टळलेला दहशतवादी हल्ला

    20-Nov-2025
Total Views |
@रुपाली भुसारी



भारतासारख्या बलाढ्य आणि मोठी लोकसंख्या असणार्‍या देशात सुरक्षा यंत्रणांपुढील आव्हाने मोठी आहेत. दिल्लीवरील आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्हे उभी राहिलेली आहेत. पण वस्तुस्थिती ही सुद्धा आहे की, यापेक्षाही मोठा दहशतवादी हल्ला रोखण्यात आपल्या यंत्रणांना यश आलेले आहे! एकूणच घटनाक्रम विचारात घेतला तर हे स्पष्ट होते.

हल्ला 10 नोव्हेंबरला झाला असला, तरी त्या आधी अनेक धागेदोरे हाती येत होते पण पूर्ण चित्र तयार नव्हते. गेल्या दोन महिन्यात अनेक ठिकाणी कारवाई केली गेली. 19 ऑक्टोबरला जैश-ए-मोहम्मदचे पोस्टर्स श्रीनगरच्या नौगाम परिसरात आढळले आणि तपास यंत्रणेची चक्र वेगाने फिरली. त्यावेळी अटक केलेल्या तीन जणांकडून माहिती काढून तेथील मौलवी इरफान अहमद पर्यंत पोलीस पोहोचले. आणि नंतर हाच या दहशतवादी हल्ल्याचा मूळ आधार असल्याचे समजले. कारण कट्टर इस्लामी मूलतत्त्ववादी विचारसरणी तरुणांच्या मनावर बिंबवण्याचे आणि त्यांना प्रभावित (Radicalization) करण्याचे काम त्यानेच केलेले होते. ही इस्लामी दहशतवादाची पहिली पायरी मानली जाते.
 
 
दरम्यान 28 ऑक्टोबरला पुण्यात संगणक अभियंता जुबेर हंगरगेकरला अटक झाली. पुढे 5 ते 10 ऑक्टोबर रोज सुरक्षा यंत्रणांच्या संबंधित बातम्या येत होत्या. अनेक राज्यांत चौकशी आणि धाडसत्र चालू होते. अगदी 10 तारखेला 2900 किलो स्फोटकांचा आणि त्याआधी 360 किलोचा साठा फरीदाबादहून पोलिसांनी जप्त केला होता. अल फलाह विद्यापीठापर्यंत सुरक्षा यंत्रणा पोहचल्या होत्या, पण तोपर्यंत डॉक्टर उमर हा फरार होता. कटातील अन्य डॉक्टरांना ताब्यात घेतले गेले होते, पण दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ आत्मघातकी हल्ला उमरने चढवलेला होता.
 
 
मात्र, या धरपकडीत यापेक्षाही मोठ्या कटाचा माग सुरक्षा यंत्रणांनी काढला. एक-दोन नव्हे तर, 32 वाहनांना स्फोटकांनी भरून 6 डिसेंबरला दिल्लीत सहा ठिकाणी आणि अन्य काही ठिकाणी मोठे आत्मघातकी हल्ले घडवण्याचा भयंकर डाव सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले आहे, याची सुद्धा दखल घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा, दहशतवादविरोधी पथक, गुप्तहेर खाते तसेच स्थानिक पोलीस यंत्रणा या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आखणी वेळ साधली असती तर दिल्लीचा हल्ला सुद्धा टाळता आला असता!
 
 
ही जप्त केलेली स्फोटके जर वापरली गेली असती तर किती मोठा विद्ध्वंस झाला असता, याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. हल्ल्याच्या दिवशी आणि आदल्याच दिवशी दहशतवादाचे फरीदाबाद मोड्यूल सुरक्षा यंत्रणेने उद्ध्वस्त करणे चालू केले होते. पण इतका मोठा हल्ला करण्याचे त्यांचे कारस्थान होते, हे नंतर उघड झाले.




माहितीचे विश्लेषण हे आव्हान

मुळात, गुप्तहेर खात्याचे कार्य म्हणजे राष्ट्रविरोधी कारवाया करणार्‍यांवर लक्ष ठेवून त्यांची माहिती आधीच संबंधित यंत्रणांना देणे आणि संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी मदत देणे आहे. गुप्तवार्ता संकलन ही सततची प्रक्रिया असून मिळणार्‍या माहितीचे एकमेकांत गुंफलेले अनेक धागे जोडून त्याचे विश्लेषण करावे लागते. त्यात यश मिळाले तर त्यानंतर त्यातून होणारा अर्थबोध म्हणजे गुप्तवार्ता असू शकते. दिल्लीचा दहशतवादी हल्ला आणि त्याचे पसरलेले धागेदोरे यांचा गुंता इतका दाट आहे की, त्याच्या एकेका धाग्यावर काम करणे आणि माहिती एकत्रित करणे हे सुद्धा आव्हानात्मक बनले आहे. भारतातच नाही तर जगभरातील यंत्रणांच्या पुढे हे आव्हान आहे.


