जयपूर डायलॉग्ज - राष्ट्रवाद्यांचा विचारमेळा

    20-Nov-2025
Total Views |
सारंग दर्शने  9821504025
 jaipur dialogues

‘जयपूर डायलॉग्ज’ या आता लवकरच दशकपूर्ती करणार्‍या राष्ट्रीय परिचर्चेचा तीन दिवसांचा सोहळा नुकताच पार पडला. देशभरातील विचारवंत, लेखक, संपादक, कायदेतज्ज्ञ, नोकरशहा, लष्करी अधिकारी आदींनी हजेरी लावलेल्या आणि ‘शत्रुबोध’ या संकल्पनेवर मंथन करणार्‍या या कार्यक्रमाचा हा वृत्तान्त...

देशात गेल्या दशकभरापासून एक वेगळा प्रयोग होतो आहे. तो म्हणजे विविध प्रवाहांमधील राष्ट्रवादी विचारांच्या मंडळींनी एकत्र येऊन विचारांचे आदानप्रदान करायचे. माजी आयएएस अधिकारी संजय दीक्षित यांनी सन 2016 मध्ये पहिल्यांदा ‘जयपूर डायलॉग्ज’ या उपक्रमाची सुरुवात केली. तेव्हा मर्यादित प्रतिसाद मिळालेल्या ‘जयपूर डायलॉग्ज’ची कीर्ती आता जगभरात पसरली आहे. हा उपक्रम देशभरात विविध शहरांमध्ये होऊ लागला आहे. खुद्द जयपुरात दरवर्षी होणार्‍या या चर्चासत्राला आता केवळ देशातूनच नव्हे तर अमेरिका, युरोप, आखाती देशांसहित अनेक देशांमधून नियमित हजेरी लावणार्‍या प्रतिनिधींची संख्या वाढत चालली आहे. यंदा हा विचारमेळा सात, आठ आणि नऊ नोव्हेंबरला पार पडला. दरवर्षी मेळाव्याची एक संकल्पना असते. यंदा ती होती... ‘शत्रुबोध’. हा आर्य चाणक्यांनी वापरलेला शब्द आहे आणि कौटिलीय अर्थशास्त्रात शत्रूला ओळखण्याची, त्याला रोखण्याची अनेक तंत्रे व मंत्र आहेत. विशेष म्हणजे, आर्य चाणक्य शत्रूच्या गुणांची पारख कशी करावी आणि ते गुण आपण आत्मसात कसे करावेत, याचेही विवेचन करतात. शत्रू हा केवळ एका प्रकारचा नसतो आणि तो गुप्त रूपात अगदी आपल्या शेजारीही असू शकतो. ‘शत्रुबोधा’ची ही चौकट लक्षात येऊन यंदाच्या परिसंवादांची आखणी करण्यात आली होती. त्यात देशातील शंभराहून अधिक विचारवंत, लेखक, ब्लॉगर्स, यू ट्युबर्स सहभागी झाले होते. वक्त्यांमध्ये जसे अनेक तरुण मंचावर होते, तसाच सभागृहातील श्रोत्यांमधला तरुणांचा सहभाग विशेष लक्षणीय होता.
 

