@डॉ. श्रीहरी हसबनीस
प्लास्टिकचा भस्मासुर सर्वदूर होत असताना त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काही संस्था-संघटना स्वत:हून पुढाकर घेऊन या समस्येच्या निराकरणासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातीलच एक संस्था म्हणजे चिपळूण येथील बी. के. एल. वालावलकर चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण होय. रत्नागिरी जिल्ह्यातील परिसरातील सर्व कचरा विलग करणे, न कुजणारा सर्व प्रकारचा प्लास्टिक कचरा पुनर्प्रक्रियेसाठी योग्य ठिकाणी देऊन पर्यावरण रक्षणास सहाय्यभूत काम करीत आहे.
हल्ली आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिक वापर हा न टाळता येणारा भाग बनला आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटलीपासून ते घरात आणावयाच्या भाजीपाल्याच्या पिशवीसाठी सुद्धा आपण प्लास्टिकचा वापर करतो. अगदी याला निसर्गसुलभ पर्याय असताना सुद्धा. याशिवाय इतर अनेक ठिकाणी आपण प्लास्टिकचा वापर करतो. पण यापैकी जे प्लास्टिक कचर्यामध्ये टाकून दिले जाते ते पुन्हा वेचले जात नाही, ते विलग केले जात नाही. हा कचरा निसर्गासाठी म्हणजेच आपल्यासाठी भस्मासुर आहे. याची काही उदाहरणे पाहू.
आपण सर्व हिंदूधर्मीय वसुबारसेला गोमातेची तिच्या वासरासह पूजा करतो आणि उर्वरित सर्व काळ मात्र तिच्यासमोर आपण हे प्लास्टिकचे विष फेकत असतो. घरात शिल्लक राहिलेले खरकटे, शिळे अन्न किंवा तत्सम गोष्टी, कॅरीबॅगमध्ये किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये भरतो, तिला गाठ मारतो आणि बहुदा रस्त्याच्या कडेला फेकून देतो. तिच्यातील अन्नाच्या वासाने ही गाय आपल्या तोंडाने हुंगत असताना पिशवी फुटते आणि गोमाता पिशवीसकट खरकटे, शिळे अन्न खाते. खरं तर गाय ही रवंथ करणारी. शिळ्या अन्नासोबत तिला खाल्लेले प्लास्टिक रवंथ करता येत नाही. आतड्यामध्ये साचून राहते. तिची अन्न पचनक्रिया तुंबून जाते. ती शेण सुद्धा व्यवस्थित शरीराबाहेर टाकू शकत नाही. पोट फुगते आणि गाय आपलं अस्तित्व हरवून बसते. मग सांगा, एक दिवस किंवा एक सायंकाळ तिची पूजा आणि इतर सर्वकाळ मात्र तिची हत्या कोण करतंय?
आजकाल प्लास्टिकच्या पिशवीतून आपण भाजीपाला घरी आणतो. इतरही रोजच्या गरजेच्या वस्तू प्लास्टिकच्या कॅरीबॅगमधूनच आणतो. दुसर्या दिवशी या सर्व कॅरीबॅग कचर्यामध्ये विलगीकरण न करताच फेकून दिल्या जातात. आता खरकटे आणि ह्या कॅरीबॅग कोण विलग करणार? कचरा व्यवस्थापन करणारे किंवा कचरा वेचणारे ही सुद्धा आपल्यासारखीच माणसे आहेत. आपले खरकटे, आपली कॅरीबॅगमधील घाण त्यांनी का स्वच्छ करावी? हे आणखी एक उदाहरण.
आजकाल खेड्यापाड्यात गेलं तरी गावाच्या वेशीवरच प्लास्टिकच्या पिशव्यांचा, बाटल्यांचा, वेगवेगळ्या वेष्टणांचा ढीग पडलेला असतो. तो वार्यामार्फत कसाही विस्कटलेला असतो. ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेचे लोक गाडी घेऊन येतात. तो विस्कटलेला प्लास्टिक कचरा आणि कुजणारा इतर पालापाचोळा मिश्रण करून एकत्रच घेऊन जातात. याला काही सजग संस्था अपवाद आहेत. पण त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. हा गाडीतून नेलेला कचरा कुठेतरी डम्पिंग ग्राउंडवरती टाकला जातो. तो बराचसा न कुजता तसाच पडतो. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेला कुजणारा कचरा निसर्गाच्या सान्निध्यात न आल्याने तो तसाच खूप काळ पिशवीत राहतो. कुजत नाही, अत्यंत घाणेरडी अशी दुर्गंधी सुटते. अशी कित्येक उदाहरणे नमूद करता येतील. जागतिक पातळीवरचं एक भीषण उदाहरण खाली नमूद करत आहे,
ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच (GPGP)
हवाई आणि कॅलिफोर्निया यांच्या दरम्यान उत्तर पॅसिफिक महासागरात तरंगणारा प्लास्टिक कचर्याचा मोठा ढिगारा आहे. त्याचा आकार सुमारे 1.6 दशलक्ष चौरस किलोमीटर (टेक्सासच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट / भारताच्या भूभाग क्षेत्रफळाच्या निम्मा) इतका मोठा आहे. हे जगातील पाच मोठ्या प्लास्टिक साठ्यांपैकी एक आहे.
हा कचरा मुख्यत: प्लास्टिकपासून बनलेला असून, अंदाजे 1,00,000 मेट्रिक टन वजनाचा आहे. यापैकी ऐंशी टक्के कचरा जमिनीवरून येतो. हे प्लास्टिक सूर्यप्रकाश व समुद्राच्या हालचालीने तुटून सूक्ष्म तुकड्यांमध्ये विभागले जाते, ज्यामुळे समुद्री जीवांना हानी पोहोचते आणि ते अन्नसाखळीत सामील होते. हा पॅच हवामान आणि समुद्राच्या हालचालींनुसार बदलत राहतो. सन 2024 अखेरपर्यंत एक दशलक्ष पाउंड प्लास्टिक काढले गेले, जो कचर्याचा केवळ अर्धा टक्का भाग आहे. उपाययोजना म्हणून ‘द ओशन क्लिनअप प्रोजेक्ट’ हा प्लास्टिक कचरा समुद्रातून काढत आहे. यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा वापरून प्लास्टिक कचरा जमा करून रीसायकल किंवा पुनर्वापरासाठी पाठवतात. भविष्यातील प्रदूषण टाळण्यासाठी दी सीबिन प्रोजेक्ट सारखे प्रोजेक्ट पोर्ट आणि आणि समुद्रामधील कचरा गोळा करतात.
श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ, डेरवण, चिपळूण, ज़ि. रत्नागिरी.
बी.के.एल. वालावलकर चॅरीटीस ट्रस्ट, डेरवण, चिपळूण, ज़ि. रत्नागिरी 415606
भविष्यातील अशा समस्यांसाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचर्याचे व्यवस्थापन सुधारणे, रीसायकलिंग वाढवणे आणि कम्पोस्टेबल साहित्य वापरणे असे महत्त्वाचे उपाय आहेत.
सन 2040 पर्यंत पॅसिफिक महासागरातील 90 टक्के तरंगणारे प्लास्टिक काढण्याचे उद्दिष्ट आहे. अविरत संशोधन, तंत्रज्ञान वापर आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हे यशासाठी उपाय आहेत. महासागरात प्लास्टिक प्रदूषण प्रमाण मोठे असल्यामुळे साचलेला कचरा काढणे व नवे प्लास्टिक थांबवणे यावर लक्ष देणे गरजेचे आहे. ही योजना आणि उपाय पर्यावरणासाठी व समुद्री जीवांसाठी आवश्यक आहेत.
पॅसिफिक महासागराभोवतालचे सर्व देश हे अतिप्रगत आहेत. तरीसुद्धा खूप भीषण समस्या निर्माण झाली आहे. केवळ योग्य वेळी कचरा विलगीकरण करून तो पुनर्निर्मितीसाठी वापरणे शक्य असूनही दुर्लक्ष केले. आता या सर्व प्रगत राष्ट्रांनी एकत्रित येऊन ठरवले आहे की, सन 2040 पर्यंत ही तरंगणारी प्लास्टिक कचर्याची विल्हेवाट प्रगत अद्ययावत यंत्रांच्या सहाय्याने लावायाची. पण ही सुद्धा शंभर टक्के होणार नाही. नव्वद टक्केच कचर्याची विल्हेवाट लागणार आहे.
या सर्व लिखाणातून सर्व सूज्ञ नागरिकांपर्यंत एक आग्रही कळकळीची विनंती की, जिचा उपयोग आपला निसर्ग टिकवण्यासाठी, आपल्या पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी होणार आहे.
बी. के. एल. वालावलकर चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी परिसरात सर्व कचरा विलग करून, न कुजणारा सर्व प्रकारचा प्लास्टिक कचरा पुनर्प्रक्रियेसाठी चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेस दिला जातो.
आता या क्षणापासूनच स्वतःपासून सुरुवात करावी. प्लास्टिक नको म्हणण्यासाठी नेहमी आपल्याजवळ एक छोटीशी घडी होईल अशी कापडी पिशवी ठेवावी म्हणजे कॅरीबॅग आणावी लागणार नाही. कितीतरी गोष्टी आपण प्लास्टिक पिशवीतून आणतोय. या प्लास्टिक पिशव्या वापरून झाल्यानंतर पुनर्प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यासाठी कचरा घरातून बाहेर ठेवताना निदान तो विलग करूनच ठेवा. जसे की, कुजणारा आणि न कुजणारा.
पाणी पिण्यासाठी स्वतःजवळ कायम एक बाटली ठेवावी. म्हणजे प्लास्टिक बाटलीमधील पाणी घ्यावे लागणार नाही. मोठमोठ्या संस्थांना आव्हान आहे की, त्यांनी सुद्धा आपल्या परिसरात नागरिकांसाठी पाण्याच्या बाटल्या भरण्याकरिता स्वच्छ आणि चांगल्या फिल्टरची व्यवस्था करावीच. म्हणजे खूपसे लोक प्लास्टिक बाटलीमधून पाणी खरेदी करण्याऐवजी स्वतः जवळच्या बाटलीत शुद्ध पाणी भरून घेतील. यातूनही जे लोक प्लास्टिकच्या बाटलीचाच वापर करणार आहेत त्यांनी रिकाम्या बाटल्या पुनर्प्रक्रियेसाठी जातील अशा ठिकाणीच टाकाव्यात.
हा लेख वाचल्यानंतर पुन्हा काही प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा, स्वतःपासूनच आपला परिसर आणि आपलं घर प्लास्टिकमुक्त ठेवण्याची शपथ घेऊया. इथे मी काही प्रश्न करण्यापेक्षा एवढ्यासाठी म्हटलं आहे, कारण बरेच लोक म्हणतात - ही जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारनेच प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मितीवर बंधन घालावे. यावरती मी लेखक म्हणून काहीही भाष्य करू इच्छित नाही. कारण आपण प्रत्येक सुजाण नागरिक हा सरकारचाच भाग आहोत त्यामुळे आपली ही जबाबदारीच आहे आणि ती सुद्धा आपल्या पुढील पिढ्यांसाठी म्हणून पेलावयाची आहे.
लेखक निवृत्त कृषी अणुजीव शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख, वनस्पती रोग शास्त्र, कृषी महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत.