@डॉ. हेमंत बेडेकर
9767200905बांबू उत्पादक देशांपैकी भारतात याचे क्षेत्र सर्वात जास्त पण उत्पन्नाच्या बाबतीत मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनच्या कितीतरी मागे असा हा बांबू. इतका उपयुक्त असूनही अजूनही दुर्लक्षित असणारा. आपल्याला जगातील देशांनी विशेषतः चीनने काय मार्ग चोखाळला हे पाहावे लागेल. असंख्य लोकांना रोजगार देण्याची क्षमता असणार्या बांबू उद्योगाविषयी ही खास मालिका.
कतेच महाराष्ट्र सरकारने बांबू उद्योगाबद्दलचे आपले धोरण प्रसिद्ध केले. तसेच मध्यंतरी मुंबईमध्ये जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने एक सरकारी परिषद झाली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात बांबू व त्याचा प्रामुख्याने औष्णिक केंद्रासाठी वापर या विषयावर उहापोह झाला. हे सर्व होत असताना सामान्य नागरिकांची पाच आंधळे आणि हत्ती यासारखी अवस्था झाली. बांबूबद्दल बरेच समज-गैरसमज सामान्यांच्या मनात आहेत. तसा सर्वांना बांबू माहीत आहे तो धुणे वाळत घालायची काठी किंवा गुढीपाडव्याच्या काठीच्या निमित्ताने, ग्रामीण भागात टोपल्या, सुपे, करंडे आणि कणग्या या स्वरूपात आणि निश्चित माहीत असलेला उपयोग म्हणजे इहलोकातील यात्रा संपवताना चार लोकांच्या खांद्यावर बांबूच्या तिरडीच्या स्वरूपात.
जर कोणी सांगितले की, हाच बांबू आपल्या अर्थव्यवस्थेत फार मोलाची कामगिरी बजावू शकतो तर बर्याच लोकाना धक्का बसेल. मुळात बांबूत असे काय आहे की, जो आपले राष्ट्रीय सकल उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो.
या साठी आपण बांबू नीट समजून घेऊया.
बांबू एक बहुवार्षिक आणि बहुउपयोगी गवत. सात-आठ वर्षांपूर्वी सर्व परवानग्यांच्या कचाट्यातून मुक्त झालेले एक औद्योगिक पीक. विषुववृत्तीय प्रदेश हे त्याचे उगमस्थान. भारत त्यातील एक महत्त्चाचा देश. भारतात जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण भारतभर हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि राजस्थान-कच्छच्या रणापासून ते ईशान्य भारताच्या सर्व टेकड्यांमध्ये अगदी अरुणाचलप्रदेशपर्यंत त्याचा आढळ (स्थान). या सर्व प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या एकपाद ते छद्मपाद (एकापुढे एक वाढणारा आणि बेटाने वाढणारा) अशा दोन रूपांत तो आढळतो. महाराष्ट्रात नैसर्गिकरीत्या बेटाने वाढणारा बांबू आहे. कधी उंचच उंच पण अतिशय कमी जाडीचा, कधी भरपूर जाडी आणि आकाशाशी स्पर्धा करणारा, तर कधी अतिशय बुटका; कधी भरीव तर कधी पोकळ; कधी खालची पेरे भरीव व वरची पोकळ; कधी दरवर्षी फुलावर येणारा पण तरीही बहुवार्षिक; तर कधी 30-100 वर्षांनी फुलणारा आणि बी धरताच आपले आयुष्य संपवणारा असा हा बांबू.
याचा आढळ किती पुरातन. रामाला वनवासात जाताना शरयू नदी पार करतानाचा तराफा याचाच, श्रीकृष्णाची बासरी याच्यापासूनच बनलेली, परंपरागत घरासाठी हाच उपयुक्त, आजही बहुसंख्य लोकांच्या घरासाठी याचाच वापर, अब्जावधी लोकांना आधार देणारा पण तरीही दुर्लक्षित. अगदी अलीकडच्या काळापर्यंत नवजात बालकासाठी पाळणा बनणारा आणि आपली अंत्ययात्रा याच्याच खांद्यावर. बांबू उत्पादक देशांपैकी भारतात याचे क्षेत्र सर्वात जास्त पण उत्पन्नाच्या बाबतीत मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनच्या कितीतरी मागे असा हा बांबू. इतका उपयुक्त असूनही अजूनही दुर्लक्षित असणारा. आपल्याला अजूनही त्याचा म्हणावा तसा वापर करता आलेला नाही. आम्हाला त्याचे महत्त्वच अजून कळलेले नाही.