jaipur dialogues 
 
मुख्य सभागृहात दिवसभर चालणारे परिसंवाद, चर्चा आणि दोन छोट्या सभागृहांमध्ये त्याचवेळी चालणारी स्वतंत्र सत्रे अशी या संमेलनाची रचना होती. त्यामुळे, अनेकदा इथे जावे की तिथे असा पेच श्रोत्यांना पडत असे. तीन दिवसांमध्ये या तीनही मंचावर मिळून जवळपास 45 चर्चासत्रे, परिसंवाद झाले. अशा प्रकारची विस्तृत व व्यापक वैचारिक चर्चा घडवून आणायची आणि तीही शेकडो श्रोत्यांनी मन लावून ऐकायची; हा एक महत्त्वाचा संस्कार जयपूर डायलॉग्ज करीत आहे. ‘राष्ट्रवादी विचारधारे’ला किती प्रकारचे पैलू असू शकतात, किती अंगांनी राष्ट्राचा, त्याच्या भवितव्याचा विचार करता येतो आणि ‘भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी’ हे किती महत्त्वाचे असते, हे अशा संवादांमधून अधोरेखित होत असते. त्यामुळेच, ‘शत्रुबोध इन जिओपॉलिटिक्स’सारख्या विषयावरील परिसंवादात सुशांत सरीन, अभिजित अय्यर-मित्र, मेजर जनरल राजीव नारायणन यांनी दक्षिण आशियातील व्यापक चित्र श्रोत्यांसमोर ठेवले. भारताच्या चहूबाजूंनी आणि त्याचवेळी देशांतर्गत अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न कसे चालू असतात, याचे विश्लेषण केले. या संवादाचे संचालन आदी अचिंतसारखा अभ्यासक करत होता. याचप्रमाणे, ‘शत्रुबोध इन अ‍ॅकॅडेमिया’ ही अतिशय महत्त्वाची चर्चा पहिल्याच दिवशी झाली. भारतातील श्रेष्ठ संपादक कै. गिरीलाल जैन यांच्या कन्या आणि इतिहासकार, खासदार मीनाक्षी जैन यांचे यातले भाषण विलक्षण होते. स्वातंत्र्यानंतर भारताच्या मध्ययुगीन व इतरही इतिहासाची मांडणी कशी एकाच दृष्टीकोनातून करण्यात आली आणि ती करताना सत्य लपविणे, सत्याची मोडतोड कशी झाली, याबाबतचा त्यांचा अनुभव ही आधुनिक भारताची एक शोकांतिकाच आहे. एखाद्या अभ्यासकाला काही वेगळे सापडले किंवा मांडावेसे वाटले तर मोठमोठ्या संस्था किंवा विद्यापीठांमध्ये होणार्‍या मुस्कटदाबीचा सामना त्यांनाही करावा लागला. या वैचारिक लढाईमध्ये त्यांनी आत्मबळ कसे टिकवले आणि आपल्याला योग्य वाटेल ते लिहिण्यासाठी कशी झुंज दिली, याची कहाणी श्रोत्यांना खिळवून ठेवणारी होती. याच चर्चेत स्वयंसेवी संस्थांकडे येणारा प्रचंड परदेशी पैशाचा ओघ आणि त्यातून उभे राहणारे कथित विचारमंच यावरही वक्त्यांनी प्रकाश टाकला. सगळ्यांच चर्चांच्या शेवटी श्रोत्यांनी प्रश्न विचारावेत, अशी अपेक्षा होती. या चर्चेनंतर प्रश्नांचा पाऊस पडला. विविध राज्यांमधून आलेले श्रोते नेमके, थेट प्रश्न विचारत होते. त्यामुळे, अनेकदा काही मुद्दे प्रश्नांच्या उत्तरांमधून अधिक स्पष्ट होत होते.
 

jaipur dialogues जयपूर डायलॉग्ज मध्ये बोलताना भरत गुप्त
 
पहिल्याच दिवशी ‘टुकडे टुकडे गँग’ यावर झालेल्या चर्चेत, नक्षलवादी, कडव्या इस्लामी संघटना आणि इतर फुटीर चळवळी यांचा घेतलेला परामर्श फार मोलाचा होता. त्यात अविनाश धर्माधिकारी यांनी तर्कशुद्ध आणि मार्मिक विश्लेषणाने श्रोत्यांची मने जिंकली. या चर्चेत बंगालमधून आलेल्या अ‍ॅड. नाजिया इलाही खान यांना तर श्रोत्यांनी तुफान प्रतिसाद दिला. या लढाऊ राजकीय व सामाजिक कार्यकर्तीवर बंगालमध्ये शंभराहून अधिक एफआयआर आणि खटले चालू आहेत. त्यांची निखळ राष्ट्रवादी भूमिका आश्वस्त करणारी होती. महाराष्ट्रात हमीद दलवाई यांनी जी इस्लामची कठोर चिकित्सा केली, तिच्या चार पावले पुढे जाऊन नाजिया खान जी चिकित्सा करतात, तशी करण्यासाठी धैर्य लागते. त्यांच्यावर अनेकदा हल्ल्यांचे प्रयत्नही झाले आहेत. एक पूजापद्धती म्हणून इस्लाम आणि भारताचा राष्ट्रधर्म यांच्यातले नाते नाजिया खान यांनी उलगडले. नाजिया खान या स्वत: वकील असल्याने मुस्लीम महिलांच्या समान हक्कांसाठी त्या अनेक न्यायालयीन लढायाही करीत आहेत. त्यांची प्रखर राष्ट्रवादी आणि फुटीर शक्तींवर कडाडून हल्ला करणारी भूमिका हे यंदाच्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले. स्वाभाविकच, त्यांना सभागृहात आणि आवारात श्रोत्यांचा सतत गराडा पडला होता.
 

jaipur dialogues 
डावीकडून विष्णू जैन, शेफाली वैद्य, आनंद रंगनाथन, अश्विनी उपाध्याय
 
