शेकोटी

विवेक मराठी    11-Nov-2025
Total Views |
@ संतोष पाटील
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...

shekoti
 
सारे गाव खालीवर दोन-दोन वाकळा आणि पोटाशी पाय घेऊन झोपले होते. तांबडे केव्हाच फुटले होते. पण, धुक्याने सार्‍या गावाला आपल्या कवेत घेतल्यामुळे कोणाला तांबडेच काय, तर काहीच दिसत नव्हते. एक-एक दार उघडायचे आणि रांगोळीचा सडा टाकून, कुडकुडत पुन्हा बंद व्हायचे. थंडी मी म्हणत होती. हळूहळू एक-एक दार पुन्हा उघडू लागले आणि तिकटीचे कोपरे शेकोट्यांनी फुलायला लागले.
 
 
आकाशातील एक-एक चांदणी कोपर्‍याकोपर्‍याला उतरावी, तसे लांबून धुक्यातून शेकोट्या दिसत होत्या. जुने कोट आणि स्वेटर हळूहळू बाहेर पडू लागले होते. बंडी, धोतरातल्या माणसांना अशा नवीन अवतारात पाहून पाहणार्‍यालाही कसेसेच व्हायचे. पण, थंडीपुढे इलाज नव्हता. सूर्य दोन कासरे वर आला होता. तो जसजसा वर येत होता, तसतशी थंडी आणि धुके काढता पाय घेऊ लागले होते. पण पूर्ण हार मानायला तयार नव्हते. काचेचा गोल आरसा आकाशात धरावा, तसा सूर्य उघड्या डोळ्यांनी दिसत होता.
 
 
अशा ऐन थंडीत हौसा म्हातारी कमरेचं धनुष्य करून, दुखणार्‍या गुडघ्यावर हाताचा आधार देत आणि कमरेवर एका हातात बुट्टी, त्या बुट्टीत काठी आणि फडक्यात बांधलेली रात्रीची भाजी-भाकरी घेऊन, कसा तरी तोल सावरत लगबगीने कुठे तरी चालली होती. शामा पाटील गल्लीतच शेकोटी शेकत बसला होता. म्हातारीकडे त्याचे लक्ष गेले.
 
 
“काय म्हातारे, एवड्या थंडीत कुठं मरायला चाललीस? बस घटकाभर शेकोटीला आणि जरा हाडं शेकून मग जा...”
 
 
हौसा म्हातारी शामा पाटलाच्या दुप्पट वयाची होती. तो तिला सरळ भाषेतही विचारू शकला असता, पण वाकड्यात न शिरता सरळ बोलेल, तो पाटील कसला?
 
 
म्हातारी क्षणभर थांबली. तिला दम लागला होता. जरा दम घेऊन ती म्हणाली- “मराण काय आसं मागून मिळतंय व्हर रं बाबा? तसं आसतं, तर कवाच तेंच्या पाटनं मी बी गेलो आसतो.”
 
 
म्हातारीला थंडी सहन होत नव्हती. म्हातारी शेकोटीजवळ आली आणि कमरेवरची लोखंडी बुट्टी पालथी घालून त्यावर बसली. तिने थंडीने गारठलेल्या टाचा आगीवर धरल्या. थंडीने बधीर झालेल्या तिच्या तळव्यांना कसलीच संवेदना होत नसावी.
 
“आगं म्हातारे, भाजून घेशील की! तर सारा गाव शामा पाटलानं म्हातारीला पेटीवलं म्हणल.”
 
“कशाला कोण काय म्हणल लेकरा, माझं कोण हाय इचारणारं?”आडदांड बाईने धुतलेले लुगडं करकचून पिळावे, तसा शामा पाटलाच्या काळजाला पीळ पडला.
 
“आसं का म्हणतीस म्हातारे? भावाची दोन पोरं हायीत, ती तुझी कोण न्हवंत व्हय?”
 
“तेंच्यासाठीच लेकरा यो जीव आजून राकून ठेवलाय, न्हायीतर कवाच आड जवळ केला अस्ता...”
 
“गप्प बस म्हातारे, काय बी वंगाळ संगाळ बोलू नकोस.”
 
“खरं तेच बोलतोय शामा. कुटल्या जल्माचं पाप देव माझ्याकडनं फेडून घ्यालाय, हे तेचं तेलाच ठावं. पोटाला प्वॉर बाळ दिलं न्हायी, का नवर्‍याचं सुख लयी दिस दिलं न्हायी. भावाच्याबी नशीबाला तेच भोग दिल्यात. दोन पोरं झाल्यावर साथीच्या रोगानं दोघंबी दादला बाईल व्हत्याची नव्हती झाली. आणि दैवाच्या फेर्‍यातनं सुटली बिचारी! पर, मागं दोन चिमण्या पाखरावाणी पोरं ठेऊन गेली. तेंच्यासाठीच या सगळ्या खस्ता खायाच्या. माजं भोग कवा सपत्यात कुणाला ठावं?” म्हातारीने आपले मन मोकळे केले, तसा तिचा पदर भरून आलेल्या डोळ्याला लागला. शामाला काय बोलायचे तेच सुचत नव्हते. विषय बदलायचा म्हणून तो बोलू लागला-
 
“बरं मला सांग म्हातारे, एवड्या थंडीत तू कुटं चाललीस?”
“तुझ्याच शेताला चाललोय.”
“माझ्या शेताला? आणि ते कशापायी?”
“आरं तुझी बायको कांचन काल रातच्याला आली व्हती, मावशी शेंगा काडायला येती का इचारायला.”
“आसं व्हय, मग जा तर. पर, जेवणाचं काय केलीस म्हातारे? काय कांचीकडनं भाकरी पोच करू शेतावर?”
“नको रं लेकरा, म्हटलास त्यात समाधान झालं. राती भाजीभाकरी जरा जास्तीच केली व्हती, ती घेतलीया फडक्यात बांदून.”
“बरं, मग जा तर. पर बांदावरनं सावकास उतर म्हातारे, न्हायीतर पाय घसरून पडशील.”
“ व्हय लेकरा...”
हौसा म्हातारी दुखणार्‍या गुढघ्याला हाताचा आधार आणि कमरेवर लोखंडी बुट्टी घेऊन तोल सावरत चालू लागली होती. शामाच्या पोटात कालवाकालव झाली. तो मान वर करून आभाळाकडे पाहू लागला. जणू तो देवालाच जाब विचारत होता.
शामा पाटलाचे तसे शेताकडे दुर्लक्षच असायचे. तालुक्याच्या पुढार्‍यांच्या पाठून फिरण्यातच तो धन्यता मानायचा आणि स्वत:लाही सामाजिक कार्यकर्ता समजायचा. पण, असे जरी असले, तरी गावातील घाणेरड्या राजकारणापासून तो चार हात लांब असायचा. त्याने गावातील कोणत्याही निवडणुकीत कधी भाग घेतला नव्हता. पण तो कुणा अडलेल्या नडलेल्यांच्या हाकेला ओ द्यायचा आणि आपल्यापरीने शक्य तेवढी मदत करायचा.
कधी नाही ते आज शामा शेताकडे गेला होता. कांचीला दोन भाकर्‍या जास्त घ्यायला सांगितल्या होत्याच. दुपारी जेवणवेळेला सर्वजण शेतात जेवायला बसले. म्हातारी आपली फडक्यात बांधलेली भाकरी घेऊन लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसली. शामाने ते पाहिले.
“आगं ये म्हातारे, आमच्याजवळ जेवायला बसलीस, तर आमी काय तुजी भाकरी काडून घेणार हाय व्हय?”
“नको लेकरानू, तुमच्या दादला बाईच्यामधी मी आणि कशाला येऊ?”
“आगं ये. आमी काय आता नवीन हाय व्हय?” कांचन लाजेने गोरीमोरी झाली.
“आवं तुमच्या जीभेला काय हाड?”
म्हातारी येत नही असे पाहून, शामा आणि कांचन दोघेही जेवणाची बुट्टी घेऊन तिच्याजवळ गेले. म्हातारी आपली वाळलेली भाकरी पदराआड घेऊन आपले दारिद्र्य लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. ते पाहून शामाला फार वाईट वाटले. पण चेहर्‍यावर तसे न दाखविता, तो कांचनला म्हणाला - “कांचे, म्हातारीला झुणका भाकरी दे.”