याचे पर्यावरणीय महत्त्वही तितकेच आहे. माणसाच्या हावरट प्रवृत्तीने निसर्गात सोडलेला कर्ब वायू शोषून मुक्तपणे प्राणवायू हवेत सोडणारा, जमिनीतून वाहणार्या पाण्यातील गढूळपणा आपल्या मुळांमध्ये अटकवून शुद्ध करणारा हा बांबू. आपल्या सहस्त्र बाहूनी अनेक कि.मी.वरून आकाशातून पडणारे पावसाचे पाणी आपल्या अंगावर झेलून जमिनीत सावकाश मुरवणारा, अनेक वृक्षांपेक्षाही अधिक जैवभार देणारा, जमिनीची धूप थांबवणारा, याचबरोबर लाकडाला उत्तम पर्याय.
प्राचीन काळापासून हजारो वर्षे चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला हा बांबू. चीनने त्याचे महत्त्व ओळखले आणि बांबूच्या प्रत्येक भागापासून काय काय उत्पादित करता येईल याचा विचार केला. त्यावर शास्त्रज्ञांना कामाला लावले त्यातून पुढील चित्र उभे राहिले.
यामुळे बांबूतील असणारे 10-15 टक्के पाणी वगळता सर्व भागांचा औद्योगिक वापर कळला. आपण जर फक्त एकाच उद्योगासाठी बांबू वापरायचे ठरवले तर त्यातील फक्त 20-30 टक्के भाग वापरता येतो. उदबत्ती काडीचे उदाहरण घेऊ. बांबूवर प्रक्रिया करून, त्याच्या लांब काड्या करून, पाहिजे तेवढ्या आकाराच्या व गोल केलेल्या काड्या उदबत्तीसाठी वापरल्या जातात. या काड्या बनवताना विशिष्ट लांबीची बांबूची पेरे वापरली जातात. भारतातला बहुतांश बांबू हा छद्मपाद म्हणजेच बेटांच्या स्वरूपात वाढणारा आहे. त्याच्या गुणधर्मानुसार जर पेरांसकट बांबू वापरायला गेले तर पेरावर काडी तुटते. साहजिकच आपणाला फक्त पेरेच वापरता येतात व पेरांच्या गाठी बाजूला काढाव्या लागतात. हे सर्व करताना बांबू कापताना पडणारा भुसा, पेरांच्या गाठी, टोकाकडील निमुळता बांबूचा भाग, आणि साली या वेगळ्या काढाव्या लागतात. एवढे करून 100 किलो बांबूतून फक्त 15-20 किलो उदबत्तीची काडी मिळते म्हणजेच बांबूची किंमत, त्याच्या प्रक्रियेचे मूल्य आणि हे वाया जाणारे भाग या सर्वांची किंमत त्या काडीवर पडते. साहजिकच ती महाग पडणार. त्यामुळेच आमचा उदबत्ती तयार करणारा उद्योजक स्वस्त असणार्या चिनी किंवा व्हिएतनामी काडीचा वापर करतो. चिनी उद्योजकांना ही काडी स्वस्त का पडते याचा विचार केला तर असे लक्षात येते की, बांबूच्या सर्व भागांच्या वापरामुळे 100 किलो बांबूतील फक्त आठ-दहा टक्के पाणी असलेला भाग वाया जातो. बाकी सर्व भाग या ना त्या कारणाने उद्योगात वापरला जातो. त्यातून विक्रीयोग्य अशा वस्तू केल्या जातात. साहजिकच वर उल्लेख केलेले सर्व मूल्य हे विभागून जाते व चिनी काडी स्वस्त पडते.
बांबू हे व्यापारी पीक आहे. साहजिकच त्यापासून बनवलेल्या कोणकोणत्या वस्तू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी असतात हे पाहूया. बांबू हा जगभरातील अविकसित, अर्धविकसित व विकसित देशातील जनतेचा जीवनाधार आहे. बांबू हा पर्यावरण रक्षक तर आहेच, पण बांबू उद्योगात असंख्य लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. बांबूचे आजच्या घडीला ज्ञात असलेले किमान 1500 मुख्य उपयोग आहेत. त्यात पडवीला लावायच्या आधारापासून ते कागदापर्यंत सर्व उद्योग येतात. आता नव्याने भर पडलेला मोटर गाड्यांची स्टीयरिंग व्हील्स व त्या अंतर्गत सजावट, पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी इथेनॉल, सीएनजी. त्यातील ज्यांना आंतरराष्ट्रीय मानके प्राप्त आहेत असे काही प्रकार हे औद्योगिक वस्तू म्हणून विचारात घेतले जातात. यात नुकताच तोडलेला बांबू व प्रक्रिया केलेला बांबू, पट्ट्या काढून विणकाम केलेल्या टोपल्या, चटया, बांबूचे पडदे, विविध उपयोगासाठीच्या ताटल्या, झोपड्यांसाठीचा तट्ट्या व त्यापासून तयार केलेला बोर्ड हे आहेत. त्याचबरोबर प्रक्रिया केलेला कोळसा, जळणासाठी केलेला कांडी कोळसा, थंड प्रदेशात वापरली जाणारी फरशी (flooring tiles), बांबूच्या तुळया व त्यापासून बनविलेल्या असंख्य वस्तू, प्लायवूड, कागदासाठी लगदा व कागद, इंधनात मिसळण्यासाठीचे अल्कोहोल, उदबत्तीच्या काड्या, बांबूचे कोंब अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. यातील एकेका वस्तूचा व्यापार हा काही कोटींचा किंवा अब्जात असू शकतो.
इनबार (INB-R 2012)) या आंतरराष्ट्रीय संस्थेने या जगभरच्या व्यापाराची विस्तृत माहिती काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केली त्यातील निष्कर्ष हे कोणाही सुजाण भारतीय माणसाला विचार करायला लावणारे आहेत.

या आकडेवारीत गेल्या 10-15 वर्षांत फारसा फरक पडलेला नाही. या आकडेवारीचा विचार करता आपल्याला केवढा पल्ला गाठायचा आहे याची कल्पना येऊ शकते. भारतात सर्वांत जास्त बांबूखालील क्षेत्र आहे, पण जागतिक व आंतरदेशीय बाजारात आपण खूपच मागे आहोत हे लक्षात घेऊन पावले टाकली पाहिजेत. आपला बांबू व्यापार अजूनही हस्तकला वस्तू व भेट देण्याच्या वस्तू या बाबत घुटमळतो आहे. असंख्य हातांना रोजगार देण्यासाठी हे महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर औद्योगिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्मिती करून आपल्याला या व्यापारात आक्रमकतेने उतरावे लागेल.
चीनने ही प्रगती काही एका रात्रीत केलेली नाही. त्यासाठी चीनला 35-40 वर्षे नेटाने प्रयास करावे लागले. हे त्यांनी कसे केले हे पाहणे महत्त्वाचे आहे. चीनने 30-35 वर्षापूर्वी बांबू हा लाकडाला उत्तम पर्याय आहे, असे जाहीर करून त्यासाठी बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. यासाठी स्वतंत्ररित्या वेगवेगळ्या हवामानात वाढणार्या बांबूवर संशोधनाला प्रोत्साहन दिले, दर एकरी वाढीव उत्पन्नासाठीचे तंत्रज्ञान विकसित केले व ते शेतकर्याच्या बांधावर नेऊन पोचवले. दर्जेदार पण त्या-त्या हवामानात उत्तम वाढणार्या प्रजातींचा प्रसार केला व त्या उपलब्ध करून दिल्या. दर एकरी उत्पन्न वाढवताना उत्कृष्ट दर्जाचा बांबू निर्माण झाला पाहिजे, अशी शिकवण शेतकर्यांना दिली. त्याचवेळी तयार झालेल्या बांबूचा वापर पूर्णपणे होण्यासाठी उत्पादन क्षेत्राच्या जवळपास त्यावर पूर्व-प्रक्रिया (झीश-िीेलशीीळपस) करणारी केंद्रे उभारून त्या त्या उद्योगाला उपयोगी पडणारा कच्चा माल पुरवठा करणारी यंत्रणा उभी केली. आजच्या भाषेत भक्कम पुरवठा साखळी निर्माण केली. यामुळे खेडे स्तरावर रोजगार वाढवला. अख्ख्या बांबूचा वाहतूक खर्च वाचवला, ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून दिला, जेथे कच्चा माल आहे तेथेच विविध प्रकारचे बांबू आधारित कारखाने काढण्यास प्रोत्साहन दिले (अपक्षळ र्लेीपीूं), प्रसंगी तैवान या कट्टर शत्रूराष्ट्राकडून मशिनरी आयात केली. तंत्रज्ञांना कामाला लावून त्या मधून चीनमधील बांबूसाठी उपयुक्त ठरेल अशी मशिनरी तयार केली. सर्व विकसित तंत्रज्ञान व व्यापाराच्या संधी यासाठी ग्रामीण स्तरावर तंत्रज्ञान पोचवले, जगाच्या बाजारात नेमकी कशाची गरज आहे हे ओळखून त्याप्रमाणे उत्पादन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. चीनमध्ये एकेकाळी आपल्यासारखेच हेक्टरी 3-5 टनापर्यंत उत्पन्न मिळत होते. 2015 सालच्या माहितीनुसार ते आता 20 टनाच्या आसपास आहे, पुढील काही वर्षांत ते 40 टनाच्या आसपास जावे यासाठी प्रयत्न चालू आहे.