मुख्य सभागृहांमध्ये बोलणारे अनेक वक्ते थांबून इतर दोन मांडवांमधील चर्चा, संवादांमध्येही भाग घेत होते. त्यामुळे, तेथे श्रोत्यांशी अधिक जवळून संवाद साधता येत होता. या चर्चांमध्ये बिहारच्या राजकारणापासून पंतप्रधानांच्या यशापयशापर्यंत आणि उत्तर प्रदेशातील माफियामुक्तीपासून नोकरशाहीतील वैगुण्यांपर्यंत अनेक विषय होते. या सगळ्या चर्चाही मुद्देसूद आणि प्रभावी होत होत्या. त्यातली ‘आत्मनिर्भर डिफेन्स’ ही अनेक युद्धनीतितज्ज्ञांनी भाग घेतलेली चर्चा किंवा ‘डज हिंदू इको सिस्टम एग्झिस्ट’ ही चर्चा महत्त्वाची होती. भारतापुढे जो डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्येच्या विविध पैलूंचा प्रश्न उभा राहतो आहे, त्यावरची चर्चाही उद्बोधक झाली. शेफाली वैद्य यांनी त्या चर्चेचे सूत्रसंचालन केले. देशापुढच्या या संकटाचे सूक्ष्म विवेचन यावेळी कर्नल आरएसएन सिंग कार्तिक गोर आदी वक्त्यांनी केले. हा विषय येत्या काळात सातत्याने महत्त्वाचा ठरणारा आहे.
 
 
महाराष्ट्राचा ठसा
 
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे जयपूर डायलॉग्जचे संस्थापक संजय दीक्षित यांना बराच काळ साह्य करीत आहेत. हा उपक्रम देशाच्या इतर भागांमध्ये नेण्यातही भाऊंचा पुढाकार आहे. भाऊंचे फॅन आता देशभरात असून त्याचा प्रत्यय येत होता. ते अनेक चर्चांमध्ये सहभागी तर झालेच पण अनेक चर्चांना त्यांनी नेमके वळण दिले. भाऊंशिवाय, अविनाश धर्माधिकारी, नीलेश ओक, उदय माहूरकर, शेफाली वैद्य हे विविध चर्चांमध्ये सहभागी झाले. अभिजित जोग यांच्या इंग्रजी पुस्तकाचे विमोचन यावेळी झाले. विशेष म्हणजे, या परिसंवादांना हजेरी लावणार्‍या प्रतिनिधी, श्रोत्यांमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्ली इथून आलेल्या मराठी मंडळींची संख्या लक्षणीय होती. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची असणारी भव्य चित्रे हाही या संमेलनावरचा एक मराठी ठसा होता.
 
भारतातले कायदे, त्यांची अंमलबजावणी, देशातली न्यायव्यवस्था, न्यायप्रक्रिया आणि भारतीय समाज या चौकटीतल्या अनेक चर्चा यावेळी ठेवण्यात आल्या होत्या. त्यातून होणारा ‘शत्रुबोध’ सूक्ष्म पण महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने जी फौजदारी दंडसंहितेची नवरचना केली आहे; ती पुरेशी आहे का, अशी शंकाही अनेकदा व्यक्त झाली. समान नागरी कायदा अजून झालेला नाही. तो झाला तर कसा व किती व्यापक असेल, हाही प्रश्न आहेच. याशिवाय, भारतातील एकूण न्यायव्यवस्थेचे वर्तन भारतीय समाजाच्या हिताचे किंवा त्याला न्याय देणारे असते का, या अत्यंत मूलभूत प्रश्नाला अनेक वक्ते थेटपणे भिडले. यातल्या काहींवर आधीच्या न्यायालयीन बेअदबीचे खटले चालू आहेत. त्या खटल्यांची पर्वा न करता न्यायालयांवर थेट व अतिशय कडक टीका करण्याचे काही वक्त्यांचे धैर्य विशेष होते.
 
 
jaipur dialogues
 ब्रेकिंग इंडिया फोर्सेस या परिसंवादात भाग घेतलेले डावीकडून अभिजित अय्यर-मित्र, अविनाश धर्माधिकारी, अभिजित चावडा, संजय दीक्षित, पंकज सक्सेना, नाजिया इलाही खान..