“नको लेकरा, आणलीया मी... खावा तुमचं तुमीच.”
“आमच्यातलं खाशील, तर मरशील व्हय म्हातारे? तुझ्यासाठी जास्तीची भाकरी आणलीया, ती कोण खाणार?”
कांचनने म्हातारीला भाकरी दिली. बर्‍याच दिवसांनी म्हातारीच्या पदरात ताजी भाकरी पडली होती. दररोज आजूबाजूच्या आयाबाया ’म्हातारे, आता कवा जेवण करशील? ही भाकरी आणि कोरड्यास घे.’ म्हणून द्यायचे, तर कोणी तिला भातआमटी द्यायचे. पण ते जेवण शिल्लक राहिलेले, शिळेच असायचे. म्हातारी ते जेवण आनंदाने खायची. आणि आपल्या नातवंडांनाही खाऊ घालायची. पण, म्हातारीला त्या ताज्या, मऊ भाकरीत आपल्या नातवंडांचे चेहरे दिसू लागले. म्हातारीने भाकरी खाल्ल्यासारखी केली आणि उरलेली फडक्यात बांधून घेतली.
“आगं म्हातारे, खा की...खाल्ली न्हायीस, तर अंगात ताकत कुटनं ईल? कुटंतरी चक्कर येऊन पडशील. ”
म्हातारी स्वतःशीच मिश्कील हसली.
“आता ताकत येऊन कुटं लेका मला औत वडायचं हाय?”
“तू ऐकायची न्हायीस म्हातारे, आताच जेवलीस, बस घटकाबर माझ्यासंग बोलंत. कांचे, तू जा गं, शेंगा काड जा.”
कांचन उठून शेंगा काढायला गेली. काय माहीत का, पण शामा सकाळपासून अस्वस्थ वाटत होता. त्याला हौसा म्हातारीबद्दल आस्था वाटायला लागली होती. तिचं दुःख त्याला आतून पोखरत होतं.
“काय म्हातारे, काय चाललंच आणि तुजं?”
“काय? माझं काय चालणार लेकरा? आल्याला दिस ढकलायचा. पर, तुजं काय चाललंय ते मला कळलं...”
“म्हंजे, तुला काय म्हणायचं हाय म्हातारे?”शामाने आश्चर्याने विचारलं.
“आरं, कांचन हितं शेतात राबतीया आणि तू रोज पांढरी कापडं घालून तालुक्याच्या चकरा मारत आसतोस, मला सांग ह्यातनं तुला काय फायदा व्हतोय?” म्हातारीचा घाव शामाच्या मनावर चांगलाच वर्मी बसला होता. खरेच, शामाला त्यातून काहीच फायदा नव्हता. उलट त्याच्याच खिशातील पैसे खर्च व्हायचे. शिवाय घरसंसाराकडेही दुर्लक्ष व्हायचे. बायको राबते, म्हणून आपण बाहेर फिरू शकतोय, याची त्याला प्रथमच जाणीव झाली होती. त्याच्याकडे बोलायला काही शब्दच नव्हते. तो उगीचंच नखाने भुई उकरू लागला. त्याला वरमलेला पाहून, म्हातारीला वाईट वाटले.
“तुला आणि ह्या म्हातारीचा राग ईल बाबा, जातो मी शेंगा काढायला.”
असं म्हणत म्हातारी उठून शेंगा काढायला निघून गेली. शामा तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहातच राहिला. थोडावेळ तो तसाच विचार करत राहिला. आणि कसली तरी खूणगाठ बांधूनच तो घरी जाण्यासाठी निघाला. दुसर्‍या दिवशी शामा लवकर उठला. त्याने अंघोळ आटोपून न्याहारी केली.
“कांचे, मी शेताकडं जातो गं, मागणं जेवण घेऊन ये.”
शामा शेताकडे चाललेला पाहून, कांचनला मोठे आक्रीतच वाटले.
“या बया! तुम्ही आणि शेताला? काय करणार आहात तिथं जाऊन?”
“काय म्हंजे? शेतात काय कमी कामं शिल्लक हायीत?”
“म्हंजे? तुम्ही शेतात जाऊन कामं करणार?”
‘’व्हय तर, कुणब्याचाच पोर हाय मी! आमच्या आबा आजाचा शेती करण्यात कोण हात धरत नव्हतं. मी बी तेंचाच वारस हाय!”
आता मात्र कांचनला हसू आवरेना. ती जोरजोरात हसू लागली. शामा शेतात जाऊन काम करणार, हा तिला एक विनोदच वाटत होता. कारण शामाने कधीही शेतात काम केले नव्हते. खळखळून वाहणार्‍या निर्मळ झर्‍यासारख्या कांचनच्या हास्याने शामा सुखावून गेला. भान हरपून तो तिच्याकडे पाहातच राहिला. “बरं बरं जावा. मी येते जेवणवक्ताला जेवण घेऊन.”
कांचन हसू आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. भानावर आलेला शामा कांचनकडे लटक्या रागाचा कटाक्ष टाकून, शेताकडे जाण्यासाठी निघाला.
त्या दिवसापासून शामात मोठे परिवर्तन झाले. तो रोज भल्या पहाटे उठून शेतात जायचा. शेतातील सर्व कामे करायचा. त्यामुळे शेतात चांगले पीक येऊ लागले. आजपर्यंत तो फक्त पुढार्‍यांच्या पाठूनच फिरत होता. त्याने त्यांच्याकडून आपला कोणताही फायदा करून घेतला नव्हता. पण आता मात्र तो पंचायत समितीत जाऊन, शेतकर्‍यांसाठी असलेल्या योजना जाणून घेऊ लागला आणि त्या अंमलातही आणू लागला. तसेच त्याने शेतीला असणारे जोडधंदेही चालू केले. त्यामुळे दोन-चार वर्षातच शामा गावातील एक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. आता तो फक्त शामा राहीला नव्हता. तर शामाचा शामराव झाला होता. पण, तो म्हातारीला कधी विसरला नव्हता. दर तीन-चार दिवसातून तो न चुकता तिच्या घराकडे जायचा, तिची विचारपूस करायचा. तिला हवे नको ते पाहायचा. आजही तो तिच्याच घरी जात होता. दारातूनच त्याने तिला हाक मारली- ’म्हातारे, हायीस का घरात.’
आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याने पुढे जाऊन पाहिले, तर म्हातारी अंथरूणावर खिळून होती. तो तिच्याजवळ जाऊन बसला.
’म्हातारे...!’
’आलास बाबा, ये.’
’का झोपलीस? काय बरं वाटंना?’
म्हातारी काहीच बोलली न्हायी. शामाने म्हातारीच्या कपाळाला हात लावला.
’तुजं आंग तर इस्त्यागत तापलंय! म्हातारे, तुला ताप आलाय न्हवं.’
’व्हय, दोन दिस झालं.’
’मग दवाखाण्यात का गेली न्हायीस?’
’मला दवाखाण्याला कोन न्हेणार लेकरा?’
’का? मी न्हायी व्हय?’
म्हातारी नको, नको म्हणत असतानाही शामा तिला आपल्या जीपमध्ये घालून दवाखान्यात घेऊन गेला आणि उपचार करून तिला घरी आणले. चार दिवस न चुकता तो तिला आपल्या हातांनी औषधपाणी देत होता. आता तिला थोडे बरे वाटत होते.
दिवस जसजसे सरत होते, तसतसे वयोमानामुळे म्हातारी आता अशक्त होत होती. त्याचबरोबर शामाचा कामाचा व्याप, पैसा आणि प्रतिष्ठाही वाढत होती. एक दिवशी म्हातारीने अंथरूण धरले. तिची दोन नातवंडे तिच्या उशाला बसून असायची. शेजार्‍यापाजार्‍यांनी दिलेल्या भाकरतुकड्यातील एखादा तुकडा ते बळेबळे तिला खायला घालायचे. पण, म्हातारीला अन्न घशाखाली उतरत नव्हते. म्हातारीची अवस्था जास्तच नाजूक बनली होती.
शामा तिला भेटण्यासाठी नेहमीप्रमाणे एक दिवस घरी आला. म्हातारी शेवटची घटका मोजत होती. म्हातारीची अवस्था पाहून शामरावला गलबलून आले. तो तिला दवाखान्याला नेण्यासाठी लगबगीने आपली जीप आणण्यास निघाला. पण, म्हातारीने त्याला जाऊ दिले नाही.
’आगं म्हातारे, दवाखाण्याला न्हायी गेलीस, तर तुला बरं कसं वाटणार?’
’आता तेचा काय उपेग नाही शामा.’
’आसं वंगाळ बोलू नकोस म्हातारे, आगं तू गेलीस तर मला शहाणपणाच्या गोष्टी कोण सांगणार? मला तरी कोण हाय वडीलधारं सांगणारं?’
ती कशीबशी अंथरूणावर उठून बसली आणि उशीखाली हात घालून काहीतरी चाचपू लागली. अनेक प्रश्नचिन्ह उमटलेल्या तिच्या चेहर्‍यावर अखेर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्याचा पूर्णविराम शामाला जाणवला. उशीखाली ठेवलेले सोन्याचे कडे तिने बाहेर काढले, एकदा ते डोळे भरून पाहिले आणि शामासमोर धरून ती म्हणाली-
’शामा, हेंची ही शेवटची आठवण मी जीवापाड जपून ठेवली व्हती. हेंनी तरूणपनात एका दांडग्या पैलवानाला आस्मान दाकीवल्याबद्दल शाहू महाराजांनी बक्षिस म्हणून हे कडं दिलं व्हतं.’
म्हातारीचे थकलेले डोळे क्षणात चमकू लागले. तिचा उर अभिमानाने भरून आला. ती भूतकाळात हरवून गेली. एका खोकल्याच्या उबळीसरशी म्हातारी भानावर आली.
’हेच्या पल्याड तुला देण्यासाठी माज्याकडं कायच न्हायी पोरा.’
गरीबी पाचवीला पुजलेल्या म्हातारीला आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या गरीबीची इतकी कीव वाटत होती.
मघापासून खाली मान घालून बसलेल्या शामाच्या डोळ्यातून आता अश्रूंचे पाट भरून वाहत होते.
’शामा, मला जायला पायजे. आरं तो मला बलवाय लागलाय.’
शामाला गहिवरून आले होते. त्याचा कंठ दाटून आला होता. त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. थरथरणार्‍या ओठातून आणि धडधडणार्‍या हृदयातून एक शब्द कस बसा शामाच्या तोंडून बाहेर पडला- ’आ... ई..., आसं बोलू नको आई.’
तो शब्द कानावर पडताच, डोळे झाकून पडलेल्या म्हातारीचे डोळे खाडकन उघडले. जो शब्द ऐकायला उभा जन्म ती तडफडत होती, अखेर तो शब्द तिच्या कानावर पडलाच! जन्माचं सार्थक झाल्याचे समाधान क्षणात तिच्या चेहर्‍यावर पसरले आणि आयुष्यभर मनाला बांध घालून आडवलेली ममता धुवांधार पावसाने अचानक नदीला पूर यावा, तशी थकलेल्या डोळ्यातून दुथडी भरून वाहू लागली आणि म्हातारीचे ओठ शिवशीवू लागले, पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. फक्त तिचा थरथरता हात शामाच्या पाठीवरून फिरत होता.
’मला सोडून जाऊ नको आई. लहानपणीच आई-बा मला सोडून गेले, त्यामुळे आईची माया मला कधी समजलीच नव्हती. आता तुझ्यातच मला माझं आई-बा दिसत्यात. मी तुला कधी ते बोलून दाखवलं नव्हतं. आता तू गेल्यावर मी पुन्हा पोरका व्हईन. मला सोडून जाऊ नको आई!’
म्हातारीच्या शांत उघड्या डोळ्यांत समाधान, आनंद आणि विरहभावना अखंड भरून उरल्या होत्या. अन मोठ्या संकटाच्यावेळी बापाला कवटाळून रडावे, तशी म्हातारीची नातवंडे शामाला बिलगून रडत होती आणि शामा पुन्हा पोरका झाला होता.
शामाने टाहो फोडला.
आ... ई...