या तुलनेत आपण कोठे आहोत. हा विचार साहजिकच आपल्या मनात येईल. माजी पंतप्रधान कै. अटलजींच्या प्रेरणेने व सुरेश प्रभू यांच्या अभ्यास व प्रयत्नातून राष्ट्रीय बांबू मिशनची स्थापना झाली. पण त्याला अस्तित्वात यायला 2006 साल उजाडले.
सत्तापालट झाल्यामुळे आणि बांबूचे गांभीर्य लक्षात न येण्यामुळे आपण 10-12 वर्षे वाया घालवली. पुन्हा 2017 साली बांबू मिशनचे काम चालू झाले. प्रत्येक प्रांतात हे काम चालू आहे. त्यामध्ये काम करणार्या लोकांना अजूनही बांबू हे वनोपज म्हणूनच महत्त्वाचे वाटते. लागवडीखालील बांबू हाच खरा खात्रीचे औद्योगिक कच्चा माल म्हणून उपयोगी पडू शकतो. आपले दर एकरी सरासरी उत्पन्न हे 1-2 टनांच्या आसपास रेंगाळते आहे. त्याचे कारण आमच्या वनामध्ये तयार होणारा निकृष्ट बांबू हे आहे. आजही आमचा शेतकरी एकरी 5-10 टनांपर्यंत उत्पन्न काढतो आहे. सरासरीच्या साठमारीत त्याची कुचंबणा होते आहे. अजूनही बांबू मिशन वनातल्या बांबूतच घोटाळते आहे. वनातील बांबूची प्रत सुधारलीच पाहिजे पण त्याचबरोबर लागवडीच्या बांबूसाठी स्वतंत्र प्रयत्न व प्रोत्साहन मिळणे नितांत गरजेचे आहे. बांबूची लागवड, हवामानानुसार योग्य व उद्योगाला उपयुक्त अशा प्रजातींवर अजूनही अभ्यास झालेला नाही. केवळ उतीसंवर्धनाने उपलब्ध आहेत म्हणून कोणत्याही प्रजाती पुरवल्या जातात. शेतकरी माहिती नसल्याने व सबसिडीच्या लोभापायी त्या प्रजाती लावत आहेत. या प्रजाती त्या हवामानात कशा येतात हे ना शेतकर्याला व ना पुरवठा करणार्या माहिती आहे. ही फार धोकादायक परिस्थिती आहे. बांबू हे बहुवार्षिक पीक आहे. एकदा लावल्यावर किमान 25-30 वर्षेतरी ते शेतात राहते. जर अशी लागवड फसली तर शेतकरी पुन्हा बांबूचे नाव काढणार नाही आणि देशाचे अपरिमित नुकसान झालेले असेल.
एक बांबूप्रेमी म्हणून आणि बांबूचा ध्यास घेतलेली व्यक्ती म्हणून यात बदल होऊन भारतीय बांबूचे जागतिक बाजारात अव्वल स्थान असावे असे वाटते.
यासाठी आपल्याला जगातील देशांनी विशेषतः चीनने काय मार्ग चोखाळला हे पाहावे लागेल. कोकणात, विदर्भात, सातपुड्यात परंपरागत बांबू आहे. त्याचा नीट अभ्यास करून हे चित्र बदलण्यासाठी चीनने 70च्या दशकापासून कशी प्रगती केली ही आपण पुढच्या काही भागात पाहू. त्याचबरोबर भारतात काय परिस्थिती आहे हे पण पाहूया. घिसाडघाईने काही न करता जर शास्त्रीय आणि तांत्रिक प्रयत्न केले तर आपण चीनला टक्कर देऊ शकू.
संचालक, वेणू वेध बांबू संशोधन संस्था, पुणे.