‘भारत’ ही संकल्पना भारतीय न्यायव्यवस्थेला समजते का, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली. अश्विनी उपाध्याय हे दिल्लीतील ज्येष्ठ वकील राज्यघटनेच्या चौकटीत राहून अनेक लढे देत असतात. समान नागरी कायद्याची मागणी करणारी त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेच. याशिवाय, देशातील सर्व धार्मिक स्थळांची स्थिती यथावत ठेवण्यासाठी सन 1991 मध्ये झालेल्या कायद्यालाही त्यांनी आव्हान दिले आहे. मतदार याद्यांचे सातत्याने सखोल परीक्षण करण्याची मागणी करणारी याचिकाही त्यांचीच होती. या याचिकेतील मागणीची पूर्तता सध्या काही प्रमाणात होत आहे. अयोध्येसहित अनेक महत्त्वपूर्ण न्यायालयीन लढाया देणार्‍या विष्णू शंकर जैन यांचाही या चर्चेतील सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. वाराणसीमध्ये सापडलेल्या प्राचीन अवशेषांची नोंद घेऊन योग्य ते आदेश देण्यात न्यायव्यवस्था सध्या चालढकल करीत आहे की काय, अशी शंका त्यांचे भाषण ऐकताना श्रोत्यांच्या मनात आली. आपण आपली न्यायप्रणाली इंग्रजांकडून घेतली. ती व्यापक चौकट कायम ठेवतानाच या व्यवस्थेचे ‘भारतीयीकरण’ करणे किती आवश्यक आहे, याचा पडताळा वेगवेगळ्या अंगांनी झालेल्या विविध चर्चांमधून येत होता. सर्वांना समान, वेगवान आणि उचित न्याय देण्यात विलंब होत असेल तर राष्ट्राच्या वाटचालीतला हा एक अवरोधच आहे. या अंगाने हा शत्रुबोध श्रोत्यांना करून देणार्‍या निर्भीड वक्त्यांचे करावे तितके अभिनंदन कमी होईल.

ग्रंथविश्वातली सफर
कार्यक्रमाच्या तीनही दिवसांत अनेक नवीन पुस्तकांचे विमोचन होत होते. याशिवाय, लक्षणीय प्रश्न विचारणार्‍यांनाही ग्रंथभेट मिळत होती. याशिवाय, आवारात जे ग्रंथप्रदर्शन भरले होते, तेथे शेकडो पुस्तके होती. तीनही दिवस ग्रंथविक्री जोमाने होत होती. जे लेखक चर्चांना हजर होते, त्यांची स्वाक्षरी आणि त्यांच्याशी संवाद असा अनौपचारिक सोहळाही तीनही दिवस रंगत होता. विविध भाषांमध्ये लिहिणार्‍या लेखकांची पुस्तके हिंदी व इंग्रजीत येणे व मिळणे, हे महत्त्वाचे असते. तसे आता होते आहे. मराठीतील लोकप्रिय व व्यासंगी लेखक अभिजित जोग यांची इंग्रजीत उपलब्ध झालेली पुस्तके वाचकांना आकर्षित करीत होती. या ग्रंथप्रदर्शनासाठी दिल्ली तसेच इतर भागातूनही प्रकाशक व विक्रेते आले होते.

 
‘जयपूर डायलॉग्ज’चा गेल्या दशकभरात मोठा विस्तार झाला आहे. अलीकडेच, जयपूर डायलॉग्जचा एक कार्यक्रम पुण्यात पार पडला. आता तो मुंबईतही होणार आहे. वाराणसीतही व्हायचा आहे. देशातील अनेक शहरांमधून तो होण्यासाठी मागणी होत आहे. यामुळे, ही आता वर्षात एकदा होणारी घटना राहिली नसून निरंतर चालणारी प्रक्रियाच झाली आहे.
 
 
नरेटिव्हांचे नगारे डावे किंवा इतर गेली अनेक दशके वाजवत आले आहेत. भारतात रूढ अर्थाने ज्यांना उजवे म्हटले जाते, त्यांनी अशी काही व्यापक वैचारिक मांडणी करून ती सातत्याने समाजापुढे ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर दिला. त्याची फळे आज दिसतच आहेत. मात्र, वैचारिक विश्व पादाक्रांत करण्यालाही एक महत्त्व असते. विशेषत: जेव्हा असत्याचा सुळसुळाट होतो, तेव्हा सत्याचा कसून शोध घेणे, ते मांडणे आणि योग्य त्या परिप्रेक्ष्यात सत्याची संस्थापना करणे, हे अत्यंत मोलाचे ऐतिहासिक काम असते. त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ते काम केवळ जयपूर डायलॉग्जने करावे, असे नाही. मात्र, या उपक्रमाने या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मात्र टाकले आहे. प्रत्येक प्रादेशिक भाषेतही अशा प्रकारचे विचारमंथन होऊ शकते. ‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना घेतली तर तिला राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, मानववंशशास्त्रीय, ऐतिहासिक, पुरातत्त्वीय, वाङ्मयीन, कलात्मक.. आदी असंख्य उपांगे असतात. या सार्‍या उपांगांची खोलात जाऊन मांडणी किंवा फेरमांडणी करावी लागते. तसे केले तरच राष्ट्रवादाचा पाया भक्कम व टिकाऊ होऊ शकतो. दरवर्षी राष्ट्रवादाचा एक पैलू घेण्याची ‘जयपूर डायलॉग्ज’ची कल्पना म्हणूनच स्वागतार्ह आहे. तो यशस्वी झालाच आहे. मात्र, असे अनेक संवादी स्वर जागोजागी उमलून यायला हवेत!