रामाच्या विरहाची कारणे

विवेक मराठी    15-Nov-2025   
Total Views |
 
Karunastake
 
या प्रपंचात मी जन्मापासून वाढलो असल्याने मला तेथे आसक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे मला या संसाराची काळजी वाटते रे! तेव्हा रामराया, तूच सांग मी काय करू? या संभ्रमातून जात असताना नेमका निश्चय न झाल्याने मनात नैराश्य व दुःख निर्माण होते. निराश अवस्थेत आपल्या अंगी असलेल्या शक्तींचा विसर पडतो.
 
‘करुणाष्टक‘चार कडव्याचे असले तरी त्यात स्वामींनी आपल्या अंत:करणातील भाव प्रांजळपणे कबूल करून, रामाच्या भेटीची तीव्र तळमळ कोमल अंतःकरणाने भक्तिभावाने रामालाच साद घालून व्यक्त केली आहे. वर्षभर सुरू असलेल्या ‘करुणाष्टके’ सदरातील हा शेवटचा लेख..
आपली प्रेमळ आई, बंधू, आप्तेष्ट, सुहृद या सार्‍यांचा त्याग करून रामसाक्षात्कारासाठी नारायणाने लहान वयात नाशिक गाठले, तेथील तपाचरणात त्याने परिस्थितीची आणि निंदकांची एवढेच नव्हे तर कशाचीही तमा बाळगली नाही.
समर्थांनी दासबोधात म्हटले आहे की,
 
देवाच्या सख्यत्वासाठी। पडाव्या जिवलगांसी तुटी।
 
सर्व अर्पावें सेवटी। प्राण तोहि वेचावा॥ (8.4.8)
 
अशा कठीण निर्धाराने नारायण आपली साधना गोदावरी तीरी करीत होता. आपले आराध्य दैवत प्रभू राम यांच्या भेटीशिवाय नारायणाला चैन पडणे शक्य नव्हते, रामाच्या विरहाचे दु:ख सहन करून त्यावर चिंतन करीत असताना याची कारणे स्वामींच्या मनापुढे स्पष्ट होऊ लागली. ती कारणे जाणून स्वामी अहंकार, प्रारब्ध, दुर्जनसंगती, अविवेक इत्यादिकांचा उल्लेख करतात. हे आपण यापूर्वीच्या लेखांतून पाहिले. प्रपंचातील अनेक अडचणी सहन करून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करणार्‍या साधकाला या कारणांची जाणीव होत असते. ही जाणीव झाली तरी एक खंत भक्त प्रांजळपणे रामासमोर करतो. ती अवघड गोष्ट स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.
 
संसारचिंता मज वाटते रे।
रामा प्रपंची मन जातसे रे।
संसर्ग आहे इतरां जनासीं।
सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ॥ 4 ॥
 
अन्वयार्थ - या संसाराची मला चिंता (काळजी) वाटते. हे रामा, (माझे) मन (सारखे) या प्रपंचाकडे जात आहे रे. (कारण) माझा इतर (प्रापंचिक) जनांसी (सतत) संपर्क आहे. (तेव्हा) हे सर्वोत्तमा रामा (तू) मला केव्हा भेट देशील?
 
 
साधकाने अवघड आध्यात्मिक वाटचाल करण्याचा निश्चय केला, देवाशी, रामाशी, भगवंताशी सख्य साधण्यासाठी जिथे आपला जीव गुंतून राहातो त्या सर्वस्वाचा त्याग केला. एवढेच नव्हे तर, आपले प्राणही वेचण्याची तयारी साधकाने दाखवली. अशा निर्धाराने जेव्हा साधक परमेश्वरप्राप्तीसाठी साधनेत वाटचाल करू लागतो, तेव्हा ध्येयप्राप्तीच्या यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो.
 
साधकाने ध्येयप्राप्तीसाठी निर्धार केला असला तरी ज्या परिस्थितीतून साधकाला जावे लागते तेथील अडचणी सहन करून पुढे जायचे असते. या अडचणी बाह्य परिस्थितीतून उद्भवल्या असल्याने त्याला बाह्य परिस्थितीशी जमवून घ्यावे लागते. हे करीत असताना त्याला आत्मपरीक्षण करून मनालाही त्यासाठी वळवावे लागते. आत्मपरीक्षण करताना विवेकाला स्थान देऊन आपण कुठे कमी पडलो याचा शोध घ्यावा लागतो, त्यावर उपाययोजना करून आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. भगवंत भेटीची तळमळ अंतःकरणात जसजशी वाढू लागते तसतशी मनातील विकारांची जाणीव प्रकर्षाने होऊ लागते. आणि साधकाला त्यासंबंधी चिंता उत्पन्न होते.
 
 
सर्वस्वाचा त्याग करून नारायण नाशिकला येऊन राहिल्यावर रामाशिवाय कोणाचाच त्याला आधार नव्हता. तसेच रामाला आपला सखा मानल्याने तो आपल्या अंतःकरणातील भाव रामासमोर उघड बोलून दाखवीत आहे. स्वामी म्हणतात, या प्रपंचात मी जन्मापासून वाढलो असल्याने मला तेथे आसक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे मला या संसाराची काळजी वाटते रे! तेव्हा रामराया, तूच सांग मी काय करू? मनातील ही संसारचिंता कशी कमी करावी हे मला समजत नाही, अनेक प्रकारच्या चिंता भेडसावत असतात. हा प्रपंच किंवा संसार सोडून पळून जाता येत नाही. माणसाने देहाने त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी प्रपंच बरोबर येतो. मन एका ठिकाणी जडले की दुसरा विचार मन स्वीकारायला तयार नसते, तथापि तसा प्रयत्न मनाने केला तर हे योग्य की ते योग्य असा संभ्रम निर्माण होतो. या संभ्रमातून जात असताना नेमका निश्चय न झाल्याने मनात नैराश्य व दुःख निर्माण होते. निराश अवस्थेत आपल्या अंगी असलेल्या शक्तींचा विसर पडतो. अशी अवस्था युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी अर्जुनाची झाली होती. श्रीमद्भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात याचे वर्णन येते. त्याला ’अर्जुनविषादयोग’ असे नाव दिलेले आहे. आपले कर्तव्य विसरून ऐन युद्धप्रसंगी मनात मोह, निर्माण झाल्याने निराश मनाने अर्जुनाने धनुष्य खाली टाकले. अर्जुनाला त्यातून सावरण्यासाठी भगवंताला पुढचे सतरा अध्याय सांगावे लागले! एकंदरीत काय, तर संसारमोह, संसारचिंता कोणाला सतावत नाहीत? ती सर्वांना असते. त्यामुळे स्वामींनी या श्लोकाच्या पहिल्या ओळीत रामासमोर प्रांजळपणे कबूल करून टाकले की, ’संसारचिंता मज वाटते रे‘.
 
 
आध्यात्मात, भक्तिमार्गात चित्ताच्या एकाग्रतेला महत्त्वाचे स्थान आहे. संसारातील, प्रपंचातील सारे खेळ मनाच्या द्वारा चाललेले असतात. मन चंचल असल्याने ते स्थिर करणे कठीण जाते. मनाच्या पुढे अंत:करण, चित्त, बुद्धी यांना पार करून त्या पलीकडील राम - परमात्मा याचे दर्शन शक्य होते. त्यासाठी विवेक राखून रामावर प्रेम करावे लागते, त्याची भक्ती करावी लागते. मनाला संसारचिंता लागली आहे हे पहिल्या ओळीत कबूल करून प्रपंचाची ओढ लागली आहे असे भक्त श्लोकाच्या दुसर्‍या ओळीत सांगत आहे. साधक म्हणतो की, मन प्रपंचाकडे जात आहे. सकाळपासून माझा सारखा इतर लोकांशी संबंध येत असतो. लोकसंपर्क हा मानवी जीवनाचा भाग आहे. तो टाळता येत नाही. संपर्कात आलेल्या लोकांपैकी काही स्वार्थी, कोणी अहंकारी व द्वेषमत्सराने पछाडलेले असतात, कोणी वासनेच्या आहारी गेलेले असल्याने अविवेकी, भ्रष्टाचारी असतात. प्रभू रामासारखे निष्कलंक चारित्र, विवेकी आचरण अंशमात्रानेही कुठे अनुभवास येत नाही.
 
 
बहुतेक इतरेजन विकाराधीन झालेले मला दिसत आहेत आणि अशा विकारी इतरेजनांशी माझा संबंध येत आहे. माझ्या भोवतालच्या या लोकांच्या संपर्काने माझे मन प्रपंचाकडे धाव घेत आहे. प्रपंच, संसार याच्या आवडीबद्दल आधुनिक मानसशास्त्र ती एक सहजप्रवृत्ती (ळपीींळपलीं) आहे असे समर्थन करते. परंतु स्वामी प्रपंचाची आसक्ती आहे व मन तिकडे ओढले जात आहे हे मान्य करून रामाच्या भेटीने ते शांत होईल अशी आशा बाळगून रामाला भेट देण्याची विनंती करीत आहेत. ’सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी’ अशी खर्‍या अंतःकरणाने तळमळ व्यक्त करीत स्वामींनी या करुणाष्टकाची पूर्तता केली. हे करुणाष्टकचार कडव्याचे असले तरी त्यात स्वामींनी आपल्या अंत:करणातील भाव प्रांजळपणे कबूल करून, रामाच्या भेटीची तीव्र तळमळ कोमल अंतःकरणाने भक्तिभावाने रामालाच साद घालून व्यक्त केली आहे.
समाप्त

सुरेश जाखडी

'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..