सतत दहशतवादाला सामोरे गेलेल्या इस्त्रायलचा अभ्यास केला तरी अनेक अशी उदाहरणे आहेत. 1972च्या सप्टेंबरमध्ये इस्रायलच्या खेळाडूंना म्युनिक-जर्मनी येथे ऑलिम्पिक चालू असताना पेलेस्टाईनच्या ‘ब्लॅक सप्टेंबर’ या कट्टर दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी ओलीस धरले. हे सर्व ऑलिम्पिक ग्राममध्ये भर स्पर्धा सुरू असताना घडले आणि नंतर सगळ्या खेळाडूंना त्यांनी ठार केले होते. हा संपूर्ण जगाला धक्का होता. पण या आधी इस्त्रायलला मिळणारी गोपनीय माहिती, त्याचा अर्थ, अचूकता साधली गेली नव्हती असे नंतर लक्षात आले. काही संदर्भामध्ये असे म्हटलेले आहे की ‘ऑलिम्पिक खेळ’ आणि ‘हल्ला’ अशा गोपनीय बातम्या आधी तुरळक येत होत्या. नंतर यांची वारंवारता वाढली. पण माहितीचे ठोस विश्लेषण करण्यात यश मिळाले नव्हते. ऑलिम्पिक खेळाच्या दरम्यान एखाद्या मोठ्या व्यक्तीवर हल्ला होऊ शकतो असा ढोबळमानाने अर्थ काढला गेला. शिवाय, हल्ला करणारे दहशतवादी खेळाडूंच्या वेषात ऑलिंपिक ग्राममध्ये सहजपणे शिरले होते.

याचप्रमाणे मुंबईचा 26/11च्या, 2008च्या हल्ल्याची गुप्तवार्ता आधी मिळालेली होती पण त्याचे विवेचन आणि त्याआधारे कृती यात सांगड घालता आली नव्हती.


काही वेळा अगदी संधी वाटणारी माहिती सुद्धा अति महत्त्वाची असू शकते, पण त्याची जाणीव सामान्य नागरिकांना नसते. उदा - दिल्ली हल्ल्याच्या चौकशीत अल फलाह विद्यापीठ आले तेव्हा एका बातमीत म्हटले आहे की, इंफाळच्या एका मुलीला इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा डॉक्टर उमरचा प्रयत्न होता. तो तिला ‘मरियम’ नावाने संबोधत असे तसेच तेथील विद्यार्थ्यांना अनौपचारिक सत्रात सहभागी व्हायला भाग पाडले जात होते. ही बातमी किंवा याविषयीची एक तक्रार जरी योग्य ठिकाणी नोंदवली गेली असती तरी या मोडयूलपर्यंत पोलीस आधीच पोहचले असते.

नियोजनाची अनेक वर्षे

जेव्हा दहशतवादी हल्ल्याचे नियोजन दीर्घकाळ चालू असते तेव्हा सुरक्षा यंत्रणांना ते ओळखणे कठीण असते. कारण, रोजच्या नित्यक्रमांचा हा भाग कोणताही संशय निर्माण करू शकत नाही.

अमेरिकेवरील 9/11चा हल्ला याचे सुद्धा उदाहरण महत्त्वाचे ठरते. सर्वत्र इतकी सुरक्षा यंत्रणा असतांना हा हल्ला दहशतवाद्यांनी घडवून आणला कारण हे नियोजन अनेक वर्षे सुरू होते. दहशतवादी रोजच्या जीवनात आपले लक्ष्य गाठण्यासाठी थोडे थोडे प्रयत्न करत पुढे सरकत असतात, त्यामुळे ते कुणाच्या लक्षात येऊ शकत नाही.


दिल्ली हल्ल्याचा कट गेल्या आठ-दहा वर्षे शिजत होता. दरम्यान, 22 उच्चशिक्षित जण या मोड्यूलशी जोडलेले आढळून आले असून त्याचा तपास सुरू आहे. मौलवी इरफान हा नौगाम येथील मशिदीत इमाम होता. तसेच तो श्रीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा आधी नोकरी करीत होता. हा या मोड्यूलचा मूळ आधार होता. त्याने अनेकांना इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारसरणीने प्रभावित केले होते. त्याला 19 ऑक्टोबरला झालेली अटक महत्त्वाची आहे. त्याने तीन वेगवेगळ्या अ‍ॅपच्याद्वारे या मोड्यूलच्या 22 जणांशी संपर्क ठेवलेला होता, ही सगळी नावे तपास यंत्रणेला मिळू शकली. पण हे सर्व दीर्घकाळ पर्यंत गोपनीय राहिले. मौलवी किंवा डॉक्टर यांच्यावर कुणी संभाव्य दहशतवादी म्हणून संशय सुद्धा घेणार नाही, इतके यांचे ‘कव्हर’ मजबूत होते. डॉक्टर शाहीन सईद जैश-ए- मोहम्मदच्या महिला गटाची प्रमुख होती. तिच्या जप्त झालेल्या फोनमधून काही सांकेतिक संभाषण मिळाले आहे.

देशात अनेक दहशतवादी हल्ले होण्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे रोखले गेले आहेत. 2022 मध्ये उधमपूर येथे लष्कर -ए-तैबाचा हल्ला रोखला होता. अशी अनेक उदाहरणे आहेत. एकूणच, दिल्लीवरच्या आत्मघातकी हल्ल्याला रोखण्यात अपयश आले आणि 6 डिसेंबर 2025ला होऊ घातलेला हल्ला रोखण्यात यश आले ही वस्तुस्थिती आहे. वास्तववादी दृष्टीकोनातून याकडे पाहिले पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे...