की, त्याकडे खर्चीक कार्यक्रम म्हणून दुर्लक्ष केले जाते किंवा नको ते धार्मिक अवडंबर म्हणून हे धर्मकार्य टाळले जाते. पण त्रिपदी परिवाराची धुरा आज ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या बाबामहाराजांनी आवाहन केले आणि अक्षरशः विभिन्न जाती, पंथांच्या नाना भक्तांनी घरोघरी दत्तयाग, दान-दक्षिणादी विधी आणि कौटुंबिक सहभोजनाचे आयोजन करून भगवान दत्तात्रेयाची मनोभावे आराधना केली. यानिमित्ताने 500 हून अधिक दत्तयाग भारताच्या विविध शहरांमध्येच नव्हे तर इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलियातही भक्तांनी मनोभावे सफल केले. कुठल्याही कार्याला धर्माचे अधिष्ठान असलेच पाहिजे, तसे ते त्रिपदी परिवाराच्या कार्यक्रमांमध्ये असतेच. दत्तजयंती हीरकमहोत्सवानिमित्त यतिपूजनाचा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद तोंडपाठ असलेल्या ब्राह्मणांचा सत्कार करण्यात आला. बाबामहाराजांची 115 विविध वस्तूंनी तुला करण्यात आली आणि प्राप्त झालेल्या वस्तू गरजू सामाजिक संस्थांना दानस्वरूपात देण्यात आल्या. आध्यात्मिक कार्याचा भाग म्हणून सवत्सधेनूचे दानही केले गेले.
 
याप्रसंगी बोलताना माजी लोकसभा अध्यक्ष पद्मभूषण सुमित्रा महाजन यांनी हा कार्यक्रम म्हणजे ज्ञान आणि विज्ञान यांच्यातील पूल असून, डॉ. बाबासाहेब हे त्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का जी यांनी सामूहिक सत्यानरायणातील महिलांच्या विक्रमी उपस्थितीचे तोंड भरून कौतुक केले. त्या म्हणाल्या की, देवाने केवळ महिलांनाच श्रेष्ठ मुलांना जन्म देण्याची क्षमता दिली आहे. महिला सर्जनशील असतात आणि निःस्वार्थपणे काम करतात. त्यांचे मातृत्वाचे गुण अतुलनीय आहेत. वसुधैव कुटुंबकम हे भारताचे जीवन तत्त्वज्ञान आहे. कुटुंबाला समाजाशी, समाजाला राष्ट्राशी आणि राष्ट्राला जगाशी जोडण्याची शक्ती भारतातच आहे. वसुधैव कुटुंबकमच्या तत्त्वज्ञानातूनच भारतात सामाजिक सुसंवाद घडून येईल, जो जातिव्यवस्था नष्ट करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
 
वैदिक ज्ञान विज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. याचे पुरावे आपण अनेक वेळा पाहिले आहेत. गेल्या काही वर्षांत, जेव्हा उज्जैनला दुष्काळ किंवा कमी पावसाचा सामना करावा लागला, तेव्हा तेथील नागरिकांनी यज्ञयागादी कार्यक्रम केले. परिणामी, संपूर्ण प्रदेशात चांगला पाऊस पडू लागला, असे प्रतिपादन स्वामी रंगनाथाचार्य जी महाराज यांनी केले. ते पुढे म्हणाले की, समाजात दिखावा करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. लग्न हा सर्वात महागडा कार्यक्रम होऊन बसला आहे. हे सर्व पश्चिमेकडील अंधानुकरणाचे दुष्परिणाम आहेत. दुसरीकडे, समाज गोमातेबद्दल उदासीन झाला आहे. नद्यांचे नाल्यांमध्ये रूपांतरण होत आहे. जंगले निर्दयपणे तोडली जात आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुलांना शिक्षणातून मूल्यांचा मौल्यवान वारसा मिळेल याची खात्री करण्याची तसेच भौतिकवादी जीवनशैलीपासून दूर जाण्याची गरज आहे. अहंकारी प्रवृत्ती अनावश्यक युद्धांना कारणीभूत ठरत आहेत. हे प्रकार थांबवले जायला हवेत, याकडेही महाराजांनी लक्ष वेधले.
 
 
कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबामहाराजांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणार्‍या पुस्तकाचे प्रकाशन संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी, हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व्ही.एस. कोकजे, खासदार शंकर लालवाणी आणि इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना भैयाजी जोशी म्हणाले की, बाबासाहेबांना त्यांचे आजोबा नानामहाराजांकडून वारसाहक्काने मूल्ये मिळाली आहेत. दत्तात्रेयांच्या चित्रात आपल्याला गाय आणि कुत्रा दिसतो. गाय प्रेमाचे प्रतीक आहे तर कुत्रा दक्षता दर्शवतो. म्हणून व्यक्तीने नेहमी सतर्क राहिले पाहिजे. आजच्या काळात सज्जनांनी शक्तिशाली बनणे आणि शक्तिशाली लोकांनी सज्जनतेच्या मार्गाचा अवलंब करण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे स्पष्ट करून, भैयाजींनी सज्जनांची निष्क्रियता समाजासाठी हानिकारक असल्याचेही प्रतिपादन केले.
 
सामूहिक दत्तयागाने तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचा समारोप झाला. नृत्यसंकीर्तनाने भक्तांचा आनंद द्विगुणित केला. आनंद मांगलिक भवनाच्या पटांगणात उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यातील आध्यात्मिक आणि दिशादर्शक कार्यक्रमांमधून मोकळीक मिळाली की, आबालवृद्ध भक्तजन वेळात वेळ काढून गुरूच्या भेटीला स्नेहलतागंज येथील नानांच्या निवासाकडे धाव घेताना दिसत होते. स्नेहलतागंज येथील नानांच्या निवासस्थानी आजही त्यांची गादी अंथऱलेली असते. त्यावरील पांढऱीशुभ्र चादर रोज बदलली जाते. त्या आवारात रोज भजन-कीर्तनादी कार्यक्रम पार पडतात. करुणा त्रिपदीचे बोलही या परिसरात कायम कानावर पडत असतात. नानांच्या कृपाप्रसादासाठी भक्त आजही व्याकुळ दिसतात. त्यांचे मंत्रदीक्षेचे कार्य आज बाबामहाराजांकडे परंपरेने चालत आले आहे. त्यांची तर नानांवर अपार श्रद्धा आहेच पण संपूर्ण त्रिपदी परिवाराचाही नानांच्या कृपाप्रसादाबाबतचा ओढा तसूभरही कमी झालेला दिसत नाही. ‘नाना! वारंवार दर्शनासाठी बोलवा नाना!’ ही नानांचे दर्शन घेऊन परतणार्‍या एका गुरुभगिनीच्या मुखातून निघालेली आर्त हाक नानांवरील निखळ श्रद्धेचेच प्रकटीकरण करते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर ‘नाना, नाना, कृपा करा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हे शब्द अवचितपणे मुखावाटे बाहेर पडतात.